Thursday, 22 June 2023

Text - आकाशवाणी औरंगाबाद , दिनांक : 22.06.2023 रोजीचे दुपारी 01.00 वाजताचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date : 22 June 2023

Time : 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक : २२ जून २०२ दुपारी १.०० वा.

****

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत या वर्षाचे राष्ट्रीय फ्लोरेंस नाइटिंगेल पुरस्कार वितरीत करण्यात आले. राष्ट्रपती भवनात हा सोहळा झाला. आरोग्य क्षेत्रात सर्वोत्कृष्ट सेवा देणाऱ्या परिचारीकांना या पुरस्कारांनी यावेळी सन्मानित करण्यात आलं. पन्नास हजार रुपये रोख, सन्मान चिन्ह आणि सन्मान पत्र असं या पुरस्काराचं स्वरुप आहे.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या अमेरिका दौऱ्यामध्ये आज दुसऱ्या दिवशी अमेरिकेचे राष्ट्रपती जो बायडन यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. दोन्ही देशांमधील संबंध आणखी दृढ  करण्यामध्ये येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी दोन्ही देशांमधील आर्थिक सहकार्य वाढवण्यावर यावेळी विचारविनीमय होईल.  त्यानंतर ते अमेरिकेच्या संसदेमध्ये संयुक्त बैठकीत मार्गदर्शन करणार आहेत.  तत्पूर्वी पंतप्रधानांचा व्हाईट हाऊस इथं परंपरागत स्वागत केलं जाणार आहे.  पंतप्रधानांच्या सन्मानार्थ आज रात्री आणखी एक भोजन समारोह होणार आहे. भारत आणि अमेरिकेला विकासाचा वेग कायम ठेवण्यासाठी कुशल प्रतिभावंतांची गरज असल्याचं पंतप्रधान मोदी यांनी अमेरिकेतल्या प्रमुख उद्योगांच्या प्रमुखांशी संवाद साधताना काल नमुद केलं.

****

गृहमंत्री अमित शाह यांनी मणिपूरच्या स्थितीवर चर्चेसाठी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. परवा- शनिवारी नवी दिल्लीमध्ये ही बैठक होईल.

****

आसाम राज्यात पुरस्थिती अद्यापही कायम असून सखल भागात पाणी शिरलं आहे. राज्यात वीस जिल्ह्यातील जवळपास एक लाख वीस हजार नागरिकांना या पुराचा फटका बसला आहे. पुरस्थिती मुळं अनेक रस्ते मार्ग विस्कळीत झाले आहेत तर शेतपीकं पुर्णपणे नष्ट झाली आहेत. आतापर्यंत ७८० गावं पाण्यात बुडाली असून राज्य आपत्ती निवारण पथकाकडून मदतकार्य सुरु आहे.प्रशासनाच्या १४ मदत केंद्रात आतापर्यंत दोन हजारांहून अधिक नागरिकांना निवारा देण्यात आला आहे. 

****

मराठवाड्यात उद्या आणि परवा अनेक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल, असा अंदाज मुंबईच्या प्रादेशिक हवामान केंद्रानं वर्तवला आहे. उद्यापासून एकोणतीस जून या कालावधीत मराठवाड्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस होण्याची शक्यताही हवामान विभागानं वर्तवली आहे. 

****

नाशिक जिल्ह्यात त्र्यंबकेश्वर जवळ असलेल्या चिखलवाडी इथल्या आदिवासी वसतीगृहातील मुलींना पर्यटकांसमोर सक्तीनं नृत्य करायला भाग पाडण्यात आल्या प्रकरणी चौकशी कली जाणार आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांनी पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली. या संदर्भात पालकांच्या तक्रारीवरुन नाशिक वाडीव्हरे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

****

लातूर शहरात दयानंद कला महाविद्यालयात समान संधी केंद्राचं उद्घाटन समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांच्या हस्ते आज करण्यात आलं. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवाजीराव गायकवाड यांनी यावेळी समान संधी केंद्राची माहिती दिली.

****

ताईपेई खुल्या बॅडमिंटन स्पर्धेमध्ये पुरुष एकेरीच्या उपउपांत्यपूर्व फेरीमध्ये आज तृतीय मानांकित भारताच्या एच. एस. प्रणॉयचा सामना इंडोनेशियाच्या टोमी सुगियार्तोविरुद्ध होणार आहे. पी. कश्यप आणि तानया हेमनाथ आज उपउपांत्य फेरीचे सामने खेळणार आहेत.

****

केंद्र सरकारच्या शासन आपल्या दारी अभियानाचा अकोला जिल्ह्यातल्या मुर्तिजापूर इथं एक हजार ६३४ जणांना लाभ मिळाला. शासनाच्या विविध योजनांची माहिती तसंच लाभ देण्यासाठी यावेळी दालनं थाटण्यात आली होती, अशी माहिती तहसीलदार शिल्पा बोबडे यांनी दिली. आयुष्यमान भारत योजनेचं पत्र वितरण, बचत गटांना कर्ज वितरण, फेरफार नोंदी यावेळी करण्यात आल्या. शेत रस्ते प्रकरणातले आदेश, जातीचे दाखले, उत्पन्नाचे दाखले, अधिवास रहिवासी दाखले, रोजगार पत्रवाटप, अंत्योदय शिधा पत्र आदींबाबत कार्यवाही करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं.  

****

बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यात जनावरांची वाहतूक करणाऱ्या वाहतूकदारांनी विशेष परवाना घ्यावा असं आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी दीपक पाटील यांनी केलं आहे.वाहतूकदारांनी जनावरांची वाहतूक करतांना सक्षम प्राधिकरण तसंच प्राणी कल्याण संस्थे मार्फेत जारी केलेलं प्रमाणपत्र सोबत ठेवावं असंही त्यांनी सांगितलं आहे.

****

अकोला शहरात ई कचरा संकलन अभियान राबवण्यात येत आहे. येत्या ३० जूनपर्यंत हे अभियान चालेल. या अंतर्गत टाकाऊ आणि नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक्सच्या वस्तू ट्यूबलाईट, घड्याळ आदींचं संकलन करुन त्यांना पुनःप्रकिया विभागाकडे सोपवलं जाणार आहेत. महाराष्ट्र राज्य युवा अग्रवाल संमेलनातर्फे हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.

****

No comments:

Post a Comment