▼

Tuesday, 21 March 2023

TEXT - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 21.03.2023 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजताचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 21 March 2023

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २१ मार्च २०२३ सायंकाळी ६.१०

****

·      कांद्याचे भाव घसरल्याच्या पार्श्वभूमीवर, दोन लाख पन्नास हजार मेट्रिक टन कांदा खरेदी करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय.

·      काँग्रेस नेते राहुल गांधी आणि अदानी समूहाच्या मुद्यावरुन सलग सातव्या दिवशी संसदेचं कामकाज बाधित.

·      राज्यात हरभरा खरेदी केंद्र सुरु करण्यास मान्यता- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.

·      छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेतील घरकुल घोटाळ्याला जबाबदार असलेल्यांची विशेष तपास पथकामार्फत चौकशी करण्याची विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची मागणी.

आणि

·      केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना धमकी देणारा पुन्हा दूरध्वनी, नागपूरमधील कार्यालय आणि निवासस्थानाच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ.

****

देशातल्या, विशेषत: महाराष्ट्रातल्या कांदा उत्पादक भागांमध्ये मोठ्या प्रमाणात कांद्याचं उत्पादन झाल्यामुळे भाव घसरल्याच्या पार्श्वभूमीवर, केंद्र सरकारनं दोन लाख पन्नास हजार मेट्रिक टन कांदा खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी आज लोकसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली. सरकारनं राष्ट्रीय सहकारी ग्राहक संघ आणि राष्ट्रीय कृषी आणि सहकारी विपणन महासंघ- नाफेडला या भागातून कांदा खरेदी करून देशातल्या इतर विक्री केंद्रांमध्ये वितरित करण्याचे निर्देश दिल्याचं तोमर यांनी सांगितलं. आतापर्यंत तेरा हजार मेट्रिक टन कांद्याची खरेदी केल्याचं तोमर यांनी या उत्तरात सांगितलं आहे.

****

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी देशातल्या लोकशाहीसंदर्भात विदेशात केलेल्या वक्तव्याबाबत सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी आणि अदानी समूहाच्या मुद्यावर विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे संसदेचं कामकाज आजही सलग सातव्या दिवशी बाधित झालं.

लोकसभेचं काम आधी दुपारी दोनपर्यंत आणि त्यानंतर दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. राज्यसभेतही आजचं कामकाज सुरु होताच अदानी समूहाच्या मुद्यावर विरोधकांनी स्थगन प्रस्ताव दिला, सभापती जगदीप धनखड यांनी तो फेटाळून लावला. सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी, राहुल गांधी यांनी माफी मागावी, अशी मागणी लावून धरली. दोन्ही बाजूंच्या घोषणाबाजीमुळे राज्यसभेचं कामकाजही आधी दुपारी दोन वाजेपर्यंत आणि त्यानंतर दिवसभरासाठी स्थगित झालं. संसदेच्या दोन्ही सभागृहांचं काम उद्या बंद राहणार असून, हे कामकाज आता परवा सकाळी अकरा वाजता सुरू होईल.

****

राज्यातल्या शेतकऱ्यांना हरभरा खरेदी केंद्रांमध्ये आणायचा असून, राज्यात भारतीय राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महासंघ- नाफेडची खरेदी केंद्रं बंद आहेत, ती त्वरित सुरू करावीत, अशी आग्रही मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी आज विधानसभेत पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून केली. यावर, राज्यात नाफेडनं हरभरा खरेदी केंद्रांना मान्यता दिली असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. ते म्हणाले –

(उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस)

मी स्वतः नाफेडच्या प्रमुखांशी चर्चा केली. मागच्या वर्षीपेक्षा जास्त केंद्र आपण सुरू केली आहेत. फक्त मागच्या वर्षी दिलेल्या काही लोकांना याकरता केंद्र दिलेली नाहीत की मागच्या वर्षी त्यांच्या केंद्रावर घोटाळे झालेत. आणि काही नवीन केंद्र दिली आहेत. तथापि आपण ही सूचना केलीत पुन्हा एकदा मी त्यांच्याशी बोलेन आणि काही जर त्याच्यामध्ये राहिले असतील तर आपण ते सुरू करू.

****

आतापर्यंत फक्त व्यावसायिक अभ्यासक्रम प्रवेशासाठी जात पडताळणी प्रमाणपत्र आवश्यक होतं, मात्र येणाऱ्या काळात अव्यावसायिक अभ्यासक्रम प्रवेशासाठीही जात प्रमाणपत्र पडताळणी अनिवार्य करण्यात येणार असल्याची माहिती आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांनी आज विधानसभेत एका लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात दिली. जात पडताळणी आणि जात प्रमाणपत्रासंदर्भातली कार्यवाही सोपी होण्यासाठी नवीन प्रणाली आणण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचंही गावित यांनी सांगितलं.

****

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेतील घरकुल घोटाळ्याची तसंच घोटाळ्याला जबाबदार असलेल्यांची विशेष तपास पथकामार्फत चौकशी करण्याची मागणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली आहे. विधान परिषदेत याबाबत त्यांनी प्रश्न विचारला होता. पंतप्रधान आवास योजने अंतर्गत छत्रपती संभाजीनगर शहरात सात हजार घरकुलासाठी परवानगी असताना ४० हजार घरे बांधण्यासाठी काढण्यात आलेल्या निविदा प्रक्रियेची पोलीस, सक्तवसुली संचालनालय-ईडी आणि महानगरपालिकेकडून चौकशी करण्यात येत आहे. यामुळे शहरासाठीची ही घरकुल योजना परत जाण्याची शक्यता दानवे यांनी व्यक्त केली.

****

गेल्या वर्षी विविध खेळांमध्ये राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर लक्षवेधी कामगिरी करणाऱ्या राज्यातल्या खेळाडूंना घोषित करण्यात आलेली रक्कम अजूनही मिळालेली नाही आणि त्यांचा सन्मानही करण्यात आलेला नाही, असा आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज विधानसभेत केला. या विजेत्या खेळाडूंना घोषित केलेली रक्कम देण्याची, तसंच त्यांचा उचित गौरव करण्याची मागणी पवार यांनी केली.

****

येत्या पंधरा दिवसांत नवीन माहिती तंत्रज्ञान धोरण आणण्यात येणार असल्याची माहिती मंत्री उदय सामंत यांनी आज विधानसभेत दिली. विधानसभा सदस्य प्रकाश आबिटकर आणि संजय सावकारे यांनी, राज्यातल्या छोट्या शहरांमध्ये आयटी केंद्रं उभारण्याबाबत अर्धा तास चर्चेची सूचना मांडली होती. त्यात सामंत बोलत होते. कोल्हापूर इथं लवकरच नवीन माहिती तंत्रज्ञान केंद्र उभारण्यासंदर्भात विचार करण्यात येईल, असंही सामंत यांनी या चर्चेत सांगितलं.

****

राज्याचे बंदरे आणि खनिकर्म मंत्री दादा भुसे यांच्याविरुद्ध खासदार संजय राऊत यांनी गिरणा अ‍ॅग्रो नावानं १७८ कोटी २५ लाख रुपयांचं भागभांडवल जमा केलं, मात्र प्रत्यक्षात कमी दाखवल्याच्या केलेल्या आरोपाचे आज विधिमंडळाच्या अधिवेशनात पडसाद उमटले. राऊत यांच्याविरोधात शिंदे गटाचे आमदार आक्रमक झाले होते. या आरोपांवर स्पष्टीकरण देताना मंत्री भुसे यांनी कोणत्याही यंत्रणेनं या आरोपांची चौकशी करावी, आरोप सिद्ध झाल्यास राजकारण सोडून देण्याचं जाहीर केलं. यावेळी त्यांनी राऊत यांच्या विरुद्ध जोरदार टीका केली.

****

आज जागतिक वन दिवस साजरा होत आहे. या दिवसाचं या वर्षासाठीचं ‘वनं आणि आरोग्य’ घोषवाक्य आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वनदिनाच्या शुभेच्छा दिल्या असून, वनांचं संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी कटिबद्ध होऊ या, असं मुख्यमंत्र्यांनी आपल्या याबाबतच्या ट्वीट संदेशात म्हटलं आहे.

पारशी नववर्ष दिनाच्याही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. हे नववर्ष सर्वांच्या आयुष्यात आरोग्य, समृद्धी आणि आनंद घेऊन येवो, असं आपल्या याबाबतच्या ट्विट संदेशात त्यांनी म्हटलं आहे.

****

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना आज सकाळी धमकी देणारा दूरध्वनी पुन्हा आल्यामुळे त्यांच्या नागपूरमधील कार्यालय आणि निवासस्थानी सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. याआधी जानेवारी महिन्यातही गडकरी यांना खंडणीसाठी धमकी देणारे फोन आले होते. धमकी देणारी व्यक्ती आणि फोन करण्याचं ठिकाण यांचा तपास सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं. आज धमकी देणाऱ्यानं खंडणीची मागणी केल्याचं सांगण्यात आलं.

****

स्वच्छ भारत मिशन अंतर्गत, एकल वापर प्लॅस्टिकच्या वापरावर बंदी घालण्यासाठी आणि त्याचा वापर टाळण्यासाठी सुरू असलेल्या देशव्यापी जनजागृती मोहीमेत, महाराष्ट्रातल्या सांगली जिल्ह्यातल्या विटा नगरपरिषदेच्या उपक्रमानं लक्ष वेधून घेतलं आहे. या नगरपरिषदेनं दुकानदार आणि ग्राहकांना पर्यावरणपूरक पिशव्या देता याव्यात यासाठी बाजारात पाच ‘बॅग एटीएम’ बसवली आहेत. या यंत्रात पैसे टाकल्यानंतर सुती पिशवी उपलब्ध होते. या एटीएम मधल्या पिशव्या बचत गटाच्या महिलांकडून खरेदी करण्यात आल्या आहेत.

****

गौतम बुद्धांचा ‘अत्त दीप भव’ अर्थात स्वत:च स्वत:चा प्रकाश व्हा, हा संदेश घेऊन जगातल्या नागरी संस्थांनी मानवी मूल्यांचं संवर्धन करावं, असं मत, सी-२० परिषदेच्या ‘नागरी संस्था आणि मानवी मूल्यांचं संवर्धन’ या विषयावरच्या परिसंवादात व्यक्त करण्यात आलं. नागपूर इथं आज झालेल्या या परिसंवादात देश विदेशातले प्रतिनिधी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते.

****

No comments:

Post a Comment