Saturday, 3 June 2023

TEXT - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 03.06.2023 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजताचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 03 June 2023

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ०३ जून २०२३ सायंकाळी ६.१०

****

·      बालासोर रेल्वे अपघातातल्या मृतांची संख्या २८८; पंतप्रधानांकडून मदत आणि बचावकार्याचा आढावा तसंच जखमींची विचारपूस.

·      नवीन शैक्षणिक धोरण लोकल अभ्यासक्रमाला ग्लोबल करणारं - उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील.

·      औरंगाबाद जिल्ह्यात बचत गटांसाठी बचत भवन तसंच सभागृह उभारण्यात येणार.

आणि

·      वटपौर्णिमेचा सण आज राज्यात विविध उपक्रमांनी साजरा.

****

ओडिशातल्या बालासोर इथं काल झालेल्या रेल्वे अपघातातल्या मृतांची संख्या वाढून २८८ झाली आहे, तर ८५५ हून अधिक प्रवासी गंभीर जखमी आहेत. बचाव कार्य अद्याप सुरू असल्यामुळे मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता असल्याचं ओडिशाचे मुख्य सचिव प्रदीप जेना यांनी सांगितलं. ओळख पटलेले मृतदेह संबंधित नातेवाईकांकडे सोपवण्याचं काम सुरू आहे. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या सात तुकड्या, ओडिशा आपत्ती प्रतिसाद दलाच्या पाच तुकड्या, अग्निशामक दलाच्या २४ गाड्या, स्थानिक पोलीस आणि स्वयंसेवक यांच्या सहकार्यानं हे मदतकार्य सुरू आहे. या अपघाताच्या चौकशीचा प्राथमिक अहवाल प्राप्त झाला असून, त्यानुसार सिग्नल यंत्रणेशी संबंधीत बिघाडामुळे हा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या अपघाताची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अपघात स्थळाची भेट देऊन पाहणी केली. हा अपघात अत्यंत वेदनादायी आणि मन सुन्न करणारा असल्याची भावना पंतप्रधानांनी व्यक्त केली. अपघाताला जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाईचे निर्देशही पंतप्रधानांनी दिले. ओडिशा सरकार आणि सर्वसामान्य नागरिकांनी अपघातग्रस्तांना केलेली तातडीची मदत मोलाची असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं. पंतप्रधानांनी बालासोर इथं रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली. तसंच जखमींवर योग्य त्या उपचारांची आरोग्य विभागाला सूचना केली.

काल झालेल्या या रेल्वे अपघाताबद्दल जगभरातून दु:ख व्यक्त केलं जात आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतिन, कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो, जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा, संयुक्त अरब अमीराती चे राष्ट्रपती शेख मोहम्मद बिन जायद अल नाह्यान यांच्यासह अनेक देशांनी या अपघाताबद्दल शोक व्यक्त केला आहे.

दरम्यान, अपघातग्रस्त कोरोमंडल एक्स्प्रेसमधे अडकलेल्या अडीचशे प्रवाशांना घेऊन एक विशेष रेल्वेगाडी आज चेन्नईकडे रवाना झाली. काल झालेल्या अपघातामुळे ३९ गाड्यांच्या मार्गात बदल करण्यात आले असून अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

दरम्यान, या अपघाताच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वेमार्गावरील पहिल्या वंदे भारत एक्स्प्रेसचा आजचा नियोजित उद्घाटन सोहळा रद्द करण्यात आला. वंदे भारत एक्स्प्रेस गाडी काल रात्री रिकामीच मुंबईकडे रवाना झाली. वंदे भारत एक्स्प्रेसच्या उद्घाटनाची पुढील तारीख निश्चित झाल्यावर जाहीर केली जाईल, असं कोकण रेल्वेतर्फे स्पष्ट करण्यात आलं आहे.

****

नवीन शैक्षणिक धोरण लोकल अभ्यासक्रमाला ग्लोबल करणारं असेल, असं माहिती उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. अमरावती जिल्हा दौऱ्यावर असताना शिवाजी शिक्षण संस्थेच्या सभागृहात ते आज एका कार्यक्रमात बोलत होते. नवीन शैक्षणिक धोरणामुळे विद्यार्थ्यांना पारंपारिक अभ्यासक्रमासोबतच नवीन तंत्रज्ञानाचे शिक्षण घेणं सोयीचे होणार असल्याचं मत पाटील यांनी यावेळी व्यक्त केलं. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या इमारतीचे चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते यावेळी लोकार्पण करण्यात आलं. पाटील यांनी संत गाडगेबाबा विद्यापीठात संत गाडगेबाबा संदेश शिल्प इथं भेट देऊन अभिवादन केलं. आदिवासी विकास केंद्राकरिता मुलींच्या वसतिगृहाच्या इमारतीचं भूमीपूजन पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं.

****

सर्व शासकीय बांधकामांसाठी क्रश सॅण्ड अर्थात रेती चुरा वापरण्याचे धोरण शासन स्वीकारणार असल्याचं, महसूल मंत्री तथा अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितलं आहे. ते आज अहमदनगर इथं बोलत होते. शासकीय कामाच्या नावाखाली यापूर्वी मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर वाळू उपसा झाला. त्याची पुनरावृत्ती होवू नये म्हणून हा निर्णय घेणार असल्याचं, विखे पाटील यांनी सांगितलं.

****

नाशिक महापालिकेच्या लाचखोर शिक्षणाधिकारी सुनीता धनगर आणि लिपिक नितीन जोशी यांना पाच जून पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयानं दिले आहेत. एका मुख्याध्यापकाकडून संस्थेत नियुक्तीसाठी सुनिता धनगर यांनी पन्नास हजार रुपये आणि लिपीक नितीन जोशी यांनी पाच हजार रुपयांची मागणी केली होती. या संदर्भात संबंधित मुख्याध्यापकाने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. धनगर यांना पन्नास हजार रुपयांची लाच स्वीकारताना काल नाशिकच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडलं होतं. दरम्यान, सुनीता धनगर यांच्या घराची झडती घेतल्यानंतर त्यात ८५ लाख रुपयांची रोकड, ४५ तोळे सोनं, तसंच दोन घरं आणि एका भूखंडाची कागदपत्रे सापडल्याचं या बाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

“जनसंपर्क अभियान” अंतर्गत सामाजिक संपर्क माध्यमातली प्रभावशाली मान्यवर, पदाधिकारी, कार्यकर्त्यांसमवेत केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांनी आज औरंगाबाद इथं संवाद साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या यशस्वी कार्यकाळाला नऊ वर्ष पूर्ण झाल्याबद्दल येत्या ३० जून दरम्यान हे अभियान जिल्हाभरात राबवण्यात येत आहे.

****

औरंगाबाद जिल्ह्यातल्या प्रत्येक ग्रामीण भागात, बचत गटांसाठी एक बचत भवन आणि बचत गटांना प्रशिक्षण देण्यासाठी एक सभागृह उभारण्यात येणार असल्याची घोषणा केंद्रीय अर्थ राज्य मंत्री डॉ.भागवत कराड यांनी केली आहे. लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातल्या गोपीनाथराव मुंडे राष्ट्रीय ग्रामीण विकास आणि संशोधन संस्थेच्या वतीनं "कृषी माल प्रक्रियेतून ग्रामीण विकास " या विषयावर एकदिवसीय कार्यशाळा घेण्यात आली, या कार्यशाळेचं डॉ. भागवत कराड यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. त्यावेळी ते बोलत होते. राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बॅँक - नाबार्ड आणि औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या माध्यमातून, साकारल्या जात असलेल्या या प्रकल्पाला २७५ कोटी रुपये खर्च येणार असून बचत गटातील उत्पादित वस्तूंसाठी मॉल उभारण्याची संकल्पना असल्याचं डॉ.भागवत कराड यांनी सांगितलं.

दरम्यान, केंद्रीय कामगार मंत्री भूपेंद्र यादव यांच्याकडे राज्य कामगार रुग्णालयात परिचर्या महाविद्यालय सुरु करावं आणि कामगारांसाठी ५०० खाटांचं नवीन रुग्णालय सुरु करण्याची मागणी केली असल्याचं डॉ.भागवत कराड यांनी यावेळी सांगितलं. ओडिशा दुर्घटनेतील मृतांना यावेळी श्रद्धांजली वाहण्यात आली.

****

वटपौर्णिमेचा सण आज राज्यात विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. ठिकठिकाणी महिलांनी वडाच्या झाडाची पूजा करून, त्याला धागा गुंडाळून पारंपारिक पद्धतीने पूजा केली.

चंद्रपूर जिल्ह्यात महानगरपालिका, नागपूर इथल्या नटराज निकेतन संस्था आणि मैत्री परिवार यांच्यावतीनं आज वटवृक्ष लागवडीचा संकल्प करण्यात आला. अटलबिहारी वाजपेयी क्रीडा संकुलाच्या आवारात वटवृक्षाची लागवड करून या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. तसंच सामूहिक जलप्रतिज्ञाही यावेळी घेण्यात आली. या मोहिमेत देशभरातील ३०० संस्था सहभाग घेणार असल्याची माहिती मनपा आयुक्त विपिन पालीवाल यांनी दिली.

****

धुळे तालुक्यातील निमगुळ इथल्या महिलांना सामाजिक कार्यकर्ते दिलीप खिवसरा यांनी वडाच्या रोपट्यांचं वाटप केलं, आपल्या परिसरात वृक्षलागवड करण्याचं आवाहन त्यांनी या महिलांना केलं.

****

सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ शहरातली काही पुरुष मंडळी गेल्या १४ वर्षांपासून वट पोर्णिमेचे व्रत करत आहेत. यंदाही महिलांच्या बरोबरीनं या पुरुषांनी वटवृक्षाला फेऱ्या मारून वटपोर्णिमा साजरी केली.

****

शासनाच्या योजना तळागळातील सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचाव्यात म्हणून ‘शासन आपल्या दारी’ हा उपक्रम सुरू केला आहे. यामध्ये विविध प्रकारच्या ३५ योजनांचा समावेश असून, सोलापूर जिल्ह्यातील ११ तालुक्यांतील एक लाख २३ हजार २१२ लोकांना याचा लाभ मिळाला आहे. दरम्यान, लोकांनी सर्वांत जास्त ३८ हजार ३७३ लोकांनी जातप्रमाणपत्राचा लाभ घेतला आहे.

****

केंद्रातील नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपा सरकारला नऊ वर्ष पूर्ण झाल्यानिमित्ताने महाजनसंपर्क अभियानाअंतर्गत सेवा, सुशासन आणि गरीब कल्याणाची नऊ वर्षे या माध्यमातून धाराशिव जिल्ह्यातील सहा लाख घरापर्यंत केंद्र सरकारचे काम पोहोचवलं जाणार आहे. आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. संपर्क से समर्थन या अंतर्गत एक हजार कुटुंबांना भेटी देऊन मोदी सरकारचे काम सांगितलं जाणार आहे.

****

No comments:

Post a Comment