Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 04 June
2023
Time 7.10 AM
to 7.25 AM
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक
०४ जून २०२३ सकाळी ७.१० मि.
****
· बालासोर रेल्वे अपघातातल्या मृतांची संख्या २८८;पंतप्रधानांकडून
मदत आणि बचावकार्याचा आढावा तसंच जखमींची विचारपूस
· उत्क्रांतीचा सिद्धांत आणि नियतकालिक सारणी अभ्यासक्रमातून
वगळल्याचं वृत्त निराधार-एनसीईआरटीचा खुलासा
· दहावीच्या विद्यार्थ्यांना विविध कौशल्यांवर आधारित
व्यवसाय मार्गदर्शन तसंच
समुपदेशन करण्याचा शिक्षण विभागाचा निर्णय
· काळा बाजार रोखण्यासाठी केंद्र सरकारकडून डाळींच्या साठवणुकीवर ३१ ऑक्टोबरपयर्यंत मर्यादा
· दिवंगत केंद्रीय मंत्री गोपिनाथ मुंडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना काल सर्वत्र
अभिवादन
·
औरंगाबाद जिल्ह्यात बचत गटांसाठी बचत भवन तसंच सभागृह
उभारण्यात येणार
आणि
· तिसऱ्या खेलो इंडिया आंतर विद्यापीठ स्पर्धेचा वाराणसी इथं समारोप
****
ओडिशातल्या बालासोर
इथं शुक्रवारी झालेल्या रेल्वे अपघातातल्या मृतांची संख्या २८८ झाली आहे, तर एक हजाराहून अधिक प्रवासी गंभीर जखमी
आहेत. ओळख पटलेले मृतदेह संबंधित नातेवाईकांकडे सोपवण्याचं काम सुरू आहे.या
अपघाताच्या चौकशीचा प्राथमिक अहवाल प्राप्त
झाला असून, त्यानुसार सिग्नल यंत्रणेशी
संबंधीत बिघाडामुळे हा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. रेल्वे
मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या अपघाताची
उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल अपघात
स्थळाची भेट देऊन पाहणी केली. हा अपघात अत्यंत वेदनादायी आणि मन
सुन्न करणारा असल्याची भावना पंतप्रधानांनी व्यक्त केली. अपघाताला जबाबदार असणाऱ्यांवर
कठोर कारवाईचे निर्देशही पंतप्रधानांनी दिले. ओडिशा सरकार आणि सर्वसामान्य नागरिकांनी
अपघातग्रस्तांना केलेली तातडीची मदत मोलाची असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं. पंतप्रधानांनी
बालासोर इथं रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली. तसंच जखमींवर योग्य ते उपचार करण्याची
आरोग्य विभागाला सूचना केली.
परवा झालेल्या या रेल्वे अपघाताबद्दल जगभरातून दु:ख व्यक्त केलं जात आहे. रशियाचे
राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन, कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो, जपानचे पंतप्रधान
फुमियो किशिदा, संयुक्त अरब अमीराती चे राष्ट्रपती शेख
मोहम्मद बिन जायद अल नाह्यान यांच्यासह
अनेक देशांच्या प्रमुखांनी या अपघाताबद्दल शोक व्यक्त केला आहे.
या रेल्वे अपघाताची जबाबदारी स्वीकारुन रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी राजीनामा
द्यावा, अशी मागणी काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. ते काल मुंबईत वार्ताहरांशी
बोलत होते. काही त्रुटी राहील्या तरच असे अपघात होतात, असं ते म्हणाले.
दरम्यान अपघातग्रस्त कोरोमंडल
एक्स्प्रेसमधे अडकलेल्या २५० प्रवाशांना घेऊन एक विशेष रेल्वेगाडी काल चेन्नईकडे रवाना झाली. काल झालेल्या अपघातामुळे
३९ गाड्यांच्या मार्गात बदल करण्यात आले असून अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.
दरम्यान, या अपघाताच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वेमार्गावरील
पहिल्या वंदे भारत एक्स्प्रेसचा कालचा नियोजित उद्घाटन सोहळा रद्द करण्यात आला. वंदे भारत एक्स्प्रेस गाडी शुक्रवारी रात्री रिकामीच मुंबईकडे रवाना झाली. वंदे भारत एक्स्प्रेसच्या
उद्घाटनाची पुढील तारीख निश्चित झाल्यावर जाहीर केली जाईल, असं कोकण रेल्वेतर्फे स्पष्ट करण्यात आलं आहे.
****
राष्ट्रीय शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण परिषद - एनसीईआरटीने
अभ्यासक्रमातून उत्क्रांतीचा सिद्धांत आणि नियतकालिक सारणी काढून टाकल्याच्या
बातम्या चुकीच्या आणि दिशाभूल करणाऱ्या असल्याचं ट्वीटरच्या माध्यमातून
स्पष्ट केलं आहे. इयत्ता अकरावीच्या पुस्तकातील तिसऱ्या विभागात या
बाबी तपशीलवार देण्यात आल्या असून इयत्ता बारावीच्या पुस्तकात उत्क्रांती
सिद्धांताचं सहाव्या भागात तपशीलवार वर्णन करण्यात आल्याचं एनसीईआरटीने स्पष्ट केलं
आहे.
****
नवीन शैक्षणिक धोरण लोकल अभ्यासक्रमाला ग्लोबल करणारं असेल, असं उच्च आणि तंत्र शिक्षण
मंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. ते काल अमरावती इथं एका कार्यक्रमात
बोलत होते. नवीन शैक्षणिक धोरणामुळे विद्यार्थ्यांना पारंपारिक अभ्यासक्रमासोबतच नवीन तंत्रज्ञानाचे शिक्षण घेणं सोयीचे होणार असल्याचं मत पाटील
यांनी यावेळी व्यक्त केलं.
****
दहावी परीक्षेच्या नुकत्याच जाहीर झालेल्या निकालातून सुमारे आठ टक्के
विद्यार्थ्यांना किमान अध्ययन क्षमतेपर्यंत पोहोचण्यास अडसर येत असल्याचं निदर्शनास आलं आहे. या विद्यार्थ्यांना यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून विविध कौशल्यांवर आधारित व्यवसाय
मार्गदर्शन, पुढील शिक्षणासाठी मार्गदर्शन तसंच समुपदेशन करण्याचा निर्णय शिक्षण
विभागाने घेतला आहे. यासंदर्भात विविध शासकीय, अशासकीय संस्थांनी कौशल्यावर आधारित
व्यवसाय मार्गदर्शन, पुढील शिक्षण, समुपदेशासाठी शिबीर आयोजित करण्याचे
निर्देश शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी दिले आहेत.
दरम्यान, यंदा दहावीच्या परीक्षेदरम्यान आणि
परीक्षेनंतर एकूण ३६६ गैरप्रकार घडले आहेत. कॉपी केल्याची सर्वाधिक ३३ प्रकरणे नाशिक
विभागीय मंडळात घडली असून, छत्रपती
संभाजीनगर विभागात ३०, नागपूर २६, पुणे १४, लातूर आठ, अमरावती चार, तर मुंबईत कॉपीचा एक प्रकार समोर आला. कोल्हापूर तसंच कोकण विभागात एकाही कॉपी प्रकरणाची नोंद झाली नाही. परीक्षेदरम्यान शिक्षकांनी
परीक्षार्थ्यांना सहाय्य केल्याप्रकरणी पुणे
आणि नागपूर विभागीय मंडळात प्रत्येकी एक प्रकार नोंदवण्यात आला आहे.
****
सर्व शासकीय बांधकामांसाठी क्रश सॅण्ड अर्थात रेती चुरा वापरण्याचे धोरण शासन स्वीकारणार असल्याचं, महसूल मंत्री तथा अहमदहनगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे
पाटील यांनी सांगितलं. ते काल
अहमदनगर इथं बोलत होते. शासकीय कामाच्या नावाखाली यापूर्वी मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर वाळू उपसा
झाला. त्याची पुनरावृत्ती होवू नये म्हणून हा निर्णय घेणार असल्याचं, विखे पाटील यांनी
सांगितलं.
****
केंद्रीय नागरी
विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी काल कोल्हापूर विमानतळाच्या नवीन टर्मिनल इमारतीच्या कामाची
पाहणी केली. देश विदेशातून येणाऱ्या प्रवाशांना
कोल्हापूरच्या समृद्ध, वैभवशाली
इतिहासाची प्रचिती येईल, अशा पद्धतीने या इमारतीची बांधणी करावी, तसंच येत्या दसऱ्यापूर्वी काम पूर्ण करण्याच्या सूचना शिंदे यांनी केल्या.
****
राज्य शासन आणि
बजाज फिनसर्व्ह
यांच्यात काल पाच हजार कोटी रूपयांच्या गुंतवणुकीचा सामंजस्य करार करण्यात आला. या
करारामुळे चाळीस हजार जणांना रोजगार उपलब्ध होणार आहे. पुणे हे वित्तीय
सेवांचे केंद्र बनत असून नवनवीन गुंतवणूकीमुळे विकासाला चालना मिळेल असं मत या सामंजस्य
करारावर स्वाक्षरी केल्यानंतर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं.
****
साठेबाजी आणि
काळा बाजार रोखण्यासाठी, तसंच तूर आणि उडीद डाळीचे दर ग्राहकांना परवडतील असे
ठेवण्यासाठी, केंद्र सरकारनं या डाळींच्या साठेबाजीवर मर्यादा घातली आहे. हे
निर्बंध घाऊक, किरकोळ विक्रेते, मोठे साखळी
विक्रेते, डाळ मिलर्स आणि आयातदार यांना बंधनकारक असतील. यासंदर्भातला
आदेश कालपासून लागू करण्यात आला. या आदेशानुसार, सर्व राज्ये
आणि केंद्रशासित प्रदेशांसाठी ३१ ऑक्टोबर पर्यंत तूर आणि उडीद डाळ साठा मर्यादा
निश्चित करण्यात आली आहे.
****
जागतिक स्तरावर खाद्यतेलाच्या किमतीत घसरण होत असताना
खाद्य तेलाच्या किमतीत कपातीबाबत चर्चा करण्यासाठी, सरकारनं प्रमुख तेल उत्पादक
संघटनांसोबत दुसरी बैठक घेतली. खाद्यतेलाच्या किंमती आणखी कमी करण्यास तेल उत्पादन कंपन्यांनी या बैठकीत सकारात्मक प्रतिसाद दिल्याचं,
याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
वर्ल्ड फेलोशिप ऑफ बुद्धिस्ट या बौद्ध धम्मासाठी कार्य करणाऱ्या आंतरराष्ट्रीय संघटनेच्या मानद उपाध्यक्षपदी
केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले यांची निवड झाली आहे. येत्या
फेब्रुवारीत मुंबईत परिषद आयोजित करण्याबाबत संघटनेचे अध्यक्ष फेलॉप थेरी
यांच्याशी आठवले यांची काल चर्चा झाली.
****
दिवंगत केंद्रीय
मंत्री, भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना काल
सर्वत्र अभिवादन करण्यात आलं. बीड जिल्ह्यातल्या परळी इथल्या गोपीनाथगडावर कार्यकर्त्यांनी
अभिवादनासाठी गर्दी केली होती. माजी मंत्री तथा भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे,
खासदार डॉ प्रीतम मुंडे, आमदार धनंजय मुंडे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते
एकनाथ खडसे यांनी याठिकाणी गोपीनाथ मुंडे यांना अभिवादन केलं. दरम्यान, यावेळी बोलताना
पंकजा मुंडे यांनी, आपलं राजकारण फक्त आणि फक्त लोकांसाठी असल्याचं, म्हटलं आहे. लोकांच्या हिताची भूमिका घ्यायची ही
लोकनेते मुंडे साहेबांची आपल्याला शिकवण आहे. सत्य, स्वाभिमान आणि वंचितांच्या सेवेचा वसा आपण शेवटपर्यंत सोडणार नाही, असं पंकजा मुंडे यांनी नमूद केलं.
औरंगाबाद इथंही
काल गोपीनाथ मुंडे यांच्या नियोजित स्मारक स्थळी अभिवादन सभा घेण्यात आली. अनेक मान्यवरांनी यावेळी उपस्थित
राहून मुंडे यांना आदरांजली वाहून त्यांच्या कार्याला उजाळा दिला,
दरम्यान, या ठिकाणी गोपीनाथ मुंडे यांचं स्मारक आणि संग्रहालय बांधण्याच्या मागणीसाठी
लोकनेते गोपीनाथ मुंडे संस्थेचे अध्यक्ष योगेश खाडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी काल अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा
प्रयत्न केला. पोलिसांनी मध्यस्थी करत त्यांना ताब्यात घेतलं. गेल्या अनेक
वर्षांपासूनच्या या मागणीची सरकारनं दखल न घेतल्यानं हे आंदोलन
केल्याचं खाडे यांनी सांगितलं.
****
जनसंपर्क
अभियान” अंतर्गत सामाजिक संपर्क माध्यमातली प्रभावशाली मान्यवर, पदाधिकारी, कार्यकर्त्यांसमवेत केंद्रीय मंत्री
भूपेंद्र यादव यांनी काल औरंगाबाद इथं
संवाद साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या यशस्वी
कार्यकाळाला नऊ वर्ष पूर्ण झाल्याबद्दल येत्या ३० जून दरम्यान हे अभियान जिल्हाभरात
राबवण्यात येत आहे.
****
औरंगाबाद जिल्ह्यातल्या प्रत्येक ग्रामीण भागात, बचत गटांसाठी
एक बचत भवन आणि बचत गटांना प्रशिक्षण देण्यासाठी एक सभागृह उभारण्यात येणार
असल्याची घोषणा केंद्रीय अर्थ राज्य मंत्री डॉ.भागवत कराड यांनी केली आहे. लोकनेते
गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा
विद्यापीठातल्या गोपीनाथ मुंडे राष्ट्रीय ग्रामीण विकास आणि संशोधन संस्थेच्या
वतीनं "कृषी माल प्रक्रियेतून ग्रामीण विकास " या विषयावर एकदिवसीय
कार्यशाळा घेण्यात आली, या कार्यशाळेचं डॉ.कराड यांच्या
हस्ते उद्घाटन करण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते. राष्ट्रीय कृषी
आणि ग्रामीण विकास बॅँक - नाबार्ड आणि औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या माध्यमातून, सरकारल्या जात असलेल्या
या प्रकल्पाला
२७५ कोटी रुपये खर्च येणार असून बचत गटातील उत्पादित वस्तूंसाठी मॉल उभारण्याची
संकल्पना असल्याचं डॉ.कराड यांनी सांगितलं.
दरम्यान, केंद्रीय कामगार मंत्री भूपेंद्र यादव यांच्याकडे राज्य कामगार
रुग्णालयात परिचर्या महाविद्यालय सुरु करावं आणि कामगारांसाठी ५०० खाटांचं नवीन रुग्णालय
सुरु करण्याची मागणी केली असल्याचं डॉ.भागवत कराड यांनी यावेळी सांगितलं. ओडिशा
दुर्घटनेतील मृतांना यावेळी श्रद्धांजली वाहण्यात आली.
****
केंद्रातील
नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपा सरकारला नऊ वर्ष पूर्ण झाल्यानिमित्ताने
महाजनसंपर्क अभियानाअंतर्गत सेवा, सुशासन आणि गरीब कल्याणाची नऊ वर्षे या माध्यमातून धाराशिव
जिल्ह्यातील सहा लाख घरापर्यंत केंद्र सरकारचे काम पोहोचवलं जाणार आहे. आमदार
राणाजगजीतसिंह पाटील यांनी काल पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. संपर्क
से समर्थन या अंतर्गत एक हजार कुटुंबांना भेटी देऊन मोदी सरकारचे काम सांगितलं जाणार आहे. २१ जून या
आंतरराष्ट्रीय योग दिनी धाराशिव लोकसभा मतदारसंघात ६० ठिकाणी
कार्यक्रम घेतले जाणार असल्याची माहितीही पाटील यांनी दिली.
****
थायलंड खुल्या
बँडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारताच्या लक्ष्य सेनचा काल पराभव झाला. थायलंडच्या कुनलावत विटिडर्सन याने लक्ष्यचा १३-२१, २१-१७, २१-१३ असा पराभव केला.
****
तिसऱ्या खेलो
इंडिया आंतर विद्यापीठ स्पर्धेचा काल वाराणसी इथं समारोप झाला. चंदीगड इथलं पंजाब विद्यापीठानं एकंदर ६६ पदकं पटकावून अव्वल पटकावलं. अमृतसरचं गुरु नानक देव विद्यापीठ ६५ पदकांसह दुसऱ्या स्थानावर राहिलं. कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाला सहा सुवर्णपदकांसह एकूण १७ पदकं मिळाली. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला चार सुवर्णपदकांसह २९ पदकं, मुंबई विद्यापीठाला चार सुवर्णासह १३ पदकं, तर नागपूरच्या राष्ट्रसंत तुकडोजी
महाराज विद्यापीठानं तीन सुवर्णासह आठ पदकं पटकावली.
****
No comments:
Post a Comment