Wednesday, 22 March 2023

TEXT - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 22.03.2023 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजताचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 22 March 2023

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २२ मार्च २०२ सायंकाळी ६.१०

****

·      छत्रपती संभाजीनगर इथं सीजीएचएस - केंद्र सरकारी आरोग्य केंद्राचं केंद्रीय आरोग्यमंत्र्यांच्या हस्ते उद्धाटन.

·      अवकाळी पावसानं आतापर्यत एक लाख एकोणचाळीस हजार हेक्टरवरच्या पिकाचं नुकसान.

·      तिसऱ्या आणि अखेरच्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात ऑस्ट्रेलियाचं भारतासमोर २७० धावांचं लक्ष्य.

आणि

·      गुढीपाडव्याचा सण सर्वत्र पारंपरिक पद्धतीने उत्साहात साजरा.

****

केंद्र सरकारचे कर्मचारी आणि सेवा निवृत्त कर्मचाऱ्यांना उत्तमोत्तम आरोग्य सेवा पुरवण्यासाठी केंद्र सरकार कटीबद्ध असल्याचं, केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. मनसुख मांडवीय यांनी म्हटलं आहे. छत्रपती संभाजीनगर इथल्या सीजीएचएस - केंद्र सरकारी आरोग्य केंद्राचं उद्धाटन मांडवीय यांच्या हस्ते दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून आज झालं, त्यावेळी ते बोलत होते. सी जी एच एसद्वारे दिल्या जाणाऱ्या सेवा सुविधा वाढवण्यासाठी आरोग्य मंत्रालय सतत प्रयत्नरत असल्याचं मांडवीय यावेळी म्हणाले. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ.भागवत कराड, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ.भारती पवार, खासदार इम्तियाज जलील आणि सहकारमंत्री अतुल सावे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. देशातल्या सर्व सीजीएचएसचं डिजिटायझेशन करुन ही केंद्रं कागदविरहित करण्याचं काम आरोग्य मंत्रालय करत आहे. छत्रपती संभाजीनगरातल्या या केंद्रासह देशात आता ॲलोपॅथिक सीजीएचएसची संख्या ३३६ झाली असल्याची माहिती भारती पवार यांनी यावेळी दिली. या आरोग्य केंद्रात छत्रपती संभाजीनगरसह आसपासच्या जिल्ह्यातल्या केंद्रीय कर्मचारी, सेवानिवृत्त केंद्रीय कर्मचारी आणि माजी संसद सदस्यांना विविध प्रकारच्या आरोग्य सेवा पुरवण्यात येणार आहेत.

****

कर्तारपूर कॉरिडॉरच्या धर्तीवर पाकव्याप्त काश्मीरमधील शारदा पीठ भारतीयांसाठी खुलं करण्याचे प्रयत्न करणार असल्याचं, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. शहा यांनी दूरदृश्य संवाद यंत्रणेच्या माध्यमातून काश्मीरमध्ये कुपवाडा जिल्ह्यात नियंत्रण रेषेजवळ शारदा मंदिराचं लोकार्पण केलं, त्यावेळी ते बोलत होते. नववर्षाच्या पहिल्या दिवशी शारदा मंदिराचं लोकार्पण हे शारदा संस्कृतीच्या पुनरुज्जीवनाकडे टाकलेलं पाऊल असल्याचं शहा यांनी म्हटलं आहे. काश्मीरात सध्या विविध १२३ प्रार्थना स्थळांचा जीर्णोद्धार सुरू असून, यासाठी ६५ कोटी रुपये निधी देण्यात आल्याची माहितीही शहा यांनी दिली.

****

अवकाळी पावसानं यावर्षी राज्यात आतापर्यत एक लाख एकोणचाळीस हजार हेक्टर जमिनीवरच्या पिकाचं नुकसान झाल्याचा आकडा समोर आला आहे. कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी आज नंदुरबार जिल्ह्यातल्या गारपीटग्रस्त ठाणेपाडा आणि आष्टे भागाचा दौरा करत पाहणी केली. त्यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. ते म्हणाले – (कृषी मंत्री अब्दुल सत्तार)

ज्या ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे, तो शेतकरी नुकसानभरपाईपासून वंचित राहणार नाही. चालू अधिवेशनामध्ये उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री महोदय हे दोघंही दोन्ही सभागृहामध्ये नुकसाना भरपाईच्या बाबतीत घोषणा करतील. कोणत्या पिकाला किती नुकसान द्यायचं, कशा पद्‌धतीने, एन डी आर एफ चे नियम काय आहेत? याच्या पेक्षा अजून काही अधिकचं देऊ शकतो का?

सत्तार यांनी आज धुळे जिल्ह्यातल्या नुकसानग्रस्त भागाचीही पाहणी केली. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या सरकारकडून आणि वीजमंडळाकडून असलेल्या अपेक्षांबद्दल कृषीमंत्र्यांनी त्यांच्याशी चर्चा केली. शेतकऱ्यांच्या आत्महत्येसाठी दोषी आढळणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई करू असा इशारा सत्तार यांनी यावेळी दिला.

****

ई मेल किंवा संकेतस्थळाचा पत्ता आता प्रादेशिक भाषांमध्ये उपलब्ध होऊ शकणार आहे. प्रगत संगणन विकास केंद्र -सी-डॅकने त्यासाठी पुढाकार घेतला असून, सुरुवातीला ५० सरकारी संकेतस्थळांचे पत्ते देवनागरीमध्ये उपलब्ध करण्यात येणार आहेत. सी-डॅकचे कार्यकारी संचालक कर्नल ए. के. नाथ यांनी ही माहिती दिली. सुरुवातीला पन्नास सरकारी संकेतस्थळांचे पत्ते देवनागरीमध्ये करण्यात येतील. त्यानंतर टप्प्याटप्प्याने अन्य भाषांचा विचार करण्यात येईल, असं नाथ यांनी सांगितलं. सध्या ई मेल तसंच संकेतस्थळांचे पत्ते फक्त इंग्रजीत आहेत. मात्र देशभरात विविध भाषा वापरात असल्याने इंटरनेट हे बहुभाषिक होण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. त्या दृष्टीने युनिव्हर्सल ॲक्सेप्टन्स क्लॉज अंतर्गत देशभरात सरकारी संकेतस्थळांचे पत्ते प्रादेशिक भाषांमध्ये उपलब्ध करण्यात येणार आहेत.

****

भारतीय सैन्यदलाने सैनिकांना दिल्या जाणाऱ्या शिध्यामध्ये भरड धान्याचा समावेश केला आहे. या ऐतिहासिक निर्णयामुळे तब्बल पन्नास वर्षांनंतर, सैनिकांना देशी आणि पारंपारिक धान्यांचा पुरवठा सुनिश्चित होईल.

****

भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात चेन्नई इथं सुरू असलेल्या तिसऱ्या आणि अखेरच्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियानं भारतासमोर २७० धावांचं लक्ष्य दिलं आहे. ऑस्ट्रेलियानं आज नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला, मिशेल मार्शच्या ४७ धावा वगळता, पाहुण्या संघाचा अन्य एकही फलंदाज मोठी खेळी करू शकला नाही, मात्र शेवटच्या फलंदाजापर्यंत सर्वांनी चिवट खेळ केल्यानं, पाहुणा संघ ४९ षटकांत सर्वबाद दोनशे एकोणसत्तर धावा करू शकला. हार्दिक पंड्या आणि कुलदीप यादवनं प्रत्येकी तीन तर मोहम्मद सिराज आणि अक्षर पटेलनं प्रत्येकी दोन बळी घेतले.

****

गुढीपाडवा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीचं औचित्य साधून ‘आनंदाचा शिधा’ वितरित करण्याचा निर्णय शासनानं घेतला आहे, त्यानुसार आजपासून पुढचा महिनाभर हा शिधा वितरित करण्यात येणार आहे. राज्यातल्या सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत पात्र शिधा पत्रिकाधारकांना हा आनंदाचा शिधा मिळणार आहे. लातूर जिल्ह्यात औसा इथे आमदार अभिमन्यू पवार यांच्या उपस्थितीत आज ‘आनंदाचा शिधा’ वितरणाला सुरुवात झाली.

****

गुढीपाडव्याच्या दिवशी सुरू होत असलेल्या नववर्षाचं आज राज्यभरात उत्साहात आणि विविध संकल्पनांच्या माध्यमातून स्वागत झालं. ठाण्यात कोपिनेश्वर मंदिरापासून निघालेल्या शोभायात्रेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाग घेतला. या शोभायात्रेत महिला आणि तरुणांचा जोषपूर्ण सहभाग लक्षवेधी होता.

छत्रपती संभाजीनगर मध्ये नागरिकांनी पारंपरिक पद्धतीनं तसंच विविध प्रकारच्या गुढ्या उभारून सण साजरा केला. यामध्ये एक्कावन्न फुटांची गुढी, तिरंगा गुढी, सर्वधर्म समभाव दर्शवणारी गुढी, आरोग्याची गुढी, शेतकऱ्याची गुढी आणि खेळाची गुढी यांचा समावेश दिसून आला.

छत्रपती संभाजीनगर इथं जगद्‌गुरु नरेंद्राचार्य महाराज भक्त सेवा मंडळाच्या वतीनं आज हिंदू नववर्ष स्वागत यात्राही काढण्यात आली. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांनी जगद्गुरु श्रींच्या प्रतिमेचं पूजन करुन स्वागत यात्रेला सुरुवात केली.

नाशिक मध्येही स्वागतयात्रा काढून नववर्षाचं स्वागत करण्यात आलं. गोदावरीकाठी ढोल ताशांचं महावादन, महारांगोळी आणि ऐतिहासिक शस्त्र प्रदर्शन, शस्र प्रात्यक्षिकं असे विविध कार्यक्रम झाले. नाशिकच्या सर्वात जुन्या सार्वजनिक वाचनालयाच्या वतीनं पुस्तकांची भव्य गुढी उभारण्यात आली आणि तिचं पूजन करण्यात आलं.

पुण्यातही नववर्षदिन आणि गुढी पाडव्यानिमित्त भारतीय क्रांतीकारक आणि महापुरुषांच्या रथांची भव्य शोभायात्रा काढण्यात आली.

नागपूरला C20 परिषदेसाठी आलेल्या मान्यवरांनी आज पेंच व्याघ्र प्रकल्पाला भेट दिली तेव्हा वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांचं स्वागत केलं आणि नंतर गुढीचं पूजन केलं. यावेळी या मान्यवर पाहुण्यांनीही गुढीची पूजा केली.

राजधानी दिल्लीतही महाराष्ट्र सदनात गुढीपाडवा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

****

शासनाच्या पशुसंवर्धन विभागाच्या वतीनं येत्या २४ ते २६ मार्च दरम्यान शिर्डी इथे राष्ट्रीय स्तरावरचं सगळ्यात मोठं महापशुधन एक्स्पो आयोजित करण्यात आलं आहे. देशातल्या तेरा राज्यांतले पशुपक्षीपालक या प्रदर्शनात सहभागी होणार आहेत. शास्त्रोक्त पध्दतीनं पशुपालनासाठी आवश्यक असलेली यंत्रं आणि उपकरणं तसंच पशुसंवर्धनाशी निगडीत बाबींसाठीच्या उत्पादनांचे स्टॉल्स या महाएक्स्पोमध्ये असतील. तर पासष्ट प्रकाराच्या विविध पशुपक्षांचे स्टॉल्सही यात असणार आहेत.

****

यवतमाळ इथे पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेनं गोवंश तस्करी करणारी सहा वाहनं ताब्यात घेतली आहेत. या कारवाईत कत्तलखान्यात नेल्या जाणाऱ्या पासष्टहून जास्त गोवंशीय पशूंची सुटका करण्यात आली तर चार पशूंचा या वाहनांमध्ये मृत्यू झाला. राज्यात गोवंशहत्या बंदी कायदा असतानाही मोठ्या प्रमाणात यवतमाळमार्गे तेलंगणा आणि आंध्र प्रदेशात गो तस्करी होत असल्याबद्दल हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

****

No comments:

Post a Comment