Tuesday, 2 May 2023

TEXT - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 02.05.2023 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजताचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 02 May 2023

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ०२ मे २०२ सायंकाळी ६.१०

****

·      खासदार शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरून निवृत्तीची घोषणा; पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा या निर्णयाला तीव्र विरोध; तर हा पक्षांतर्गत निर्णय असल्याची अन्य पक्षांची भूमिका.

·      राज्यात निवडणुका झाल्या तर विरोधकांना सपशेल पराभूत करू - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दावा.

·      खारघरसह विविध मुद्यांवर विधीमंडळाचं विशेष अधिवेशन बोलावण्याची काँग्रेस पक्षाची मागणी.

आणि

·      प्रत्येक जिल्ह्याला वैद्यकीय महाविद्यालयासोबत परिचर्या महाविद्यालय देण्याचा राज्य सरकारचा विचार.

****

खासदार शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होत असल्याचं जाहीर केलं आहे. लोक माझे सांगाती, या पवार यांच्या राजकीय आत्मचरित्राच्या नव्या आवृत्तीचं आज मुंबईत प्रकाशन झालं, या समारंभात शरद पवार यांनी पक्षाच्या अध्यक्षपदावरून दूर होण्याचा निर्णय अचानक जाहीर केला –

एक मे एकोणीसशे साठ ते एक मे दोन हजार तेवीस इतक्या प्रदीर्घ काळाच्या नंतर कुठतंरी थांबायचा  विचार सुद्‌धा केला पाहिजे. माणसाला अधिक मोह असू नये. आणि त्यामुळे तुम्हाला अस्वस्थता कदाचित वाटेल पण मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरून निवृत्त व्हायचा निर्णय आज घेतलेला आहे.

पवार यांच्या या निर्णयामुळे उपस्थितांसह पक्षाचे पदाधिकारी, नेते तसंच कार्यकर्त्यांना धक्का बसला. पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह राष्ट्रवादीच्या सर्वच प्रमुख नेत्यांनी हा निर्णय परत घेण्याचा आग्रह केला. जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड यांच्यासह अनेकांना यावेळी भावना अनावर झाल्या. पवार यांच्याशिवाय राजकीय जीवन व्यर्थ असल्याची भावना सुनील तटकरे यांनी व्यक्त केली. ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी आपल्या भावना व्यक्त करताना, पक्षाची फेररचना करायची असल्यास आम्ही सगळे जण तयार आहोत, पण शरद पवार यांनी अध्यक्षपदी रहावं, असा आग्रह केला.

अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना पवार यांच्या निर्णयामागची भूमिका समजावण्याचा प्रयत्न केला. वाढत्या वयामुळे त्यांनी हा निर्णय घेतला असून, ते फक्त अध्यक्षपदावरून दूर होत आहेत, असं सांगताना, अजित पवार यांनी काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी यांचा दाखला दिला. पवार यांचं मार्गदर्शन आपल्याला कायम मिळत राहील, त्यांच्या मार्गदर्शनात नवीन अध्यक्ष तयार झाला, तर हरकत काय, असा प्रश्न अजित पवार यांनी विचारला. ते म्हणाले –

काळानुरूप काही निर्णय घ्यावे लागतात. आणि साहेबांच्या डोळ्यादेखत नवीन होणारा अध्यक्ष तयार झाला तर तुम्हाला का नको रे? मला काही कळत नाही तुमचं. उद्याच्याला नवीन अध्यक्ष झाल्यानंतर साहेब त्या अध्यक्षाला जे काही बारकावे असतात राजकारणातले ते त्या ठिकाणी सांगतील ना. साहेब महाराष्ट्रामध्ये फिरणारच आहेत. साहेब देशामध्ये फिरणारच आहेत. ते वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातनं पवार साहेबांचं मार्गदर्शन आपल्याला सगळ्यांना होणारच आहे. नवीन होणारा अध्यक्ष, नवीन होणारी कार्यकारीणी, बाकीचे सगळे सहकारी, साहेबांशी चर्चा करूनच पुढचा निर्णय घेणार आहेत. त्याच्यामुळे तुम्ही अजिबात भावनिक होण्याचं काही कारण नाही.

मात्र, अजित पवार यांच्या या सांगण्याला जवळपास सगळ्याच नेत्यांनी तसंच पदाधिकाऱ्यांनी विरोध करत शरद पवार यांनी तहहयात पक्षाच्या अध्यक्षपदी रहावं, असा आग्रह सुरूच ठेवला. शरद पवार यांनी निर्णय मागे घेईपर्यंत सभागृहातच उपोषणाला बसण्याची घोषणा कार्यकर्त्यांनी केली. यावर अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवार यांच्यासोबत पुन्हा चर्चा करण्याचं आश्वासन दिलं, त्यानंतर शरद पवार यांनी आपल्या सिल्व्हर ओक या निवासस्थानाकडे प्रस्थान केलं.

दरम्यान, सध्या सिल्व्हर ओकवर पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांची बैठक सुरू आहे. पवार यांनी कार्याध्यक्ष नियुक्त करून, पक्षाच्या कामकाजाची जबाबदारी त्यांच्याकडे सोपवावी, मात्र अध्यक्षपदी शरद पवार यांनीच कायम राहावं, असा प्रस्ताव अनेक नेत्यांनी या बैठकीत दिल्याचं वृत्त आहे. पवार यांनी आपल्या निर्णयावर विचार करण्यासाठी काही दिवसांची मुदत मागितल्याची माहिती अजित पवार यांनी दिली आहे. धाराशिव, बुलडाणा इथल्या पक्षाच्या जिल्हाध्यक्षांनी राजीनामा दिल्याचं वृत्त आहे, हे राजीनामा सत्र तत्काळ थांबवण्याची सूचना शरद पवार यांनी केल्याचं, अजित पवार यांनी सांगितलं.

****

दरम्यान, पवारांचा अध्यक्षपदावरून दूर होण्याचा निर्णय हा त्यांच्या पक्षाचा अंतर्गत निर्णय असल्याची प्रतिक्रिया महाविकास आघाडीसह अनेक पक्षांच्या नेत्यांनी व्यक्त केली आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी याबाबत बोलताना शरद पवार हे फक्त अध्यक्षपदावरून दूर होत आहेत, त्यांनी राजकारणातून निवृत्ती घेतलेली नाही, याकडे लक्ष वेधलं.

काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी यासंदर्भात बोलताना, देशात सध्या सुरू असलेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर पवार यांनी अध्यक्षपदावरून बाजूला होणं योग्य नसल्याचं मत व्यक्त केलं.

दरम्यान, शरद पवार यांचा हा वैयक्तिक निर्णय असून, ही त्यांच्या पक्षाची अंतर्गत बाब आहे. या क्षणाला त्यावर बोलणं योग्य नाही, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. आपण परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत आणि योग्यवेळी त्यावर बोलू, असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे.

****

दरम्यान, राज्यात निवडणुका झाल्या तर विरोधकांना सपशेल पराभूत करू, असा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. ते आज गडचिरोली इथे माध्यमांशी बोलत होते. हिंमत असेल तर निवडणुका घेऊन दाखवा, असं आव्हान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी नुकतंच दिलं आहे, त्यासंदर्भातल्या प्रश्नाला फडणवीस यांनी हे उत्तर दिलं. बारसू शुद्धीकरण प्रकल्पाबाबत विरोधक दुटप्पीपणानं वागत असून, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करुन सरकारला कोंडीत पकडण्याचा विरोधकांचा डाव आहे, अशी टीका फडणवीस यांनी केली.

****

महाराष्ट्र भूषण पुरस्कार कार्यक्रमाच्यावेळी खारघर इथे झालेली दुर्घटना, अवकाळी पाऊस आणि गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना तातडीनं मदत करण्याची गरज, स्थानिकांचा विरोध असलेला बारसू प्रकल्प, या सगळ्या मुद्यांवर विधीमंडळाचं विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी काँग्रेस पक्षाने राज्यपालांकडे केली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या शिष्टमंडळानं राज्यपाल रमेश बैस यांची आज राजभवनात भेट घेतली, त्यानंतर पटोले माध्यमांशी बोलत होते. सरकारच्या महसूल आणि कृषी विभागाकडे असलेल्या पीकपेऱ्याच्या माहितीच्या आधारे सरकारनं नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरीव मदत द्यावी, पंचनाम्यांसाठी थांबू नये, असं पटोले यावेळी म्हणाले.

****

प्रत्येक जिल्ह्याला वैद्यकीय महाविद्यालयासोबत परिचर्या महाविद्यालय देण्याबाबत गांभीर्यानं विचार करत असल्याची माहिती राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री तसंच नांदेडचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे. नांदेडच्या डॉक्टर शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातल्या दोन अद्ययावत हृदयरोग अतिदक्षता कक्षांच्या उद्घाटन समारंभात ते आज बोलत होते. वैद्यकीय क्षेत्राच्या मनुष्यबळाच्या प्रश्नावर मार्ग काढण्यासाठी शासनानं धोरणात्मक निर्णय घेतला असून येत्या दीड महिन्यात सुमारे पाच हजार कर्मचारी नियुक्त केले जातील, असंही महाजन यांनी यावेळी सांगितलं.

****

लातूरच्या जिल्हा रुग्णालयासाठी आवश्यक असलेली जमीन कृषी विभागाकडून दिली जाईल, असं कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी सांगितलं आहे. लातूर इथं कृषी महाविद्यालयाच्या, अनुसूचित जातींच्या मुलींसाठी बांधण्यात आलेल्या वसतीगृहाचं उद्घाटन करताना ते आज बोलत होते. या रुग्णालयासाठीच्या दहा एकर जमिनीची मागणी कृषी विद्यापीठाकडे प्रलंबित असल्याची माहिती जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी सत्तार यांना दिली, त्यानंतर कृषीमंत्र्यांनी ही घोषणा केली. कोविड साथीमुळे दोन वर्षं रद्द झालेली सोयाबिन परिषद येत्या चौदा ऑगस्टला लातूरमध्ये होणार असल्याचं कृषीमंत्र्यांनी सांगितलं. लातूरच्या कृषी महाविद्यालयासाठी यावर्षी पन्नास कोटी रुपयांचा निधी दिल्याची, तसंच मुलींच्या आणि मुलांच्या अजून प्रत्येकी एका वसतीगृहाला मंजुरी दिल्याची माहितीही सत्तार यांनी यावेळी दिली.

****

छत्रपती संभाजीनगरच्या महानगरपालिका आयुक्तपदी जी.श्रीकांत यांची नेमणूक झाली आहे. जी.श्रीकांत हे २००९ च्या आयएएस तुकडीचे अधिकारी असून या नियुक्तीपूर्वी ते छत्रपती संभाजीनगर इथं राज्य कर विभागाच्या सह आयुक्त पदावर कार्यरत होते.

****

आजपासून येत्या पाच तारखेपर्यंत मराठवाड्याच्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याचा अंदाज मुंबईच्या प्रादेशिक हवामान केंद्रानं वर्तवला आहे. यातच, आज म्हणजे दोन मे आणि परवा, म्हणजे चार मे ला, नांदेड आणि लातूर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह गारपीट होण्याची शक्यताही हवामान केंद्रानं वर्तवली आहे

****

No comments:

Post a Comment