▼

Saturday, 22 April 2023

TEXT - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 22.04.2023 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजताचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 22 April 2023

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २२ एप्रिल २०२३ सायंकाळी ६.१०

****

·      राज्य मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार-रोजगार हमी मंत्री संदीपान भुमरे यांचे संकेत.

·      येत्या खरीप हंगामासाठी खतांचा मुबलक साठा उपलब्ध-कृषी आयुक्तांची ग्वाही.

·      ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या निवारणासाठी १४-पाच-६७ ही राष्ट्रीय हेल्पलाईन सुरु.

आणि

·      अक्षय्य तृतीया, महात्मा बसवेश्वर जयंती आणि रमजान ईद निमित्त सर्वत्र उत्साह.

****

राज्य मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार होणार असल्याचे संकेत रोजगार हमी मंत्री संदीपान भुमरे यांनी दिले आहेत. ते आज नंदूरबार इथं पत्रकारांशी बोलत होते. राज्यात कुठल्याही खात्याचं काम अडून राहिलेलं नाही असंही भुमरे यांनी म्हटलं आहे. दरम्यान, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर भुमरे यांनी टीका केली. राऊत यांनी खासदारकीचा राजीनामा देऊन पुन्हा निवडून यावं, असं आव्हान भुमरे यांनी दिलं. विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांची पक्षात घुसमट होत असून, एकदिवस त्याचा विस्फोट होईल, असंही भुमरे यांनी म्हटलं आहे.

****

राज्यात येत्या खरीप हंगामासाठी खतांचा मुबलक साठा उपलब्ध असल्याचं, कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांनी सांगितलं आहे. ते आज पुणे इथं बोलत होते. मृगाचा पाऊस झाल्यानंतरच शेतकऱ्यांकडून रासायनिक खतांची मागणी वाढत असते, त्या पार्श्वभूमीवर खतांचे नियोजन एप्रिलपासून सुरु करण्यात आल्याचं चव्हाण यांनी सांगितलं. शेतकऱ्यांना आपल्या जिल्ह्यासाठी माती तपासणी अहवालाप्रमाणे पिकनिहाय खतांचं प्रमाण, त्यांची उपलब्धता आणि त्यासाठीचा खर्च याबाबत माहिती देणारं ‘कृषिक ॲप’ कृषी विभागानं तयार केल्याची माहिती कृषि आयुक्त चव्हाण यांनी दिली. शेतकऱ्यांनी माती तपासणी अहवालानुसार खतांचा समतोल वापर करावा, अतिरिक्त खत वापरामुळे होणारा अतिरिक्त खर्च, घटणारं पिक उत्पादन अशा समस्यांवर मात करावी असं आवाहन चव्हाण यांनी केलं.

****

‘उडान अर्थात उडे देश का आम नागरिक’ या योजनेच्या पाचव्या टप्प्याला आज सुरुवात झाली. नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या हस्ते या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. उडानच्या माध्यमातून देशातील दुर्गम आणि प्रादेशिक भागांशी हवाई संपर्क सुविधा अधिक वाढवणं आणि अगदी अखेरच्या टोकापर्यंत हवाई संपर्क सुविधा निर्माण करण्यात येणार आहे. नजीकच्या भविष्यात एक हजार नवे मार्ग, पन्नास अतिरिक्त विमानतळं, हेलीकॉप्टर स्थानकं आणि पाण्यावरील विमान उड्डाण व्यवस्था कार्यान्वित करण्याचं लक्ष्य साध्य होईल असं शिंदे यांनी यावेळी सांगितलं.

****

इस्रो- अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनं आज दोन उपगृह अंतराळात यशस्वीपणे प्रक्षेपित केले. आंध्र प्रदेशच्या श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रातून दुपारी जवळपास अडीचच्या सुमारास पी एस एल व्ही वाहकाद्वारे टेलीऑस -दोन आणि ल्युमलाईट-चार हे दोन उपग्रह त्यांच्या अंतराळातील निर्धारित कक्षेत पाठवण्यात आल्याचं इस्रोचे प्रमुख एस. सोमनाथ यांनी सांगितलं.

****

देशभरातील ज्येष्ठ नागरिकांच्या विविध समस्या आणि तक्रारींच्या निवारणासाठी १४-पाच-६७ क्रमांकाची राष्ट्रीय हेल्पलाईन एल्डरलाईन सेवा सर्व राज्यात सुरु करण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालयाच्या या टोल फ्री हेल्पलाईनच्या माध्यमातून निवृत्तीवेतन, ज्येष्ठ नागरिक योजना, कायदेशीर समस्या, बेघर आणि वृद्धांवरील अत्याचार इत्यादींची माहिती तसंच मदत देण्यात येते

****

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी १२ तुघलक लेन हे शासकीय निवासस्थान रिकामं केलं आहे. खासदारकी रद्द झाल्यानंतर त्यांना महिनाभरात सरकारी निवासस्थान सोडण्याची नोटीस बजावण्यात आली होती. त्यानंतर राहुल यांनी आपले बहुतांश सामान १० जनपथ या सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी पाठवले होते. उर्वरित सामानासह काल शुक्रवारी ते १० जनपथ या निवासस्थानी राहायला गेल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

हिंदू धर्मियांसाठी पवित्र आणि साडेतीन शुभ मुहुर्तांपैकी एक असलेल्या अक्षय्य तृतीयचा सण आज देशभरात साजरा होतो आहे. उत्तराखंडातल्या प्रसिद्ध चार धाम तीर्थक्षेत्र यात्रेला आजपासून प्रारंभ झाला. उत्तराखंडमधील, गंगोत्री आणि यमुनोत्री धाम इथल्या मंदिरांचे दरवाजे आज दुपारच्या सुमारास दर्शनासाठी विधीवत उघडण्यात आले. केदारनाथ धाम इथलं मंदिर येत्या २५ एप्रिलला आणि बद्रीनाथ धाम इथलं मंदिर २७ एप्रिल रोजी दर्शनासाठी खुलं करण्यात येईल. पुढच्या सहा महिन्यांपर्यंत नेहमीप्रमाणे या चारही ठिकाणी भाविकांना दर्शन घेता येणार आहे.

****

भगवान परशुराम आणि महात्मा बसवेश्वर यांची जयंती सर्वत्र साजरी केली जात आहे. छत्रपती संभाजीनगर इथं महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून बसवेश्वरांना आदरांजली वाहण्यात आली. परशुराम जयंतीनिमित्त आज सायंकाळी शहरातून शोभायात्रा काढण्यात येत आहे.

****

आज ईद-उल-फित्र अर्थात रमजान ईदचा सण सर्वत्र आनंदात साजरा होत आहे. या निमित्तानं छत्रपती संभाजीनगर इथं छावणी परिसरातील ईदगाह मैदानावर हजारो नागरिकांनी मुख्य नमाज पठण केली. खासदार इम्तियाज जलील, यांच्यासह अनेक मान्यवरांनी यावेळी मुस्लीम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. सणासुदीच्या पार्श्वभुमीवर शहरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला असल्याची माहिती पोलिस आयुक्त डॉ.निखील गुप्ता यांनी दिली आहे.

****

जालना शहरासह जिल्ह्यात रमजान ईद उत्साहात साजरी करण्यात येत आहे. जालना शहरात मुस्लीम समाजबांधवांनी सकाळी कदीम जालना आणि सदर बाजार ईदगाह मैदानावर सामुहिक नमाज अदा केल्यानंतर एकमेकांना ईद ऊल फित्रच्या शुभेच्छा दिल्या.

भोकरदन इथं केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, आमदार संतोष दानवे यांनी ईदगाह मैदानावर उपस्थित राहून सामुहिक नमाज पठण झाल्यानंतर मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या

****

बालविवाह हा अजामीनपात्र गुन्हा असूनही बऱ्याच ठिकाणी असे विवाह होत आहेत. आज अक्षय तृतीयेच्या दिवशी काही ठिकाणी बालविवाह होण्याची शक्यता असल्यानं राज्यात प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत. बालविवाह झाल्याचं निर्दशनास आल्यास संबंधितांवर कडक कारवाई करण्यात येईल, बालवधूशी विवाह केल्यास दोन वर्ष सक्तमजुरी आणि एक लाख रूपयांचा दंड अशी तरतूद आहे. वधु-वरांचे आई वडील, तसंच विवाहात सहभागी मंडळींवर गुन्हा नोंदवण्यात येईल असं प्रशासनातर्फे निर्देशित करण्यात आलं आहे. नागरीकांनी दहा-नऊ-आठ या मोफत दुरध्वनी क्रमांकावर बालविवाहाबाबत माहिती द्यावी असं आवाहनही करण्यात आलं आहे.

****

सोलापूर इथल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठांतर्गत महाविद्यालयांमध्ये आता शनिवारी तसंच रविवारी देखील ऑनलाइन/ऑफलाईन तास घेतले जाणार आहेत. दोन सत्र परीक्षेत किमान ९० दिवसांचं अध्यापन आवश्यक आहे. मात्र कोविडकाळापासून सत्रात विस्कळितपणा आला, त्यामुळे अंतिम सत्र परीक्षेसाठी तेवढा वेळ थांबणे अशक्य असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. अभ्यासक्रम पूर्ण करून मे अखेरीस अंतिम सत्र परीक्षा घेतली जाणार आहे. जून महिन्यात निकाल जाहीर करून जुलैमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरु करण्याच्या दृष्टीनं विद्यापीठाचं नियोजन सुरु आहे.

****

 

छत्रपती संभाजीनगर इथं कालपासून शेक्सपिअर महोत्सवाची सुरवात झाली. या सातव्या शेक्सपिअर महोत्सवाचं उद्घाटन ज्येष्ठ नाट्यकर्मी प्राध्यापक मोहन फुले यांच्या हस्ते दीपप्रज्वलन आणि नटराज पुजन करून झालं. काल दासू वैद्य लिखित ‘मेळा’ पुस्तकाचं अभिवाचन केलं. आज या महोत्सवात शेक्सपियर यांच्या साहित्यकृतींवर आधारित शेक्सपियर दर्शन हा कार्यक्रम होणार आहे. उद्या प्रसिद्ध कवी इंद्रजित भालेराव यांच्या कवितांवर आधारित आम्ही काबाडाचे धनी या काव्यगायनानं या महोत्सवाचा समारोप होणार आहे.

****

जागतिक ग्रंथ दिन उद्या साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त छत्रपती संभाजीनगर इथं मराठी प्रकाशक पुणे यांच्या वतीनं मराठवाडा साहित्य परिषदेच्या ना. गो नांदापूरकर सभागृहात उद्या संध्याकाळी सहा वाजता कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यावेळी मराठी साहित्याची विद्यमान अवस्था या विषयावर विचारवंत डॉ.ऋषिकेश कांबळे हे भाष्य करणार आहेत. प्रकाशन परिषदेचे कार्यवाह अरविंद पाटकर हे ग्रंथव्यवहारासंबंधी विचार मांडणार आहेत.

****

आय.पी.एल क्रिकेट स्पर्धेत आज गुजरात टायटन्स विरुध्द जिंकण्यासाठी लखनऊ सुपर जायन्टसला शेवटचं वृत्त आलं तेव्हा ९२ चेंडूत ९७ धावांची गरज होती. आज दुपारी लखनऊ इथं सुरु झालेल्या या सामन्यात गुजरात टायटन्सनं प्रथम फलंदाजी करत वीस षटकात सहा बाद १३५ धावा केल्या.

दरम्यान, स्पर्धेतला आजचा दुसरा सामना मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात मुंबई इथं थोड्याच वेळात सुरु होणार आहे.

****

No comments:

Post a Comment