Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date : 24 March
2023
Time : 7.10
AM to 7.25 AM
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक
: २४
मार्च २०२३ सकाळी ७.१०
मि.
****
ठळक बातम्या
·
मोदी आडनावावरून टिप्पणी केल्याप्रकरणी काँग्रेसचे
खासदार राहुल गांधी यांना दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा
·
खासगी
शाळांमधलं शुल्क ठरवण्यासंदर्भात तज्ज्ञांची समिती नियुक्त करणार - शालेय शिक्षण मंत्री
दीपक केसरकर
·
कृषी
सहाय्यकांची रिक्त पदं तातडीनं भरण्यासाठी येत्या १५ दिवसात जाहिरात काढण्याचं कृषीमंत्र्याचं
आश्वासन
·
सर्व
सरकारी शाळांची वीज देयकं शालेय शिक्षण विभाग भरणार
·
विधानसभेत
महाराष्ट्र गो सेवा आयोग विधेयक सादर
·
शिवसेनेच्या
संसदीय नेतेपदी खासदार गजानन कीर्तिकर यांची निवड
आणि
·
रमजानच्या
पवित्र महिन्याला आजपासून सुरुवात
सविस्तर बातम्या
काँग्रेसचे
खासदार राहुल गांधी यांना मानहानी प्रकरणात दोषी ठरवत सूरतच्या न्यायालयानं दोन वर्षांच्या
तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या वेळी
मोदी आडनावावरून टिप्पणी केल्याप्रकरणी ही याचिका दाखल करण्यात आली होती. मात्र, या
निर्णयानंतर राहुल गांधी यांनी न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला आणि त्यांचा जामीन
मंजूर झाला. आपला हेतू अयोग्य नव्हता आणि आपल्या विधानामुळे कोणाचीही हानी झालेली नाही,
असा युक्तिवाद करुन, आपल्याला कमीत कमी शिक्षा
द्यावी अशी मागणी त्यांनी न्यायालयात केली होती.
****
महाविकास
आघाडीच्या आमदारांनी कालही विधानभवनाच्या पायऱ्यांवर येत राज्य सरकारविरोधी निदर्शनं
केली. विरोधी पक्षनेते अजित पवार आणि अंबादास दानवे यांनी आंदोलक आमदारांचं नेतृत्त्व
केलं. सत्ताधारी आमदारांनीही यावेळी त्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी घोषणाबाजी केली.
विधान भवनाच्या पायऱ्यांवर सकाळी आंदोलन करताना सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी राहुल
गांधी यांच्यविरोधात अवमानकारकरित्या आंदोलन केल्याकडे काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते
बाळासाहेब थोरात आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी अध्यक्षांचं लक्ष वेधलं. याबद्दल
थोरात म्हणाले,
Byte…
येथे ज्या पद्धतीने राहुजींचा
फोटो आणि त्यावर घोषणा जोडे मारो आणि त्यामध्ये अविर्भाव तसे करणं, यापूर्वी अशा प्रकारचं
झालेलं नव्हतं, अशी घटना कधीच पूर्वीची नाही. दुर्देवाने आज ती पाहवयास मिळाली. शेवटी
सर्व पक्षांना सुद्धा राष्ट्रीय पातळीला, राज्य पातळीला नेते आहेत. असं जर या संसदेच्या आपल्या विधानभवनाच्या परिघामध्ये
असं घडत असेल, आणि त्या पद्धतीने ते चालत असेल, तर कधीही दुसर्या पक्षाच्या सुद्धा
नेत्यांच्या बाबतीत हे घडू शकतं, ही वस्तुस्थिती आहे.
ही
राज्याची संस्कृती नाही, असे प्रकार पुन्हा घडणार नाही यासाठी तातडीनं पावलं उचलण्याची
मागणी पवार यांनीही केली. सत्ताधारी पक्षाचे सदस्य पुन्हा असे प्रकार करणार नाहीत,
असं आश्वासन, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या
विरोधात बोलणाऱ्यांचा निषेध झाला पाहिजे असंही ते म्हणाले. विधान भवनाच्या पायऱ्यांवर
झालेल्या असंसदीय आंदोलनाची चौकशी करण्याचं आश्वासन अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलं.
असे प्रकार यापुढे पुन्हा घडले तर कठोर कारवाई केली जाईल असं ईशारा त्यांनी दिलं.
****
खासगी
शाळांमधलं शुल्क ठरवण्यासंदर्भात तज्ज्ञांची समिती नियुक्त करणार असल्याची माहिती,
शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी काल विधानसभेत दिली. समाधान अवताडे, राजेश टोपे,
रोहित पवार, विजय वडेट्टीवार आणि विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी पुण्यातल्या एका
शाळेत शुल्क न भरलेल्या विद्यार्थ्याना डांबून ठेवल्याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता,
त्यावर केसरकर बोलत होते. विनाअनुदानित शाळेचं शुल्क किती असावं, हे राज्य शासन ठरवत
नसल्यानं अनेकदा या शाळांमधल्या शुल्कासंदर्भात अनेक तक्रारी राज्य शासनाकडे येत असतात.
ही समिती येणाऱ्या काळात याबाबत काम करेल, तसंच या प्रश्नाबाबत अधिवेशन संपल्यानंतर
एक बैठकही घेण्यात येईल, असं केसरकर म्हणाले.
****
तुकडा
बंदीचे आदेश रद्द करण्यासाठी येत्या १५ दिवसांत न्यायालयाच्या संमतीने सकारात्मक निर्णय
घेतला जाईल, अशी घोषणा, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी काल विधानपरिषदेत
केली. या आदेशामुळे छत्रपती संभाजीनगर इथल्या वाळूज महानगर परिसरातल्या सर्वसामान्य
नागरिकांची, शेतकऱ्यांची मोठी अडचण निर्माण झाली असल्याचं सांगून आमदार सतीश चव्हाण
यांनी सभागृहात लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. नोकरी, व्यवसायानिमित्त आलेल्यांनी
वाळूज परिसरात जागा घेऊन घरे बांधली, मात्र १२ जुलै २०२१ पासून नोंदणी महानिरीक्षक
आणि मुद्रांक नियंत्रक यांनी तुकडा बंदीचा आदेश लागू केल्याने सर्वसामान्य कामगार,
मजूरांना हक्काचं घर आणि शेतकऱ्यांना जमिनी
विकसीत करता येत नसल्याचं चव्हाण यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिलं.
****
राज्यात
धर्मांतर आणि लव्ह जिहादच्या घटना वाढत आहेत, याला आळा घालण्यासाठी कायदा करण्याच्या
मागणीचा प्रस्ताव विचाराधीन असून यावर सरकार योग्य निर्णय घेईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांनी काल विधान परिषदेत दिली. भारतीय जनता पक्षाचे गोपीचंद पडळकर
यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना ते बोलत होते. कोणालाही कोणाशीही लग्न
करण्याचा अधिकार आहे. कोणत्याही समाजातील मुलाला न्याय मिळाला पाहिजे हीच सरकारची भूमिका
आहे. धर्माबाहेर लग्न केलेल्या मुलीसोबत पालकांचा संपर्क प्रस्थापित व्हावा, तिची ख्याली
खुशाली कळावी, यासाठी आंतरधर्मीय विवाह परिवार समितीची स्थापना करण्यात आली आहे, असं
फडणवीस यांनी सांगितलं. ते म्हणाले,
Byte…
या
सगळ्या विषयाचं गांभीर्य हे शासनाला समजलेलं आहे, शासनानं त्याची नोंद घेतली आहे. जवळपास
४० मोर्चे यासदंर्भातले महाराष्ट्रात निघालेले आहेत. यासंदर्भात वेगवेगळ्या राज्यांनी
काय कायदे केले आहेत, त्या कायद्यांची माहिती ही मागवली जाईल. आणि आपल्याकडे देखील
अशा प्रकारचा कुठला कायदा केला पाहिजे, त्याच्यात काय तरतुदी केल्या पाहिजे, या कायद्यांमध्ये
काय आहे, असा सगळा अभ्यास करून आणि मग त्यानंतर त्याच्यावर योग्य निर्णय घेण्यात येईल.
आज मी एवढंच सांगतो की, जी भावना आपण मांडली आहे, किंवा विविध मोर्चांच्या माध्यमातनं
जी भावना समोर आलेली आहे, त्या संदर्भात निर्णय घेणं हे सरकारच्या विचाराधीन आहे.
****
राज्यातल्या
कृषी सहाय्यकांची एक हजार चारशे एकोणचाळीस रिक्त पदं तातडीनं भरण्यात येतील, यासाठी
येत्या १५ दिवसात जाहिरात काढण्यात येईल, अशी माहिती कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी
काल विधानपरिषदेत दिली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सतीश चव्हाण यांनी विचारलेल्या
तारांकित प्रश्नाला ते उत्तर देत होते. राज्यपालांनी अनुसूचित क्षेत्रातली पदं -`पेसा`च्या
संदर्भात आदेश दिले आहेत, त्यामुळे `पेसा`ची पदं वगळून अन्य पदं भरण्यात येतील, असं
सत्तार यांनी सांगितलं.
****
थकीत
वीज देयकामुळे कुठल्याही सरकारी शाळेचा वीज पुरवठा यापुढे खंडित केला जाणार नाही, सर्व
सरकारी शाळांची वीज देयकं शालेय शिक्षण विभाग भरेल, असं आश्वासन, शालेय शिक्षण मंत्री
दीपक केसरकर यांनी विधानसभेत दिलं. शाळांना सौर ऊर्जा वापरण्याच्या सूचना दिल्या असल्याचं
त्यांनी सांगितलं. थकीत वीज देयकांसाठी सार्वजनिक बाबींचा विद्युत पुरवठा खंडीत करु
नये, आणि राज्य सरकारनं याविषयी तातडीनं धोरणात्मक निर्णय घेण्याची मागणी विरोधी पक्षेनेते
अजित पवार यांनी केली होती. हा मुद्दा मंत्रिमंडळ बैठकीत उपस्थित केला जाईल, असंही
केसरकर म्हणाले. राज्यात प्राथमिक शाळा, ग्रामपंचायत कार्यालयं, प्राथमिक आरोग्य केंद्रं,
उपजिल्हा रुग्णालयं, जिल्हा रुग्णालयं, ग्रामीण पाणी पुरवठा योजनांचा वीज पुरवठा थकीत
देयकांसाठी खंडीत करण्याच्या घटना घडत आहेत, याकडे पवार यांनी लक्ष वेधलं.
****
छत्रपती
शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेसाठी नुकत्याच सादर झालेल्या अर्थसंकल्पात एक हजार
कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे या योजनेतल्या पात्र उर्वरीत लाभार्थी
शेतकऱ्यांना लवकरच अनुदान मिळेल, असं सहकार मंत्री अतुल सावे यांनी काल विधानपरिषदेत
सांगितलं. यवतमाळ जिल्ह्यातल्या एक लाख २८ हजार ४६४ शेतकऱ्यांना अद्यापही छत्रपती शिवाजी
महाराज शेतकरी सन्मान योजनेचा लाभ मिळालेला नसल्याबाबत विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे
यांनी प्रश्न उपस्थित केला होता. ज्या पात्र लाभार्थींना या योजनेचे लाभ मिळाले नाहीत
त्यांना या महिनाअखेर पर्यंत अनुदान देण्यात येईल असं सावे यांनी सांगितलं.
****
राज्यातल्या
धान उत्पादक शेतकऱ्यांना आधारभूत किंमती व्यतिरिक्त प्रति हेक्टरी १५ हजार रुपये प्रोत्साहनपर
रक्कम देण्यात येत असल्याचं मंत्री रवींद्र चव्हाण यांनी विधानसभेत सांगितलं. धान उत्पादक
शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर रकमेसंदर्भात उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नाला ते उत्तर
देत होते. गेल्या हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धान उत्पादक शेतकऱ्यांना
दोन हेक्टरच्या मार्यादेत प्रति हेक्टर १५ हजार रुपये देण्याची घोषणा केली होती, त्यानुसार
ही रक्कम शेतकऱ्यांना देण्यात येत आहे.
****
महसूलमंत्री
राधाकृष्ण विखे-पाटील यांनी काल विधानसभेत महाराष्ट्र गो सेवा आयोग विधेयक मांडलं.
याअंतर्गत राज्यात गो सेवा आयोग स्थापन करण्याचा मानस आहे. देशी गायी, वळू, बैल आणि
वासरांच्या संरक्षणाची जबाबदारी या आयोगाकडे असेल. प्रामुख्यानं देशी पशुंच्या प्रजननाला
आणि संरक्षणाला हा आयोग प्रोत्साहन देईल. हा आयोग पशुसंवर्धन क्षेत्रात कार्यरत असलेल्या
गोसदन, गोशाळा, पांजरपोळ आणि गोरक्षण यासारख्या संस्थांची नोंदणी आणि पर्यवेक्षण करेल.
गोसेवा अधिनियम किंवा आयोगाच्या आदेशाचं पालन न करणाऱ्या व्यक्तीवर दहा हजार रुपयांपर्यंत
दंड लावण्याची तरतूद या विधेयकात करण्यात आली आहे. या आयोगात अध्यक्ष, विविध शासकीय
विभाग, विद्यापीठ, अशासकीय संस्था यांचे २३ सदस्य आणि पशुसंवर्धन विभागाचे सहआयुक्त
असे २५ सदस्य असतील.
****
विधीमंडळ
सुरु असताना विधीमंडळाच्या कामकाजालाच मंत्र्यांनी सर्वोच्च प्राधान्य दिलं पाहिजे,
अशी मागणी विधानसभेत विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी केली. राज्याच्या मंत्रिमंडळातले
मंत्री बैठकीत व्यस्त असल्यामुळे विधानसभेत काल प्रश्न राखून ठेवण्याची नामुष्की सरकारवर
आली. या गोष्टी सभागृहात वारंवार घडत आहेत. सभागृहात चुकीचे पायंडे पाडता कामा नये,
अशी मागणीही पवार यांनी यानिमित्त केली.
****
छत्रपती
संभाजीनगर जिल्ह्यात कन्नड -सोयगाव परिसरात लगतच्या गावांमध्ये संरक्षक भिंत बांधण्यात
येणार असल्याचं, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानसभेत सांगितलं. यासंदर्भात
सदस्य उदयसिंग राजपूत यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. कन्नड-सोयगाव परिसरातल्या
२० ठिकाणांपैकी, अकरा ठिकाणच्या कामांची प्रत्यक्ष पाहणी करून संरक्षक भिंत बांधण्याची
अंदाजपत्रकं तयार केलेली असून, प्रशासकीय मान्यतेसाठी सादर करण्याची कार्यवाही क्षेत्रीयस्तरावर
सुरू आहे. उर्वरित नऊ ठिकाणची अंदाजपत्रकं प्रशासकीय मान्यतेसाठी शासनास सादर करण्याची
कार्यवाही प्रगतीपथावर आहे. यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य हरिभाऊ बागडे, बच्चू कडू
यांनी सहभाग घेतला.
****
शिवसेनेच्या
संसदीय नेतेपदी खासदार गजानन कीर्तिकर यांची निवड करण्यात आली आहे. याबाबत मुख्यमंत्री
एकनाथ शिंदे यांनी लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहिलं आहे. संसदीय नेतेपदावरुन खासदार
संजय राऊत यांना अधिकृतरित्या हटवण्यात आलं आहे.
****
रमजानच्या
पवित्र महिन्याला आजपासून सुरुवात झाली. काल संध्याकाळी चंद्रदर्शन झाल्याचं अमारत-
ए - शरियाच्या वतीने जाहीर करण्यात आलं. त्यानंतर छत्रपती संभाजीनगरमधल्या सर्व मशिदींमधून
रमजान महिना सुरु झाल्याची घोषणा करण्यात आली. सहेरी आणि इफ्तारच्या खरेदीसाठी बाजारपेठेत
नागरीकांची गर्दी दिसून आली.
****
छत्रपती
संभाजीनगरमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या शहीद भगतसिंग अध्यासन
केंद्रातर्फे, `शहीद भगतसिंग यांची सामाजिक - सांस्कृतिक प्रतिमा`, या विषयावर काल
विद्यापीठामध्ये एक दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्र घेण्यात आलं. भगतसिंग अनेक अंगांनी
समृद्ध असं व्यक्तिमत्व आहे. आजही नवीन क्रांतीसाठी भगतसिंगाचे विचार प्रेरणादायी असल्याचं
प्राध्यापक तानाजी ठोंबरे आपल्या बीजभाषणात म्हणाले. भगतसिंग हे आधुनिक युगाचे महानायक
असल्याचं प्रतिपादन प्राचार्य डॉ. शिवाजी देवढे यांनी उद्घाटनपर भाषणात केलं.
****
परभणी
इथले कथा लेखक आसाराम लोमटे आणि पाली इथले एचआयव्ही ग्रस्तांचे पालनकर्ता बारगजे दांपत्य
यांना, भोकर इथला सेवा समर्पण साहित्य पुरस्कार जाहीर झाला आहे. प्रत्येकी अकरा हजार
रुपये, मानपत्र, सन्मान चिन्ह असं या पुरस्काराचं स्वरुप आहे. येत्या दोन एप्रिलला
समारंभपूर्वक या पुरस्काराचं वितरण केलं जाणार असल्याची माहिती संयोजकांनी दिली आहे.
****
धाराशिव
जिल्ह्यात परंडा तालुक्यातल्या रोहकल इथल्या सरपंचाचा पती हनुमंत कोलते याला एक लाख
रुपयांची लाच घेताना अटक करण्यात आली. दुहेरी पंप लघु योजनेचं काम पूर्ववत सुरू ठेवण्यासाठी
त्यानं ही लाच मागितली होती.
****
No comments:
Post a Comment