Monday, 24 April 2023

आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक : २४ एप्रिल २०२३ सकाळी ७.१० मि.

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date : 24 April 2023

Time : 7.10 AM to 7.25 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक : २४ एप्रिल  २०२ सकाळी ७.१० मि.

****

·      राष्ट्रीय पंचायती राज दिनानिमित्त आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सुमारे १७ हजार कोटी रूपये खर्चाच्या विविध प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण

·      आपल्या कष्टाचा पैसा सुरक्षित राहण्यासाठी नागरिकांनी सतर्क राहण्याचं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचं आवाहन

·      आगामी विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीसोबत युती करण्याबाबत योग्य वेळी निर्णय घेतला जाईल- शरद पवार

·      भारतीय जनता पक्षाला देशात दुसरा कोणताही पक्ष राहू द्यायचा नाही- माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आरोप

·      ९७ वावं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अमळनेरला होणार

·      लातूरचा रेल्वे बोगी कारखाना येत्या ऑगस्टपर्यंत सुरु करण्यासाठी पाठपुरावा करण्याची रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची ग्वाही

·      आयपीएल क्रिकेट स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा राजस्थान रॉयल्सवर तर चेन्नई सुपर किंग्जचा कोलकाता नाईट रायडर्सवर विजय

आणि

·      मराठवाडासह राज्याच्या काही भागात तुरळक ठिकाणी अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त

 

 

 

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मध्य प्रदेशातल्या रीवा इथं राष्ट्रीय पंचायती राज दिनाच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होणार असून, सुमारे १७ हजार कोटी रूपये खर्चाच्या विविध प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण करणार आहेत. देशभरातल्या सर्व ग्रामसभा आणि पंचायती राज संस्थांच्या प्रतिनिधींना ते यावेळी मार्गदर्शन करणार आहेत. जलजीवन मिशन अंतर्गत सुमारे सात हजार कोटी रुपये खर्चाच्या प्रकल्पांची पायाभरणीही पंतप्रधान करणार आहेत.

या कार्यक्रमामध्‍ये पंचायत स्तरावर सार्वजनिक खरेदीसाठी एकात्मिक ई ग्राम स्वराज  आणि जेम पोर्टलचं उद्घाटनही करण्यात येणार आहे. पंचायतींना ई-ग्रामस्वराज मंचाचा  लाभ मिळावा यासाठी हे पोर्टल सुरू करण्‍यात येत आहे. या दौऱ्यात पंतप्रधान सुमारे ३५ लाख मालमत्ता स्वामित्व कार्ड लाभार्थ्यांना सुपूर्द करणार आहेत.

'सर्वांसाठी घरकुल' हे ध्येय साध्य करण्याच्या दिशेनं एक पाऊल पुढे टाकत, प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण अंतर्गत चार लाखांहून अधिक लाभार्थ्यांच्या 'गृह प्रवेश' कार्यक्रमात देखील पंतप्रधान सहभागी होतील.

****

आपल्या कष्टाचा पैसा सुरक्षित राहण्यासाठी नागरिकांनी सतर्क असण्याची गरज, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी व्यक्त केली आहे. त्या काल बंगळुरू इथं एका कार्यक्रमात बोलत होत्या. पॉन्झी ॲप्स- फसव्या गुंतवणूक योजनांवर कारवाईसाठी रिझर्व्ह बँक आणि संबंधित मंत्रालयांसोबत सरकार काम करत असल्याचं सीतारामन यांनी सांगितलं. कोविड काळात पाश्चिमात्य देशांनी चुकीचे निर्णय घेतल्यानं, तसंच कोविडपश्चात युक्रेन युद्धामुळे इतर देशांच्या अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम झाल्याचं त्या म्हणाल्या. मात्र योग्य वेळी योग्य निर्णय घेतल्यानं भारतीय अर्थव्यवस्था अन्य देशांच्या तुलनेत सुस्थितीत असल्याचं, सीतारामन यांनी नमूद केलं.

****

भारतीय अर्थव्यवस्थेला जगात तिसऱ्या स्थानावर पोचण्यासाठी देशातल्या युवा वर्गाला बरोबर घेऊन एकत्रित प्रयत्न करण्याचं आवाहन, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत डॉ.  कराड. ते काल पुण्यात सावित्रीबाई फुले विद्यापीठात, 'सहकार क्षेत्रातील युवकांचा सहभाग', या विषयावरील राष्ट्रीय कार्यशाळेत मार्गदर्शन करत होते. राष्ट्रीय युवा सहकारी संस्थेच्या सहकार्यानं पुणे विद्यापीठात, सहकार क्षेत्रातील संशोधन केंद्र सुरु करणार असल्याची घोषणा कराड यांनी यावेळी केली.

****

कोविड विषाणूच्या वाढत्या संसर्गाला आळा घालण्यासाठी मुंबई, पुणे आणि ठाणेसह राज्यातल्या दहा अतिजोखमीच्या जिल्ह्यांवर विशेष लक्ष देण्यात यावं, अशी सूचना, सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी केली आहे. कोरोना विषाणू संसर्गावर काम करण्यासाठी गठीत विशेष कृतीदलाच्या बैठकीत ते काल पुणे इथं बोलत होते. कोविड चाचण्यांची संख्या वाढवावी, आरोग्य विभागाच्या वतीनं करण्यात आलेल्या सराव प्रात्यक्षिकात आढळलेल्या त्रुटींचं तत्काळ निराकरण करावं, जत्रा, मॉल, थिएटर, बाजार अशा गर्दीच्या ठिकाणी मास्क आवर्जून वापरण्याबाबत आवाहन करण्यात यावं, अशा सूचना सावंत यांनी यावेळी केल्या.

****

राज्यातल्या आगामी विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीसोबत युती करायची की नाही, याबाबत योग्य वेळी निर्णय घेतला जाईल, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे. अमरावती इथं काल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुरस्कृत महात्मा फुले एग्रीकल्चर फोरमच्या वतीनं आयोजित कृषी पदवीधरांचं पहिलं राज्यस्तरीय अधिवेशन काल पवार यांच्या उपस्थितीत झालं, त्यानंतर ते बोलत होते. महाविकास आघाडी भक्कम असल्याचा पुनरुच्चार त्यांनी यावेळी केला.  शेती व्यवसाय समृद्ध करायचा असेल तर शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्याची आवश्यकता असल्याचं त्यांनी कृषी पदवीधरांना यावेळी सांगितलं.

****

भारतीय जनता पक्षाला देशात दुसरा कोणताही पक्ष राहू द्यायचा नाही, अशी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. ते काल जळगाव जिल्ह्यात पाचोरा इथं जाहीर सभेत बोलत होते. भाजपच्या पक्षविस्ताराच्या धोरणावर टीका करताना उद्धव ठाकरे म्हणाले…

“भारतीय जनता पक्षाला देशामध्ये राजकारणात मित्र पण नकोयत आणि स्वतःच्या पक्षातले चांगले लोकं नकोयत. हा कुठला न्याय आहे? हा कुठला पक्ष आहे? कोणता पक्षवाढीचा हा विषय? आज माझ्याकडे नाव, चिन्ह नसतांनासुद्‌धा जनसागर उसळतोय, हा माझा पक्ष आहे. ही माझी शक्ती, ही माझी ताकत आहे. आणि शिवसेना प्रमुखांचे आशिर्वाद आहेत. पण स्वतःच्या पक्षात जी चांगली माणसं आहेत, ती आपल्याला डोईजड होणारेत, त्यांच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप करायचे, त्यांना पक्षातून काढून टाकायचं, पक्षातून ते जातील असं बघायचं. आणि दुसऱ्या पक्षातल्या लोकांना भ्रष्टाचाराचे आरोप करून स्वतःच्या पक्षात घ्यायचं हा कोणता न्याय आहे?”

****

९७ वावं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन जळगाव जिल्ह्यातल्या अमळनेर इथं होणार आहे. साहित्य महामंडळानं गठित केलेल्या स्थळनिवड समितीतर्फे काल पुण्यात सर्वानुमते हा निर्णय घेण्यात आला. अमळनेरच्या मराठी वाङमय मंड या संस्थेनं हे संमेलन घेण्याची शिफारस केली, त्याचा स्वीकार करत अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळानं, या प्रस्तावाला मान्यता दिली. या समितीनं सातारा जिल्ह्यात औदुंबर आणि जळगाव जिल्ह्यात अमळनेर या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली. या संस्थांची संमेलन आयोजनाची तयारी आणि कार्यक्षमता यांचा विचार करून ९७ वाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी अमळनेरची निवड केली आहे.

****

महाराष्ट्र लोकसेवा आयोग - एमपीएससीच्या येत्या ३० तारखेला होणाऱ्या परिक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांचे प्रवेश पत्र सामाजिक माध्यमावर व्हायरल झाल्याचं उघडकीस आलं आहे. टेलिग्राम लिंकवर हजारो विद्यार्थ्यांचे प्रवेशपत्र काल सकाळपासून दिसू लागल्यानंतर ही बाब समोर आली. याबाबत सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल केल्याचं आयोगानं जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे. या प्रवेशपत्रांची लिंक बंद करण्यात आली असून, परिक्षा पूर्वनियोजित वेळापत्रकानुसारच होईल, असंही आयोगानं स्पष्ट केलं आहे.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमाचा शंभरावा भाग येत्या रविवारी, ३० एप्रिलला प्रसारित होणार आहे. सकाळी ११ वाजता आकाशवाणी तसंच दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरून हा भाग प्रसारित केला जाईल. दरम्यान, या शंभराव्या भागानिमित्त केंद्र सरकारने शंभर रुपयांचं विशेष नाणं जारी करण्याचा निर्णय घेतला आहे.

****

लातूर इथला रेल्वे बोगी कारखाना येत्या ऑगस्टपर्यंत सुरु करण्यासाठी पाठपुरावा सुरु असल्याचं, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी सांगितलं आहे. दानवे यांनी काल या कारखान्याची पाहणी करून स्थितीचा आढावा घेतला, त्यानंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते. या कारखान्यात १२० वंदे भारत रेल्वेंची निर्मिती केली जाणार असून, आवश्यकता भासल्यास आणखी ८० रेल्वे निर्मिती केली जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं. हा कारखाना सुरु झाल्यानंतर लातूरसह मराठवाड्यातल्या सुशिक्षित बेरोजगार युवकांना रोजगार उपलब्ध होणार आहे, तसंच या परिसरात छोटे-छोटे व्यावसायिक तयार होवून जिल्ह्याच्या विकासाला गती मिळेल, असा विश्वासही दानवे यांनी यावेळी व्यक्त केला.

दरम्यान, निलंगा तालुक्यात आंबुलगा इथं, कर्मयोगी डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर सहकार साखर कारखान्याचा ओंकार साखर कारखाना, तसंच विविध प्रकल्पांचं उद्घाटन, दानवे यांच्या हस्ते काल झालं. यावेळी बोलताना त्यांनी, सरकारची गुंतवणूक असल्याशिवाय शेती परवडत नसल्याचं सांगितलं...

‘‘सरकारची गुंतवणूक असल्याशिवाय शेती परवडत नाही. एनडीआरएफच्या नियमांमध्ये अतिवृष्टी झाली, दुष्काळ जर पडला तर शेतकर्याला फक्त साडे सहा हजार, साडे सहा हजार दोन हेक्टरला पैसे दिले जायचे. हे सरकार आलं देवेंद्र फडणवीस, एकनाथरावांचं, या सरकारनं एनडीआरएफचे नियम बदलले आणि काय नियम केले, १३ हजार रुपये एका हेक्टरला पैसे दिले. दोन हेक्टर ऐवजी तीन हेक्टरला पैसे देऊ, तर पहिले मिळत होते १३ हजार, आणि मिळणार आहेत ३९ हजार. म्हणजे शेतीमध्ये सरकारची गुंतवणूक झाली’’.

****

निसर्गाच्या समतोलासाठी वसुंधरा संवर्धन आणि विकासासाठी महिलांनीच पुढाकार घ्यावा, सं आवाहन, भूवैज्ञानिक डॉ. एस बी गायकवाड यांनी केलं आहे. ते काल धाराशिव तालुक्यात कावळेवाडी इथं, जागतिक वसुंधरा दिवसाच्या निमित्तानं लोकसंवाद कार्यक्रमात बोलत होते. भूगर्भातल्या पाण्याचा मोठ्या प्रमाणावर उपसा केल्यानं पुढील काळात मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई निर्माण होणार असल्याचं सांगत, आतापासूनच काटकसरीनं पाणी वापराचं व्यवस्थापन करावं, प्रत्येकानं एक तरी पर्जन्य जलपुनर्भरणाचं मॉडेल तयार करावं, असं आवाहन गायकवाड यांनी यावेळी केलं.

****

गडचिरोली जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या पोलिस भरती प्रक्रियेत, बीड जिल्ह्यातले प्रकल्पग्रस्त असल्याचं बनावट प्रमाणपत्र जोडून नोकरी मिळवण्याचा प्रयत्न करणाऱ्या सहा युवकांना, स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. हे सर्व आरोपी गडचिरोली जिल्ह्यातले रहिवासी आहेत. यासंदर्भातली गोपनीय तक्रार पोलिस अधीक्षकांकडे प्राप्त झाली होती, त्या अनुषंगानं केलेल्या तपासात, शिपाई म्हणून नियुक्त झालेल्या पाच पैकी दोन जणांचे, तर यंदाच्या भरतीत तात्पुरती नियुक्ती झालेल्या चार उमेदवारांची प्रमाणपत्रं बोगस असल्याचं निदर्शनास आल्यामुळे ही कारवाई करण्यात आली.

****

धाराशिव जिल्ह्यात तुळजापूर तालुक्यातल्या नळदुर्ग इथं महात्मा बसवेश्वर यांचा श्वारुड पुतळा उभारण्यात येणार आहे. आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचा पुढाकारातून हा पुतळा उभारण्यात येणार असून, गेल्या अनेक वर्षापासून धाराशिव जिल्ह्यातल्या वीर शैव लिंगायत समाजाची ही मागणी होती. नुकत्याच झालेल्या महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीचं औचित्य साधून, नळदुर्ग इथं राष्ट्रीय महामार्गालगत उपलब्ध असलेल्या शासकीय जमिनीची पाहणी करुन, या ठिकाणी सुसज्ज उद्यानासह अश्वारु पुतळा उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

****

संपूर्ण राज्यातल्या शेतकऱ्याचं लक्ष लागून असलेल्या बुलडाण्यातल्या भेंडवळच्या घटमांडणी चे अंदाज काल जाहीर झाले. या अंदाजानुसार यावर्षी जूनमध्ये कमी पाऊस होणार असून, पेरणी उशिरा होणार आहे, तसंच वर्षभर पीकपरस्थिती सर्वसाधारण राहणार आहे. अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर घटमांडणी झाली होती. गेल्या ३५० वर्षांपासून ही परंपरा जोपासली जाते, भेंडवळच्या या भविष्यवाणीला शास्त्रीय आधार नाही, मात्र संपूर्ण राज्याचं खासकरून शेतकऱ्याचं लक्ष या अंदाजाकडे लागलेलं असतं.

****

बीड जिल्ह्यात उन्हाचं प्रमाण वाढत असून, उष्माघात बाधितांना उपचारांसाठी शासकीय रुग्णालयांनी सज्जता ठेवावी,शी सूचना जिल्हाधिकारी दिपा मुधोळ मुंडे यांनी रुग्णालयांना केली आहे. उष्मघात होऊ नये यासाठी नागरिकांनी प्रतिबंधात्मक उपायांवर भर देणं गरजेचं असून, दुपारी उन्हात जाण्याचं टाळावं, असं आवाहनही मुंडे यांनी केलं आहे.

****

इंडियन प्रीमिअर लीग -आयपीएल क्रिकेट स्पर्धेत काल रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरनं राजस्थान रॉयल्सचा सात धावांनी पराभव केला. बंगळुरू इथं झालेल्या या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने प्रथम फलंदाजी करत १८९ धावा केल्या, मात्र राजस्थान रॉयल्स संघ २० षटकांत सहा बाद १८२ धावाच करू शकला.

अन्य एका सामन्यात चेन्नई सुपर किंग्जनं कोलकाता नाईट रायडर्सवर ४९ धावांनी विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करत चेन्नईनं निर्धारित षटकात २३५ धावा केल्या. प्रत्यूत्तरादाखल मैदानात उतरलेल्या कोलकाताचा संघ २० षटकात १८६ धावाच करु शकला.

****

तुर्की इथल्या जागतिक धनुर्विद्या स्पर्धेत पुरुष रिकर्व प्रकारात भारताला रौप्यपदकावर समाधान मानावं लागलं. काल झालेल्या अंतिम फेरीत अतनु दास, धीरज बोम्मादेवरा आणि तरुणदीप राय या नेमबाजांच्या संघाचा चीनच्या संघाने पाच-चार असा पराभव केला. पुरुष रिकर्व एकेरीच्या उपान्त्यफेरीत भारताच्या धीरज बोम्मादेवरा यानं कांस्यपदक पटकावलं. त्यानं कझाकस्तानच्या नेमबाजाचा सात-चार असा पराभव केला. 

****

हवामान

आजपासून तीन दिवस मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी अवकाळी पाऊस पडेल, असा इशारा हवामान विभागानं दिला आहे. या काळात धाराशिव, लातूर, बीड, परभणी यासह विदर्भातल्या काही जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.

****

तेलंगणाचे मुख्यमंत्री आणि भारत राष्ट्र समितीचे प्रमुख के चंद्रशेखर राव यांची आज छत्रपती संभाजीनगर इथं सभा होणार आहे. शहरातल्या जाबिंदा मैदानावर संध्याकाळी पाच वाजता होणार्या सभेत माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्यासह बीआरएसमध्ये नुकत्याच प्रवेश केलेल्या नेत्यांची उपस्थिती असेल.

****

कॉसमॉस बँकेची ९४ कोटी ४२ लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी, पुणे इथल्या न्यायालयाने ११ दोषींना तुरुंगवास आणि आर्थिक दंडाची शिक्षा सुनावली आहे. दोषींमध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या सिल्लोड इथले फहिम अझीम खान आणि शेख मोहम्मद अब्दुल जब्बार, तसंच नांदेड जिल्ह्याच्या भोकर इथला महेश साहेबराव राठोड याचा समावेश आहे. या टोळीने ऑगस्ट २०१८ मध्ये कॉसमॉस बँकेच्या मुख्यालयात असलेल्या सर्व्हरवर सायबर हल्ला करून बँकेतल्या खात्यांमधला पैसा लंपास केला होता.

****

No comments:

Post a Comment