Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date
– 24 March 2023
Time
18.10
to 18.20
Language
Marathi
आकाशवाणी
औरंगाबाद
प्रादेशिक
बातम्या
दिनांक
– २४ मार्च
२०२३ सायंकाळी ६.१०
****
·
राहुल गांधी यांचं लोकसभा सदस्यत्व रद्द; काँग्रेससह विरोधी
पक्षांची कडाडून टीका.
·
विरोधकांच्या गदारोळात वित्त विधेयक २०२३ लोकसभेत आवाजी मतदानानं
संमत.
·
राज्यात गुंडगिरी आणि धार्मिक तेढ वाढल्याचा विरोधकांचा अंतिम
आठवडा प्रस्तावातून आरोप.
आणि
·
लातूर ते नांदेड थेट रेल्वे मार्गाची माजी मुख्यमंत्री अशोक
चव्हाण यांची मागणी.
****
राहुल गांधी यांचं
लोकसभा सदस्यत्व रद्द करण्यात आलं आहे. लोकसभा सचिवालयाने आज याबाबतचं पत्र जारी केलं.
मानहानीच्या एका खटल्यात सूरतच्या जिल्हा न्यायालयानं राहुल गांधींना दोन वर्षांची
शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणी त्यांना वरच्या न्यायालयात दाद मागण्यासाठी तीस दिवसांच्या
मुदतीसह जामीनही मंजूर झाला आहे. मात्र लोकप्रतिनिधींना दोन वर्ष किंवा त्यापेक्षा
अधिक काळासाठी शिक्षा झाल्यास, त्यांचं सदस्यत्व रद्द करण्याचा नियम आहे. या नियमानुसार
लोकसभा सचिवालयाने गांधी यांचं लोकसभा सदस्यत्व रद्द केलं आहे.
राहुल गांधी सातत्यानं
संसदेत आणि संसदेच्या बाहेरही सरकार विरोधात बोलत असल्यामुळेच त्यांचा आवाज दाबण्यासाठी
ही कारवाई केल्याची टीका काँग्रेस पक्षाने केली आहे. पक्षाचे प्रवक्ते अभिषेक मनु सिंघवी
यांनी पत्रकार परिषदेत हा आरोप केला.
****
गांधी यांच्यावर
झालेल्या कारवाईच्या विरोधात विधानसभेत विरोधी पक्षांनी अंतिम आठवडा प्रस्तावाच्या
चर्चेदरम्यान सभात्याग केला. काँग्रेससह विरोधी पक्षांनी काळ्या फिती लावून विधीमंडळाच्या
पायऱ्यांवर आंदोलन केलं. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विरोधी पक्षनेते अजित
पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे
पक्षाचे गटनेते अजय चौधरी यांच्यासह अनेक आमदार या निदर्शनात सहभागी झाले.
राहुल गांधी यांची
खासदारकी रद्द करणं ही बाब संविधानात किंवा लोकशाहीत बसत नाही. हा निर्णय लोकशाहीला
धक्का देणारा असल्याचं, अजित पवार यांनी म्हटलं आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब
ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी हा निर्णय म्हणजे लोकशाहीचं हत्याकांड असल्याचं
म्हटलं आहे. सर्व सरकारी यंत्रणा दबावाखाली असल्याची टीकाही ठाकरे यांनी केली.
हा निर्णय द्वेष
भावनेतून घेण्यात आल्याची टीका वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष विधीज्ञ प्रकाश
आंबेडकर यांनी केली आहे. वरच्या न्यायालयात जाण्याची मुभा असताना, तातडीने अशी कारवाई
करणं चूक असल्याचं, आंबेडकर यांनी नमूद केलं.
****
वित्त विधेयक २०२३
आज लोकसभेत संमत झालं. त्यापूर्वी राहुल गांधी यांच्या परदेशातल्या वक्तव्याप्रकरणी
सत्ताधारी सदस्यांनी, तर काँग्रेससह विरोधी पक्षाच्या सदस्यांनी कथित अदानी घोटाळ्यासंदर्भात
संयुक्त संसदीय समिती स्थापन करण्याच्या मागणीसाठी, घोषणाबाजी केल्यानं, लोकसभेचं कामकाज
बारा वाजेपर्यंत तर राज्यसभेचं कामकाज दुपारी अडीच वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. लोकसभेचं
कामकाज पुन्हा सुरू झाल्यावरही गदारोळ सुरूच राहिला मात्र तालिका अध्यक्षांनी गदारोळातच
कामकाज सुरू ठेवलं. वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी वित्त विधेयक सभागृहासमोर सादर
केलं. या विधेयकातल्या अनेक सूचना तसंच सुधारणा सदनानं मंजूर करून, हे विधेयक विरोधकांच्या
गदारोळातच आवाजी मतदानानं मंजूर केलं.
****
सक्तवसुली संचालनालय,
तसंच केंद्रीय अन्वेषण विभाग सारख्या तपास यंत्रणांकडून देशभरात विविध राजकीय पक्षांच्या
नेत्यांवर कारवाई सुरू आहे. त्या विरोधात काँग्रेससह १४ विरोधी पक्षांकडून सर्वोच्च
न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर येत्या ५ एप्रिल रोजी सुनावणी
होणार आहे. यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तसंच राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांचाही
समावेश आहे. ईडी आणि सीबीआयकडून विरोधी नेत्यांची मनमानी अटक टाळण्यासाठी अटकपूर्व
आणि अटकेनंतर मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्याची मागणी विरोधकांनी या याचिकेत केली आहे.
****
राज्यात गुंडगिरी
आणि धार्मिक तेढ वाढली असून फोडा आणि झोडा असं धोरण सत्ताधाऱ्यांकडून राबवलं जात असल्याचा
आरोप, विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला आहे. आज विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्तावाची
सुरूवात करताना ते बोलत होते. राज्यात ज्येष्ठ नेत्यांना धमक्यांचं सत्र सुरू आहे.
अनिल जयसिंघानी या बुकीची मुलगी आपल्या घरात थेट कशी येऊ शकते याचं उत्तर गृहमंत्र्यांनी
द्यायला हवं अशी मागणी पवार यांनी केली. पोलिस दलात बदल्या आणि बढत्या यावरून प्रचंड
अस्वस्थता आहे, सुधारित आकृतीबंध रखडला आहे त्याला मान्यता कधी मिळेल असा प्रश्नही
त्यांनी उपस्थित केला. ऑनलाईन गेममुळे तरुण पिढी वाईट मार्गाला जाते आहे, त्यावर तातडीनं
बंदी घाला आणि त्याचा प्रचार करणाऱ्या अभिनेत्यांवर गुन्हे दखल करा अशी मागणी पवार
यांनी केली.
****
विधान परिषदेत विरोधी
पक्षनेते अंबादास दानवे यांनी अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेला सुरुवात केली. राज्यातलं
सरकार जाहिरातबाजी करण्यात आणि विरोधकांना केंद्रीय संस्थांच्या तपासात अडकवण्यात मग्न
आहे, मात्र राज्याच्या विकासाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याची टीका दानवे यांनी
केली. सरकार फक्त घोषणा करतंय पण पुढे अंमलबजावणी काहीच नाही असं सांगत त्यांनी सरकारच्या
कारभारावर ताशेरे ओढले.
दरम्यान, विरोधी
पक्षनेत्यांचं भाषण सुरू असताना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री किंवा संसदीय कार्य मंत्र्यांनी
सभागृहात उपस्थित राहावं ही मागणी करत विरोधक आक्रमक झाले त्यामुळे सभागृहाचं कामकाज
दोन वेळा तहकूब करण्यात आलं.
****
राज्यातील प्रकल्पग्रस्तांच्या
शैक्षणिक आणि सामाजिक उन्नतीसाठी सर्वंकष धोरण आणण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
यांनी केली आहे. ते आज विधान परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते एकनाथ खडसे यांनी
मांडलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देत होते. प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी आवश्यक
ती कार्यवाही सरकार करेल. यासाठी मदत आणि पुनर्वसन विभागाच्या प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली
एक समिती स्थापन करण्यात येईल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. प्रकल्पग्रस्तांच्या
पाल्यांना राज्य सरकारच्या सेवेत सरळसेवा भर्तीच्या माध्यमातून सामावून घेण्यासाठी
न्यायालयाचे निर्णय तपासून मार्ग काढण्यात येईल असंही मुख्यमंत्री म्हणाले.
****
मराठवाडा मुक्ती
संग्रामच्या अमृत महोत्सवी वर्षाचं औचित्य साधून लातूर ते नांदेड थेट रेल्वे मार्गाची
मागणी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आज विधानसभेत केली. मुख्यमंत्र्यांनी यासंदर्भात
लक्ष घालून हा प्रस्ताव केंद्राकडे कधी पाठवणार हे सांगावं, असं चव्हाण म्हणाले. रेल्वे
विकासातून मराठवाडा पूर्णपणे वगळण्यात आल्याची टीका त्यांनी केली. मुख्यमंत्र्यांनी
यासंदर्भात उत्तर देताना, या प्रकल्पाला प्राधान्य देणार असल्याची ग्वाही देत, मंत्रिमंडळ
बैठकीत याबाबत निर्णय घेतला जाईल, असं सांगितलं.
****
जात प्रमाणपत्रासंदर्भात
येत्या १५ दिवसांत विस्तृत बैठक घेणार असल्याचं सहकारमंत्री अतुल सावे यांनी आज विधानसभेत
सांगितलं. सदस्य राजन साळवी यांनी याबाबतची लक्षवेधी सूचना मांडली होती. विद्यार्थ्यांना
नोकरी आणि शिक्षणासाठी आवश्यक असणारे जात प्रमाणपत्र वेळेत सादर करणं आवश्यक असतं,
त्यामुळे तिल्लोरी कुणबी समाजाच्या विद्यार्थ्यांना आवश्यक असणारे प्रमाणपत्र वेळेत
दिले जाण्याबाबतची सूचना संबंधित जिल्हाधिकारी यांना करण्यात येईल, असं सावे यांनी
सांगितलं.
****
जागतिक क्षयरोग दिनानिमित्त
छत्रपती संभाजीनगर इथल्या दगडोजी महाविद्यालय आणि आरोग्य विभागाच्या वतीनं विद्यार्थ्यांनी
आज जनजागृती फेरी काढली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांच्या
हस्ते हिरवी झेंडा दाखवून या रॅलीचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी अधिकारी कर्मचारी
आणि आरोग्य कार्यालय बजाजनगर वडगाव कोल्हाटी इथल्या सर्व आशा ताई - गटप्रवर्तक ताई
उपस्थित होत्या.
****
खासदार राहुल गांधी
यांनी केलेल्या कथित वक्तव्याविरोधात भारतीय जनता पक्षाच्या वतीनं आज छत्रपती संभाजीनगर
इथं क्रांतीचौकात निदर्शनं करण्यात आली. यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी राहुल गांधी यांच्या
विरोधात जोरदार घोषणा देत त्यांचं छायाचित्र फाडलं.
दरम्यान, छत्रपती
संभाजीनगर इथं आज जिल्हा काँग्रेसच्या वतीनं जेल भरो आंदोलन करण्यात आलं. या आंदोलकांना
पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
धुळ्यात तेली सामाजानं
राहुल गांधी यांच्याविषयी निषेध व्यक्त करत तीव्र आंदोलन केलं. गांधी यांच्या प्रतिमेला
जोडे मारत, माफी मागण्यासंदर्भात घोषणाबाजी करण्यात आली.
****
आंतरराष्ट्रीय नेमबाजी
क्रीडा महासंघाच्या विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत भोपाळ मध्ये आज रुद्रांक्ष पाटीलने पुरुषांच्या
दहा मीटर रायफल शुटींगमध्ये कांस्य पदक मिळवलं. या स्पर्धेत चीनच्या शेंग लिहाओनं सुवर्ण
तर चीनच्याच ‘ही डू लिंशू’ याने रजत पदक पटकावलं.
****
No comments:
Post a Comment