Saturday, 4 March 2023

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 04.03.2023 रोजीचे सकाळी 07.10 वाजताचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 04 March 2023

Time 7.10 AM to 7.25 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०४ मार्च २०२३ सकाळी ७.१० मि.

****

·      नोकर भरतीसाठी वयोमर्यादेत दोन वर्षांची शिथिलता देण्याचा राज्यशासनाचा निर्णय जारी

·      दर्जेदार पायाभूत सुविधांच्या माध्यमातून महाराष्ट्राची वेगळी ओळख निर्माण करणार-मुख्यमंत्र्यांची ग्वाही

·      अंगणवाडी सेविका तसंच मदतनीसांच्या मानधनात सुमारे २० टक्के वाढीचा सरकारचा निर्णय

·      बारावी पेपर फुटी प्रकरणी गुन्हा दाखल; परीक्षा पुन्हा घेणार नाही-मंडळाकडून स्पष्ट

·      छत्रपती संभाजीनगर इथं उत्तरपत्रिकेसह पसार परीक्षार्थ्याविरुद्ध गुन्हा दाखल

·      विकासकामांना स्थगिती देणारा राज्य सरकारचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाकडून रद्द

·      प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात सहभागी महाराष्ट्राच्या चित्ररथाचं, आज तुळजापुरात प्रदर्शन

·      इंदूर कसोटीत ऑस्ट्रेलियाचा भारतावर नऊ गडी राखून विजय

आणि

·      मराठवाड्यात पुढच्या काही दिवसांत तुरळक पावसाची शक्यता

****

राज्याच्या शासकीय नोकर भरतीसाठी वयोमर्यादेत दोन वर्षांची शिथिलता देण्याचा शासन निर्णय काल जारी झाला. याचा लाभ ३१ मार्च २०२३ पर्यंत होणाऱ्या शासकीय नोकर भरतीसाठीच मिळणार आहे. तीन मार्च २०२२ ते ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत शासकीय सेवेत सरळसेवेने नियुक्तीसंदर्भात प्रसिद्ध होणाऱ्या जाहीरातींकरता अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी ही शिथिलता दिली जाणार आहे.

****

दर्जेदार पायाभूत सुविधांच्या माध्यमातून महाराष्ट्राची वेगळी ओळख निर्माण करणार असल्याची ग्वाही, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. काल विधानसभेत राज्यपालांच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावाच्या चर्चेला उत्तर देताना ते बोलत होते. येत्या दोन वर्षांत महत्त्वपूर्ण पायाभूत प्रकल्प मार्गी लावणार असून, राज्याचं वेगळं चित्र देशासमोर उभं करण्यासाठी प्रयत्न करत असल्याचं, मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. ते म्हणाले...

‘‘पुढच्या दीड दोन वर्षांमध्ये हे जे प्रकल्प हे मार्गी लावले आणि महाराष्ट्राचं एक वेगळं चित्र या देशापुढे आपल्याला उभं करायचं ते आम्ही उभं करणार. आम्ही निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काम करत नाही. निवडणुका असू द्या, नसू द्या आमचं काम कायम सुरू राहणार.’’

राज्यातली पाच लाख ३१ हजार हेक्टर नविन जमीन सिंचनाखाली आणणार असल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. यासाठी ३८ हजार कोटी रुपये खर्च करणार असल्याचं ते म्हणाले. विरोधी पक्षनेते अजित पवार, अतुल भातखळकर, संजय कुटे, सुरेश वरपुडकर, अशोक चव्हाण, छगन भुजबळ, अबु आझमी आदी सदस्यांनी या चर्चेत भाग घेतला. मुख्यमंत्र्यांच्या उत्तरानंतर राज्यपालांच्या अभिभाषणावर अभिनंदनाचा ठराव आवाजी मतदानानं मंजूर झाला.

****

अंगणवाडी सेविकांच्या मानधनात सुमारे २० टक्के वाढ करणार असल्याचं, महिला आणि बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सांगितलं आहे. ते काल विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात बोलत होते. मे महिन्यापूर्वी सेविकांची रिक्त पदं पूर्णपणे भरली जाणार, सर्व अंगणवाड्यांसाठी दीडशे कोटी रुपये निधीतून नवीन मोबाईल खरेदी केली जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली....

‘‘अंगणवाडी सेविकाओं के अंदर अपन मानधन के अंदर पहले हमारे विभाग ने दस प्रतिशत की मानधन वाढ के बारें मे प्रस्ताव रखा था। की ये बात बढाकर बीस प्रतिशत की जाये। बीस हजार एक सौ बयासी रिक्त पदं लंबे समय से रूके हुये थे। एक जनवरी से रिक्त पदं भरने का काम शुरू हुआ है। मई से पहले बीस हजार एक सौ पदं डायरेक्टली भर दिये जायेंगे। आता आपण नवीन मोबाईल खरेदी करायचा पण निर्णय केलेला आहे. एक सौ पचास करोड रूपया खर्च करून आपण सर्व अंगणवाड्यांसाठी नवीन मोबाईल खरेदी करणार आहे.’’

मिनी अंगणवाड्यांचं श्रेणीवर्धन करून, त्यांचं पूर्ण अंगणवाडीत रुपांतर करण्याचा निर्णयही सरकारनं घेतल्याची माहिती लोढा यांनी दिली. राज्यात कंटेनर अंगणवाडीला प्रायोगिक स्तरावर सुरवात होत असून, तीन महिन्यात दोनशे कंटेनर अंगणवाड्या सुरू केल्या जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

धनंजय मुंडे, बाळासाहेब थोरात, आदिती तटकरे यांनीही यासंदर्भात प्रश्न विचारले. मोबाईल ॲपमधली माहिती मराठीतून भरण्याची व्यवस्था करावी, असा मुद्दा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी उपस्थित केला. या ॲपमध्ये नावाशिवाय इतर सर्व माहिती मराठीतून भरण्यासाठी व्यवस्था आहे, नावही मराठीत भरण्याची व्यवस्था केली जाईल, असं लोढा यांनी सांगितलं. मात्र या प्रश्नांवर मंत्र्यांकडून समाधानकारक उत्तर मिळत नसल्याचं सांगत विरोधकांनी सभात्याग केला.

रम्यान, ाल विधानभवनात मुख्यमंत्री तसंच उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत कंटेनर अंगणवाडीचं ऑनलाईन पद्धतीने उद्घाटन करण्यात आलं. छत्रपती संभाजीनगरसह राज्यात नऊ जिल्ह्यात कंटेनर अंगणवाडीचा प्रयोग राबवला जाणार आहे.

****

जुन्या पेन्शन योजनेवर व्यवहार्य पर्यायांची चाचपणी करणार असल्याची माहिती, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधान परिषदेत दिली. नोव्हेंबर २००५ नंतरच्या कालावधीत सेवेत रुजू झालेल्या राज्य सरकारी कर्मचारी आणि शिक्षकांना, जुनी निवृत्तीवेतन योजना लागू करण्यासंदर्भात सरकार सकारात्मक असल्याचं, फडणवीस यांनी सांगितलं. ते म्हणाले..

‘‘सरकार याबद्दल निगेटीव्ह नाही, पण याचा आर्थिक ताळेबंद कसा बसवायचा? यासंदर्भात आमचा अभ्यास चाललेला आहे. काय अल्टरनेटीव्ह असू शकतात याचाही आम्ही अभ्यास करतो आहोत. जेवढ्या मान्यताप्राप्त कर्मचारी संघटना आहेत, यांनी जे अल्टरनेटीव्ह तयार केलेत यासंदर्भात, हे अधिवेशन संपल्यानंतर मी एक पूर्ण दिवस बसणार आहे, आणि त्यांच्याकडून देखील समजून घेणार आहे की तुमचा काय अल्टरनेटीव्ह आहे. त्यांच्या म्हणण्यात तथ्य असेल आणि असाच जर त्यांनी एखादा अल्टरनेटीव्ह दिला तर तो स्वीकारायची तयारी आपली आहे.’’

****

राज्यात द्रवरुप पेय ओषधांचं उत्पादन करणाऱ्या सर्व कंपनीच्या तपासणीसाठी विशेष मोहीम राबवावी, असे आदेश विधानसभेचे तालिका अध्यक्ष संजय शिरसाट यांनी दिले आहेत. तसंच औषधांची गुणवत्ता तपासण्याला अन्न आणि औषध प्रशासनामार्फत प्राधान्य देण्यात यावं, अशी सूचनाही त्यांनी केली आहे. विधानसभा सदस्य आशिष शेलार, विरोधी पक्षनेते अजित पवार, योगेश सागर, जयकुमार रावल यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे हा प्रश्न उपस्थित केला होता.

राज्यात कफ सिरपचं उत्पादन करणाऱ्या चार कंपन्यांचं उत्पादन बंद करण्यात आलं असून, सहा कंपन्यांचे परवाने निलंबित करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचं, अन्न आणि औषध प्रशासन खात्याचे मंत्री संजय राठोड यांनी या प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं.

****

राज्यातल्या आरोग्य सेवा - सुविधांच्या बळकटीकरणासाठी आरोग्य विभागातली रिक्त पदं लवकरच भरणार असल्याची माहिती, सार्वजनिक आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी काल विधानसभेत दिली.

****

राज्यात पतसंस्थांमधल्या कर्ज वितरण प्रकरणी येत असलेल्या अडचणी आणि ठेवी सुरक्षित करण्यासाठी येत्या पंधरा दिवसात विशेष तज्ज्ञ समिती नेमण्याची, घोषणा, सहकार मंत्री अतुल सावे यांनी काल विधानसभेत केली.

****

महाराष्ट्र उद्योग, व्यापार आणि गुंतवणूक सुविधा विधेयक २०२३, काल सभागृहात मंजूर झालं. या विधेयकाद्वारे महसूल, पर्यावरण, प्रदूषण, उद्योग आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सर्व परवानग्या तत्काळ मिळणार आहेत.

****

राज्यातल्या अत्युच्च गुणवत्ताधारक खेळाडूंना शासकीय सेवेत थेट नियुक्ती देण्याबाबतची प्रक्रिया, येत्या देान महिन्यांत पूर्ण करण्यात येईल, अशी माहिती, क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री गिरीश महाजन यांनी काल विधानसभेत दिली.

****

बुलडाणा जिल्ह्यात सिंदखेडराजा तालुक्यात साखरखेर्डा केंद्रावर, बारावी परीक्षेचा गणिताचा पेपर फुटल्याचा प्रकार काल निदर्शनास आला. माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी याबाबत अधिक माहिती दिली...

‘‘यासंदर्भात संबंधित गट शिक्षण अधिकारी संबंधित कस्टोडियन संबंधित जिल्हा शिक्षण अधिकारी यांनी त्यांना पाठवलेला आहे, पोलिस स्टेशनला गुन्हा नोंदवायला सांगितलेला आहे, आणि गुन्हा नोंद केल्यानंतर आपल्या लक्षात येईल की हा पेपर किती वाजता नेमका वायरल झालेला आहे.’’

या प्रकरणी सिंदखेडराजा आणि साखरखेर्डा पोलीस ठाण्यात स्वतंत्र तक्रार दिली असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

दरम्यान, या विषयाची प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यापर्यंत पोहोचल्याचं राज्यात कोठेही आढळून आलेलं नाही, त्यामुळे इयत्ता १२ वी च्या गणित विषयाची परीक्षा पुन्हा घेतली जाणार नसल्याचं, राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी स्पष्ट केलं आहे.

****

छत्रपती संभाजीनगरमध्ये नागसेन माध्यमिक विद्यालयात बारावीचा एक परीक्षार्थी आपली उत्तरपत्रिका घेऊन पळाल्याची घटना काल घडली. पोलिसांनी या विद्यार्थ्याला दीड तासाने एका अभ्यासिकेतून पकडून आणलं. याप्रकरणी या विद्यार्थ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

****

महाविकास आघाडी सरकारच्या काळातल्या विकासकामांना स्थगिती दिल्याचा राज्य सरकारचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने रद्द केला आहे. याप्रकरणी वसमतचे आमदार राजु नवघरे, जालना जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सतिश टोपे यांनी रिट याचिका दाखल केली होती. स्थगिती दिलेली कामं पूर्ववत करावी आणि त्यादृष्टीने निर्णय घ्यावा, असे आदेशही खंडपीठाने दिले आहेत.

****

प्रजासत्ताक दिनानिमित्त नवी दिल्लीत कर्तव्यपथावरच्या संचलनात सहभागी झालेल्या साडेतीन शक्तीपीठावर आधारित चित्ररथाचं, आज सकाळी ११ वाजता, तुळजापुरात प्रदर्शन होणार आहे. तुळजाभवानी मंदिर मार्गावर या प्रदर्शनाला सुरुवात होणार असल्याचं, सांस्कृतिक कार्य संचालनालयानं कळवलं आहे. सर्व नागरिकांनी  या चित्ररथाच्या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असं आवाहन, संचालनालयानं केलं आहे. महाराष्ट्र शासनाच्या या देखाव्याला दिल्लीत सर्वोत्कृष्ट सादरीकरणाचा दुसरा क्रमांक मिळाला होता.

****

बॉर्डर - गावसकर मालिकेतल्या इंदूर इथं झालेल्या तिसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात ऑस्ट्रेलियानं भारताचा नऊ गडी राखून पराभव केला. दुसऱ्या डावात विजयासाठी असलेलं ७६ धावांचं लक्ष्य ऑस्ट्रेलियाच्या संघाने काल सामन्याच्या तिसऱ्याच दिवशी एका ड्याच्या मोबदल्यात पूर्ण केलं. या डावात आठ गडी बाद करणारा लायन, प्लेयर ऑफ द मॅच पुरस्काराचा मानकरी ठरला. चार सामन्यांच्या मालिकेत भारत दोन - एकनं आघाडीवर आहे. मालिकेतला शेवटचा सामना येत्या नऊ तारखेपासून अहमदाबाद इथं सुरु होणार आहे. 

****

मराठवाड्यात पुढच्या काही दिवसांत अनेक ठिकाणी तुरळक पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आज आणि उद्या, जालना तसंच बीड जिल्ह्यात पाच, सहा आणि सात तारखेला, तर परभणी जिल्ह्यात सात तारखेला पावसाची शक्यता आहे. काढणी झालेल्या किंवा सुरू असलेल्या गहू, हरभरा, रबी ज्वारी, आदी पिकांची सुरक्षित साठवणूक करावी, तसंच काढणीला आलेल्या हळदसह फळपिकांची काढणी लवकरात लवकर पूर्ण करून घेण्याचा सल्ला परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने दिला आहे.

****

औरंगाबाद महानगरपालिकेचं अधिकृतरित्या छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका असं नामकरण करण्यात आलं आहे. राज्य शासनाच्या आदेशानुसार हा बदल करण्यात आल्याचं महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजित चौधरी यांनी जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे.

****

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानांतर्गत जलसंधारणाच्या विविध कामांचा, जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी काल तालुकानिहाय आढावा घेतला. जिल्ह्याला दिलेल्या जलयुक्त शिवार अभियानाचं उद्दिष्ठ पूर्ण करण्यासाठी, महसूल विभागानं गावनिहाय केलेल्या आराखड्याप्रमाणे मंजूर जलसंधारणाची कामं, कृषी आणि जलसंधारण विभागानं समन्वयानं पूर्ण करावीत, तसंच जलयुक्त शिवार दोन अभियानास गती द्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी पाण्डेय यांनी या आढावा बैठकीत दिले.

****

जालना शहरातल्या गांधी चमन चौकात काल काँग्रेस पक्षाच्या महिला आघाडीच्यावतीनं घरगुती गॅस सिलिंडर दरवाढीच्या विरोधात निदर्शनं करण्यात आली. सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत दरवाढ मागे घेण्याची मागणी करण्यात आली.

****

महिला शेतकऱ्यांनी नवतंत्रज्ञानाच्या मदतीनं पूरक व्यवसाय करुन प्रगती साधावी असं आवाहन, नांदेड जिल्हा परिषदेच्या प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी केलं आहे. जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाच्या वतीने काल डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना, आणि बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी, एक दिवशीय कार्यशाळा घेण्यात आली, त्यावेळी त्या बोलत होत्या. शेती व्यवसायाला बळकटी देण्याचं काम महिला शेतकरी मोठया जोमाने करत असून, खऱ्या अर्थाने शेती व्यवसायाचा त्या कणा आहेत, असं मत वर्षा ठाकूर यांनी व्यक्त केलं.

****

धाराशिव जिल्ह्यात आजपासून १० मार्च दरम्यान गोवर रुबेला विशेष लसीकरण मोहीम राबवण्यात येणार आहे. नऊ महिने ते पाच वर्ष वयोगटातल्या बालकांना घरोघरी जाऊन लस दिली जाणार आहे.

****

छत्रपती संभाजीनगर मधल्या अ दर्जा असलेल्या जीवन विकास ग्रंथालयाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आजपासून दोन दिवसीय कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. टिळक नगर इथल्या व्यंकटेश बालाजी मंदिराच्या प्रांगणात संध्याकाळी सात वाजता हे कार्यक्रम होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.

****

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात गंगापूर तालुक्यात तांदूळवाडी इथं आज आणि उद्या उस्ताद डॉ. गुलाम रसूल शास्त्रीय संगीत महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. आज शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम, तर उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते दर्पण पत्रिकेचं प्रकाशन होईल. तांदूळवाडीत श्री शंकर महाराज मठाच्या नियोजित जागेत सायंकाळी साडेपाच ते रात्री साडेदहा या वेळेत हा महोत्सव होणार असून, हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.

****

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सिल्लोड इथं गॅस सिलिंडरची वाहतुक करणारं वाहन आणि एस टी बस यांच्यात धडक होऊन झालेल्या अपघातात सिलिंडर वाहतुक करणाऱ्या चालकाचा मृत्यू झाला. काल सायंकाळी हा अपघात झाला.

दरम्यान छत्रपती संभाजीनगरात काल रात्री चारचाकी गाडीच्या अपघातात दहावीतल्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. काल मध्यरात्री जालना रोडवर पादचारी पुलाचा खांबाला ही गाडी धडकून हा अपघात झाला.

****

परभणी जिल्ह्यात सेलू - ढेंगळी पिंपळगाव - मानवत रोड दरम्यान रेल्वे रुळाचं काम करण्यासाठी आज पाच तासांचा लाईन ब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे काही रेल्वे गाड्या उशीरा धावणार आहेत.

निजामाबाद - पंढरपूर - निजामाबाद ही रेल्वे लाईन ब्लॉकमुळे निजामाबाद - नांदेड - निजामाबाद दरम्यान आजपासून २५ मार्चपर्यंत अंशतः रद्द करण्यात आली आहे. या काळात ही गाडी नांदेड - पंढरपूर - नांदेड अशी धावणार आहे.

नांदेड इथून सात मार्च रोजी सुटणारी नांदेड - अमृतसर सचखंड एक्सप्रेसच्या, आग्रा केंट ते नवी दिल्ली दरम्यानच्या मार्गात बदल करण्यात आला आहे. उत्तर मध्य रेल्वेच्या आग्रा विभागात तांत्रिक कारणांमुळं ही रेल्वे आग्रा केंट पासून मितवाली, गाझियाबाद मार्गे नवी दिल्ली पर्यंत धावणार आहे.

****

No comments:

Post a Comment