Saturday, 3 June 2023

Text - आकाशवाणी औरंगाबाद, दिनांक : 03.06.2023 रोजीचे सकाळी 11.00 वाजताचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

 आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

०३ जून २०२ सकाळी ११.०० वाजता

****

ओडीशामध्ये बालासोर जिल्ह्यात बहानगा स्थानकाजवळ झालेल्या रेल्वे अपघातातल्या मृतांची संख्या २३७ वर पोहोचली आहे. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव अपघातस्थळी पोहचले असून, परिस्थितीची पाहणी करत आहेत. या अपघाताची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत. सरकारचा मदतकार्यावर अधिक भर राहील, असं ते म्हणाले. या दुर्घटनेमुळे ओडीशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी आज राज्यात एक दिवसाचा शोक जाहीर केला आहे. या अपघातात ९००हून अधिक जण जखमी झाले आहेत.

****

देशातल्या शेतकऱ्यांनी गाळलेला घाम आणि त्यांनी घेतलेल्या मेहनतीचा देशाच्या प्रगतीत सिंहाचा वाटा असल्याचं मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवरून व्यक्त केलं आहे. शेतकऱ्यांच्या अथक श्रमामुळे आपल्याला अन्न सुरक्षा मिळत असल्याचंही ते म्हणाले. गेल्या नऊ वर्षांपासून सरकार अन्नदात्यांचा आधारस्तंभ बनलं असून, कृषी क्षेत्राच्या विकासानं नवी उंची गाठवी यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं पंतप्रधान म्हणाले.

****

युजीसी अर्थात विद्यापीठ अनुदान आयोग - विद्यापीठे मानद संस्था २०२३ ही नियमावली, काल शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नवी दिल्लीत जाहीर केली. या नियमांमुळे विद्यापीठ मानल्या जाणाऱ्या अधिकाधिक संस्थांची स्थापना वस्तुनिष्ठ आणि पारदर्शक पद्धतीनं होईल, या मार्गदर्शक सूचनांमुळे विद्यापीठं दर्जावर लक्ष केंद्रीत करतील, असं प्रधान म्हणाले. २०२० च्या राष्ट्रीय शिक्षण धोरणाला अनुसरून युजीसीनं वेळेवर या सुधारणा केल्याबद्दल त्यांनी गौरवोद्गार काढले.

****

केंद्र सरकारला नऊ वर्षं पूर्ण झाल्याच्या निमित्तानं भारतीय जनता पक्षाच्या वतीनं औरंगाबाद जिल्ह्यात "संपर्क से समर्थन" अभियानांतर्गत काल वैजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत संघनात्मक बैठक घेण्यात आली. यावेळी केंद्रीय अर्थ राज्य मंत्री डॉ.भागवत कराड यांनी उपस्थित कार्यकर्त्याना मार्गदर्शन केलं.

****

ऑलिम्पिकमधे सहभागी झालेला भारतीय नेमबाज एलाव्हेनिल वालारिवान आणि तिरंदाज प्रवीण जाधव यांनी, क्रीडा उपकरणं आणि अद्ययावत सुविधांसाठी केलेल्या प्रस्तावाला, केंद्रीय युवक व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाच्या ऑलिम्पिक विभागानं मान्यता दिली आहे.

 //*************//

No comments:

Post a Comment