Thursday, 2 March 2023

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 02.03.2023 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 02 March 2023

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ०२ मार्च २०२ दुपारी १.०० वा.

****

पुण्यातल्या कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसचे रविंद्र धंगेकर विजयी झाले आहेत. त्यांनी भारतीय जनता पक्षाचे हेमंत रासने यांचा जवळपास ११ हजार मतांनी पराभव केला. धंगेकर यांना ७३ हजार १९४, तर रासने यांना ६२ हजार २४४ मतं मिळाली. मात्र अद्याप धंगेकर यांच्या विजयाची अधिकृत घोषणा होणं बाकी आहे. चिंचवड विधानभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या अश्विनी जगताप आघाडीवर आहेत.

त्रिपुरा, मेघालय आणि नागालँड विधानसभा निवडणुकीसाठी देखील आज मतमोजणी होत आहे. त्रिपुरामध्ये भाजप - आयपीएफटी युती ३३ जागांवर आघाडीवर आहे, मेघालयमध्ये नॅशनल पिपल्स पार्टी २४ जागांवर, तर नागालँडमध्ये भाजप - एनडीपीपी युती ३६ जागांवर आघाडीवर आहे.

***

भारतीय राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महासंघ - नाफेडने तीन शेतकरी उत्पादक कंपन्याच्या माध्यमातून दहा ठिकाणी कांदा खरेदी सुरू केली आहे. या कंपन्यांनी बाजार समितीत कांदा खरेदी केंद्र सुरू केली नसतील तर त्यांना बाजार समितीमध्ये कांदा खरेदी केंद्र सुरू करण्याचे आदेश देऊ, अशी माहिती, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली. छगन भुजबळ यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता. आतापर्यंत नाफेड मार्फत १८ हजार ७४३ क्विंटल कांदा खरेदी केली असल्याची माहिती त्यांनी दिली. या शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी स्थापन केलेल्या समितीचा अहवाल आल्यानंतर शेतकऱ्यांना मदत जाहीर करू असंही फडणवीस यांनी सांगितलं.

स्वयंपाकाच्या गॅसच्या सिलिंडरवरचा मूल्यवर्धित कर कमी करावा अशी मागणी जयंत पाटील यांनी आज विधानसभेत केली. थकीत वीज बिल असलेल्या शेतकऱ्यांची वीज जोडणी अधिवेशनापर्यंत तोडू नये, त्यानंतर तोडावी असे आदेश सरकारने दिल्याचा आरोप त्यांनी केला. याप्रकरणी महविकास आघाडीच्या सरकारने मूल्यवर्धित कर कमी केला नव्हता असं उत्तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं. यानंतर विरोधी पक्षाच्या सदस्यांनी गोंधळ करत सभात्याग केला.

***

विधानपरिषदेत आज राज्यपालांच्या अभिभाषणावर धन्यवाद प्रस्तावावरच्या चर्चेला पुन्हा सुरुवात झाली. राज्यपालांच्या अभिभाषणात सरकारची ध्येय धोरणं प्रतीत झालेली नाहीत, असं सांगत, हे अभिभाषण जनतेच्या हिताचं नाही, अशी टीका करत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी, या अभिभाषणाला विरोध दर्शवला.

***

निवडणूक आयुक्त नेमणुकीची प्रक्रिया बदलण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत. त्यामुळे आता केंद्र सरकारला थेट निवडणूक आयुक्त आणि निवडणूक आयोग नेमता येणार नाही. यासंदर्भात दाखल याचिकेवर आज झालेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने, यापुढे समिती स्थापन करुन ही निवड केली जाईल, असं सांगितलं. या समितीत पंतप्रधान, विरोधी पक्षनेते आणि सरन्यायाधीशांचा समावेश असेल.  निवडणूक आयुक्त आणि निवडणूक आयोग नेमण्यासाठी संसदेत कायदा करण्याचे निर्देशही सर्वोच्च न्यायालयानं दिले असून, जोपर्यंत हा कायदा होत नाही, तोपर्यंत समितीच्या माध्यमातूनच निवडणूक आयुक्त नेमले जातील, असं स्पष्ट केलं आहे.

***

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेना लवकरच राज्यभरात शिवधनुष्य यात्रा काढणार आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर मिळालेलं पक्षचिन्ह आणि पक्षाचं नावं हे राज्याच्या कानाकोपऱ्यात नेलं जाणार असून, महाराष्ट्राचा स्वाभिमान, माझा धनुष्यबाण असं या यात्रेचं घोषवाक्य असेल. या यात्रेदरम्यान, मार्च महिन्याच्या शेवटी अयोध्या इथं जाण्याची शिवसेनेची तयारी सुरू असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

***

राज्यात तालुका, जिल्हा आणि उच्च न्यायालयात ई-फायलिंग सक्तीला ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. महाराष्ट्र आणि गोवा वकील परिषद पदाधिकारी आणि उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती यांच्यात नुकत्याच झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. ई फायलिंगमध्ये काहीच वकिलांचा एकाधिकार टाळण्यासाठी वरिष्ठ वकिलांनी देखील तंत्रज्ञान अवगत करत याबाबतचं प्रशिक्षण घेतलं पाहिजे असं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

***

हिंगोली जिल्ह्यात वसमत तालुक्यातल्या आंबा चौंडी फाट्याजवळ एका १९ वर्षीय तरुणीस कारने उडवल्याची घटना घडली. आज पहाटे हा अपघात झाला. कन्याकुमारी भोसले असं मयत तरुणीचं नाव असून, ती पोलिस भरतीची तयारी करत होती, असं आमच्या वार्ताहरांन कळवलं आहे.

***

भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान इंदूर इथं सुरु असलेल्या तिसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या आजच्या दुसऱ्या दिवशी, शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या दुसऱ्या डावात दोन बाद ३२ धावा झाल्या होत्या. तत्पूर्वी आज ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव १९७ धावांवर संपुष्टात आला. या डावात भारताकडून रविंद्र जडेजानं चार, तर रविचंद्रन अश्विन आणि उमेश यादवनं प्रत्येकी तीन बळी घेतले. भारत ५६ धावांनी पिछाडीवर आहे.

//**********//

No comments:

Post a Comment