Friday, 23 June 2023

Text - आकाशवाणी औरंगाबाद, दिनांक : 23.06.2023 रोजीचे सकाळी 07.10 वाजताचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date : 23 June 2023

Time : 7.10 AM to 7.25 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक : २३ जून  २०२ सकाळी ७.१० मि.

****

ठळक बातम्या

·      दहशतवाद हा मानवतेचा शत्रू असून, त्याच्या निर्मुलनाबाबत कोणताही संभ्रम नको-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं अमेरिकी संसदेत प्रतिपादन

·      जी-20 शिक्षण कार्यगटाच्या चौथ्या आणि अंतिम बैठकीची काल पुण्यात सांगता

·      राष्ट्रीय फ्लोरेंस नाइटिंगेल पुरस्कार प्रदान-महाराष्ट्रातल्या तीन परिचारिकांचा गौरव

·      शिंदे-फडणवीस जाहिरातींवर पाचशे कोटी रुपये खर्च करत असल्याचा काँग्रेसचा आरोप

·      बीड शहरात बालविवाह प्रकरणी १५० जणांविरोधात गुन्हा दाखल

आणि

·      तैपेई खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या एच. एस. प्रणॉय याचा उपउपांत्य फेरीत प्रवेश

सविस्तर बातम्या

दहशतवाद हा मानवतेचा शत्रू असून, त्याच्या निर्मुलनाबाबत कोणताही संभ्रम असायला नको, असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. ते काल अमेरिकी संसदेला संबोधित करत होते. सध्याचं युग हे युद्धाचं नसून, संवाद आणि मुत्सद्देगिरीचं युग असल्याचं, पंतप्रधानांनी नमूद केलं. भारत आणि अमेरिकी सहकार्य हे लोकशाहीच्या भवितव्यासाठी शुभकारक असल्याचं, ते म्हणाले.

त्यापूर्वी पंतप्रधानांनी व्हाईट हाऊसमध्ये राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्यासह मोदी यांनी संयुक्त पत्रकार परिषदेला संबोधित केलं. भारतीय लोकशाहीत जाती धर्माच्या आधारावर भेदभावाला स्थान नसल्याचं पंतप्रधान म्हणाले. लोकशाही हा भारताचा आत्मा असल्याचं मोदी यांनी नमूद केलं. सीमेपलिकडून होणारा दहशतवाद संपवण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. पर्यावरण क्षेत्रात भारताने गाठलेल्या टप्प्याचा पंतप्रधानांनी आढावा घेतला.

****

शालेय अभ्यासाव्यतिरिक्त इतर शिक्षणावर अधिक भर देण्याचं आवाहन, पंतप्रधानांनी केलं आहे.  पुण्यात जी - 20 शिक्षण कार्यगटाच्या बैठकीला ध्वनिचित्रफितीच्या माध्यमातून दिलेल्या संदेशात पंतप्रधान बोलत होते. गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या माध्यमातून उत्तम प्रशासन निर्माण करण्याची गरज असल्याचं, ते म्हणाले. किमान अंक आणि अक्षर ओळख प्रसाराला देशानं प्राधान्य दिलं असून, या उद्दिष्टासाठी येत्या २०३० पर्यंत काम करण्याची गरज असल्याचं पंतप्रधान म्हणाले.

दरम्यान, गेले दोन दिवस सुरू असलेल्या जी - 20 शिक्षण कार्यगटाच्या चौथ्या आणि अंतिम बैठकीची काल सांगता झाली. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यावेळी उपस्थित होते. मूलभूत साक्षरता आणि अंकज्ञान या विषयात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून हा विषय सर्वसमावेशक करण्याचा निर्धार बैठकीत करण्यात आल्याचं प्रधान यांनी सांगितलं.

****

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते काल नवी दिल्लीत या वर्षाचे राष्ट्रीय फ्लोरेंस नाइटिंगेल पुरस्कार प्रदान करण्यात आले. पन्नास हजार रुपये रोख, सन्मान चिन्ह आणि सन्मान पत्र असं या पुरस्काराचं स्वरुप आहे. पुरस्कारप्राप्त परिचारिकांमध्ये राज्यातल्या तीन जणींचा समावेश आहे. आदिवासी आणि  नक्षली क्षेत्रात उत्कृष्ट सेवा दिल्याबद्दल चंद्रपूरच्या जिल्हा रुग्णालयात कार्यरत पुष्पा पोडे यांना, पुण्याच्या दक्षिण कमांड सैनिकी रुग्णालयात कार्यरत ब्रिगेडियर अमिता देवराणी यांना तसंच पालघर जिल्ह्यातल्या निर्मल उपकेंद्रात कार्यरत सुजाता तुस्कानो यांना राष्ट्रपतींच्या हस्ते गौरवण्यात आलं. 

****

सर्व राष्ट्रीय आणि खाजगी बँका तसंच टपालामार्फत दिल्या जाणाऱ्या नागरी सेवा, आता राज्यातल्या सर्व शिधावाटप- रास्त भाव दुकांनामधून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री रवींद्र चव्हाण यांनी काल मुंबईत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. राज्यामध्ये सुमारे ५० हजार शिधावाटप आणि रास्त भाव दुकानं आहेत, या निर्णयामुळे रास्त भाव दुकानदारांचं उत्पन्नही सुधारणार असल्याचं ते म्हणाले. या उपक्रमाच्या यशस्वी अंमलबजाणीसाठी रास्त भाव दुकानदारांमध्ये जागरुकता निर्माण करुन, प्रशिक्षण दिलं जाईल. या उपक्रमाच्या अंमलबजावणीसाठी राज्य तसंच जिल्हा स्तरावर सुकाणू अधिकारी नियुक्त केले जातील, असं चव्हाण यांनी सांगितलं. आधार कार्डमध्ये दुरुस्ती करण्याची कार्यवाही या शिधावाटप दुकानांमध्ये केली जाणार आहे.

****

महाराष्ट्र पशु आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठाअंतर्गत तीन वर्षाचा पशुसंवर्धन विषय पदविका अभ्यासक्रम या शैक्षणिक वर्षापासून सुरु करण्यात येणार आहे. या विभागाचे मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. सद्य:स्थितीत सुरु असलेला पशुधन व्यवस्थापन आणि दुग्ध उत्पादन पदविका अभ्यासक्रम बंद न करता, पुढील दोन वर्षे सुरु ठेवण्याचा निर्णय देखील यावेळी घेण्यात आला.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या पंतप्रधानपदाच्या नऊ वर्षांच्या कार्यकाळामध्ये खूप मोठ्या प्रमाणात सामान्य माणसाच्या जीवनामध्ये परिवर्तन केलं असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. सातारा जिल्ह्यातल्या कराड इथं केंद्र सरकारला नऊ वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त एका कार्यक्रमात फडणवीस बोलत होते. ते म्हणाले...


Byte…

ही नऊ वर्षं भारताच्या परिवर्तनाची आहेत. भारताच्या विकासाची आहेत. आंतरराष्ट्रीय पटलावर भारताला सन्मान देणारी आहेत. भारताच्या सीमा सुरक्षित करणारी आहेत. समाजातल्या शेवटच्या माणसाच्या हिताच्या योजना राबवून भारताच्या विकासाच्या गाथेला वेगानं पुढे नेणारी अशा प्रकारची ही नऊ वर्ष आहेत.

****

दरम्यान, सातारा जिल्ह्यातल्या फलटण तालुक्यात बरड इथं संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी काल दर्शन घेतलं. काल बरड इथं पालखीचा मुक्काम होता, आज पालखीचं सोलापूर जिल्ह्यात आगमन होणार आहे.

****

राज्यावर पाच लाख कोटी रुपयांचा कर्ज असून शिंदे - फडणवीस सरकार हे फक्त जाहिरातींवर सुमारे पाचशे कोटी रुपयांचा खर्च करत असल्याचा आरोप, काँग्रेस नेते, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केला आहे. ते काल हिंगोली इथं पक्ष कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते. सध्याचं सरकार हे शेतकरी विरोधी असून, मराठवाड्याची अवस्था अतिशय बिकट झाली असल्याची टीका चव्हाण यांनी केली.

****

बीड शहरात बालविवाह प्रकरणी १५० जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. शहरातल्या खडकपुरा भागातल्या एका मंगल कार्यालयात बालविवाह होत असल्याची माहिती बालविकास प्रकल्प अधिकारी सुधीर ढाकणे यांना मिळाल्यानंतर, त्यांनी पथकासोबत जाऊन हा बालविवाह थांबवला. याप्रकरणी मुला - मुलीचे पालक, इतर नातेवाईक, भटजी, आचारी, सजावटकार, छायाचित्रकार अशा एकूण १५० सगळ्यांविरुद्ध बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे.

****

उस्मानाबाद इथं काल गर्भधारणापूर्व आणि प्रसूतीपूर्व गर्भलिंग निदान प्रतिबंधक समितीची बैठक झाली. स्त्रीभ्रूण हत्येला आळा घालण्यासाठी उस्मानाबाद पीसीपीएनडीटी समिती पूर्णपणे सजग राहून काम करत असल्याचं जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.राजाभाऊ गलांडे यांनी यावेळी सांगितलं. पीसीपीएनडीटी कायद्याची जनजागृती करण्यासाठी तालुकास्तरावर सर्व खाजगी, शासकीय डॉक्टरांच्या कार्यशाळेचं आयोजनही करण्यात येणार असून, याकामी आशा आणि अंगणवाडी कार्यर्त्यांचा सहभाग असेल, असं त्यांनी सांगितलं. त्याचप्रमाणे सर्व सोनोग्राफी आणि एमटीपी केंद्राची नियमित तपासणी करण्यात येणार असल्याचंही डॉ.गलांडे यांनी सांगितलं.

****

गाईच्या दुधाला ४० रुपये तर म्हशीच्या दुधाला साठ रुपये भाववाढ द्यावी, अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे करण्यात आली आहे. पक्षाचे प्रवक्ते लक्ष्मण हाके यांनी काल सोलापूर इथं पत्रकार परिषदेत बोलताना, सरकारनं दूध धोरण जाहीर करावं अशी देखील मागणी केली. हा निर्णय घेवूनच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंढरपूरला आषाढी एकादशीच्या शासकीय महापूजेला यावं अन्यथा आंदोलन करण्याचा इशाराही, हाके यांनी दिला आहे. 

****

राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत राज्यात तिसऱ्या क्रमांकानं उत्तीर्ण झालेल्या दर्शना पवार यांच्या हत्येप्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांनी आरोपी राहुल हंडोरेला अटक केली आहे. हंडोरे हा दर्शना पवार यांच्या हत्येच्या दिवसापासून फरार होता. तो मुंबईहून पुण्याला जात असताना त्याला अटक करण्यात आल्याची माहिती, पुणे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी  काल पत्रकार परिषदेत दिली.

****

लातूर जिल्ह्यात लामजना इथल्या शासकीय निवासी शाळेच्या बांधकामाची चौकशी करण्याचे आदेश, समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी दिले आहेत. या बांधकामात वापरण्यात आलेलं बांधकाम साहित्य तसंच इतर साहित्य निकृष्ट दर्जाचं असल्याचं त्यांना पाहणी दरम्यान आढळलं होतं, त्यानुसार त्यांनी हे आदेश दिले. अनुसूचित समाजातल्या मुलांसाठी बांधण्यात येणाऱ्या या वसतीगृहासाठी विभागानं बारा कोटी रुपयांचा निधी दिला आहे.

****


बीड जिल्ह्यात शिरुर कासार पोलीस ठाण्यामध्ये कार्यरत पोलीस हवालदार शिवाजी सानप याला पाच हजार रुपयांची लाच घेताना काल अटक करण्यात आली. तक्रारदाराला पोलीस कारवाईत जामीन मिळवण्यास मदत करण्याकरता त्यानं ही लाच मागितली होती.

****

अहमदनगर जिल्ह्यात पाथर्डी तालुक्यातल्या माळीबाभुळगाव परिसरात असलेल्या विहिरीत एका महिलेसह तीन मुलांचे मृतदेह सापडले. कांचन सांगडे या महिलेसह तिच्या सहा, चार आणि दीड वर्ष वयाच्या मुलांचे हे मृतदेह असून, याप्रकरणी तिचा पती धम्मपाल सांगडे याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. नांदेड जिल्ह्यातलं हे मजूर कुटुंब कुक्कूटपालन केंद्रात कामासाठी याठिकाणी स्थलांतरित झालं होतं.

****

महावितरणच्या औरंगाबाद नजिक वाळूज औद्योगिक वसाहत उपविभागातल्या उत्कृष्ट सेवा देणाऱ्या यंत्रचालकांचा, काल कार्यकारी अभियंता प्रेमसिंग राजपूत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. वाळूज एमआयडीसी उपविभागातल्या सर्व उपकेंद्रातल्या यंत्रचालकांच्या मागील दोन वर्षाच्या कामगिरीचा आढावा घेऊन डी-सेक्टर उपकेंद्र हे आदर्श उपकेंद्र, तर एम-सेक्टर उपकेंद्र हे उत्कृष्ट उपकेंद्र म्हणून घोषित करण्यात आलं. यंत्रचालक हा महावितरणच्या विद्युत व्यवस्थेचा कणा असून, त्यांनी स्वतः सुरक्षित राहून आपल्या सोबत काम करणाऱ्या सर्व सहकाऱ्यांच्याही सुरक्षिततेची काळजी घेण आवश्यक असल्याचं राजपूत यावेळी म्हणाले.

****

आगामी निवडणुकीमध्ये मतदानाचं प्रमाण वाढवण्यासाठी मतदार याद्या अचूक आणि निर्दोष करण्यावर, तसंच नव युवा मतदार नोंदणीवर सर्वाधिक भर देण्याचे निर्देश राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी दिले आहेत. पुण्यात काल राज्यातले जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी आणि उप जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांच्या दोन दिवसीय कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. नवीन मतदारांचा समावेश करण्यासाठी विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम अचूक राबवावा, अशी सूचना त्यांनी केली.

****

चांद्रयान - तीन या मोहिमेविषयी जनजागृती करण्यासाठी औरंगाबाद इथल्या एमजीएम एपीजे अब्दुल कलाम खगोल अंतराळ विज्ञान केंद्राच्या वतीनं आजपासून ११ जुलै पर्यंत चांद्रयान-तीन महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. महानगरपालिका आयुक्त जी श्रीकांत यांच्या हस्ते आज या मोहिमेचं उद्घाटन होणार आहे. याअंतर्गत शालेय विद्यार्थ्यांसाठी चित्रकला, रंगभरण आणि प्रश्नमंजुषा स्पर्धा, घेण्यात येत आहे. तसंच आज, उद्या आणि परवा २५ तारखेला संध्याकाळी साडे सहा ते आठ वाजेपर्यंत दुर्बिणीद्वारे “चंद्र पृष्ठभागाची सफर घडवण्यात येणार आहे. चंद्राच्या दक्षिण भागात ज्या ठिकाणी “चांद्रयान-तीन उतरणार आहे, तो भागही दुर्बिणीद्वारे पहायला मिळणार असल्याची माहिती या केंद्राचे संचालक श्रीनिवास औंधकर यांनी दिली.

****

तैपेई खुल्या बॅडमिंटन स्पर्धेमध्ये पुरुष एकेरीत भारताच्या एच. एस. प्रणॉय यानं उपउपांत्य फेरीत प्रवेश केला. काल झालेल्या सामन्यात प्रणॉयनं इंडोनेशियाच्या टोमी सुगियार्तोचा २१-९, २१-१७ असा पराभव केला. अन्य एका सामन्यात भारताच्या पी. कश्यपला चीन ताईपेईच्या एल. वाय. सूकडून १६-२१, १७-२१ असा पराभव पत्करावा लागला.

****

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा जन्म दिन २६ जून हा सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा करण्यात येतो. यानिमित्त औरंगाबाद इथं समाज कल्याण कार्यालयातर्फे समता दिंडीचं आयोजन करण्यात आलं आहे. २६ तारखेला सकाळी आठ वाजता भडकलगेट इथल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन या दिंडीची सुरुवात होणार असल्याचं, समाज कल्याण सहायक आयुक्त पी.जी.वाबळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवलं आहे.

****

बीड जिल्ह्यात माजलगाव प्रकल्पात वीस पूर्णाक ३२ टक्के पाणीसाठा शिल्लक असल्याची माहिती, जलसंपदा विभागानं दिली आहे. जिल्ह्यात एकूण सोळा मध्यम प्रकल्पांत वीस पूर्णांक दोन टक्के पाणीसाठा आणि एकूण २० लघू प्रकल्पात ४७ पूर्णांक २२ टक्के पाणीसाठा उपलब्ध असल्याचं विभागातर्फे कळवण्यात आलं आहे. 

दरम्यान, मांजरा धरणातील पाणी कालव्यामार्फत सोडण्यात यावं, अशी मागणी मांजरा काठच्या शेतकऱ्यांनी पाटबंधारे विभागाकडे केली आहे. पाणी न सोडल्यास मांजरा धरणावर उपोषण करण्याचा इशारा या शेतकऱ्यांनी एका निवेदनातून दिला आहे.

****

आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरला जाण्यासाठी सोडण्यात येणाऱ्या आदिलाबाद - पंढरपूर आणि पंढरपूर - औरंगाबाद या विशेष रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. आदिलाबाद -पंढरपूर ही रेल्वे गाडी येत्या २८ तारखेला सकाळी ११ वाजता आदिलाबादहून सुटेल आणि २९ तारखेला सकाळी नऊ वाजून २० मिनिटांनी पंढरपुरला पोहोचेल. तर पंढरपूर - औरंगाबाद ही गाडी २९ तारखेला रात्री ११ वाजता पंढरपूरहून सुटेल आणि दुसर्या दिवशी दुपारी पावणे दोन च्या सुमारास औरंगाबादला पोहचेल. दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड जनसंपर्क कार्यालयानं ही माहिती दिली.

****

No comments:

Post a Comment