Sunday, 23 April 2023

Text - आकाशवाणी औरंगाबाद , दिनांक : 23.04.2023 रोजीचे दुपारी 01.00 वाजताचे मराठी बातमीपत्र

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date :  23 April  2023

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक : २३ एप्रिल २०२ दुपारी १.०० वा.

****

कोविड विषाणूच्या वाढत्या संसर्गाला आळा घालण्यासाठी मुंबई, पुणे आणि ठाणेसह राज्यातल्या दहा अतिजोखमीच्या जिल्ह्यांवर विशेष लक्ष देण्यात यावं, अशा सूचना सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी दिल्या आहेत. कोरोना विषाणु संसर्गावर काम करण्यासाठी गठीत विशेष कृतीदलाच्या बैठकीत पुणे इथं ते बोलत होते. कोविड चाचण्यांची संख्या वाढवावी, आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आलेल्या सराव प्रात्यक्षिकात आढळलेल्या त्रुटींचं तत्काळ निराकरण करावं. जत्रा, मॉल, थिएटर, बाजार अशा गर्दीच्या ठिकाणी मास्क आवर्जून वापरण्याबाबत आवाहन करण्यात यावं, अशा सूचना आरोग्यमंत्री डॉक्टर सावंत यांनी यावेळी दिल्या.

***

गेल्या २४ तासात देशभरात कोरोना विषाणू संसर्गाचे १० हजार ११२ नवे रुग्ण आढळले. आणि ९ हजार ८३३ रुग्ण या आजारातून बरे झाले. सध्या देशात ६७ हजार ८०६ कोरोना विषाणुग्रस्त रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आणि रुग्ण बरे होण्याचा देशातला दर ९८ पूर्णांक ६६ दशांश टक्के आहे.

***

मराठवाड्यातील मराठा समाजाचा इतर मागासप्रवर्ग ओबीसीमध्ये समावेश करावा, या एकमेव मागणीसाठी येत्या १ मे पासून छत्रपती संभाजीनगर इथं क्रांती चौकात ठिय्या आंदोलन करण्याचा निर्धार सकल मराठा समाजानं केला आहे. यासंदर्भात झालेल्या बैठकीत सकल मराठा समाजाच्या नेत्यांनी आरक्षणासंबंधी विविध मुद्यांवर चर्चा केली. राज्य शासनाचा क्युरेटिव्ह पिटीशन - सुधारणा याचिका दाखल करण्याचा आणि नवा आयोग नेमण्याचा निर्णय हा वेळकाढूपणा असल्याचा सूर या बैठकीतून निघाला. कोणीही राज्य सरकारशी चर्चा करण्यासाठी मुंबईला जाऊ नये, तर शासनाला छत्रपती संभाजीनगर इथं येण्यास भाग पाडावं, असा निर्धारही या बैठकीत करण्यात आला.

***

सोलापूर शहरातील श्री सिद्धेश्वर साखर कारखान्याच्या जवळ असलेल्या कागद कारखान्याला आज सकाळी भीषण आग लागली. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. या आगीत कारखान्याचं मोठं नुकसान झाल्याची भीती वर्तवली जात आहे.

***

छत्रपती संभाजीनगर इथं गेले तीन दिवस सुरू असलेल्या शेक्सपिअर महोत्सवाचा आज समारोप होत आहे. काल या महोत्सवात शेक्सपियर यांच्या साहित्यकृतींवर आधारित शेक्सपियर दर्शन हा कार्यक्रम झाला. आज प्रसिद्ध कवी इंद्रजित भालेराव यांच्या कवितांवर आधारित आम्ही काबाडाचे धनी या काव्यगायनानं या महोत्सवाचा समारोप होणार आहे.

***

भारत राष्ट्र समितीचे प्रमुख तथा तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव, उद्या सोमवारी सायंकाळी छत्रपती संभाजीनगर इथं जाहीर सभा घेणार आहेत. या सभेत विविध पक्षांतील अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते भारत राष्ट्रीय समितीमध्ये प्रवेश करणार असल्याचं, या पक्षाकडून सांगण्यात आलं आहे.

***

इंडियन प्रीमिअर लीग आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना होणार आहे, दुपारी साडे तीन वाजता बंगळुरु इथल्या के एम चिन्नास्वामी मैदानावर सामन्याला सुरुवात होईल. या स्पर्धेतला अन्य सामना कोलकाता नाईट राईडर्स आणि चेन्नई सुपर किंग्ज या संघादरम्यान होणार आहे. सायंकाळी साडे सात वाजता कोलकाता इथल्या ईडन गार्डन्स मैदानावर हा सामना खेळला जाईल.

***

तुर्की इथल्या जागतिक धनुर्विद्या स्पर्धेत आज तिसऱ्या सुवर्णपदकासाठी पुरुष रिकर्व गटात भारत आणि चीन यांच्यात लढत होणार आहे. भारतीय संघात अतनु दास, धीरज बोम्मादेवरा आणि तरुणदीप राय या नेमबाजांचा समावेश आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार थोड्या वेळात म्हणजे दुपारी १ वाजून १० मिनिटांनी या लढतीची सुरुवात होईल. पुरुष रिकर्व एकल स्पर्धेच्या उपान्त्यफेरीत भारताचा धीरज बोम्मादेवरा आणि मोल्दोवाचा डॅन ओलारु यांच्यात सामना होणार असून संध्याकाळी ५ वाजून ४६ मिनिटांनी या सामन्याला सुरुवात होईल.

***

नांदेड रेल्वे विभागातील आदिलाबाद थून सुटणारी रेल्वेगाडी आदिलाबाद - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई नंदीग्राम एक्स्प्रेस आजपासून येत्या ३० तारखेपर्यंत दादर पर्यंतच धावणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई रेल्वे स्नानकावर काही दिवस घेण्यात येणाऱ्या लाईन ब्लॉक मुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.

//************//

No comments:

Post a Comment