Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date : 03 June 2023
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक : ०३ जून
२०२३ दुपारी १.०० वा.
****
ओडीशातल्या बालासोर इथं झालेल्या रेल्वे अपघाताच्या पार्श्वभूमीवर
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीत उच्चस्तरीय बैठक घेतली. केंद्रीय गृहमंत्री
अमित शहा यावेळी उपस्थित होते. पंतप्रधानांनी यावेळी संपूर्ण अपघाताची आणि बचावकार्याची
माहिती घेतली.
दरम्यान, पंतप्रधान बालासोर इथं रेल्वे अपघातस्थळी भेट
देणार आहेत. कटक इथल्या रुग्णालयात दाखल अपघातातल्या जखमींना देखील ते भेटणार असल्याचं
याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी देखील आज सकाळी
अपघातस्थळी जाऊन परिस्थितीची पाहणी केली.
बालासोर जिल्ह्यातल्या बहनागा रेल्वे स्थानकावर
काल सायंकाळी झालेल्या या अपघातात २३८ जणांचा मृत्यू झाला असून, ९०० हून अधिक जण जखमी झाले आहेत.
केंद्र सरकारनं भुवनेश्वर इथल्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान
संस्था - एम्स इथून डॉक्टरांची दोन पथकं बालासोर आणि कटक इथं पाठवली असल्याचं केंद्रीय
आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी सांगितलं आहे. या भीषण रेल्वे अपघातातल्या जखमींना आवश्यक
ती सर्व वैद्यकीय मदत सरकार पुरवत असल्याचं ते म्हणाले.
****
या रेल्वे अपघाताची जबाबदारी स्वीकारुन रेल्वे मंत्री
अश्विनी वैष्णव यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी
केली आहे. ते आज मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. काही त्रुटी राहील्या तरच असे अपघात
होतात, असं ते म्हणाले.
****
माजी केंद्रीय मंत्री, भाजपचे ज्येष्ठ नेते गोपिनाथ मुंडे
यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना आज अभिवादन करण्यात येत आहे. बीड जिल्ह्यातल्या
परळी इथल्या गोपिनाथगडावर कार्यकर्त्यांनी अभिवादनासाठी गर्दी केली आहे. भाजप नेत्या
पंकजा मुंडे, खासदार प्रितम मुंडे, आमदार धनंजय मुंडे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे
नेते एकनाथ खडसे यांनी याठिकाणी गोपिनाथ मुंडे यांना अभिवादन केलं.
****
साठेबाजी आणि काळा बाजार रोखण्यासाठी, तसंच तूर डाळ आणि उडीद डाळीचे दर ग्राहकांना
परवडतील असे ठेवण्यासाठी, भारत सरकारच्या वतीनं आदेशाद्वारे या
डाळींच्या साठेबाजीवर मर्यादा घातली आहे. हे निर्बंध घाऊक, किरकोळ
विक्रेते, मोठे साखळी विक्रेते, डाळ मिलर्स
आणि आयातदार यांना बंधनकारक असतील. यासंदर्भातला आदेश कालपासून लागू करण्यात आला. या
आदेशानुसार, सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांसाठी ३१ ऑक्टोबर
पर्यंत तूर आणि उडीद डाळ साठा मर्यादा निश्चित करण्यात आला आहे. आयातदारांनी सीमाशुल्क
क्लीअरन्स तारखेपासून, ३० दिवसांपेक्षा जास्त आयातीतला साठा ठेवू
नये, अशी मर्यादा घालण्यात आली आहे. संबंधित कायदेशीर संस्थांनी
ग्राहक व्यवहार विभागाच्या पोर्टलवर साठ्याची स्थिती घोषित करणं अनिवार्य आहे.
****
गेल्या वर्षीच्या तुलनेत कडधान्यं आणि
तृणधान्यांच्या पेरणी क्षेत्रात वाढ झाल्याची माहिती केंद्र सरकारनं दिली आहे. केंद्रीय
कृषी मंत्रालयानं काल उन्हाळी
पिकांच्या लागवड क्षेत्राच्या प्रगतीविषयीची माहिती जाहीर केली. तांदळाचं पेरणी क्षेत्र
मात्र कमी झाल्याचं या अहवालात म्हटलं आहे.
****
जागतिक खाद्यतेलाच्या किमतीत घसरण होत
असताना खाद्य तेलाच्या किमतीत आणखी कपात करण्याबाबत चर्चा करण्यासाठी, सरकारनं प्रमुख तेल उत्पादक संघटनांसोबत
दुसरी बैठक घेतली. नवी दिल्लीत अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाचे सचिव संजीव चोप्रा
यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. गेल्या दोन महिन्यांत विविध खाद्यतेलाच्या जागतिक
किमतीत प्रति टॅन १५० ते २०० डॉलर्सनं घट झाली असल्याची माहिती खाद्यतेल उत्पादन कंपन्यांनी
यावेळी दिली. खाद्यतेलाची किंमत आणखी कमी केली जाईल असं खाद्यतेल उत्पादन कंपन्यांनी
बैठकीत सांगितलं.
****
तिसऱ्या खेलो इंडिया विद्यापीठ स्पर्धांचा आज वाराणसी इथं समारोप होणार आहे.
उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, केंद्रीय क्रीडा मंत्री
अनुराग सिंह ठाकूर यांच्यासह युवा व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री निशीथ प्रामाणिक
यावेळी सहभागी होणार आहेत. चंदीगड इथलं पंजाब विद्यापीठ एकंदर
६६ पदकं पटकावून अव्वल स्थानावर आहे.
अमृतसरचं गुरु नानक देव विद्यापीठ ६५ पदकांसह दुसऱ्या, तर जैन विद्यापीठ तिसऱ्या स्थानावर
आहे.
****
थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष एकेरीत उपान्त्य
फेरीत आज भारताच्या लक्ष्य सेनचा सामना थायलंडच्या कुनलावुत वितिदसर्न याच्याशी होणार
आहे. काल झालेल्या उपान्त्य पूर्व फेरीच्या सामन्यात लक्ष्यनं मलेशियाच्या खेळाडुचा
पराभव केला होता.
****
हवामान
मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात उद्या आणि
परवा तुरळक भागात उष्णतेची लाट येण्याची शक्यता असून, तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट
होण्याची शक्यता, हवामान खात्यानं वर्तवली आहे. तसंच कोकण आणि मराठवाड्यात काही ठिकाणी मेघगर्जनेसह गारपीट होण्याची शक्यता
आहे.
//************//
No comments:
Post a Comment