Thursday, 2 March 2023

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 02.03.2023 रोजीचे सकाळी 07.10 वाजताचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 02 March 2023

Time 7.10 AM to 7.25 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०२ मार्च २०२३ सकाळी ७.१० मि.

****

·      शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या आक्षेपार्ह वक्तव्यावरून विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज बाधित

·      ाऊत यांच्याविरुद्ध हक्कभंगाची सूचना दाखल, दोन दिवसांत चौकशी करुन निर्णय जाहीर करण्याची विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची घोषणा 

·      देशद्रोही संबोधल्याबद्दल विधानपरिषदेत विरोधकांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरुद्ध हक्कभंग प्रस्ताव दाखल

·      आम्हीच शिवसेना असल्याचा एकनाथ शिंदे गटाचा घटनापीठासमोरील सुनावणी दरम्यान दावा

·      पुण्यातल्या कसबा पेठ आणि चिंचवड विधानभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीची आज मतमोजणी

·      घरगुती स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरच्या दरात ५० रुपये तर व्यावसायिक सिलिंडरच्या किंमतीत ३५० रुपयांची वाढ

·      राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची दहावीची परीक्षा आजपासून सुरु

आणि

·      बॉर्डर-गावस्कर मालिकेत तिसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात पहिल्या दिवसअखेर ऑस्ट्रेलियाची भारतावर ४७ धावांची आघाडी

****

शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या आक्षेपार्ह वक्तव्यावरून विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज काल बाधित झालं. काल सकाळी कोल्हापूर इथं पत्रकारांशी बोलताना, राऊत यांनी, विधीमंडळ नव्हे चोरमंडळ असा उल्लेख केला. त्यावरून विधानसभेत सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी राऊत यांच्यावर कारवाईची मागणी लावून धरली. विधीमंडळाच्या अवमानावर बोटचेपी भूमिका घेऊ नये, असं आवाहन आशिष शेलार यांनी केलं.

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी याबाबत बोलताना, पक्षीय मतभेद बाजूला ठेवून या प्रकरणाचा गांभिर्यानं विचार व्हावा, तथ्य तपासून योग्य तो निर्णय विधीमंडळानं घ्यावा, असं मत व्यक्त केलं. नाना पटोले, अशोक चव्हाण यांच्यासह विरोधी पक्षातल्या नेत्यांनीही या विधानाबाबत नाराजी व्यक्त केली. सत्ताधारी पक्षाकडून अतुल भातखळकर तसंच भरत गोगावले यांनी हक्कभंगाची सूचना दाखल केली. सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी राऊतांवर कारवाईच्या मागणीसाठी हौद्यात उतरून घोषणाबाजी सुरू केली. त्यामुळे सदनाचं कामकाज सुरवातीला चार वेळा आणि नंतर दिवसभरासाठी स्थगित झालं होतं.

याप्रकरणी दोन दिवसांत चौकशी करुन निर्णय जाहीर करणार असल्याचं अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सांगितलं. ते म्हणाले...

“प्रस्तूत सूचनेअन्वये उपस्थित करण्यात आलेली बाब अत्यंत गंभीर असून सार्वभौम सभागृहाच्या घटनात्मक कारवाईवर प्रतिकुल परिणाम करणारी तसेच विधीमंडळातील सन्माननीय सदस्यांचा, संपूर्ण सभागृहाचा व एकूणच महाराष्ट्रातील जनतेचा अपमान ठरत असल्याचे माझे प्राथमिक मत आहे. त्यामुळे या प्रकरणी सखोल चौकशी होणे अत्यंत आवश्यक आहे. सबब प्रकरणी दोन दिवसांत चौकशी करून बुधवार दिनांक आठ मार्च २०२३ रोजी मी सभागृहास याबाबतचा पुढचा निर्णय जाहीर करीन.’’

विधान परिषदेतही हा मुद्दा उपस्थित झाला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच प्रवीण दरेकर यांनी कारवाईची मागणी केली. राऊत यांचं विधान हे विधीमंडळाचा अपमान करणारं असून, सर्व सदस्यांनी याचा एकमताने निषेध करून असा अपमान खपवून घेणार नसल्याचा संदेश, विधिमंडळानं देणं आवश्यक असल्याचं फडणवीस म्हणाले.

विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी हे वक्तव्य समर्थनीय नसल्याचं सांगत, हे वक्तव्य त्यांनी कोणत्या पार्श्वभूमीवर आणि कोणासाठी केलं, हे तपासून पाहण्याची मागणी केली. मात्र विरोधकांना देशद्रोही म्हणणाऱ्यांवर काय कारवाई करणार, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. यानंतर दोन्ही बाजूंनी गदारोळ वाढत गेल्यानं उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे यांनी सदनाचं कामकाज दिवसभरासाठी स्थगित करत असल्याचं सांगत, यासंदर्भात योग्य तो निर्णय घेणार असल्याचं सांगितलं, मात्र संबंधितांना अटकेसंदर्भातला अधिकार राज्यसरकारचा आहे, त्यामुळे सदस्यांनी ती मागणी उपमुख्यमंत्र्यांकडे करण्याचा सल्ला उपसभापतींनी दिला. त्या म्हणाल्या...

“एकूण सगळ्यांच्या भावना पाहिल्या. मी यामध्ये माझा निर्णय दिलेला आहे की मी तपासून घेते आणि उद्या सकाळी मी हक्कभंगाच्या संदर्भामधला माझा निर्णय जाहीर करते. हे देखील स्पष्ट केलेलं आहे, की अटक करण्याच्या संदर्भामध्ये तुम्ही माझ्याकडे बघून जी मागणी करताय ती तुम्ही माननीय गृहमंत्र्यांच्याकडे मागणी करू शकता. तो माझा अधिकार घेणं स्वतःच्या हातामध्ये एखाद्या खासदाराला मला योग्य वाटत नाही. पण हक्कभंगाबद्दलचा निर्णय मी घेईन.’’

दरम्यान, सरकारच्या चहापानाला उपस्थित न राहणाऱ्या विरोधकांना देशद्रोही संबोधल्याबद्दल विधानपरिषदेत विरोधकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरुद्ध हक्कभंग दाखल केला. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली काल उपसभापती निलम गोर्हे यांच्याकडे हा हक्कभंग प्रस्ताव सादर करण्यात आला.

****

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी हक्कभंग समितीची स्थापना केली आहे. या समितीच्या प्रमुखपदी आमदार राहुल कुल यांची नियुक्ती करण्यात आली असून, सदस्यांमध्ये नितेश राणे, अतुल भातखळकर, योगेश सागर, अमित साटम, अभिमन्यू पवार, संजय शिरसाठ, दिलीप मोहिते पाटील, सदा सरवणकर, माणिकराव कोकाटे, सुनील भुसारा, नितीन राऊत, सुनिल केदार, विनय कोरे, आणि आशिष जयस्वाल यांचा समावेश आहे.

हक्कभंग समितीकडून संजय राऊत यांना आज कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येणार आहे. विधानसभेचा अवमान किंवा हक्कभंगास कारणीभूत व्यक्तीला शिक्षा करण्याचा अधिकार हा सभागृहाला असतो. अवमान करणारा व्यक्ती स्वतः आमदार असेल तर सभागृहातून त्याची हकालपट्टी केली जाऊ शकते. संबंधित व्यक्ती सभागृहाबाहेरील असेल तर त्याला तुरुंगवासापर्यंत शिक्षा होऊ शकते, किंवा समज देऊन सोडून दिलं जाऊ शकतं.

****

नाशिकमधल्या गोंदे औद्योगिक वसाहतीतील जिंदाल पॉलिफिल्म्स कंपनीत झालेल्या भीषण दुर्घटनेप्रकरणी, कंपनीच्या व्यवस्थापकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, तत्काळ अटकेची कारवाईचे आदेश पोलिसांना देण्यात येतील, अशी माहिती, कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी काल विधान परिषदेत दिली. राष्ट्रवादी काँग्रेसचे विक्रम काळे यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेला ते उत्तर देत होते.

दरम्यान, विधान परिषदेत राज्यपालांच्या अभिभाषणाच्या आभार प्रस्तावावर चर्चेला सुरवात झाली. प्रवीण दरेकर यांनी हा प्रस्ताव मांडला. प्राध्यापक राम शिंदे यांनी या आभार प्रस्तावाला अनुमोदन दिलं.

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या काल तिसऱ्या दिवशी विरोधी पक्षांनी विधान भवनच्या पायऱ्यांवर जोरदार आंदोलन केलं. घरगुती गॅसचे दर कमी करा, शेतकऱ्यांना दिवसा १२ तास वीज द्या, शेतकऱ्यांची वीज तोडणी बंद करा, अशा मागण्या विरोधकांनी यावेळी केल्या.

****

राज्याच्या सत्तासंघर्षांच्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीशांच्या नेतृत्वाखालच्या घटनापीठात काल सलग दुसऱ्या दिवशी सुनावणी झाली. पक्षात फूट पडल्याचं आपण म्हटलं नाही किंवा आम्ही कुठल्या पक्षात सहभागी झालेलो नाही किंवा नवा पक्षही स्थापना केलेला नाही. आम्हीच शिवसेना आहोत, असा दावा एकनाथ शिंदे यांचे वकील नीरज किशन कौल यांनी केला. आम्हाला मुख्यमंत्र्यांवर विश्वास नव्हता, त्यांनी महाविकास आघाडीसोबत राहू नये असं आमचं मत होतं, असं त्यांनी न्यायालयात सांगितलं. निवडणूक पूर्व आघाडी भाजपासोबत असताना निवडणुकीनंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत आघाडी स्थापन करणं अयोग्य असल्याचं आमचं म्हणणं असल्याचं कौल म्हणाले.

संविधानाच्या १० परिशिष्टानुसार विरोधी गटानं पूर्वीच्या पक्षावर दावा केला किंवा नवा राजकीय पक्ष स्थापन केला तरी काही फरक पडत नाही, शिंदे गटालाही हा नियम लागू होतो.  असं सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड म्हणाले.

बहुमत चाचणीचा राज्यपालांनी घेतलेला निर्णय योग्यच होता असा दावा कौल यांनी केला. जेव्हा बहुसंख्य आमदार सरकारवर विश्वास नसल्याचं सांगतात, तेव्हा बहुमत चाचणीशिवाय कोणता पर्याय असतो, असा सवालही त्यांनी केला.

****

पुण्यातल्या कसबा पेठ आणि चिंचवड विधानभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीची मतमोजणी आज होणार आहे. याठिकाणी गेल्या २६ तारखेला सरासरी ५० टक्के मतदान झालं होतं. जिल्हा प्रशासनानं मतमोजणी केंद्राच्या परिसरात प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. त्रिपुरा, नागालँड आणि मेघालय विधानसभा निवडणुकीची मतमोजणी देखील आज होणार आहे

****

घरगुती स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरच्या किंमतीत ५० रुपये आणि व्यावसायिक सिलिंडरच्या किंमतीत ३५० रुपयांची वाढ झाली आहे. त्यानुसार आता दिल्लीत घरगुती एलपीजी सिलेंडरची किंमत एक हजार १०३ रुपयांवर पोहोचली आहे. तर, मुंबईत एलपीजीचे दर एक हजार १०२ रुपये ५० पैसे इतके झाले आहेत.

****

राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं घेण्यात येणारी दहावीची परीक्षा आजपासून सुरु होत आहे. या परीक्षेसाठी राज्यातल्या २३ हजार १९ शाळांमधून एकूण १५ लाख ७७ हजार २५६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. २५ मार्चपर्यंत चालणारी ही परीक्षा राज्यात ५ हजार ३३ मुख्य केंद्रांवर घेतली जाणार आहे. शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी काल ही माहिती दिली.

****

राज्य शासनानं औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्यांचं नामांतर केल्यानंतर राज्य मार्ग परिवहन महामंडळानं देखील अधिकृतरित्या या दोन जिल्ह्यांची नावं बदलली आहेत. महामंडळानं काल यासंदर्भात पत्रक जारी केलं असून, औरंगाबाद आणि उस्मानाबाद मध्यवर्ती बसस्थानकांचं नाव आता छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव असं केल्याचं सांगितलं आहे. राज्यातल्या सर्व परिवहन महामंडळांच्या विभाग नियंत्रकांनी ज्याठिकाणी औरंगाबाद आणि उस्मानाबाद असं नावं असेल, त्याठिकाणी छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव नाव देण्याचे निर्देश मंडळानं दिले आहेत.

****

हिंगोली जिल्ह्यात औंढा तालुक्यात लिगो प्रकल्पासंदर्भात, केंद्रीय अंतराळ आणि अणुऊर्जा विभागाचे राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांच्यासह, पृथ्वीविज्ञान विभागाचे सचिव डॉ. एम. रविचंद्रन यांच्या भेटी संदर्भात सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. या प्रकल्पासंदर्भात लवकरच बैठक बोलावली जाणार असल्याची माहिती, खासदार हेमंत पाटील यांनी दिली आहे.

****

महावितरणनं मागणी केलेली ३७ टक्के वीज दरवाढ पूर्णपणे रद्द करण्यात यावी, या मागणीसाठी, काल छत्रपती संभाजीनगर मधल्या वाळूज महानगर इथल्या, मराठवाडा असोसिएशन ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज अँड ॲग्रीकल्चर - मसिआच्या कार्यालयासमोर, वीजदरवाढ प्रस्तावाची होळी करण्यात आली. महावितरण कंपनीनं ६७ हजार ६४४ कोटी रुपये तुटीच्या भरपाईसाठी प्रस्तावित केलेली वीज दरवाढ अन्यायकारक असून, त्यानं राज्याची उद्योग भरारी रोखली जाणार आहे. तसंच सर्व सर्वसामान्य घरगुती आणि व्यावसायिक वीज ग्राहकांचं कंबरडं मोडणारी ही दरवाढ असेल. प्रस्तावित दरवाढ रद्द करून दिलासा देण्याची मागणी मसिआच्यावतीनं करण्यात आली.

****

बॉर्डर-गावस्कर कसोटी क्रिकेट मालिकेत इंदूर इथं सुरु झालेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात काल पहिल्या दिवसअखेर ऑस्ट्रेलियानं भारतावर ४७ धावांची आघाडी घेतली आहे. भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीची निवड केली. मात्र भारताचा पहिला डाव १०९ धावांवरच आटोपला. सुरुवातीच्या तासाभरातच भारताचा  निम्मा संघ तंबूत परतला. दिवसअखेर, ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावात चार बाद १५६ धावा झाल्या होत्या. भारतातर्फे रविंद्र जडेजानं ४ बळी घेतले.

****

कुसुम महोत्सवाला कालपासून नांदेड इथं प्रारंभ झाला. प्रसिद्ध अभिनेते वैभव मांगले, प्रसिद्ध गायिका वैशाली सामंत यांच्या उपस्थितीत या महोत्सवाचं उद्‌घाटन झालं. देशाचे माजी गृहमंत्री डॉ.शंकरराव चव्हाण यांच्या पत्नी दिवंगत कुसुमताई चव्हाण यांच्या स्मृतिप्रित्यर्थ यशवंत महाविद्यालयाच्या मैदानावर उद्यापर्यंत हा महोत्सव चालणार आहे.

****

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पैठण इथं साजरा होणाऱ्या ४२४व्या नाथषष्ठी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर भाविकांना तत्पर सेवा देण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावं, अशी सूचना, जिल्ह्याचे पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी दिली आहे. काल झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. शहर सुशोभीकरणासाठी जिल्हा नियोजन समितीमार्फत निधी उपलब्ध करुन देण्यात येणार असून, यात नागरिकांनी देखील पुढाकार घेण्याचं आवाहन भूमरे यांनी यावेळी केलं.

****

बीड इथं काल महिला आयोगाच्या जनसुनावणीला जिल्ह्यातील तक्रारदार पीडित महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. सुनावणीसाठी नियुक्त तीनही पॅनल समित्यांनी तक्रारदारांचं म्हणणं ऐकून घेतलं. सदर तक्रारींवर तातडीने कार्यवाहीच्या सूचना करुन संबंधित विभागांकडे पाठवण्यात आल्या. सुमारे साठ तक्रारींची दखल काल घेण्यात आली. यानंतरही महिला तक्रारदारांनी मोठया संख्येने जिल्हाधिकारी कार्यालय तसंच शासकीय विश्रामगृह इथं आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची भेट घेऊन निवेदनं तसंच तक्रारी सादर केल्या.

****

शेतकऱ्यांकडे फायदेशीर शेती करण्यासाठी उच्च कृषी तंत्रज्ञान अत्यावश्यक असल्याचं मत नांदेडचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी व्यक्त केलं आहे. नांदेड इथं आयोजित कृषि महोत्सव आणि बचत गटातल्या महिलांनी  उत्पादित केलेल्या वस्तुचे प्रदर्शन आणि विक्री मेळाव्याच्या उद्घाटन प्रसंगी ते काल बोलत होते. शेतकऱ्यांनी शेतमालावर आधारित उद्योग उभारावेत तसंच उत्पादनाच्या विक्रीवरही भर द्यावा असं त्यांनी यावेळी सांगितलं. हा महोत्सव चार दिवस सुरु राहणार आहे. 

****

छत्रपती संभाजीनगर शहरात जी-20 बैठकीनिमित्त करण्यात आलेल्या सुशोभीकरणाचं नुकसान करणाऱ्या चारचाकी चालकाला ८२ हजार ९८४ रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. महानगरपालिकेच्या उद्यान विभागाकडून शहरातल्या सेव्हनहिल उड्डाणपुलावरच्या रस्ता दुभाजकावर ठेवण्यात आलेल्या शोभिवंत झाडांसह सिमेंट आणि फायबरच्या कुंड्या कार चालकांनं धडक देऊन नुकसान केलं. फरार चालकाविरोधात जवाहन नगर पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे.

****

दौंड निझामाबाद दौंड ही रेल्वे गाडी येत्या २६ मार्चपर्यंत रद्द करण्यात आली आहे. मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागात बेलापूर पुणतांबा स्थानकादरम्यान उद्‌भवलेल्या तांत्रिक कारणांमुळं ही रेल्वेगाडी रद्द करण्यात आल्याचं नांदेडच्या जनसंपर्क कार्यालयानं कळवलं आहे. 

दक्षिण मध्य रेल्वेने होळी निमित्त काचीगुडा ते बिकानेर दरम्यान विशेष गाडीची एक फेरी करण्याचा निर्णय घेतला आहे. ही गाडी नांदेड, पूर्णा, हिंगोली, अकोला मार्गे धावणार आहे. चार मार्चला ही गाडी काचिगुडा इथून तर सात मार्चला बिकानेर इथून सुटणार आहे.

****

No comments:

Post a Comment