▼

Saturday, 4 March 2023

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 04.03.2023 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 04 March 2023

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ०४ मार्च २०२३ दुपारी १.०० वा.

****

यंदाच्या अर्थसंकल्पामुळे पायाभूत सुविधा क्षेत्राला नवी ऊर्जा मिळेल, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. पायाभूत सुविधा आणि गुंतवणूक - पीएम गतीशक्ती राष्ट्रीय कृती योजना, या विषयावरच्या अर्थसंकल्प पश्चात वेबिनारमध्ये ते आज बोलत होते. देशाच्या विकासाच्या प्रक्रियेत पायाभूत सुविधांचा विकास हा नेहमीच महत्त्वाचा आधारस्तंभ राहिला आहे, असं त्यांनी नमूद केलं. नॅशनल इन्फ्रास्ट्रक्चर पाइपलाइन अंतर्गत, सरकारनं येत्या काही वर्षांत ११० लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचं उद्दीष्ट ठेवलं असल्याचं, पंतप्रधानांनी सांगितलं. राष्ट्रीय महामार्गांचं आजचे सरासरी वार्षिक बांधकाम २०१४ पूर्वीच्या तुलनेत जवळपास दुप्पट झालं असून, स्वातंत्र्यानंतर आधुनिक पायाभूत सुविधांवर आवश्यक तेवढा भर दिला गेला नाही, असं पंतप्रधान म्हणाले.

****

मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स यांची भेट घेतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला आहे. गेट्स यांच्या ट्विटला उत्तर देताना पंतप्रधानांनी, दोघांमध्ये महत्त्वाच्या मुद्द्यांवर विस्तृत चर्चा झाल्याचं सांगितलं.

बिल गेट्स यांनी आपल्या ब्लॉगमध्ये पंतप्रधान मोदी यांची प्रशंसा केली आहे. दोघांमध्ये झालेल्या भेटीचा दाखला देत त्यांनी, मोदी आपल्या वेळेच्या बाबतीत अत्यंत काटेकोर असल्याचं म्हटलं आहे. विज्ञान आणि नाविन्यपूर्ण कल्पकता यांच्या संयोगातून भारत आणि संपूर्ण जगामधली असमानता कशी दूर येईल, याविषयी त्यांचा दृष्टीकोन अतिशय सुस्पष्ट असल्याचं गेट्स यांनी नमूद केलं आहे.

****

युवा उत्सव-इंडिया@2047 ला आजपासून प्रारंभ होत आहे. केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री, अनुराग सिंग ठाकूर यांच्या हस्ते आज या उत्सवाचं उद्‌घाटन होईल. देशभरातल्या १२ ठिकाणी या उत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे, त्यात महाराष्ट्रातल्या जळगावचा समावेश असून, राज्यातल्या १६ जिल्ह्यात आजपासून ३१ मार्चपर्यंत या कार्यक्रमाच्या पहिल्या टप्प्याचं आयोजन केलं जाणार आहे.

****

छत्रपती संभाजीनगर जिल्हा नियोजन निधीच्या माध्यमातून जिल्हा पोलीस दलासाठी, १४ नविन चार चाकी वाहनं उपलब्ध करून देण्यात आली आहे. पालकमंत्री संदिपान भुमरे यांच्या हस्ते आज या वाहनांचं लोकार्पण होणार आहे. शहरातल्या पोलिस अधिक्षक कार्यालयातल्या गोकुळ मैदानावर आज संध्याकाळी पाच वाजता, विशेष पोलीस महानिरीक्षक, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थिती हा सोहळा होणार आहे.

****

औरंगाबादचं छत्रपती संभाजीनगर नामकरण केल्याच्या निषेधार्थ खासदार इम्तियाज जलिल यांनी साखळी उपोषण सुरु केलं आहे. छत्रपती संभाजीनगर इथल्या जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर हे उपोषण करण्यात येत आहे. तर दुसरीकडे नामांतराच्या समर्थनार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्वाक्षरी मोहिम सुरु करणार आहे.

****

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापिठातल्या इतिहास आणि प्राचीन भारतीय संस्कृती विभागात, इतिहास वस्तूसंग्राहालयाच्या वर्धापन दिनानिमित्त, इतिहास महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. या महोत्सवात काल प्राध्यापक आर.एस गुप्ते व्याख्यानमाला घेण्यात आली. इतिहास हे समाजपरीवर्तनाचं साधन आहे. इतिहासामध्ये घटनेची पार्श्वभूमी घटना आणि त्या घटनेचा झालेला परीणाम हा महत्त्वाचा असतो. सामाजिक उपयोगिता ही ऐतिहासिक घटनेत असते, असं मत प्र- कुलगुरु डॉ. श्याम सिरसाठ यांनी उद्धाटनपर भाषणात व्यक्त केलं.

या व्याख्यानमालेत, लूकींग अँट द मराठाज फ्रॉम द पेरीफेरी, आणि चेंजिंग ट्रेण्डस आँफ मराठा हिस्ट्रोग्राफी न्यू रीसर्च अँण्ड अँप्रोच, या विषयांवर, सावित्रीबाई फूले पुणे विद्यापीठातले प्राध्यापक डॉ.आर.सी.दास यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. तर मराठ्यांच्या इतिहासाची साधने आणि महादजी शिंदे काळ आणि कर्तृत्व, या विषयावर, सेवानिवृत्त प्राध्यापक डॉ.चंद्रकांत अभंग यांनी व्याख्यान दिलं.

****

पंतप्रधान स्वनिधी योजनेअंतर्गत आज छत्रपती संभाजीनगर इथं केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ.भागवत कराड यांच्या प्रमुख उपस्थितीत प्राप्त लाभार्थ्यांना कर्ज वाटप करण्यात येणार आहे. आर्थिक समावेशन आणि वित्तसहाय्य अभियानाअंतर्गत भारतीय स्टेट बँकेच्या वतीनं हे कर्ज वाटप करण्यात येत आहे.

****

महिला प्रिमिअर लीगची आजपासून नवी मुंबईत होणार सुरूवात होत आहे. या स्पर्धेत एकूण पाच संघ खेळणार आहेत. आज या स्पर्धेतला पहिला सामना गुजरात जायंटस् आणि मुंबई इंडियन्स संघांदरम्यान डी.वाय. पाटील मैदानावर संध्याकाळी साडेसात वाजता होणार आहे. भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरपनप्रीत कौर ही मुंबई संघाचं, तर बेथ मुनी गुजरात संघाचं नेतृत्व करणार आहे. स्मृती मंधाना रॉयल चॅलेंजर्स बँगलोर संघाची कर्णधार असेल, ऑस्ट्रेलियाची मेग लॅनिंग दिल्ली कॅपिटल्सची, तर ऑस्ट्रेलियाचीच एलिसा हिली यु पी वॉरिअर्स संघाचं नेतृत्व करणार आहे.

 

//**********//

No comments:

Post a Comment