Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date : 23 March
2023
Time : 7.10
AM to 7.25 AM
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक
: २३
मार्च २०२३ सकाळी ७.१०
मि.
****
ठळक बातम्या
·
कोविड आणि इतर साथीच्या आजाराबाबत सावध आणि सतर्क राहण्याचा
पंतप्रधानांचा सल्ला
·
वर्षअखेरीचे व्यवहार पूर्ण करण्यासाठी सर्व बँकांच्या शाखा
३१ मार्चपर्यंत खुल्या ठेवण्याचे भारतीय रिझर्व्ह बँकेचे निर्देश
·
शेतकऱ्यांना पिकनिहाय योग्य भरपाई देण्याची कृषीमंत्री अब्दुल
सत्तार यांची ग्वाही
·
शिवसेनेच्या ऱ्हासाला उद्धव ठाकरे यांची भूमिका कारणीभूत
असल्याची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची टीका
·
छत्रपती संभाजीनगरमध्ये केंद्रीय कर्मचारी आरोग्य योजनेचं
निरामय केंद्र सुरु
·
गुढी पाडव्याचा सण राज्यभरात उत्साहात साजरा
आणि
·
तिसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारताचा ऑस्ट्रेलियाकडून
२१ धावांनी पराभव
सविस्तर बातम्या
देशातल्या
कोविड स्थितीचा तसंच एकूण आरोग्य सेवा यंत्रणेच्या सद्यस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनी काल नवी दिल्लीत एक उच्चस्तरीय बैठक घेतली. महाराष्ट्रासह सहा राज्यांमधे
कोविड संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचं आढळल्यानं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने
पाच स्तरीय धोरण राबवण्याचा सल्ला दिला होता. या बैठकीत कोविड आणि एचएन २ इन्फ्लूएंझा
विषाणुच्या वाढत्या प्रकरणांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. पंतप्रधान कार्यालयानं दिलेल्या
माहितीनुसार, पंतप्रधानांनी राज्यांना सावध आणि सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे. २० मुख्य कोविड औषधं, १२ इतर औषधं, आठ बफर औषधं
आणि एका इन्फ्लूएंझा औषधांची उपलब्धता आणि किंमतींवर लक्ष ठेवलं जात आहे, अशी माहितीही
या बैठकीत देण्यात आली.
दरम्यान,
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने काल जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशात कोरोना विषाणूची
एक हजार १३४ नवीन प्रकरणं नोंदली गेली आहेत. यानंतर सक्रिय रुग्णांची संख्या सात हजार
२६ वर पोहोचली आहे. राज्यात सध्या इन्फ्लूएंझा बाधित १६० रुग्णांवर उपचार सुरु असल्याचं
आरोग्य विभागानं कळवलं आहे.
****
राष्ट्रपती
द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते काल दिल्लीत पद्म पुरस्कार प्रदान करण्यात आले. राष्ट्रपती
भवनात झालेल्या शानदार समारंभात दोन पद्मविभूषण, चार पद्मभूषण आणि शेहेचाळीस पद्मश्री
पुरस्कार राष्ट्रपतींनी प्रदान केले. सार्वजनिक क्षेत्रातल्या योगदानासाठी एस एम कृष्णा
यांना पद्मविभुषण, वास्तुकलेसाठी बालकृष्ण दोशी यांना मरणोत्तर पद्मविभुषण सन्मान देण्यात
आला. अध्यात्माच्या क्षेत्रात योगदानासाठी कमलेश पटेल, साहित्य आणि शिक्षण क्षेत्रासाठी
कपिल कपूर यांना, कला क्षेत्रात गायिका सुमन कल्याणपूर यांना, उद्योग क्षेत्रासाठी
कुमार मंगलम बिर्ला यांना पद्मभूषण सन्मान प्रदान करण्यात आला. प्रभाकर मांडे यांच्यासह
४६ पद्मश्री पुरस्कार देऊन काल गौरवण्यात आलं.
****
नागरीकांना
वर्षअखेरीचे व्यवहार पूर्ण करण्यासाठी सर्व बँकांच्या शाखा ३१ मार्चपर्यंत खुल्या ठेवण्याचे
निर्देश भारतीय रिझर्व्ह बँकेनं दिले आहेत. सर्व राष्ट्रीयकृत, सहकारी, खासगी आणि ग्रामीण
बँकांना हे निर्देश लागू आहेत. त्यामुळे ३१ तारखेच्या मध्यरात्री १२ वाजेपर्यंत नागरीकांना
बँकांचे व्यवहार करता येतील.
****
शासनाच्या
मदतीपासून नुकसानग्रस्त शेतकरी वंचित राहणार नाही, तसंच शेतकऱ्यांना पिकनिहाय योग्य
भरपाईची घोषणा शासनातर्फे अधिवेशन काळातच केली जाईल, अशी ग्वाही कृषीमंत्री अब्दुल
सत्तार यांनी दिली आहे. ते काल जळगाव जिल्ह्यात गारपीटग्रस्त आणि अवकाळीग्रस्त भागात
नुकसानग्रस्त शेतांची पाहणी केल्यानंतर बोलत होते. अवकाळी पावसानं यावर्षी राज्यात
आतापर्यत एक लाख एकोणचाळीस हजार हेक्टर जमिनीवरच्या पिकाचं नुकसान झाल्याचा आकडा समोर
आला आहे.
नंदुरबार
जिल्ह्यातल्या गारपीटग्रस्त ठाणेपाडा आणि आष्टे भागाचा देखील सत्तार यांनी काल दौरा
करत पाहणी केली. त्यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधताना ते म्हणाले,
Byte…
ज्या ज्या शेतकऱ्यांचं नुकसान
झालेलं आहे, तो शेतकरी नुकसानभरपाईपासून वंचित राहणार नाही. चालू अधिवेशनामध्ये उपमुख्यमंत्री
आणि मुख्यमंत्री महोदय हे दोघंही दोन्ही सभागृहामध्ये नुकसाना भरपाईच्या बाबतीत घोषणा
करतील. कोणत्या पिकाला किती नुकसान द्यायचं, कशा पद्धतीने, एन डी आर एफ चे नियम काय
आहेत? याच्या पेक्षा अजून काही अधिकचं देऊ शकतो का?
सत्तार
यांनी काल धुळे जिल्ह्यातही नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. शेतकऱ्यांच्या सरकारकडून
आणि वीजमंडळाकडून असलेल्या अपेक्षांबद्दल त्यांनी चर्चा केली. शेतकऱ्यांच्या आत्महत्येसाठी
दोषी आढळणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करू असा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला.
****
शेतकऱ्यांसाठी
सरकारने एकदाच दीर्घकालीन नियोजन करण्याची गरज माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी
व्यक्त केली आहे. ते काल कोल्हापूर इथं बोलत होते. शेतकरी नैसर्गिक संकटात सापडलेला
असताना, विधिमंडळात जाऊन बसण्याऐवजी हेलिकॉप्टरने सगळीकडे फिरण्याची गरज आहे, मात्र
कृषीमंत्र्यांनी ज्या पद्धतीने पाहणी करायला हवी, तशी झाली नसल्याचं मत संभाजीराजेंनी
व्यक्त केलं. तेलंगणा सरकार शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवत आहे, २४ तास वीज देत आहे,
हे समजून घेण्यासाठी आपण तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांची भेट घेतली असून, तेलंगणच्या
धर्तीवर शेतकऱ्यांसाठी एक ठोस धोरण महाराष्ट्र सरकारने हाती घेण्याची नितांत आवश्यकता
असल्याचं ते म्हणाले. स्वराज्य संघटना २०२४ मध्ये राजकारणाची विजयी गुढी उभारेल, असा
विश्वास संभाजीराजेनं यावेळी व्यक्त केला.
****
शिवसेनेच्या
ऱ्हासाला उद्धव ठाकरे यांची भूमिका कारणीभूत असल्याची टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे
अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे. ते काल मुंबईत गुढीपाडव्यानिमित्त जाहीर सभेत बोलत
होते. प्रथम नारायण राणे आणि त्यानंतर स्वत: शिवसेनेतून बाहेर पडण्यामागच्या घटनांना
राज ठाकरे यांनी उजाळा दिला. एकनाथ शिंदे यांच्यासह चाळीस आमदारांनी गुवाहाटीला जाण्याला
उद्धव ठाकरेच जबाबदार असल्याचं ते म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंच्या सभांना
उत्तर देण्यापेक्षा राज्यापुढच्या समस्यांकडे लक्ष देण्याचं आवाहन राज ठाकरे यांनी
केलं. ते म्हणाले…
Byte…
एकनाथ शिंदेना मला फक्त एवढंच
सांगायचंय, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून बसलेले आहात, महाराष्ट्र राज्यासाठी
काम करा. उद्धव ठाकरे जिकडे सभा घेतायत त्याच्या मागून जाऊन सभा घेत बसू नका. त्यांनी
वरळी घेतली यांनी वरळीला घेतली, त्यांनी खेडला घेतली, यांनी खेडला घेतली. गुंतवणूक
ठेवतील, महाराष्ट्राचं काय? एवढे महाराष्ट्रामध्ये प्रश्न प्रलंबित आहेत, आज तो पेन्शनचा
विषय अडकलेला आहे, शेतकऱ्यांचे विषय आहेत, विम्यामधनं त्यांना लुटलं जातंय, ते घ्या
हातामध्ये. या अवकाळी पावसाने शेतीचं जे नुकसान झालंय, जा शेतकऱ्यांना जाऊन भेटा. सभा
कसल्या घेत बसलायत?
मशिदींवरचे
भोंगे बंद करण्याच्या मागणीचा ठाकरे यांनी पुनरुच्चार केला. अनधिकृतपणे उभ्या राहणाऱ्या
बांधकामांकडे लक्ष देण्याची सूचना करताना, त्यांनी माहिम इथं समुद्रात केल्या जात असलेल्या
बांधकामाची चित्रफित दाखवली.
****
केंद्रीय
मंत्री नितीन गडकरी यांना मंगळवारी आलेल्या धमकीच्या फोन प्रकरणी कर्नाटकच्या मंगळुरु
इथल्या रझिया नावाच्या एका तरुणीला अटक करण्यात आली आहे. यासंदर्भात चौकशी करण्यासाठी
नागपूर पोलिसांचं पथक बेळगावला रवाना झालं असल्याचं वरीष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितलं.
****
ई
मेल किंवा संकेतस्थळाचा पत्ता आता प्रादेशिक भाषांमध्ये उपलब्ध होऊ शकणार आहे. प्रगत
संगणन विकास केंद्र -सी-डॅकने त्यासाठी पुढाकार घेतला असून, सुरुवातीला पन्नास सरकारी
संकेतस्थळांचे पत्ते देवनागरीमध्ये करण्यात येतील. त्यानंतर टप्प्याटप्प्याने अन्य
भाषांचा विचार करण्यात येईल, असं सी-डॅकचे कार्यकारी संचालक कर्नल ए. के. नाथ यांनी
सांगितलं. सध्या ई मेल तसंच संकेतस्थळांचे पत्ते फक्त इंग्रजीत आहेत. मात्र देशभरात
विविध भाषा वापरात असल्याने इंटरनेट हे बहुभाषिक होण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.
त्या दृष्टीने युनिव्हर्सल ॲक्सेप्टन्स क्लॉज अंतर्गत देशभरात सरकारी संकेतस्थळांचे
पत्ते प्रादेशिक भाषांमध्ये उपलब्ध करण्यात येणार आहेत.
****
छत्रपती
संभाजीनगर इथल्या सीजीएचएस - केंद्रीय कर्मचारी आरोग्य योजनेच्या निरामय केंद्राचं
उद्धाटन काल केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीच्या
माध्यमातून झालं. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री
डॉ. भागवत कराड, खासदार इम्तियाज जलील आणि राज्याचे सहकार मंत्री अतुल सावे यांची यावेळी
प्रमुख उपस्थिती होती.
देशातल्या
सर्व केंद्रीय कर्मचारी आरोग्य योजनेच्या निरामय
केंद्राचं डिजिटायझेशन करुन ही केंद्रं कागदविरहित करण्याचं काम आरोग्य मंत्रालय करत
असल्याची माहिती मांडविय यांनी दिली. छत्रपती संभाजीनगरातल्या या केंद्रासह देशात आता
ॲलोपॅथिक सीजीएचएसची संख्या ३३६ झाली असल्याची माहिती डॉ. भारती पवार यांनी यावेळी
दिली.
****
गुढी
पाडव्याच्या दिवशी सुरू होत असलेल्या नववर्षाचं काल राज्यभरात उत्साहात आणि विविध संकल्पनांच्या
माध्यमातून स्वागत झालं. ठाण्यात कोपिनेश्वर मंदिरापासून निघालेल्या शोभायात्रेत मुख्यमंत्री
एकनाथ शिंदे यांनी भाग घेतला. या शोभायात्रेत महिला आणि तरुणांचा जोषपूर्ण सहभाग लक्षवेधी
होता.
छत्रपती
संभाजीनगर मध्ये नागरिकांनी पारंपरिक पद्धतीनं तसंच विविध प्रकारच्या गुढ्या उभारून
सण साजरा केला. यामध्ये एक्कावन्न फुटांची गुढी, तिरंगा गुढी, सर्वधर्म समभाव दर्शवणारी
गुढी, आरोग्याची गुढी, शेतकऱ्याची गुढी आणि खेळाची गुढी यांचा समावेश दिसून आला.
छत्रपती
संभाजीनगर इथं जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज भक्त सेवा मंडळाच्या वतीनं, हिंदू नववर्ष
स्वागत यात्राही काढण्यात आली. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांनी,
जगद्गुरु श्रींच्या प्रतिमेचं पूजन करुन स्वागत यात्रेला सुरुवात केली. पैठण इथंही
शालिवाहनाच्या तीर्थस्तंभ परिसरात गुढी उभारून पाडव्याचा सण उत्साहात साजरा करण्यात
आला.
नागपूरला
C20 परिषदेसाठी आलेल्या मान्यवरांनी काल पेंच व्याघ्र प्रकल्पाला भेट दिली तेव्हा वनविभागाच्या
अधिका-यांनी त्यांचं स्वागत केलं आणि नंतर गुढीचं पूजन केलं. यावेळी या मान्यवर पाहुण्यांनीही
गुढीची पूजा केली. राजधानी दिल्लीतही महाराष्ट्र सदनात गुढीपाडवा मोठ्या उत्साहात साजरा
करण्यात आला.
****
गुढीपाडवा
आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीचं औचित्य साधून ‘आनंदाचा शिधा’ वितरित करण्याचा निर्णय शासनानं घेतला आहे, त्यानुसार कालपासून
पुढचा महिनाभर हा शिधा वितरित करण्यात येत आहे. राज्यातल्या सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत
पात्र शिधा पत्रिकाधारकांना हा आनंदाचा शिधा मिळणार आहे. लातूर जिल्ह्यात औसा इथं आमदार
अभिमन्यू पवार यांच्या उपस्थितीत काल ‘आनंदाचा शिधा’
वितरणाला सुरुवात झाली.
****
आंतरराष्ट्रीय
नेमबाज संघटनेच्या मध्य प्रदेश इथं झालेल्या विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत पुरुषांच्या
१० मीटर एअर पिस्तूल स्पर्धेत भारतानं काल पहिलं सुवर्णपदक जिंकलं. सरबज्योत सिंगनं
१० पूर्णांक ९ गुणांसह सुवर्णपदक तर वरुण तोमरनं कांस्यपदक मिळवलं.
****
चेन्नईत
झालेल्या तिसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात ऑस्ट्रेलियानं भारताचा २१ धावांनी पराभव
केला. या विजयाबरोबरच ऑस्ट्रेलियानं तीन सामन्यांची मालिका दोन - एकनं जिंकली आहे.
काल झालेल्या सामन्यात प्रथम फलंदाजी करत ऑस्ट्रेलियाच्या संघानं दिलेलं २७० धावांचं
लक्ष्य गाठताना भारतीय संघ २४८ धावांवर सर्वबाद झाला.
****
हिंगोली
जिल्ह्यात वसमत इथं झालेल्या पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्यात २१५ उमेदवारांची
प्राथमिक निवड करण्यात आली. जिल्ह्यातल्या बेरोजगार उमेदवारांसाठी जिल्हा कौशल्य विकास,
रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मॉडेल करिअर सेंटर तसंच शासकीय औद्योगिक प्रशिक्षण
संस्था यांच्या वतीनं घेण्यात आलेल्या या मेळाव्यात दहावी, बारावी, आयटीआय, पदविका
तसंच पदवीधारक पात्रतेचे ५१३ उमेदवार सहभागी झाले होते.
****
लातूर
इथं येत्या २६ ते २८ मार्च दरम्यान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आयोजित करण्यात आला
आहे. विलासराव देशमुख फाऊंडेशन, पुणे फिल्म फाऊंडेशन आणि अभिजात फिल्म सोसायटी यांनी
संयुक्तपणे हा महोत्सव आयोजित केला आहे. या महोत्सवात भारतीय भाषांतले चार तर तेरा
आंतरराष्ट्रीय चित्रपट दाखवण्यात येणार आहेत.
****
राज्य
सरकारनं सुरू केलेल्या महिला सन्मान योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या
सर्व प्रकारच्या बस भाड्यात महिलांना पन्नास टक्के सवलत, ही योजना सुरू झाल्यापासून
पाच दिवसातच लातूर जिल्ह्यातल्या एक लाख एक्काहत्तर हजार सहाशे चौऱ्याण्णव महिलांनी
या योजनेचा लाभ घेतला आहे. एसटी महामंडळाचे लातूर विभागीय नियंत्रक अश्वजीत जानराव
यांनी ही माहिती दिली.
****
No comments:
Post a Comment