Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date : 24 May 2023
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक : २४ मे
२०२३ दुपारी १.०० वा.
****
संसदेच्या नव्या इमारतीचं येत्या रविवारी २८ मे रोजी पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे, असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी
स्पष्ट केलं. नवी दिल्ली
इथं ते आज पत्रकारांशी बोलत होते. संसदेच्या नव्या इमारतीचे बांधकाम वेळेआधी
पूर्ण झालं आहे. या इमारतीसाठी राबणाऱ्या कामगारांचा सत्कार पंतप्रधानांच्या हस्ते
होणार असल्याचंही शहा यांनी सांगितलं.
***
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ऑस्ट्रेलियाचे
पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांच्यात आज सिडनी इथं द्विपक्षीय बैठक झाली. उभय
नेत्यांनी भारत - ऑस्ट्रेलिया यांच्यातील सर्वसमावेशक
धोरणात्मक भागीदारी अधिक व्यापक आणि बळकट करण्यासाठी वचनबद्ध असल्याचं सांगितलं. संरक्षण, सुरक्षा,
व्यापार, गुंतवणूक, ऊर्जा,
शिक्षण, स्थलांतर आणि दोन्ही देशांच्या
लोकांमधले संबंध या विषयांवर सहकार्याबाबत यावेळी चर्चा करण्यात आली.
***
जम्मू-काश्मीरमधील पाकल दुल प्रकल्पाच्या क्रूझर वाहनाला
किश्तवाडमध्ये झालेल्या अपघातात सात जण ठार तर दोन जखमी झाले आहेत. कामगारांना घेऊन जाणारे एक क्रूझर वाहन रस्त्यावरून घसरलं आणि धरण प्रकल्पाच्या
जागेजवळ खोल दरीत पडल्याचं आमच्या बातमीदारानं कळवलं आहे.
जखमींना किश्तवाड आणि डोडा जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं
असून घटनास्थळी मदत आणि बचाव कार्य सुरू असल्याचं
याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
***
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून तीन दिवसांच्या झारखंड दौऱ्यावर आहेत. राष्ट्रपती मुर्मू यांनी आज देवघर येथील बाबा वैद्यनाथ धाम मंदिरात दर्शन घेतलं. यानंतर राष्ट्रपती रांचीला
रवाना झाल्या. त्या रांची इथल्या परमवीर चक्र पुरस्कार
विजेते अल्बर्ट इक्का यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करतील आणि राजभवनात
आदिवासी समाजातील लोकांशी संवाद साधतील. राष्ट्रपतींच्या हस्ते
आज राजधानी रांची इथं झारखंड उच्च न्यायालयाच्या नवीन इमारतीचं उद्घाटन होणार आहे.
***
हिंदी सिनेमा आणि मालिकेतील अभिनेते नितिश पांडे यांचं काल नाशिक
जिल्ह्यात इगतपुरी इथं निधन झालं. ते ५१ वर्षांचे होते. पांडे हे इगतपुरी इथं एका हॉटेलमध्ये
मुक्कामाला थांबले असता ते एका खोलीत बेशुद्धाअवस्थेत आढळून आले. त्यांना डॉक्टरांनी
तपासून मृत घोषित केलं. त्यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्यानं
झाला असून पुढील तपास सुरु असल्याचं इगतपुरीचे पोलिस निरीक्षक राजू सुर्वे यांनी सांगितलं
आहे. पांडे यांनी बधाई हो, ओम शांती ओम, दबंग - २, खोसला का घोसला आदी चित्रपटांत तसंच
अनुपमा या लोकप्रिय मालिकेत भुमिका साकारली होती.
***
पीक कर्जासाठी शेतकऱ्यांकडून सिबिल
स्कोअरच्या मागणी विरोधात उद्या अकोला जिल्ह्यात बार्शीटाकळी इथं शेतकरी जागर मंचाच्या
वतीनं मोर्चा काढण्यात येणार आहे. शेतकरी जागर
मंचाच्या वतीनं आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली.उपमुख्यमंत्री तथा
अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वीच बँकांनी शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी सिबिल
स्कोअरची मागणी करू नये तसंच शेतकऱ्यांची अडवणूक न करण्याचे निर्देश दिले होते, मात्र बँकांकडून हे
निर्देश पाळले जात नसल्यानं हा मोर्चा काढण्यात येणार आहे. दरम्यान या मोर्चाची शासनानं दखल न घेतल्यास,
तीव्र आंदोलनाचा इशारा यावेळी मंचाच्या वतीनं देण्यात आल्याचं आमच्या
वार्ताहरानं कळवलं आहे.
***
हज यात्रेसाठी जाणाऱ्या महाराष्ट्रातील भाविकांना सोसावा
लागणारा अतिरीक्त खर्च कमी करण्याची मागणी खासदार इम्तियाज
जलील यांनी, केंद्र आणि राज्य सरकारकडे केली आहे. केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री स्मृती ईराणी, अल्पसंख्याक केंद्रीय सचिव, हज समितीचे मुख्य कार्यकारी अधिकारी, मुख्यमंत्री
एकनाथ शिंदे आणि राज्य अल्पसंख्याक मंत्री यांच्याकडे जलील यांनी एका पत्राद्वारे ही
मागणी केली आहे. या पत्रात विमान कंपन्यांच्या कारभाराबाबत देखील
अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत.
***
काँग्रेस
पक्षाच्या अधिकृत ट्विटर हँडलवर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची तुलना छत्रपती शिवाजी
महाराज यांच्याशी करणारी चित्रफीत टाकण्यात आल्याच्या निषेधार्थ आज औरंगाबाद इथं भारतीय जनता पक्षाच्या वतीनं शहरातल्या क्रांती चौकात निदर्शने करण्यात आली.
भाजपचे कार्यकर्ते राजू वानखेडे, हर्षवर्धन कराड
यांच्यासह उपस्थित कार्यकर्त्यांनी यावेळी निषेधाचे फलक झळकावत
घोषणाबाजी केली.
***
नवी मुंबईतील खारघर इथं सिडकोनं उभारलेल्या गोल्फ कोर्सचं रूपांतर आंतरराष्ट्रीय
गोल्फ कोर्स मध्ये करण्यात येत आहे.
//************//
No comments:
Post a Comment