Friday, 31 March 2023

TEXT - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 31.03.2023 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजताचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 31 March 2023

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ३१ मार्च २०२ सायंकाळी ६.१०

****

·      पहिली ते दहावीपर्यंतच्या शाळेपासून दूर राहणाऱ्या विद्यार्थ्यांना राज्य शासनाकडून वाहतूक भत्ता.

·      जुन्या पेन्शन योजनेसाठी संप करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात कपातीचा सरकारचा निर्णय.

·      छत्रपती संभाजीनगर इथली सभा पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार घेण्याचा महाविकास आघाडीचा निर्धार.

आणि

·      सोळाव्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेला थोड्या वेळातच प्रारंभ.

****

राज्यातल्या पहिली ते दहावीपर्यंतच्या शाळेपासून दूर राहणाऱ्या विद्यार्थ्यांना राज्य शासनाकडून वाहतूक भत्ता मिळणार आहे. ग्रामीण आणि शहरी भागातल्या वाड्यावस्त्यांवर राहणाऱ्या विद्यार्थ्यांना याचा लाभ होईल. पहिली ते पाचवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या वसतीस्थानापासून एक किलोमीटरपेक्षा अधिक तर सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांच्या वसतीस्थानापासून तीन किलोमीटर आणि नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांच्या वसतीस्थानापासून पाच किलोमीटरपेक्षा अधिक अंतरावर शाळा असल्यास वाहतूक भत्ता मिळणार आहे.

****

राज्यात जुन्या पेन्शन योजनेसाठी १४ ते २० मार्च या कालावधीत संप केलेल्या १७ लाख कर्मचाऱ्यांच्या वेतनातून बाराशे कोटी रुपयांची कपात केली जाणार आहे. तसंच संपकाळाचा कालावधी असाधारण रजा म्हणून ग्राह्य धरला जाणार असल्याचं राज्य सरकारनं स्पष्ट केलं आहे. दरम्यान, कर्मचारी समन्वय समितीचे निमंत्रक विश्वास काटकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना या आदेशात बदल करण्यासाठी विनंतीपत्र दिले असून ते लवकरच मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

२०२३ ते २०२८ या पाच वर्षांसाठी भारताच्या नवीन परदेशी व्यापार धोरणाची घोषणा केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी केली आहे. ते आज नवी दिल्लीत ते पत्रकार परिषदेत बोलत होते. उद्यापासून लागू होणाऱ्या या नवीन धोरणामध्ये आत्मनिर्भर भारताच्या दृष्टीने अनेक नवीन संधी आणि सुविधा देणाऱ्या सूचना अंमलात येणार आहेत, तसंच आयात आणि निर्यात संदर्भात लवचिकता ठेवण्यात आली असून, निर्यातीत मोठ्या आर्थिक वृद्धीचं लक्ष ठेवण्यात आल्याचं गोयल यांनी सांगितलं.

****

पंतप्रधानांच्या शैक्षणिक पदव्यांबाबत माहितीच्या अधिकार कायद्यांतर्गत माहिती सादर करण्याची गरज नसल्याचा निकाल गुजरात उच्च न्यायालयानं दिला आहे. पंतप्रधानांच्या पदवी प्रमाणपत्राचा तपशील मागणारे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना उच्च न्यायालयानं २५ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. पंतप्रधानांच्या पदवी आणि पदव्युत्तर पदवीचा तपशील सादर करण्याचे निर्देश देणारा मुख्य माहिती आयोगाचा आदेशही या न्यायालयानं रद्दबातल ठरवला आहे. महान्यायअभिकर्ता तुषार मेहता यांनी या प्रकरणाचा युक्तिवाद केला. पंतप्रधानांच्या पदव्यांमध्ये लपवण्यासारखे काही नसले तरी विद्यापीठाला माहिती जाहीर करण्यास भाग पाडले जाऊ शकत नाही. लोकशाहीत पंतप्रधान पदावर असलेली व्यक्ती डॉक्टरेट असेल किंवा निरक्षर असेल, यामुळे काहीही फरक पडत नाही. तसेच या माहितीत कोणतेही जनहित गुंतलेलं नाही, असंही मेहता यांनी आपल्या युक्तिवादात म्हटलं होतं.

****

सुधारित आकाश शस्त्र प्रणाली आणि शस्त्रास्त्रांचा शोध घेणाऱ्या, १२ डब्ल्यू एल आर ‘स्वाती’ रडारच्या खरेदीसाठी, संरक्षण मंत्रालयानं भारत डायनॅमिक्स लिमिटेड बरोबर करार केला आहे. ९ हजार १६० कोटी रुपयांपेक्षा पेक्षा अधिक रकमेच्या या करारानुसार सुधारित क्षेपणास्त्र आणि प्रक्षेपक, सहाय्यक उपकरण आणि वाहनांची खरेदी केली जाणार आहे. आकाश शस्त्र ही हवाई संरक्षण क्षेपणास्त्र प्रणाली असून, संरक्षण संशोधन आणि विकास संस्था-डीआरडीओनं ती विकसित केली आहे. सुधारित आकाश शस्त्र प्रणालीच्या आणखी दोन तुकड्या देशाच्या उत्तर सीमेवर भारतीय लष्करासाठी खरेदी करण्याची योजना आहे.

****

येत्या १७ ते १९ मे दरम्यान पहिली जागतिक पर्यटन क्षेत्रातली आर्थिक गुंतवणूक परिषद नवी दिल्लीत होणार आहे. देशी आणि परदेशी गुंतवणुकदारांना पर्यटन व्यवसायात गुंतवणूक करण्यासाठी एक मोठं व्यासपीठ मिळेल, असं केंद्रीय पर्यटन मंत्रालयानं म्हटलं आहे. नवी दिल्लीत काल दोन दिवसीय पर्यटन चिंतन समंलेनाचा समारोप केंद्रीय पर्यटन मंत्री जी किशन रेड्डी यांच्या उपस्थितीत झाला, त्यावेळी ही माहिती देण्यात आली.

****

राज्यात आज ४२५ जणांना कोविडचा संसर्ग झाला आहे. तर ३५१ रुग्ण संसर्गमुक्त होवून घरी परतले असून रुग्ण बरे होण्याचा दर ९८ पूर्णांक १४ टक्के आहे. दरम्यान, आज एकही मृत्यूची नोंद झाली नाही.

****

छत्रपती संभाजीनगर इथली सभा पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार घेण्याचा निर्धार महाविकास आघाडीने वर्तवला आहे. विधानसभेचे विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी सांगितल आहे. ते आज मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. दोन एप्रिलला ही सभा होणार आहे. सभेची तयारी व्यवस्थित सुरू असून, महाविकास आघाडीचे नेते अंबादास दानवे, राजेश टोपे यांच्यासह स्थानिक पदाधिकारी तयारीवर लक्ष ठेवून असल्याचं, पवार यांनी म्हटलं आहे. दरम्यान छत्रपती संभाजीनगरात घडलेल्या घटनेसंदर्भात नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असं आवाहनही पवार यांनी केलं आहे.

उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनीही आज मुंबईत पत्रकार परिषद घेत, ही सभा होणार असल्याचं सांगितलं.

दरम्यान, या सभेच्या पूर्वतयारीनिमित्त आज सभेच्या नियोजित ठिकाणी सांस्कृतिक मंडळ मैदानावर शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, संपर्कप्रमुख तथा म्हाडाचे सभापती विनोद घोसाळकर, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मुख्य पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. महाविकास आघाडीची ही सभा ऐतिहासिक होईल, असा विश्वास घोसाळकर यांनी यावेळी व्यक्त केला.

दरम्यान, या सभेमुळे सामाजिक वातावरण बिघडण्याचा अहवाल जर संबंधित यंत्रणांनी दिला, तर सभेला परवानगी नाकारली जाऊ शकते, असं ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे. ते आज पुण्यात पत्रकारांशी बोलत होते. प्रशासन सर्व स्थितीवर लक्ष ठेवून असल्याचं महाजन यांनी सांगितलं.

****

शिवरायांच्या महाराष्ट्रात महिलांचा अवमान होतो ही खेदाची बाब असल्याचं, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांच्यावर शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी केलेल्या वक्तव्याबाबत सुळे यांनी ट्वीटरवरून हे मत व्यक्त केलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी याची तात्काळ दखल घेऊन कारवाई करावी अशी मागणीही खासदार सुळे यांनी केली. अनेक महापुरुषांचा वैचारिक वारसा असणारे महाराष्ट्र हे अत्यंत सभ्य, सुसंस्कृत राज्य आहे याची आठवणही खासदार सुप्रिया सुळे यांनी करुन दिली आहे.

****

प्रस्तावित वीज दरवाढीला आव्हान देणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल करण्यात आली आहे. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात वीज दर अधिक असूनही, उद्या एक एप्रिलपासून वीज दरवाढ लागू करण्याचा प्रस्ताव आहे. या प्रस्तावित वीज दरवाढीला प्रतिबंध करावा या मागणीसाठी महावितरणमधील माजी अभियंते, अजित देशपांडे यांनी ही जनहित याचिका दाखल केली आहे. कृषीपंपाच्या अश्वशक्तिचा भार शेतकऱ्यांना न कळवताच त्यांच्या नावानं कोट्यवधींची थकबाकी दाखवून शासनाची, शेतकऱ्यांची आणि सर्वसामान्य ग्राहकांचीही फसवणूक केल्याप्रकरणाची उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तींच्या समितीमार्फत चौकशी करावी अशी मागणीही देशपांडे यांनी केली आहे. या प्रकरणाची प्राथमिक सुनावणी १० एप्रिल रोजी होणार आहे.

****

सोळाव्या इंडियन प्रिमियर लीग - आयपीएल क्रिकेट स्पर्धेचं आज उद्घाटन होणार आहे. अहमदाबादमधल्या नरेंद्र मोदी क्रीडा संकुलात गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपरकिंग्ज दरम्यान आज संध्याकाळी साडे सात वाजता पहिला सामना होणार आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये एकूण १० संघ खेळणार असून एकूण ७० सामने होणार आहेत. देशभरातल्या एकूण १२ शहरांमध्ये हे सामने खेळवले जाणार आहेत.

****

नांदेड जिल्ह्यात, चला जाणुया नदीला या उपक्रमा अंतर्गत उद्या नदी संवाद यात्रा आणि जलसाठ्यातून गाळ काढण्याच्या उपक्रमाचा शुभारंभ सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते होणार आहे. नदी स्वच्छतेसाठी लोकांनी एकत्र यावं तसंच नदी साक्षरतेविषयी अधिक जागर व्हावा या उद्देशाने शासन हा उपक्रम राबवत आहे.

****

लातूर जिल्ह्यात चाकूर तालूक्यात ३०० हेक्टर जमिनीवर कृषि विकास योजनेंतर्गत सेंद्रीय शेती केली जाणार आहे.

****

No comments:

Post a Comment