Thursday, 23 March 2023

TEXT - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 23.03.2023 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजताचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 23 March 2023

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २३ मार्च २०२ सायंकाळी ६.१०

****

·      राज्यातल्या कृषी सहाय्यकांची एक हजार चारशे एकोणचाळीस रिक्त पदं तातडीनं भरणार - कृषी मंत्री अब्दुल सत्तार.

·      खासगी शाळांमधलं शुल्क ठरवण्यासंदर्भात तज्ज्ञांची समिती नियुक्त करणार - शिक्षण मंत्री दीपक केसरकर.

·      सूतगिरण्यांना राज्य शासन आणि बँकेकडून एकाच वेळी भांडवल उपलब्ध करुन देणारी कार्यप्रणाली आखणार - वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील.

आणि

·      विरोधी पक्ष, सत्ताधारी आमदारांची विधानभवन परिसरात निदर्शनं.

****

राज्यातल्या कृषी सहाय्यकांची एक हजार चारशे एकोणचाळीस रिक्त पदं तातडीनं भरण्यात येतील यासाठी येत्या १५ दिवसात जाहिरात काढण्यात येईल, अशी माहिती कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी आज विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सतीश चव्हाण यांनी विचारलेल्या तारांकित प्रश्नाला ते उत्तर देत होते. राज्यपालांनी अनुसूचित क्षेत्रातली पदं –‘पेसा’च्या संदर्भात आदेश दिले आहेत त्यामुळे ‘पेसा’ची पदं वगळून अन्य पदं भरण्यात येतील, असं सत्तार यांनी सांगितलं.

****

खासगी शाळांमधलं शुल्क ठरवण्यासंदर्भात तज्ज्ञांची समिती नियुक्त करणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आज विधानसभेत दिली. समाधान अवताडे, राजेश टोपे, रोहित पवार, विजय वडेट्टीवार आणि विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी पुण्यातल्या एका शाळेत शुल्क न भरलेल्या विद्यार्थ्याना डांबून ठेवल्याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता, त्यावर केसरकर बोलत होते. विनाअनुदानित शाळेचं शुल्क किती असावं हे राज्य शासन ठरवत नसल्यानं अनेकदा या शाळांमधल्या शुल्कासंदर्भात अनेक तक्रारी राज्य शासनाकडे येत असतात. ही समिती येणाऱ्या काळात याबाबत काम करेल. तसंच या प्रश्नाबाबत अधिवेशन संपल्यानंतर एक बैठकही घेण्यात येईल,असं केसरकर म्हणाले.

****

थकीत वीज देयकामुळं कुठल्याही सरकारी शाळेचा वीज पुरवठा यापुढं खंडीत केला जाणार नाही. सर्व सरकारी शाळांची वीज देयकं शालेय शिक्षण विभाग भरेल असं आश्वासन शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिलं. शाळांना सौर ऊर्जा वापरण्याच्या सूचना दिल्या असल्याचं त्यांनी सांगितलं. थकीत वीज देयकांसाठी सार्वजनिक बाबींचा विद्युत पुरवठा खंडीत करु नये आणि राज्य सरकारनं याविषयी तातडीनं धोरणात्मक निर्णय घेण्याची मागणी विधानसभेचे विरोधी पक्षेनेते अजित पवार यांनी केली होती. हा मुद्दा मंत्रिमंडळ बैठकीत उपस्थित केला जाईल, असंही केसरकर म्हणाले. राज्यात प्राथमिक शाळा, ग्रामपंचायत कार्यालयं, प्राथमिक आरोग्य केंद्रं, उपजिल्हा रुग्णालयं, जिल्हा रुग्णालयं, ग्रामीण पाणी पुरवठा योजनांचा वीज पुरवठा थकीत देयकांसाठी खंडीत करण्याच्या घटना घडत आहेत, याकडे पवार यांनी लक्ष वेधलं होतं.

****

सूतगिरण्यांना राज्य शासन आणि बँकेकडून एकाच वेळी भांडवल उपलब्ध करुन देणारी कार्यप्रणाली आखणार असल्याची माहिती वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज विधानसभेत दिली. सदस्य बळवंत वानखेडे, योगेश सागर यांनी संत गाडगेबाबा सहकारी सूतगिरणी पुन्हा सुरू करण्याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. नवीन वस्त्रोद्योग धोरणामध्ये यापुढे वैयक्तिक ५ टक्के रक्कम तयार ठेवल्यानंतरच राज्य शासन आणि बँकांची रक्कम एकाच वेळी कशी देता येईल याची आखणी करण्यात येणार असल्याचं मंत्री पाटील म्हणाले.

****

राज्यातल्या धान उत्पादक शेतकऱ्यांना आधारभूत किंमती व्यतिरिक्त प्रति हेक्टरी १५ हजार रुपये प्रोत्साहनपर रक्कम देण्यात येत असल्याचं मंत्री रवींद्र चव्हाण यांनी विधानसभेत सांगितलं. धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर रकमेसंदर्भात उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देतांना चव्हाण बोलत होते. गेल्या हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धान उत्पादक शेतकऱ्यांना २ हेक्टरच्या मर्यादेत प्रति हेक्टर १५ हजार रुपये देण्याची घोषणा केली होती, त्यानुसार ही रक्कम शेतकऱ्यांना देण्यात येत आहे.

****

राज्यातल्या पात्र शिधापत्रिकाधारकांना काल गुढीपाडव्याला सुरु करण्यात आलेल्या ‘आनंदाचा शिधा’ संचाचं वितरण पुढील महिनाभर सुरु राहणार असल्याचं अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागानं कळवलं आहे. राज्यातल्या सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत औरंगाबाद आणि अमरावती विभागातले सर्व जिल्हे तसंच नागपूर विभागातले वर्धा, अशा शेतकरी आत्महत्याग्रस्त १४ जिल्ह्यांतल्या केशरी-शेतकरी शिधा पत्रिकाधारकांना हा ‘आनंदाचा शिधा’ वाटप केला जात आहे.

****

विधीमंडळ सुरु असताना विधीमंडळाच्या कामकाजालाच मंत्र्यांनी सर्वोच्च प्राधान्य दिलं पाहिजे, अशी मागणी विधान सभेत विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी केली. राज्याच्या मंत्रिमंडळातले मंत्री बैठकीत व्यस्त असल्यामुळं विधानसभेत आज प्रश्न क्रमांक दोन राखून ठेवण्याची नामुष्की सरकारवर आली. या गोष्टी सभागृहात वारंवार घडत आहेत. सभागृहात चुकीचे पायंडे पाडता कामा नये, अशी मागणीही पवार यांनी यावेळी केली.

****

राज्यात धर्मांतर आणि लव्ह जिहादच्या घटना वाढत असून सरकारनं या घटनांची गांभीर्यानं नोंद घेतली आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान परिषदेत दिली. याला आळा घालण्यासाठी कायदा करण्याच्या मागणीचा प्रस्ताव विचाराधीन असून यावर सरकार योग्य निर्णय घेईल, असंही त्यांनी यावेळी एका लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात नमूद केलं.

****

महाविकास आघाडीच्या आमदारांनी आजही विधानभवनाच्या पायऱ्यांवर येत राज्य सरकारविरोधी निदर्शनं केली. विरोधी पक्षनेते अजित पवार आणि अंबादास दानवे यांनी आंदोलक आमदारांचं नेतृत्त्व केलं. ‘बिरबलाची खिचडी’ म्हणून चूल मांडून शिंदे सरकारचा निषेध यावेळी करण्यात आला. सत्ताधारी आमदारांनीही यावेळी त्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी घोषणाबाजी केली. विधान भवनाच्या पायऱ्यांवर सकाळी आंदोलन करताना सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी राहुल गांधी यांच्याविरोधात अवमानकारकरित्या आंदोलन केल्याकडे काँग्रेस विधीमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी अध्यक्षांचं लक्ष वेधलं. याबद्दल थोरात म्हणाले की –

(काँग्रेस विधीमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात)

येथे ज्या पद्‌धतीनं राहुलजींचा फोटो आणि त्यावर घोषणा जोडे मारो आणि त्यामध्ये आविर्भाव तसे करणं, यापूर्वी अशा प्रकारचं झालेलं नव्हतं, अशी घटना कधी पूर्वीची नाही. दुर्दैवानं आज ती पाहावयास मिळाली. शेवटी सर्व पक्षांना सुद्‌धा राष्ट्रीय पातळीला, राज्य पातळीला नेते आहेत. असं जर संसदेच्या, विधानभवनाच्या परिघामध्ये असं घडत असेल आणि त्या पद्‌धतीने ते चालत असेल तर कधीही दुसऱ्या पक्षाच्या सुद्‌धा नेत्यांच्या बाबतीत हे घडू शकतं ही वस्तूस्थिती आहे.

ही राज्याची संस्कृती नाही, असे प्रकार पुन्हा घडणार नाही यासाठी तातडीनं पावलं उचलण्याची मागणी पवार यांनीही केली. सत्ताधारी पक्षाचे सदस्य पुन्हा असे प्रकार करणार नाहीत असं आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही दिलं. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विरोधात बोलणाऱ्यांचा निषेध झाला पाहिजे असंही फडणवीस म्हणाले. विधान भवनाच्या पायऱ्यांवर झालेल्या असंसदीय आंदोलनाची चौकशी करण्याचं आश्वासन अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलं. असे प्रकार यापुढे पुन्हा घडले तर कठोर कारवाई केली जाईल असे ते म्हणाले.

****

पोलिसांचा घातपात करण्याच्या हेतुनं गडचिरोली जिल्ह्यात पेरून ठेवण्यात आलेली शक्तीशाली स्फोटकं विशेष अभियान पथकाच्या पोलिसांनी शोधून नष्ट केल्यानं मोठा घातपात काल टळला. नक्षलवाद्यांनी भामरागड तालुक्यात नेलगुंडा गावाजवळ रस्त्याच्या कडेलगत ही स्फोटकं पुरुन ठेवली होती. प्राणहिता पोलिस उपमुख्यालयातल्या नक्षलवाद विरोधी अभियान पथकाचे जवान नक्षलविरोधी अभियान राबवत असताना त्यांनी ही स्फोटकं शोधली.

****

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या शहीद भगतसिंग अध्यासन केंद्रातर्फे ‘शहीद भगतसिंग यांची सामाजिक - सांस्कृतिक प्रतिमा’ या विषयावर आज एक दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्र घेण्यात आलं. भगतसिंग अनेक अंगांनी समृद्ध असं व्यक्तिमत्व आहे. आजही नवीन क्रांतीसाठी भगतसिंगाचे विचार प्रेरणादायी असल्याचं प्राध्यापक तानाजी ठोंबरे आपल्या बीजभाषणात म्हणाले. भगतसिंग हे आधुनिक युगाचे महानायक असल्याचं प्रतिपादन प्राचार्य डॉ.शिवाजी देवडे यांनी उद्‍घाटनपर भाषणात केलं. ज्येष्ठ विचारवंत जयदेव डोळे चर्चासत्राच्या अध्यक्षस्थानी होते. पहिल्या सत्रात ‘शहीद भगतसिंग यांची सामाजिक प्रतिमा’ या विषयावर डॉ. मारोती तेगमपुरे यांनी भगतसिंगांचे क्रांती कार्य आणि विचारविश्वाचा आढावा घेतला.

****

धाराशिव जिल्ह्याच्या परंडा तालुक्यातल्या रोहकल इथल्या सरपंचाचा पती हनुमंत कोलते याला एक लाख रुपयांची लाच घेताना अटक करण्यात आली आहे. दुहेरी पंप लघू योजनेचं काम पूर्ववत सुरु ठेवण्यासाठी त्यानं ही लाच मागितली होती. सौर ऊर्जेवर आधारित या योजनेतल्या प्रकल्पाचं १८ लाख रुपयांचं काम सुरु ठेवण्यासाठी कोलतेनं पर्यवेक्षकाकडे तीन लाख रुपयांची मागणी केली होती. त्यावरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकानं लाच घेताना त्याला अटक केली.

****

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्या उपस्थितीमध्ये आज हैद्राबाद इथं भारत राष्ट्र समिती पक्षामध्ये प्रवेश केला. लवकरच चंद्रशेखर राव यांची छत्रपती संभाजीनगरमध्ये सभा घेणार असल्याचं जाधव यांनी यावेळी सांगितलं.

****

No comments:

Post a Comment