Sunday, 4 June 2023

TEXT - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 04.06.2023 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजताचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 04 June 2023

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ०४ जून २०२३ सायंकाळी ६.१०

****

·      मराठवाड्यासह राज्याच्या अनेक भागात जोरदार वारे आणि गारपिटीसह पाऊस; पाच जणांचा मृत्यू.

·      भिवंडीत उभारलं जात आहे देशातलं पहिलं कार्बन न्यूट्रल आदिवासी गाव.

·      औरंगाबाद इथल्या जय बाबाजी भक्त परिवाराच्या वतीनं पाचशे ठिकाणी महाश्रमदान स्वच्छता मोहीम.

आणि

·      चंद्रपूर जिल्ह्यात रस्ता अपघातात चार जणांचा मृत्यू.

****

मराठवाड्यासह राज्याच्या अनेक भागात आज जोरदार वारे आणि गारपिटीसह पाऊस झाला. या पावसाशी संबंधित घटनांत पाच जणांचा मृत्यू झाला, तर वादळी वाऱ्यांमुळे घरं, दुकानं आणि आठवडी बाजारातल्या विक्रेत्यांचं नुकसान झाल्याचं वृत्त आहे.

औरंगाबाद शहरासह जिल्ह्यात विविध ठिकाणी आज जोरदार वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडली, घरावरचे पत्रे उडाले आणि काही घरांच्या भिंती ढासळल्या. पाचोड - कोळी बोडखा इथं जोरदार वादळात पत्र्याच्या टपऱ्या उडाल्या. गंगापूर, वैजापूर आणि सोयगाव तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडला. गंगापूर तालुक्यातील तुर्काबाद खराडी इथं शेतात काम करतांना वीज पडून कृष्णा मेटे या शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य एक जण होपळल्याचं वृत्त आहे. पावसामुळे वैजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणलेल्या कांद्यांचं नुकसान झालं. पाचोड आणि दौलताबादच्या आठवडी बाजारात वादळी वाऱ्यानं व्यापाऱ्यांसह नागरिकांची तारांबळ उडाली. रस्त्यावर धुळीमुळे वाहनधारकांना वाहन चालवणं कठीण झालं होतं.

 

जालना शहरासह जिल्ह्यातल्या बहुतांश भागात आज दुपारी वादळी वाऱ्यामुळे मोठं नुकसान झालं. अनेक घरांवरील पत्रे, दुकानांच्या नावांचे फलक उडून गेले. जोरदार हवेमुळे ग्रामीण भागात अनेक ठिकाणी झाडं, विजेचे खांब उन्मळून पडले. अंबड तालुक्यातल्या रवना, परडा, मठपिंपळगाव, सुखापुरी या भागात डाळिंब आणि मोसंबी फळबागांना वादळाचा फटका बसला. तीर्थपुरी, रामनगर, रवाना पराडा, डोंगरगाव, सुखापुरी भागात हलक्या स्वरुपाचा पाऊसही झाला. जोरदार हवेमुळे रस्त्यावर उठलेल्या धुळीच्या लोटांमुळे वाहनधारकांची धांदल उडाली. दरम्यान, बहुतांश भागाचा वीजपुरवठा खंडीत झाला आहे.

 

हिंगोली जिल्ह्यात आज अनेक भागात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. औंढा नागनाथ, शिरड शहापूर, जवळा बाजार, वाकोडी, कुरुंदा, वसमत, कळमनुरी, आखाडा बाळापूर, कन्हेरगावसह इतर भागातही सुमारे अर्धा तास पाऊस झाला. तर जवळा बाजार परिसरात तर गारपीट झाल्याचं वृत्त आहे.

 

वाशिम जिल्ह्यात आज विजेचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. रिसोड तालुक्यातील मौजे भर जहागीर इथं अंगावर वीज पडल्यानं एकाचा मृत्यू झाला. राज्यात जळगाव, पालघर, नंदुरबार, नाशिकसह अनेक जिल्ह्यात पाऊस झाल्याचं आमच्या वार्ताहरांनी कळवलं आहे.

 

बुलडाणा जिल्ह्यात वादळी वाऱ्यामुळे अनेक झाडं उन्मळून पडली. खामगाव तालुक्यात गेरू माटरगाव इथं एका शेतकऱ्याच्या अंगावर झाड पडून तो जागीच ठार झाला. किशोर ज्ञानेश्वर खोडके असं या शेतकऱ्याचं नाव आहे. जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गावर मलकापूर आणि नांदुरा रस्ता दरम्यान अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे झाडं पडल्याने वाहतूक काही काळ थांबली होती. विद्युत तारा तुटून पडल्याने अनेक भागात वीजपुरवठा बंद असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

 

नंदुरबार जिल्ह्यात धुळीच्या वादळात समोरुन येणारं वाहन न दिसल्याने बस आणि ट्रक यांच्यात झालेल्या अपघातात ट्रक चालकाचा जागीच मृत्यू झाला, तर बसमधले आठ प्रवासी गंभीर जखमी झाले. नवापूर तालुक्यातल्या मासलीपाडा जवळ हा अपघात झाला. जखमींना विसारवाडी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तळोदा तालुक्यात वादळी वाऱ्यामुळे वडाचं झाड एका धावत्या कारवर पडून एकाचा मृत्यू झाला तर दोन जण गंभीर जखमी झाले. तळोदा तालुक्यात रानात चरायला गेलेल्या जवळपास ३० ते ३५ बकऱ्या मुसळधार पावसामुळे दगावल्याचं वृत्त आहे.

 

अहमदनगर जिल्ह्यात कोपरगाव, नेवासे पाथर्डी तालुक्यासह अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. काही भागात तुरळक पाऊस झाला. पाथर्डी तालुक्यातील पाथर्डी बीड राष्ट्रीय महामार्गांवर खरवंडी इथला राष्ट्रीय महामार्गांवरील पथकर नाका कोसळला. यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही.

****

केंद्र शासनाने गेल्या नऊ वर्षात राबवलेल्या वैयक्तिक लाभ योजना आणि पायाभूत विकास योजनांमुळे देशाच्या तसंच नागरिकांच्या जीवनात परिवर्तन दिसून येत आहे, असं केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. ते आज नागपूर इथं केंद्र शासनाच्या नऊ वर्षपूर्ती निमित्त घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. वाहनउद्योग क्षेत्रामध्ये भारत हा आता चीन आणि अमेरिकेनंतर तिसऱ्या क्रमांकावर आहे. हे क्षेत्र साडेसात लाख कोटी रुपयांचे झालं असून, पुढील ५ वर्षांमध्ये १५ लाख कोटी रुपयापर्यंत जाईल, असा विश्वास गडकरी यांनी व्यक्त केला. रस्ते निर्मिती, औद्योगिक विकास या माध्यमातून रोजगार निर्मिती होत असून नागपूरच्या मिहान इथं आतापर्यंत ६८ हजार लोकांना रोजगार मिळाल्याचंही गडकरी यांनी सांगितलं.

****

देशातलं पहिलं कार्बन न्यूट्रल आदिवासी गाव भिवंडीत उभारलं जात आहे. केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी ही माहिती दिली. ते आज ठाणे जिल्ह्यात भिवंडी इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. केंद्र शासनाने गेल्या नऊ वर्षात राबवलेल्या विविध योजनांची माहिती त्यांनी दिली, भिवंडी लोकसभा मतदारसंघात १ लाख ७५ हजार शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा लाभ घेतला आहे. भिवंडी मतदारसंघात १२१ आदिवासी गावांचा आदर्श गावं म्हणून विकास करण्यात येत असल्याचंही पाटील म्हणाले.

****

केंद्र सरकारनं देशाच्या ऐतिहासिक उच्च संस्कृतीचं पुनरुज्जीवन केलं असून सरकारला देशाच्या उज्वल परंपरेचा अभिमान आहे, असं माहिती आणि प्रसारण मंत्री अनुरागसिंह ठाकूर यांनी म्हटलं आहे. ते आज उल्हासनगर इथं बोलत होते. आपल्या सरकारनं कर्तारपूर कॉरिडॉर, अयोध्या इथं राम मंदिर अशा अनेक गोष्टींच्या उभारणीत पुढाकार घेतला असल्याचंही त्यांनी सांगितलं.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत मिशन अंतर्गत औरंगाबाद इथल्या जय बाबाजी भक्त परिवाराच्या वतीनं आज महाराष्ट्रासह १९ राज्यांत पाचशे ठिकाणी महाश्रमदान स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. पाचशे पैकी ३४९ स्थळं ही महाराष्ट्रातील आहेत. ज्यामधे प्राचीन मंदिरांचा तसंच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या १५१ गड किल्ल्यांचा समावेश असल्याची माहिती समन्वयक राजेंद्र पवार यांनी यावेळी दिली. पैठण इथं पालकमंत्री संदिपान भुमरे यांच्या हस्ते आज सकाळी या स्वच्छता मोहिमेला प्रारंभ झाला. संत एकनाथ मंदिर आणि गोदावरी घाटांवर या अंतर्गत स्वच्छता करण्यात आली.

****

चंद्रपूर जिल्ह्यात नागपूर वरून नागभीडकडे जाणाऱ्या चारचाकी वाहनाची समोरून येणाऱ्या बसशी धडक झाली. या अपघातात चारचाकी मधल्या चार जणांचा मृत्यू झाला, तर दोन जण गंभीर जखमी झाले. आज दुपारी ४ वाजेच्या सुमारास हा अपघात झाला.

****

बीड जिल्ह्यात शेतकऱ्यांना शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी शेतकऱ्यांची आर्थिक, सामाजिक आणि कौटुंबिक सुरक्षितेबाबतची पाहणी करुन कुटुंबाच्या सद्यस्थितीचा आढावा घेण्यात येत आहे. तलाठी, ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका, कृषी सहाय्यक तसच शिक्षक यांच्याकडून प्रत्यक्ष भेटी घेण्यात येत आहेत. दरम्यान, शेतकऱ्यांनी सर्वेक्षण पाहणी विवरणपत्र निःशुल्क भरणा करुन घ्यावं, कोणत्याही खाजगी व्यक्ती किंवा खाजगी इंटरनेट कॅफेवर पैसे देवून विवरणपत्र भरुन घेवू नये, असं आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी संतोष राऊत यांनी केलं आहे.

****

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाला ७५ वर्षे झाल्यानिमित्त औरंगाबाद जिल्ह्यात वैजापूर बस स्थानकात वाहक, चालक, कर्मचारी, अधिकाऱ्यांनी हा अमृत महोत्सव साजरा केला. यावेळी ७५ वर्षांवरील प्रवाशांच्या हस्ते द्वीप प्रज्वलन करण्यात आलं. महामंडळच्या लौकिकासाठी प्रवाशांना सौजन्यपूर्ण सेवा पुरवण्याची तसंच महामंडळाच्या सर्वांगीण वृद्धी आणि विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याची प्रतिज्ञा यावेळी सर्वांनी घेतली.

****

धाराशिव जिल्ह्यात परंडा, भूआणि वाशी तालुक्यात नवीन चार रुग्णालयास १५४ कोटी रुपये निधी मंजूर करून मान्यता देण्यात आली आहे. आरोग्य मंत्री तथा पालकमंत्री डॉ तानाजी सावंत यांनी ही माहिती दिली.

****

No comments:

Post a Comment