Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date : 30 April
2023
Time : 7.10
AM to 7.25 AM
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक : ३० एप्रिल २०२३
सकाळी
७.१० मि.
****
· पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज आकाशवाणीवरच्या मन की बात मधून देशवासियांशी
संवाद, शंभराव्या भागानिमित्त
देशभरात विविध ठिकाणी हजारो कार्यक्रमांचं आयोजन
· खरीप हंगामात बियाणं, खतं, किटकनाशकाचं काटेकोर
नियोजन करण्याचे कृषि मंत्री अब्दुल सत्तार यांचे निर्देश
· जालना- छत्रपती संभाजी नगर दरम्यान स्क्रॅप पार्क तयार करण्याचा प्रस्ताव- केंद्रीय
रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे
· राज्यभरात झालेल्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकीत मतदारांचा संमिश्र कौल
· राज्यात अनेक ठिकाणी सलग चौथ्या दिवशी अवकाळी पाऊस, पिकांचं
मोठं नुकसान
आणि
· आयपीएल क्रिकेट स्पर्धेत गुजरात टायटन्सची
सात गडी राखून तर सनरायझर्स हैदराबाद संघाची नऊ
धावांनी प्रतिस्पर्ध्यांवर मात.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून
देशवासियांशी संवाद साधणार आहेत. ‘मन
की बात’च्या या
शंभराव्या भागानिमित्त देशभरात विविध ठिकाणी हजारो
कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. त्यात सर्व राज्यभवनांमधे मुख्य कार्यक्रम होणार आहेत. या कार्यक्रमात होणार असून त्यात पद्म
पुरस्कार विजेते, सामाजिक
कार्यकर्ते, चित्रपट क्षेत्रातले
मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरुन सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम
प्रसारित होईल.
दरम्यान, माहिती आणि प्रसारण मंत्री
अनुरागसिंह ठाकूर यांनी, नागरिकांना
मन की बात ऐकताना छायाचित्र काढून, ते
नमो ॲपवर अपलोड करण्याचं आवाहन केलं आहे. प्रत्येक नागरिक जास्तीत जास्त २५
छायाचित्रं अपलोड करू शकणार आहे.
मन की बातच्या या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्याचं आवाहन केंद्रीय मंत्री
पियुष गोयल यांनी केलं आहे. ते काल मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनी ‘मन
की बात या कार्यक्रमातून जनसंवाद, जनसहभागाचा
अनोखा प्रयोग केल्याचं, गोयल
यांनी म्हटलं आहे.
****
मुंबईत राजभवनावर राज्यपाल रमेश बैस यांच्या उपस्थितीत मुख्य कार्यक्रम होणार
आहे. यात पद्म पुरस्कार विजेते, मन
की बात मध्ये पंतप्रधानांनी उल्लेख केलेले मान्यवर, कला आणि चित्रपट क्षेत्रातले व्यक्ती सहभागी होणार आहेत.
केंद्रीय गृह मंत्री अमित शहा विलेपार्ले इथल्या तर केंद्रीय वाणिज्य मंत्री
पियूष गोयल कांदिवली इथं होणाऱ्या मन की बातच्या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.
मुंबई भाजपानं मुंबई आणि उपनगरात पाच हजाराहून अधिक ठिकाणी मन की बात च्या थेट
प्रक्षेपणाचं आयोजन केलं आहे.
जालना जिल्ह्यात एक हजार ठिकाणी या कार्यक्रमाच्या थेट प्रसारणाचं आयोजन
करण्यात आल्याची माहिती केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी काल
जालना इथं वार्ताहरांशी बोलताना
दिली. विदेशातही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात कार्यक्रमाची
लोकप्रियता वाढत असून या कार्यक्रमाच्या शंभराव्या भागाच्या प्रसरणाचा विश्व
विक्रम नोंदवला जाणार असल्याचं ते म्हणाले. जालना शहरासह मंठा, परतूर, भोकरदन, जाफ्राबाद इथल्या केंद्रांवर या मन की बात कार्यक्रमाच्या
थेट प्रसारणाचे आयोजन करण्यात आलं आहे. नागरिकांनी हा कार्यक्रम आवर्जुन ऐकावा असं
आवाहनही केंद्रीय मंत्री दानवे यांनी केलं आहे.
****
उद्या महाराष्ट्र दिनापासून ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, विद्यार्थ्यांना मुंबईत
मेट्रो प्रवासात २५ टक्के सवलतीची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.
मुंबई वन, नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड
वापरणाऱ्या, या श्रेणीतील हजारो
प्रवाशांना ही सवलत मिळणार आहे. महामुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेड आणि
एमएमआरडीए यांच्यातर्फे महाराष्ट्र दिनाची ही भेट असून ज्येष्ठ नागरिक, १२ वी उत्तीर्ण विद्यार्थी आणि दिव्यांग प्रवाशांना
मुंबई-वन पासवर ही सवलत मिळणार आहे.
****
आगामी खरीप हंगामात बियाणं, खतं, किटकनाशकं आदी निविष्ठा सर्वत्र उपलब्ध राहतील यादृष्टिनं
काटेकोर नियोजन करावं, तसंच
गुणनियंत्रण विभागानं दक्ष राहून बोगस बियाणे, खतांची विक्री होणार नाही याबाबतची दक्षता घ्यावी, असे निर्देश कृषि मंत्री अब्दुल सत्तार यांनी दिले आहेत. मराठवाडा विभागातील
आठही जिल्ह्यांतील खरीप नियोजनाचा कृषिमंत्री
अब्दुल सत्तार यांनी काल आढावा घेतला. सद्यस्थितीत सुरू असलेल्या अवकाळी
पावसामुळे झालेल्या नुकसानीचे अचूक पंचनामे करुन तातडीनं शासनास अहवाल सादर करावा
अशा सूचनाही त्यांनी या आढावा बैठकीत दिल्या.
बैठकीनंतर वार्ताहरांशी बोलतांना कृषीमंत्री सत्तार यांनी पावसाचं मोजमाप
करण्यासाठी राज्यात दहा हजार ठिकाणी पर्जन्यमापक यंत्रं बसवण्यात येणार असल्याचं
सांगितलं. सध्या राज्यात फक्त बाविसशे प्रर्जन्यमापक यंत्र असल्याचं ते म्हणाले.
यामुळे अतिवृष्टी झालेल्या भागात नुकसानीचे पंचनामे करण्यास मदत होईल, असं त्यांनी सांगितलं.
****
येत्या एक आणि दोन जून २०२३ रोजी रायगडावर तीनशे पन्नासावा शिवराज्याभिषेक
सोहळा राज्यशासनाकडून साजरा केला जाणार आहे. त्यानिमित्त राज्यात वर्षभर प्रत्येक
जिल्ह्यात सांस्कृतिक कार्यक्रम, पोवाडे, शाहिरी स्पर्धा, राज्यातल्या प्रमुख किल्ल्यांवर शिववंदना, जाणता राजा महानाट्याचे प्रयोग आदी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येणार
असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे. या सोहळ्याच्या नियोजनाबाबत
काल मुंबईत आढावा बैठक घेण्यात आली, त्यावेळी
मुख्यमंत्री बोलत होते. आग्रा इथं छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय केंद्राची
निर्मिती करण्यात येणार आहे, राज्यात
अकृषक विद्यापीठस्तरावर छत्रपती शिवाजी महाराज अभ्यास केंद्र सुरु करण्यात येणार
आहे. रायगडावर होणाऱ्या ऐतिहासिक सोहळ्यामध्ये सर्वांनी उत्साहाने सहभागी होण्याचं
आवाहन मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी केलं. सोहळ्यासाठी येणाऱ्या शिवभक्तांसाठी
भोजन, पाणी, मंडप, आरोग्य
सुविधा यांची चोख व्यवस्था प्रशासनाने करावी असे निर्देश रायगड जिल्हाधिकाऱ्यांना
मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
****
व्यवसायाच्या दृष्टीनं भारत हा संधींचं माहेरघर असल्याचं, केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियूष गोयल यांनी
म्हटलं आहे. ते काल मुंबईत 'भारताची
साद' या विषयावरच्या परिषदेत
बोलत होते. देशाची अर्थव्यवस्था खुली आणि पारदर्शक आहे, तसंच मुक्त व्यापार करारांमधे देशहिताचं रक्षण व्हावं, यादृष्टीनं आपलं मंत्रालय सजग असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
याच परिषदेतल्या एका सत्रात केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन
गडकरी यांनी मार्गदर्शन केलं. पी एम गतीशक्ती नॅशनल मास्टर प्लान हा राष्ट्रीय
कृती आराखडा म्हणजे सरकारनं उचललेलं मोठं पाऊल असून यामुळे देशातील मालवाहतुकीवर
होणारा खर्च कमी होईल, असा
विश्वास गडकरी यांनी व्यक्त केला.
रेल्वे आणि वस्त्रोद्योग राज्यमंत्री दर्शना जर्दोश यांनी रेल्वे क्षेत्रात
राबवण्यात येत असलेल्या रेल्वे प्रकल्पांमध्ये गुंतवणुकीच्या मोठ्या संधी उपलब्ध
असल्याची माहिती दिली.
****
राज्य सरकारकडून पाच स्क्रॅप पार्क तयार करण्याचं नियोजन असून त्यापैकी एक पार्क
जालना- छत्रपती संभाजी नगर दरम्यान मंजूर करुन घेण्याचा प्रयत्न असल्याचं केंद्रीय
रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी सांगितलं आहे.
मराठवाड्यातील स्टील व्यावसायिकांतर्फे आयोजित स्टील आणि धातु पुनर्वापरावरील परिषदेत
जालना इथे काल ते बोलत होते.
स्टील उद्योगाला, कच्चा आणि उत्पादित केलेल्या मालाचा दळणवळणाचा सध्या सुमारे १७
टक्के येत असलेला खर्च आठ टक्क्यांवर आणण्यासाठी तसंच स्टील उद्योगाची वाढ आणि आर्थिक
विकास सुलभ करण्यासाठी स्क्रॅप पार्कचं नियोजन करण्यात येत असल्याचं मंत्री दानवे यांनी
यावेळी सांगितलं.
****
राज्यभरात झालेल्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकीत मतदारांनी
संमिश्र कौल दिला आहे. छत्रपती संभाजीनगर उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीवर आमदार
हरिभाऊ बागडे आणि पालकमंत्री संदीपान भुमरे यांच्या पॅनलनं वर्चस्व राखत १५ पैकी
११ जागांवर विजय मिळवला. डॉक्टर कल्याण काळे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास
आघाडीच्या पॅनलला ४ जागांवर समाधान मानावं लागलं.
वैजापूर बाजार समितीवरही भाजप शिवसेना गटानं विजय मिळवला. आमदार रमेश बोरनारे
यांच्या नेतृत्चात, भाजप
शिंदे गटाच्या या पॅनलनं, या
बाजार समितीत दहा जागांवर विजय मिळवला, तर महाविकास आघाडीला पाच जागांवर समाधान मानावं लागलं.
बीड जिल्ह्यात अंबाजोगाई कृषी उत्पन्न बाजार समितीवर धनंजय मुंडे यांच्या
नेतृत्वातल्या योगेश्वरी शेतकरी विकास पॅनलनं १८ पैकी १५ जागा जिंकल्या, परळी कृषी उत्पन्न बाजार समितीतही धनंजय मुंडे यांच्या
नेतृत्वाखालील वैद्यनाथ शेतकरी विकास पॅनलचा विजय झाला आहे.
गेवराई इथं माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस
पुरस्कृत पॅनलनं तसंच वडवणी इथं आमदार प्रकाश सोळंके यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी
आणि महाविकास आघाडीनं सर्व १८ जागा जिंकल्या आहेत.
बीड कृषी उत्पन्न बाजार समितीत आमदार संदीप क्षीरसागर यांच्या नेतृत्वात
महाविकास आघाडीनं १८ पैकी १५ जागांवर विजय मिळवला.
आष्टी इथली निवडणूक याआधीच बिनविरोध झालेली असून, इथं आमदार सुरेश धस गटाचे ११, राष्ट्रवादी
काँग्रेसचे तीन, भीमराव धोंडे गटाचे तीन तर
शिवसेनेचा एक उमेदवार विजयी झाला आहे.
केज बाजार समितीच्या निवडणुकीत भाजपला १४ जागांवर विजय मिळाला आहे.
****
हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत शिवसेना, शिवसेना ठाकरे गट, काँग्रेस
आणि भाजपाच्या संत नामदेव विकास पॅनलनं १०
जागांवर विजय मिळवला आहे. शेतकरी विकास पॅनलला ६ जागांवर विजय मिळवता आला.
परभणी जिल्ह्यातल्या पूर्णा तालुक्यातील ताडकळस बाजार समितीच्या निवडणुकीत
भारतीय जनता पक्षाच्या पॅनलनं सर्वाधिक नऊ जागांवर विजय मिळवला, तर सत्तारुढ काँग्रेसनं सहा आणि, राष्ट्रवादी काँग्रेसनं तीन जागांवर विजय मिळवला आहे. बोरी कृषी उत्पन्न बाजार
समितीच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी आमदार रामप्रसाद
बोर्डीकर यांच्या नेतृत्वाखालील तुळजाभवानी शेतकरी विकास पॅनलनं १२ जागांवर विजय
मिळवला. जिंतूर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीतही बोर्डीकर गटानं १८ पैकी १४
जागांवर विजय मिळवला आहे.
नांदेड जिल्ह्यात भोकर, कुंटूर, हिमायतनगर, नायगाव
या बाजार समित्यांवर काँग्रेस पक्षानं विजय मिळवला. हिमायतनगर बाजार समितीत १८
पैकी १८, कुंटूर इथं सर्वच्या सर्व
१७ जागांवर काँग्रेसनं विजय मिळवला. तर भोकर बाजार समितीत काँग्रेसच्या नेतृत्वात
महाविकास आघाडीनं १८ पैकी १५ जागा जिंकल्या.
लातूर जिल्ह्यात चार पैकी, लातूर
आणि उदगीर या दोन बाजार समितीवर महाविकास आघाडीनं तर चाकूर आणि औसा बाजार समितीवर
भाजपनं विजय मिळवला.
धाराशिव
जिल्ह्यात धाराशिव, भूम आणि तुळजापूर बाजार समित्यांमध्ये भाजपला बहुमत मिळालं
तर परंडा, उमरगा. मुरुम, कळंब आणि वाशी या पाच बाजार समित्यांमध्ये महाविकास आघाडीनं
विजय मिळवला आहे. भूम बाजार समितीत, महायुतीला
१७, तुळजापूरमध्ये १४ जागांवर
विजय मिळाला. उमरगा बाजार समितीत महाविकास आघाडीला ११, मुरुम इथे १५, कळंब
इथे ११ तर वाशी इथं १२ जागांवर विजय मिळाला.
****
राज्यात काल अनेक ठिकाणी सलग चौथ्या दिवशी अवकाळी पाऊस झाला. मराठवाड्यातल्या
छत्रपती संभाजीनगर सह लातूर, परभणी, बीड, नांदेड
जिल्ह्यात काल जोरदार पाऊस पडला. लातूर जिल्ह्यात एका व्यक्तीचा अंगावर वीज
पडून तर एका व्यक्तीचा पुरात वाहझ मृत्यु
झाला. लातूर जिल्ह्यात अंगावर वीज पडून सात जनावरंही दगावली.
जालना जिल्ह्यातही काल मुसळधार पाऊस झाला. भोकरदन तालुक्यात शेतातली पिकं
पाण्याखाली गेली असून पारध इथल्या रायघोळ नदीला पूर आला आहे. जाफ्राबाद, तळेगाव परिसरातही काल जोरदार पाऊस झाला आहे.
बीड जिल्ह्यात केज तालुक्यात तांबवा, जानेगाव, सारणी, आनंदगाव परिसरातल्या फळबागांना प्रचंड गारपिटीसह वादळाचा
फटका बसला. परभणी जिल्ह्यात गंगाखेड, पूर्णा, पालम, सेलू, मानवत, जिंतूर, पाथरी
आदी ठिकाणी जोरदार पाऊस झाला. नांदेड शहर आणि परिसरातही किनवट, अर्धापूर, मालेगावसह
विष्णुपुरी परिसरात काल वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. या अवकाळी पावसामुळे
आंबा, मोसंबी, टरबूज आदी फळपिकांसह इतर रब्बी पिकांचं मोठं नुकसान झालं
आहे.
****
नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानाचे तातडीने पंचनामे करून
योग्य ती खबरदारी घेण्याचे निर्देश नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन
यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. मागील महिन्यात झालेल्या अवकाळी पाऊस आणि
गारपिटीनंतर जिल्ह्यातील सुमारे ३६ हजार पाचशे त्रेचाळीस शेतकऱ्यांसाठी ३० कोटी ५२
लाख १२ हजार रुपये निधी शासनाकडे मागितला आहे. याला शासन निर्णयान्वये मंजुरीही
देण्यात आली असून, बाधित
शेतकऱ्यांना नव्याने विकसित करण्यात आलेल्या ऑनलाईन प्रणालीद्वारे मदत वाटप
करण्याची कार्यवाही चालू असल्याचं या वृत्तात म्हटलं आहे.
****
इंडियन प्रीमिअर लीग - आयपीएल
क्रिकेट स्पर्धेत काल कोलकाता इथं झालेल्या सामन्यात गुजरात टायटन्सने कोलकाता
नाईट रायडर्सवर सात गडी राखून विजय मिळवला. कोलकाता संघाने प्रथम फलंदाजी करत सात
बाद एकशे एकोणाएंशी धावा केल्या. गुजरात संघाने हे आव्हान तीन गडी गमावत, अठराव्या षटकांत साध्य केलं.
या स्पर्धेतल्या दुसऱ्या सामन्यात, सनरायझर्स हैदराबाद संघानं दिल्ली
कॅपिटल्स वर ९ धावांनी विजय मिळवला. प्रथम
फलंदाजी करत हैदराबाद सनरायझर्स नं २० षटकात ६ बाद १९७ धावा केल्या. या लक्ष्याचा
पाठलाग करताना दिल्ली कॅपिटल्सचा संघ निर्धारित २० षटकात ६ गड्यांच्या मोबदल्यात
१८८ धावा करु शकला.
****
No comments:
Post a Comment