Sunday, 4 June 2023

Text - आकाशवाणी औरंगाबाद, दिनांक : 04.06.2023 रोजीचे दुपारी 01.00 वाजताचे मराठी बातमीपत्र

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date : 04 June 2023

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक : ०४ जून २०२ दुपारी १.०० वा.

****

ओडिशातील बालासोर इथं झालेल्या रेल्वे अपघाताच्या कारणांचा शोध लागला असून  या दुर्घटनेला जबाबदार असलेल्यांची गय केली जाणार नाही, असं केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटलं आहे. बालासोर इंथ शुक्रवारी झालेल्या रेल्वे  अपघाताच्या मदतकार्याचा आढावा घेतल्यानंतर रेल्वेमंत्री बोलत होते. या अपघाताच्या चौकशीचा प्राथमिक अहवाल प्राप्त झाला आहे परंतु, निष्कर्ष आणि पूर्ण अभ्यासानंतरच हा अहवाल जाहीर करू असं त्यांनी सांगितलं. रेल्वेमार्ग पूर्ववत करण्याचं काम युद्धपातळीवर सुरू असून बुधवार सकाळपर्यंत या मार्गावर रेल्वेसेवा सुरु होईल असंही त्यांनी सांगितलं. दरम्यान, रेल्वे अपघातातल्या मृतांची संख्या २८८ झाली आहे, तर एक हजाराहून अधिक प्रवासी गंभीर जखमी आहेत.    
दरम्यान, ओडिशातून १३७ प्रवाशांना घेऊन एक विशेष रेल्वे आज चेन्नईला पोहोचली. या प्रवाशांपैकी आठ जखमींवर राजीव गांधी शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ओडिशातून येणाऱ्या प्रवाशांवर उपचार करण्यासाठी तामिळनाडू सरकारनं ३० वैद्यकीय पथके तयार केली आहेत.
 
                                  ***
जी ट्वेंटी आरोग्य कार्यगटाच्या तिसऱ्या बैठकीला आजपासून हैदराबाद इथं सुरुवात झाली. भारताच्या अध्यक्षतेत जी ट्वेंटी आरोग्य कार्यगटाचं नेतृत्व केंद्रीय मंत्री मनसुख मांडवीय यांच्या वतीनं कुटूंब कल्याण राज्य मंत्री डॉ. भारती पवार करत आहेत. सार्वत्रिक आरोग्य सेवा साध्य करण्यासाठी, जागतिक आरोग्य प्रणाली आणि प्रादेशिक आरोग्य पद्धतींचा एकत्रित लाभ घेण्यावर डॉ. पवार या भर देतील. तीन दिवस चालणाऱ्या या बैठकीत आरोग्य आपत्कालीन व्यवस्थापन, तयारी आणि प्रतिसाद, अल्प दरातील उपचार पद्धती आणि उपलब्धता तसंच डिजीटल आरोग्य याबाबत चर्चा केली जाणार आहे.    
                                  ***     
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू सुरीनाम आणि सर्बिया या राजकीय दौऱ्यासाठी काल रात्री रवाना झाल्या. दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात राष्ट्रपती आजपासून सहा जूनपर्यंत सुरीनामला भेट देणार आहेत. सुरीनाम इथं उद्या साजऱ्या होणाऱ्या भारतीयांच्या आगमनाच्या १५० व्या वर्धापन दिनाच्या समारंभात राष्ट्रपती मुर्मू या प्रमुख पाहुण्या असतील. दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात सात ते नऊ जून या कालावधीत त्या सर्बिया इथं भेट देणार असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

                                    ***    
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षातर्फे अवघ्या ११ महिन्यांत नऊ हजार ६९९ रुग्णांना एकूण ७१ कोटी ६८ लाख रुपयांची मदत वितरीत करण्यात आली आहे. राज्यातील एकही सर्वसामान्य, गोरगरीब गरजू रुग्ण पैशाअभावी उपचाराविना राहणार नाही, याची काळजी घ्यावी असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासंदर्भात दिले असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

                                   ***   
आषाढी एकादशी निमित्त त्र्यंबकेश्वर इथून पंढरपूरला निघालेल्या संत निवृत्तीनाथ महाराज यांच्या पालखीचं आज नाशिक शहरात आगमन होणार आहे. नाशिक महापालिका तसंच वारकरी संप्रदायाच्या वतीनं या पालखीचं उत्साहात स्वागत करण्यात येणार आहे. पालखी आज शहरात मुक्कामी असून उद्या सिन्नरला रवाना होईल.  
                                  ***    
धाराशिव जिल्ह्यात परंडा -बार्शी रस्त्यावर सोनगीरी गावाजवळ काल सकाळी एका धोकादायक वळणावर बस उलटून अपघात झाला. या अपघातात ४३ प्रवासी जखमी झाले आहेत. ही बस परंड्याहुन धाराशिवकडे जात असतांना हा अपघात झाला. जखमींना परंडा इथं उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

                                 ***   
संत कबीर यांची जयंती आज सर्वत्र साजरी होत आहे. यानिमित्त पुर्वसंध्येला काल औरंगाबाद इथं साहित्य संगीत कलामंच आणि निपट निरंजन समाधी विश्वस्त मंडळाच्या वतीनं “कहे कबीर दिवाना” या कार्यक्रमात कबिरांच्या काही रचना सादर करण्यात आल्या.

                                 ***
भारतीय कुस्तीपटूंनी शनिवारी बिश्केक इथं झालेल्या संयुक्त जागतिक कुस्ती मानांकन मालिका स्पर्धेत तीन पदकं जिंकली. या स्पर्धेत मनीषानं सुवर्ण, रितिकानं रौप्य आणि सरिता मोर हिनं कांस्यपदक पटकावलं. भारतानं या मालिकेत एक सुवर्णदकांसह एकूण चार पदके जिंकली आहेत. 

                                   ***  
राज्यात आज ठिकठिकाणी मान्सून पूर्व पावसाचं आगमन झालं. औरंगाबाद शहरात ढगाळ वातावरण असून जिल्ह्यातल्या कन्नड तालुक्यातील औराळा, चापानेर आणि वैजापूरसह लोणीखूर्द, सोयगाव इथं जोरदार पाऊस सुरू आहे. धुळे शहरासह धुळे तालुका, साक्री, शिरपूर, दोंडाईचा इथं जोरदार पाऊस झाला असून वीज पुरवठाही खंडित झाल्याचं वृत्त आहे.   
                                   ***
नांदेड शहरात मध्यरात्री ढगांच्या गडगडाटांसह मान्सूनपूर्व पाऊस झाला. त्यानंतर बराचवेळ पावसाची रिमझीम सुरू होती.
र नाशिक शहरासह जिल्ह्यातील काही भागात सध्या ढगाळ वातावरण असून काही ठिकाणी हलका पाऊस झाला.  

//************//

 

 

No comments:

Post a Comment