Friday, 24 March 2023

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक : 24.03.2023 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

 

आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

२४ मार्च २०२ सकाळी ११.०० वाजता

****

जागतिक क्षयरोग दिन आज पाळला जात आहे. क्षयरोग दिनाच्या पुर्वसंध्येला दिलेल्या संदेशात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी, क्षयरोग निर्मूलनाच्या उद्दिष्टपूर्तीसाठी आपण स्वतःला समर्पित करण्याचा संकल्प करुया, असं आवाहन केलं. यानिमित्त आज छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या क्षयरोग नियंत्रण समितीच्या वतीनं सायकल रॅली काढून जनजागृती करण्यात आली. तसंच महानगरपालिकेच्या वतीनं १०० क्षयरुग्णांना पोषण आहार कीटचं वाटप करण्यात येणार असून, घंटागाड्यांवर क्षयरोग जनजागृतीसाठी जिंगल्स वाजवण्यात येत आहेत.

***

रमजानच्या पवित्र महिन्याला आजपासून सुरुवात झाली. काल संध्याकाळी चंद्रदर्शन झाल्याचं इमारत- ए - शरियाच्या वतीने जाहीर करण्यात आलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना रमजानच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

****

राज्यात यावर्षी जानेवारी महिन्यापासून इन्फ्लूएन्झाचे ६७९ रुग्ण आढळले आहेत. यामध्ये एच 1 एन 1 विषाणूच्या ४२५, तर एच 3 एन 1 विषाणूच्या २६४ प्रकरणांचा समावेश आहे. आरोग्य विभागाने राज्यातल्या सर्व रुग्णालयांना इन्फ्लूएन्झाचा सामना करण्यासाठी निर्देश दिले आहेत. 

***

पुण्यातल्या पुण्यभूषण फाउंडेशनतर्फे दिला जाणारा पुण्यभूषण पुरस्कार नाट्य आणि चित्रपट क्षेत्रातल्या अतुलनीय योगदानासाठी ज्येष्ठ अभिनेते मोहन आगाशे यांना जाहीर झाला आहे. संस्थेचे अध्यक्ष सतीश देसाई यांनी काल ही माहिती दिली. जुलैमध्ये याचा वितरण सोहळा होणार आहे.

***

कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आल्याच्या निषेधार्थ  हिंगोली इथं काल काँग्रेस पक्ष तसंच महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी रस्ता रोको आंदोलन केलं. आंदोलक कार्यकर्त्यांनी यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात घोषणा देत निषेध व्यक्त केला.

***

आसाममधे तामुलपूर इथं झालेल्या आशियाई खो खो अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय पुरूष आणि महिला संघानं जेतेपद पटकावलं आहे. महिला गटात भारतीय संघानं नेपाळचा एक डाव आणि ३३ गुणांनी पराभव केला तर भारतीय पुरूष संघानं नेपाळचाच एक डाव आणि सहा गुणांनी पराभव केला. या स्पर्धेत भारताच्या दोन्ही संघांनी सर्व सामने जिंकले.

****

 

No comments:

Post a Comment