Thursday, 1 June 2023

TEXT - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 01.06.2023 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजताचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 01 June 2023

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ०१ जून २०२३ सायंकाळी ६.१०

****

·      केंद्र सरकार देशातल्या गरिबांच्या कल्याणासाठी झटत असल्याचं केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांचं प्रतिपादन.

·      छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकला उद्या साडेतीनशे वर्षे पूर्ण, राज्य सरकारच्या वतीने रायगडावर विशेष सोहळा.

·      दहावीच्या परीक्षेचा निकाल उद्या.

·      आषाढी वारीला पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांच्या सोयीसाठी तात्पुरती स्वच्छता गृह उभारण्याच्या कामासाठी २१ कोटी रुपये निधी मंजूर.

आणि

·      आशिया चषक हॉकी स्पर्धेच्या पुरुष कनिष्ठ गटाच्या अंतिम सामन्यात आज भारत-पाकिस्तान आमनेसामने.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकार गरिबांच्या कल्याणासाठी झटत असल्याचं केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत भाजपाच्या महा जनसंपर्क अभियाना अंतर्गत आयोजित व्यापाऱ्यांच्या परिषदेत बोलत होते. देशाच्या विकासाचं काम नुकतंच सुरु झालं असून आपल्याला अजून मोठा पल्ला गाठायचा आहे, असं त्यांनी अधोरेखित केलं. ते म्हणाले –

नरेंद्र मोदीजी की सरकारने भारत की अर्थव्यवस्था को दुनिया की सबसे तेजी से बढने वाली अर्थव्यवस्था भी बनाया। भारत की अर्थव्यवस्था दुनिया की पांचवी सबसे बडी अर्थव्यवस्था है। कोई ऐसा क्षेत्र नही जहां पर भारत आगे ना बढ रहा हो। ये मोदीजी की सराहना पुरी दुनिया कर रही है। दुनिया के बडे बडे नेता आज भारत मे और भारत के नेतृत्व मे उम्मीद देखते है। और हम सब भारतीयों को उस पर खरा उतरना है। मुझे पूर्ण आशा की अगले एक वर्ष मे भी भारत उतनी तेजी से ही बढेगा। क्यूं की अभी जो एक रिपोर्ट आई है, उसमे भी भारत की अर्थव्यवस्था को सात पाईंट दो फिसदी की दर से आगे बढता हुआ बताया है।

कुस्तीगीरांच्या आंदोलनाबद्दल बोलताना अनुराग ठाकूर म्हणाले की, सरकार या विषयाची संवेशनशीलपणे हाताळणी करत आहे.

****

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाला उद्या साडेतीनशे वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्तानं शासनातर्फे रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा साजरा केला जाणार आहे. सकाळी साडेआठ वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या सोहळ्याचं उद्घाटन होणार आहे. जिल्हा प्रशासनाकडून समारंभाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. उन्हाचा त्रास होऊ नये यासाठी होळीचा माळ, राज सदर, जगदीश्वर मंदिर इथं मंडप उभारण्यात आले आहेत. लोकांच्या सोयीसाठी आराम कक्ष, नियंत्रण कक्ष उभारण्यात आले आहेत. वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून आज आणि उद्या तसंच ४ ते ६ जून रोजी मुंबई - गोवा महामार्गावर अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. या कार्यक्रमाला केंद्रीय सांस्कृतिकमंत्री किसन रेड्डी, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सामंत, प्राधिकरणाचे अध्यक्ष संभाजी राजे छत्रपती आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

****

देशाचा सकल देशांतर्गत उत्पादन वाढीचा दर २०२२-२३ या आर्थिक वर्षात ७ पूर्णांक २ दशांश टक्के राहिला तर या वर्षाच्या शेवटच्या तिमाहीत म्हणजेच जानेवारी ते मार्च २०२३ या तीन महिन्यात ६ पूर्णांक १ दशांश टक्के राहिला. केंद्र सरकारने तसंच रिझर्व बँकेनं हा दर ७ टक्के पर्यंत पोहोचेल असा अंदाज वर्तवला होता. प्रत्यक्षात तो दोन दशांश टक्के जास्त असल्याचं सांख्यिकी मंत्रालयाच्या आकडेवारीत दिसून आलं आहे. गेल्या तिमाहीत सेवा, निर्यात आणि कृषी क्षेत्राने अपेक्षेपेक्षा खूपच चांगली कामगिरी केल्यामुळे जीडीपी दरात ही वाढ झाली आहे. गेल्या वर्षी अर्थव्यवस्थेच्या वाढीचा दर १३ पूर्णांक १ दशांश टक्के नोंदला गेला आहे. गेल्या आर्थिक वर्षात जीडीपी दर ७ पूर्णांक २ दशांश टक्के राहिल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाधान व्यक्त केलं आहे.

****

राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत मार्च २०२३ ला घेण्यात आलेल्या परीक्षांचा निकाल उद्या जाहीर करण्यात येणार आहे. पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल अधिकृत संकेतस्थळांवर उद्या दुपारी १.०० वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे. तर विद्यार्थ्यांना मूळ गुणपत्रिका त्यांच्या माध्यमिक शाळेमार्फत १४ जून रोजी दुपारी तीन वाजता वितरीत करण्यात येणार आहेत.

****

आषाढी एकादशी निमित्त पुणे, सातारा, सोलापूर या जिल्हयांतून मार्गक्रमण करणाऱ्या विविध संतांच्या पालख्यांसोबत असणाऱ्या भाविकांना स्वच्छता-सोयीसुविधा पुरविण्यासाठी ग्रामविकास विभागाकडून २१ कोटी रुपये मंजूर करण्यात आल्याची माहिती ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे. या निधीतून तात्पुरते शौचालय, निवारा आणि इतर सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

****

पंढरपूर इथल्या आषाढी वारीसाठी नाशिक जिल्ह्यातल्या त्र्यंबकेश्वर इथून श्री संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचं उद्या प्रस्थान होणार आहे. त्यासाठी जिल्हा नियोजन समितीनं तीस लाख रुपये मंजूर केले असून, वारीच्या दरम्यान विविध सेवा सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचं, नाशिकचे जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी सांगितलं.

****

पर्यटनाला चालना देणाऱ्या विविध प्रकल्पांना आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या शिखर समितीची बैठकीत मान्यता देण्यात आली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यावेळी उपस्थित होते. भंडारा आणि नागपूर या दोन्ही जिल्ह्यांच्या किनाऱ्यावर होत असलेला देशातील सर्वोत्तम असा गोसीखुर्द जलपर्यटन प्रकल्प वेळेपूर्वी जानेवारी २०२४ पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

****

१९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत जवळपास ८४ रुपयांची कपात झाली आहे. आता हा सिलिंडर एक हजार ८५६ रुपये ५० पैशांऐवजी एक हजार ७७३ रुपयांना मिळणार आहे. घरगुती एलपीजीच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही.

****

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान उमेदच्या माध्यमातून सेंद्रिय शेती कार्यक्रमाअंतर्गत उस्मानाबाद तुळजापूर आणि लोहारा तालुक्यातील १५ गावातील साडे तीनशे महिला शेतकरी या सेंद्रिय शेती उत्पादक झाल्या असल्याचं जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता यांनी सांगितलं आहे. उमेदच्या माध्यमातून २०२० ते २०२२ या कालावधीत सेंद्रिय शेती प्रकल्प राबविण्यात आला. उस्मानाबाद जिल्ह्यातील नागरिकांना या माध्यमातून ज्वारीसारखे सेंद्रिय तृणधान्य आणि मूग, उडीद, तूर आदी कडधान्य उत्पादन प्राप्त होणार आहेत. याचा लाभ नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन गुप्ता यांनी केलं आहे.

****

नागपूर इथल्या भारतीय आयुर्विज्ञान संस्था एम्सला रुग्णालय आणि आरोग्य सेवा पुरवण्यासाठीच्या कार्यासाठी राष्ट्रीय मान्यता प्रमाणपत्र प्राप्त झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केलं आहे. या संस्थेने दर्जेदार आरोग्य सेवा प्रदान करण्यात विशेष विक्रम केला आहे, असं पंतप्रधानांनी आपल्या ट्विट संदेशात म्हटलं आहे. असं प्रमाणपत्र मिळवणारी नागपूरची संस्था ही देशातल्या आयुर्विज्ञान संस्थांमधली पहिली संस्था आहे.

****

महाराष्ट्र लोकसेवा आयोगा मार्फत घेतली जाणारी राज्य सेवा पूर्व परीक्षा औरंगाबाद जिल्हा केंद्रावर येत्या रविवारी ४ जून रोजी होणार आहे. १५ हजार ३४९ उमेदवार ही परीक्षा देणार असून एक हजार सहाशे अधिकारी, कर्मचारी यांची व्यवस्थापनेसाठी नियुक्ती करण्यात आली आहे.

****

शिवसेनेच्या ३८व्या वर्धापनदिनानिमित्तानं शिवसेनेच्या औरंगाबाद शाखेच्या वतीनं शहराचे ग्रामदैवत संस्थान गणपती इथं आज सकाळी महाआरती करण्यात आली. शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, जिल्हाप्रमुख किशनचंद तनवानी यांच्या हस्ते ही आरती करण्यात आली. “आता जिंकेपर्यंत लढायचं” या संपर्क मोहिमेचं उद्या २ जून ते २५ जूनपर्यंत जिल्हाभरात आयोजन करण्यात आलं आहे.

****

नाशिक जिल्ह्यात कांद्यासह शेतमालाला कवडीमोल भाव मिळत असल्यामुळे गावागावात चावडीवर बैठक होऊन नेत्यांना गावबंदी केली जात आहे. गेल्या आठवड्यात जिल्ह्यात शेतकऱ्यांनी टोमॅटो स्त्यावर फेकून निषेध नोंदवला होता तर चार दिवसांपूर्वी कांदे रस्त्यावर फेकून वणी इथं आंदोलन केलं होतं. या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून जिल्ह्यात जमावबंदीचा आदेश लागू केला जाण्याची शक्यता आहे.

****

आशिया चषक हॉकी २०२३ पुरुष कनिष्ठ गट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात आज भारत-पाकिस्तान आमनेसामने येणार आहेत. ओमानमधल्या सलालाह स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स स्टेडियमवर भारतीय प्रमाण वेळेनुसार रात्री साडेनऊ वाजता सामना सुरू होईल. या स्पर्धेत भारत - पाकिस्तान हे दोन्ही संघ अपराजित राहिले आहेत. साखळी फेरीत भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना १-१ असा बरोबरीत राहिला होता. ब गटात भारत अव्वलस्थानी होता.

****

No comments:

Post a Comment