Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date : 21 April 2023
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक : २१ एप्रिल
२०२३ दुपारी १.०० वा.
****
प्रशासकीय
कामकाजात जाणारा वेळ वाचवण्यासाठी उपाययोजना करण्याची आवश्यकता असून, तसं केल्यानेच
कामकाजात सुलभता येईल, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. नागरी सेवा दिनानिमित्त आज लोक प्रशासनातल्या सर्वोत्कृष्ट कार्यासाठी पंतप्रधानांच्या
हस्ते जिल्हाधिकाऱ्यांना सन्मानित करण्यात आलं, त्यावेळी ते बोलत
होते. पंतप्रधान गतीशक्ती राष्ट्रीय आराखड्यानुसार काम केल्यास, लोकांच्या गरजा सुनिश्चित
करता येतील, तसंच आगामी धोरण निश्चित करण्यासही ही बाब लाभदायक असेल, असं पंतप्रधान
म्हणाले. देशवासियांच्या अपेक्षा वाढत असून, देशाच्या विकासासाठी तसंच व्यवस्थेत बदलासाठी
नागरिक आतूर आहेत, त्यामुळे निर्णय क्षमता गतीमान करून पूर्ण क्षमतेनं काम करण्याचं
आवाहन पंतप्रधानांनी केलं.
या
कार्यक्रमात राज्यातून लातूरचे जिल्हाधिकारी पृथ्वीराज
बी. पी. आणि सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना सन्मानित करण्यात आलं.
लातूर इथं जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांच्या पुढाकारानं, आयुष्यमान भारत योजनेंतर्गत ‘आरोग्यवर्धिनी’
प्राथमिक आरोग्य केंद्र, आणि प्राथमिक आरोग्य उपकेंद्रामार्फत
विविध सेवा दिल्या जातात. आरोग्यदायी जीवनशैलीच्या मार्गदर्शनापासून ते विविध आजारांचं
निदान, उपचार संदर्भ सेवा इत्यादींचा त्यामध्ये
समावेश आहे. या सर्व सेवांची व्याप्ती आणि गुणवत्तेच्या निकषावर लातूर जिल्ह्याची, प्रधानमंत्री उत्कृष्ट सार्वजनिक प्रशासन पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
***
मराठा
आरक्षणाबाबत विरोधकांच्या गैरप्रचाराला कोणी बळी पडू नये, सर्वोच्च न्यायालयातली लढाई
अजून संपलेली नाही, असं उद्योगमंत्री उदय सामंत यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत पत्रकारांशी
बोलत होते. मराठा आरक्षणासंदर्भात सरकार मराठा बांधवाच्या सोबत असल्याची ग्वाही त्यांनी
दिली. दरम्यान, सामंत यांनी आज मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची
भेट घेतली. पवार हे नाट्य परिषदेचे तहहयात विश्वस्त आहेत. परिषदेच्या निवडणुकीबाबत
माहिती देण्यासाठी ही भेट झाल्याचं त्यांनी सांगितलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी
आज मुंबईत सर्व आमदारांची तातडीनं बैठक बोलावल्याची माहितीही सामंत यांनी दिली.
***
एकल वापराच्या प्लास्टिकचा वापर पूर्णपणे बंद करून
पर्यावरण संवर्धनात प्रत्येकानं मोलाचा हातभार लावावा, असं आवाहन,
पर्यावरण आणि वातावरणीय बदल विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे यांनी
केलं आहे. उद्याच्या वसुंधरा दिनानिमित्त एकल प्लास्टिकला पर्याय
असलेल्या वस्तूंच्या, मुंबईत भरवण्यात आलेल्या प्रदर्शनाचं उद्घाटन
केल्यानंतर ते बोलत होते. अशा प्लास्टिकला सक्षम पर्यायी वस्तू उपलब्ध होऊ शकतात, याबाबत सर्वसामान्य नागरिकांमध्ये व्यापक जागृती करण्याच्या उद्देशानं या
प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं.
***
परदेशातल्या एटीकेटीधारक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती
पुन्हा बहाल करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. राजर्षी
शाहू महाराज परदेशी शिक्षण शिष्यवृत्तीचा लाभ घेऊन परदेशात शिकत असणाऱ्या काही विद्यार्थ्यांना
एटीकेटी मिळाल्यानं त्यांची शिष्यवृत्ती थांबली होती. याबाबत
खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारकडे पाठपुरावा केला होता.
एटीकेटी मिळालेल्या विद्यार्थ्यांना सुद्धा आता शिष्यवृत्ती मिळणार असून, या विद्यार्थ्यांचं शिक्षण व्यवस्थित होऊ शकेल, असा विश्वास व्यक्त करत सुप्रिया सुळे यांनी सरकारचे आभार मानले.
***
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या कन्नड तालुक्यातल्या
कुंजखेडा आरोग्य उपकेंद्रात, तात्काळ वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची
नियुक्ती करुन रुग्णालय सुरु करण्याची मागणी, खासदार इम्तियाज
जलिल यांनी केली आहे. त्यांनी यासंदर्भात जिल्हा शल्यचिकित्सक, आरोग्य सेवा मंडळाचे उपसंचालक,
जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पत्र
लिहिलं आहे. कुंजखेडा इथं राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत, प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या इमारतीचं
बांधकाम करण्यात आलं आहे, मात्र आरोग्य विभागाच्या हलगर्जीपणामुळे याठिकाणी अद्याप
वैद्यकिय अधिकारी आणि डॉक्टरांची भरतीच न केल्यानं रुग्णालय बंद असल्याचं खासदार जलिल यांनी या पत्रात
म्हटलं आहे.
***
तुर्की
इथं सुरु असलेल्या नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत भारताच्या अतनु दास, बी धीरज आणि तरुणदीप
राय यांच्या रिकर्व संघानं अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. येत्या रविवारी होणाऱ्या सुवर्ण
पदकासाठीच्या सामन्यात भारतीय संघासमोर चीनच्या संघाचं आव्हान असेल.
***
इंडियन
प्रिमियर लीग - आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज चेन्नई इथं चेन्नई सुपर किंग्ज आणि सनराईजर्स
हैदराबाद यांच्यात सामना होणार आहे. संध्याकाळी साडे सात वाजता सामन्याला सुरुवात होईल.
//**************//
No comments:
Post a Comment