▼

Saturday, 4 March 2023

Text - आकाशवाणी औरंगाबाद दिनांक 04.03.2023 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजताचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 04 March 2023

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ०४ मार्च २०२३ सायंकाळी ६.१०

****

·      भावी पिढ्यांसाठी जलसुरक्षा आणि जलव्यवस्थेसंदर्भात प्रयत्न करण्याचं राष्ट्रपतींचं आवाहन.

·      राज्य सरकारच्या ‘सुविधा संपन्न कुटुंब मिशन आणि सर्वांगीण ग्रामसमृद्धी’ योजनेला प्रारंभ.

·      छत्रपती संभाजीनगर नामकरणाविरोधात खासदार इम्तियाज जलील यांचं साखळी उपोषण.

आणि

·      आकांक्षित जिल्हा कार्यक्रमांतर्गत उस्मानाबाद जिल्हा शैक्षणिक क्षेत्रात अव्वल.

****

भावी पिढ्यांसाठी जलसुरक्षा आणि जलव्यवस्थेसंदर्भात प्रयत्न करण्याचं आवाहन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं आहे. स्वच्छ भारत मिशन-ग्रामीण, जल जीवन मिशन आणि राष्ट्रीय जल मिशनच्या स्वच्छ सुजल शक्ती सन्मान २०२३चं वितरण आज राष्ट्रपतींच्या हस्ते झालं, त्यावेळी त्या बोलत होत्या. ग्रामीण भारतात शाळेत जाणाऱ्या मुलींचा वेळ पाणी आणण्यात जात होता आता मात्र हे चित्र बदलत चालल्याचं त्यांनी नमूद केलं. या कार्यक्रमात जलस्रोतांची शाश्वतता या संकल्पनेसह जलशक्ती अभियान - पावसाचे पाणी साठवा या मोहिमेचं उद्घाटनही राष्ट्रपतींनी केलं. जलशक्ती से नारी शक्ती या विषयावरची ध्वनिचित्रफीत आणि एका टपाल तिकीटाचं अनावरणही त्यांच्या हस्ते करण्यात आलं. जलशक्ती मंत्रालयाच्या विविध कार्यक्रमात उल्लेखनीय काम करणाऱ्या महिलांचा सन्मानही या कार्यक्रमात करण्यात आला.

****

देशाचा विकास, वारसा आणि मूल्य संवर्धनात युवकांनी योगदान देण्याचं आवाहन युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री, अनुराग सिंग ठाकूर यांनी केलं आहे. युवा उत्सव-इंडिया@2047चं पंजाबमधल्या रोपड इथं ठाकूर यांच्या हस्ते उद्‌घाटन झालं, त्यावेळी ते बोलत होते. देशभरात दीडशे जिल्ह्यातल्या शैक्षणिक संस्थांमध्ये ३१ मार्चपर्यंत युवा उत्सव आयोजित होणार असल्याचं ठाकूर यांनी सांगितलं. राज्यातल्या १६ जिल्ह्यात आजपासून ३१ मार्चपर्यंत या कार्यक्रमाच्या पहिल्या टप्प्याचं आयोजन केलं जाणार आहे.

****

रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून अंत्योदय साधण्यासाठी प्रशासनाचा चेहरा मानवी असण्याची आवश्यकता राज्यपाल रमेश बैस यांनी व्यक्त केली आहे. मुंबईत आज राज्यपालांच्या प्रमुख उपस्थितीत महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार, ग्रामीण रोजगार हमी योजना महाराष्ट्र आणि शासनाच्या १७ विभागांच्या योजनांचं अभिसरण करून तयार करण्यात आलेल्या ‘सुविधा संपन्न कुटुंब मिशन आणि सर्वांगीण ग्रामसमृद्धी’ योजनेचा शुभारंभ करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. राज्यात आज ६४ लाख कामगार २७ हजार ग्राम पंचायतींच्या माध्यमातून काम करत असून त्यांच्या माध्यमातून ८ लाखांपेक्षा अधिक शाश्वत संपदा निर्माण होत असल्याचं राज्यपालांनी सांगितलं.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी उपस्थित होते. मनरेगा सुविधा संपन्न कुटुंब आणि ग्रामसमृद्धी योजना समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचं काम प्रशासनाने करावं, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. नोकरी करण्यापेक्षा शेती केली तर मोठा लाभ होईल असे सांगून ‘काम मागणाऱ्यांपेक्षा काम देणारे हात तयार करा’ असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केलं.

****

राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत समाविष्ट न झालेल्या एपीएल केशरी शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना सवलतीच्या दराने दरमहा दरडोई पाच किलो धान्य देणारी योजना थांबवण्यात आली आहे. आता या शेतकऱ्यांना प्रतिमाह प्रतिलाभार्थी दीडशे रुपये देण्यात येणार आहेत. ही रक्कम थेट लाभ हस्तांतरण योजनेअंतर्गत लाभार्थी महिला कुटुंब प्रमुखाच्या बँक खात्यात जमा होणार आहे. राज्यातल्या १४ शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना जानेवारी २०२३ पासून हा निर्णय लागू होणार आहे.

****

औरंगाबादचं छत्रपती संभाजीनगर नामकरण केल्याच्या निषेधार्थ खासदार इम्तियाज जलील यांनी साखळी उपोषण सुरु केलं आहे. छत्रपती संभाजीनगर इथल्या जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर हे उपोषण करण्यात येत आहे. औरंगाबादचं नामांतर करण्याऐवजी नवीन शहर वसवून त्याला छत्रपती संभाजीनगर नाव द्यावं, असं आवाहन खासदार जलील यांनी केलं. ते म्हणाले –

(खासदार इम्तियाज जलील)

आमचं एकच म्हणणं आहे की औरंगाबादचं नाव होतं ते औरंगाबादच ठेवायला पाहिजे. आणि समजा सरकारला असं वाटत असेल नाही कोणाचं नाव द्यायचं आहे, तर एक नवीन शहर उभारा. आणि त्या शहराला तुम्ही तुम्हाला जे नाव द्यायचं ते द्या, आमचं काही म्हणणं नसणार. तुम्ही एक चांगलं आंतरराष्ट्रीय दर्जाचं शहर उभारा आणि त्याला छत्रपती संभाजी महाराजांचं नाव द्या.

****

कांद्याचे भाव घसरल्यानं पारनेरचे आमदार निलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं नगर- पुणे महामार्गावर सुपा चौकात आज सकाळी रस्ता रोको करत आक्रोश आंदोलन केलं. सरकारनं कांद्याच्या निर्यात धोरणामध्ये तातडीनं बदल करावेत तसंच नाफेड मार्फत कांद्याची खरेदी करण्यात यावी यासह विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलं. शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा प्रश्न असतानाही महसूल प्रशासनाचे अधिकारी आंदोलनाकडं आले नाहीत म्हणून लंके यांनी महसूल प्रशासनाचा निषेध केला. हे सरकार शेतकरी विरोधी असल्याचं सांगत लंके यांनी सरकारनं यावर योग्य निर्णय घेतला नाही तर पुन्हा हे आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला.

****

गुजरातमधील बेस्ट बेकरी हत्याकांड प्रकरणी मुंबई सत्र न्यायालयातील विशेष न्यायालयात १५ मार्चला पुढील सुनावणी होणार आहे. वर्ष २००२ मध्ये घडलेल्या या प्रकरणातील दोन आरोपी हर्षद सोलंकी आणि मफत गोहील गेल्या १० वर्षांपासून कारागृहात आहेत. १३ डिसेंबर २०१३ रोजी त्यांना न्यायालयीन कोठडीत सुनावण्यात आली. या दोन आरोपींबाबत निर्णय येण्याची शक्यता होती. मात्र निकालाचं वाचन पूर्ण न झाल्याने आता १५ मार्चला पुढील सुनावणी होणार आहे.

****

सोलापूरच्या पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर विद्यापीठाचा चौथा नामविस्तार दिनाचा सोहळा सोमवार ६ मार्च रोजी साजरा करण्यात येणार असून यानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आल्याची माहिती कुलसचिव योगिनी घारे यांनी दिली. सकाळी साडेअकरा वाजता विद्यापीठाच्या मुख्य सभागृहात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचं पूजन आणि अभिवादनाचा कार्यक्रम होईल. यावेळी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर अध्यासन केंद्राचं उद्घाटनही यावेळी होणार आहे.

****

आकांक्षित जिल्हा कार्यक्रम अंतर्गत उस्मानाबाद जिल्ह्याकडून शैक्षणिक क्षेत्रात करण्यात आलेल्या अभिनंदनीय कामगिरीबाबत जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांना अवर सचिव सुनिल शिंदे आणि अपर मुख्य सचिव तसंच विकास आयुक्त डॉ. राजगोपाल देवरा यांच्याकडून प्रशस्ती पत्र देण्यात आलं आहे. नीति आयोगाचे मिशन संचालकांनी मुख्य सचिवांना लिहिलेल्या पत्रात, नोव्हेंबर महिन्यात उस्मानाबाद जिल्ह्यानं शैक्षणिक क्षेत्रात अव्वल स्थान मिळवलं असून तीन कोटी रुपये अतिरिक्त निधी मिळण्यास उस्मानाबाद जिल्हा पात्र ठरल्याचं म्हटलं आहे.

****

आज छत्रपती संभाजीनगर इथं स्व मग्न मुलांसाठी काम करणाऱ्या आरंभ या संस्थेच्या वतीनं आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या अनुषंगानं आरंभ सक्षम पुरस्कार देऊन महिलांचा गौरव करण्यात आला. यामध्ये चाळीसगाव इथं दिव्यांगांसाठी काम करणाऱ्या स्वयंदीप संस्थेच्या संस्थापक मनिषा निकम, नाशिक इथं प्रबोधिनी दिव्यांग पुनर्वसन केंद्रातील शिक्षकेतर कर्मचारी सुजाता बलकवडे आणि दिव्यांग मुलांचं संगोपन करुन त्यांना सक्षम बनवणाऱ्या स्वाती रेवणकर यांना स्मृती चिन्ह, पाच हजार रुपये रोख आणि पुष्पगुच्छ देऊन गौरवण्यात आलं. यावेळी बोलताना, स्व मग्न मुलांसाठी सहानुभूतीची नाही तर मदतीची गरज असल्याचं मत पोलीस उपायुक्त अपर्णा गित्ते यांनी व्यक्त केलं.

****

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ निमित्त आज जालना जिल्हा कृषी विभागाच्या वतीनं शहरातून मिलेट दौड काढण्यात आली. जिल्हा कृषी अधिकारी कार्यालय ते गांधी चमन चौकापर्यंत काढण्यात आलेल्या या रॅलीत जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, जिल्हा कृषी अधिकारी भीमराव रणदिवे यांच्यासह जिल्हा प्रशासनातले अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येनं सहभाग घेतला. मानवी आहारात तृणधान्याचा समावेश अत्यंत महत्त्वाचा असून, या पिकांचं कमी होत असलेलं क्षेत्र वाढवणं गरजेचं असल्याचं जिल्हा कृषी अधिकारी रणदिवे यांनी रॅलीच्या समारोप प्रसंगी केलेल्या मार्गदर्शनपर भाषणात सांगितलं.

****

आज ४ मार्च हा दिवस राष्ट्रीय लाईनमन दिवस म्हणून साजरा केला जातो. छत्रपती संभाजीनगर इथं महावितरणतर्फे लाईनमन दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. परिमंडल कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात जनमित्रांचा गौरव करण्याबरोबरच विद्युत सुरक्षेची शपथ देण्यात आली.

राष्ट्रीय लाईनमन दिना निमित्त आज धुळे जिल्ह्यातल्या निजामपूर इथं आमदार मंजुळा गावित यांच्या हस्ते लाईनमन बांधवांचा सत्कार करण्यात आला. यावेळी वीज ग्राहकांना तसंच कृषी पंपांचा विज पुरवठा सुरळीत सुरु रहावा यासाठी वेळ प्रसंगी आपला जीव धोक्यात घालून काम करणारे लाईनमन हे खरे वीज योध्दा आहेत असे गौरवोद्गार यावेळी आमदार गावीत यांनी काढले.

****

छत्रपती संभाजीनगर इथल्या वाळूज एमआयडीसी पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मानसिंग रायासिंग घुनावत यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं दहा हजार रुपये लाच घेताना रंगेहात पकडलं.

****

No comments:

Post a Comment