Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date : 23 June 2023
Time : 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक : २३ जून
२०२३ दुपारी १.०० वा.
****
पंतप्रधान
नरेंद्र मोदी आज अमेरिका दौऱ्याच्या तिसऱ्या दिवशी, भारतीय समुदायाला संबोधित करणार
आहेत. अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरीस, आणि परराष्ट्र मंत्री ब्लिंकन यांच्याशीही
ते चर्चा करणार आहेत.
दरम्यान,
पंतप्रधानांच्या अमेरिका दौऱ्यात आतापर्यंत घडलेल्या घडामोडींबद्दल, परराष्ट्र व्यवहार
मंत्रालयाचे सचिव मोहन क्वात्रा यांनी, वॉशिंग्टन डीसी इथं पत्रकार परिषद घेऊन माहिती
दिली. तंत्रज्ञान हस्तांतरण तसंच तंत्रज्ञान सहकार्याबद्दल उभय देशांमध्ये अनेक करार
झाल्याचं त्यांनी सांगितलं.
****
बिहारमधल्या
पाटणा इथं आज विरोधी पक्षांची बैठक होणार आहे. संयुक्त जनता दलाचे ज्येष्ठ नेते आणि
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी ही बैठक बोलावली आहे. या बैठकीत महाराष्ट्रातून
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह,
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल,
पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान, काँग्रेस नेते राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे, उपस्थित
राहणार आहेत.
दरम्यान,
या बैठकीसाठी पाटणा इथं जाण्यापूर्वी वार्ताहारंशी बोलताना शरद पवार यांनी, या बैठकीत
देशासमोरच्या महत्त्वाच्या प्रश्नांवर चर्चा होणार असल्याचं सांगितलं. मणिपूरमधली अस्थिरता,
अनेक राज्यांमध्ये बिघडलेली कायदा आणि सुव्यवस्था, यांसारख्या प्रश्नांवर विरोधी पक्षांनी
एकत्रितपणे विचार करून, एक भूमिका ठरवावी हा या बैठकीचा विषय असल्याचं पवार म्हणाले.
****
आषाढी वारीसाठी
निघालेल्या संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांची पालखी सोलापूर जिल्ह्यात असून, कालच्या
जेऊर इथल्या मुक्कामानंतर, ही पालखी आज पंढरपुरकडे मार्गस्थ झाली. तर संत मुक्ताबाईंची
पालखी जवळा इथल्या मुक्कामानंतर, आज सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करणार आहे.
दरम्यान,
आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर, भाविकांच्या सुविधेसाठी येत्या २७ ते २९ जून दरम्यान,
पंढरपूरमध्ये तीन ठिकाणी महाआरोग्य शिबिर घेतलं जाणार आहे. आरोग्याची वारी पंढरीच्या
दारी या संकल्पनेवर आधारित या शिबिराचं आयोजन, आरोग्य विभागानं केलं आहे. सार्वजनिक
आरोग्य मंत्री डॉक्टर तानाजी सावंत, यांनी काल या शिबिराच्या तयारीचा आढावा घेतला.
पालखी प्रस्थान ते पालखी प्रवास या दरम्यान, ऑक्सिजन, रक्तसाठा, सुसज्ज रूग्णवाहिका
तसंच बाईक अँब्युलन्स देखील उपलब्ध ठेवाव्यात, असे निर्देश सावंत यांनी दिले.
****
राष्ट्रीय
शिक्षण धोरणाच्या अंमलबजावणीसाठी खाजगी शिक्षण संस्थांना मार्गदर्शन करण्याबरोबरच,
त्याकरता आवश्यक सुविधा निर्माण करण्यासाठी सहकार्य करण्यात येईल, असं आश्वासन, उच्च
आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिलं आहे. उच्च शिक्षणाच्या खाजगी संस्थांमध्ये
राष्ट्रीय शिक्षण धोरण राबवण्यात व्यवस्थापनाची भूमिका, या विषयावर पुण्यात आयोजित
कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी, ते काल बोलत होते. पुणे विद्यार्थी गृह आणि ऑल इंडिया
कौन्सिल ऑफ टेक्निकल एज्युकेशन, यांनी संयुक्तपणे ही कार्यशाळा आयोजित केली होती.
****
राज्यात
आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडु तयार व्हावेत, यासाठी पुण्यात बालेवाडी इथल्या शिवछत्रपती
क्रिडा संकुलामध्ये, क्रिडा सुविधांचा अद्ययावत आराखडा तयार करावा, आणि तो मान्यतेसाठी
मंत्रिमंडळासमोर सादर करावा, अशी सूचना, क्रिडा मंत्री गिरीष महाजन यांनी केली आहे.
मुंबईत काल राज्य क्रिडा समितीच्या बैठकीत ते बोलत होते. ग्रामीण भागातही क्रिडांगणसाठी
नियोजन करावं, फुटबॉल या खेळाची लोकप्रियता पाहता, फुटबॉल लीगची तयारी करण्यात यावी,
असंही महाजन यांनी सांगितलं.
****
मुंबई कृषी
उत्पन्न बाजार समितीच्या आवारातल्या भाजीपाला मार्केटमध्ये भाज्यांची आवक कमी होवू
लागली आहे. त्यातही टोमॅटो, कोथिंबीर यांची आवक जवळपास पन्नास टक्के कमी झाल्यानं टोमॅटोच्या
दरात वाढ झाली आहे. पूर्वी टोमॅटोची प्रतिदिन ४० ते ५० गाड्यांची आवक आता २० ते २५
गाड्यांपर्यंत कमी आली आहे. याचा परिणाम म्हणून टोमॅटोचे दर किरकोळ बाजारात ६० रूपये
किलोपर्यंत, तर घाऊक बाजारात हेच दर ३० ते ४० रूपये प्रतिकिलो पर्यंत वाढले असल्याचं
आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
धुळे जिल्ह्यातल्या
शिरपूर पंचायत समितीच्या कृषी विभागातला विस्तार अधिकारी ज्ञानेश्वर पाटील याला, आठ
हजार रुपयांची लाच घेताना काल पकडण्यात आलं. बिरसा मुंडा कृषी योजने अंतर्गत मंजूर
झालेल्या विहिरीच्या हप्त्याच्या बिलाची रक्कम, तक्रारदाराच्या खात्यावर जमा करण्यासाठी
त्यानं ही लाच मागितली होती.
****
येत्या काही
दिवसात राज्याच्या काही भागात पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. मात्र तरीही
कृषी विभाग आणि हवामान विभागाच्या सल्ल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये असं
आवाहन हवामान विभागाचे अतिरिक्त महासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी केलं आहे.
****
No comments:
Post a Comment