आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
०१ मे २०२३ सकाळी ११.०० वाजता
****
६३ वा महाराष्ट्र दिन आज सर्वत्र साजरा
होत आहे. यानिमित्त राज्यभरात विविध
कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र
मोदी यांनी राज्यातल्या जनतेला यानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.
महाराष्ट्र दिनाचं मुख्य ध्वजारोहण मुंबईत राज्यपाल रमेश
बैस यांच्या हस्ते झालं. यावेळी नागरिकांना संबोधित करताना त्यांनी मराठी
जनतेला मन:पूर्वक शुभेच्छा देत, संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी
बलिदान दिलेल्या हुतात्म्यांना आदरांजली अर्पण केली. राज्यातली कोविड परिस्थिती,
आरोग्यासंबंधी विविध योजना, युवकांना रोजगार, राज्याची अर्थव्यवस्था, दिव्यांगांचं
संरक्षण आदी मुद्यांवर राज्यपालांनी आपल्या भाषणातून भाष्य केलं.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सकाळी
मुंबईत हुतात्मा चौक इथल्या स्मारकाला पुष्पचक्र अर्पण करून संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत प्राणांची
आहुती देणाऱ्या हुतात्म्यांना अभिवादन केलं.
छत्रपती संभाजीनगर इथं पालकमंत्री संदीपान भुमरे यांच्या
हस्ते ध्वजारोहण झालं. यावेळी त्यांच्या हस्ते
विविध पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं.
****
आजचा दिवस कामगार दिन म्हणूनही सर्वत्र
साजरा केला जातो. मुख्यमंत्री शिंदे यांनी महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्याही शुभेच्छा
दिल्या आहेत. आजच्या कामगार दिनानिमित्त राज्यामध्ये विविध औद्योगिक आस्थापनांमध्ये
विशेष कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.
****
पंजाबमध्ये लुधियाना जवळ काल एका टँकरमधून अमोनिया वायूची गळती होऊन अकरा
नागरिकांचा मृत्यू झाला, तर सुमारे
२०० हून अधिक लोकांची प्रकृती बिघडली. हा टँकर एका उड्डाणपुलावर
धडकल्यानंतर ही वायूगळती सुरू झाली. या भागात बचावकार्य सुरू
असून, रुग्णांवर लुधियानातल्या रुग्णालयांमध्ये, उपचार करण्यात येत आहेत.
****
गडचिरोली जिल्ह्यातल्या भामरागड तालुक्यात
केडमारा जंगलात काल संध्याकाळी झालेल्या चकमकीत पोलिसांनी तीन जहाल नक्षलवाद्यांना ठार केलं. पेरमिली
दलम कमांडर बिटलू मडावी, विभागीय समिती सदस्य वासू आणि अहेरी
दलमचा उपकमांडर श्रीकांत अशी त्यांची नावं आहेत. त्यांच्याकडून काही शस्त्रंही ताब्यात
घेतली असल्याचं पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी काल सांगितलं.
****
No comments:
Post a Comment