▼

Friday, 21 April 2023

Text - आकाशवाणी औरंगाबाद , दिनांक : 21.04.2023 रोजीचे सकाळी 11.00 वाजताचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

 

आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

२१ एप्रिल २०२३ सकाळी ११.०० वाजता

****

नागरी सेवा दिवस आज साजरा होत आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी नागरी सेवा दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. नागरी सेवेतल्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी सार्वजनिक प्रशासनाच्या सर्वोच्च मूल्यांचं पालन केलं असून, सुशासनासाठी एक मापदंड निश्चित केला असल्याचं राष्ट्रपतींनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे. नागरी सेवकांच्या अथक परिश्रम आणि प्रयत्नांमुळे देशाच्या प्रत्येक नागरिकापर्यंत विकासाचे फायदे पोहोचत असल्याचं उपराष्ट्रपती धनखड यांनी म्हटलं आहे. यानिमित्त लोक प्रशासनातल्या सर्वोत्कृष्ट कार्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जिल्हाधिकाऱ्यांना सन्मानित केलं जाणार आहे. यामध्ये राज्यातल्या लातूर आणि सोलापूर जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांचा समावेश आहे.

***

जम्मू काश्मीरमधल्या पूँछ इथं काल झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर बाटा डोरिया परिसरातल्या जंगलात सुरक्षा दलांनी शोधमोहिम सुरु केली आहे. राजौरी आणि पूँछ इथल्या सीमारेषेजवळ सैनिकांचा बंदोबस्त वाढवण्यात आल्याचं सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं.  

***

विंग कमांडर दिपिका मिश्रा यांना काल भारतीय हवाई दल प्रमुख एयर चीफ मार्शल व्ही आर चौधरी यांच्या हस्ते वायू सेवा पदक प्रदान करण्यात आलं. २०२१ मध्ये मध्य प्रदेशात आलेल्या पुराच्या संकटकाळात दिपिका मिश्रा यांनी ४७ लोकांचे प्राण वाचवण्यात मोलाची मदत केली होती. हे शौर्य पदक मिळवणाऱ्या त्या पहिल्या महिला हवाई दल अधिकारी ठरल्या आहेत.  

***

मोदी सरकारच्या काळात भारताचं दरडोई उत्पन्न दुप्पट झालं असून देश आर्थिक प्रगतीकडे झेपावत असल्याचं केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी म्हटलं आहे. काल नंदुरबारमध्ये वंजारी समाजाच्या मेळाव्यात ते बोलत होते. आर्थिक प्रगतीमध्ये भारत हा जगात अकराव्या क्रमांकावरुन पाचव्या क्रमांकावर पोहचला असल्याचं कराड यांनी सांगितलं.

***

राज्यात काल एक हजार ११३ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, तीन रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर एक हजार ८३ रुग्ण बरे झाले. राज्यात सध्या सहा हजार १२९ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

//***********//

No comments:

Post a Comment