Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date : 24 June
2023
Time : 7.10
AM to 7.25 AM
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक : २४ जून २०२३
सकाळी
७.१० मि.
****
ठळक बातम्या
·
केंद्र आणि राज्य शासनाच्या
आरोग्य विषयक योजनांची समन्वयातून अंमलबजावणी करावी-केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया
यांची सूचना
·
रिन्यूएबल उर्जा क्षेत्रात
उद्योग वाढीसाठी लागणारं सर्व सहकार्य करण्यात येईल-उपमुख्यमंत्र्यांचं आश्वासन
·
साहित्य अकादमीचे ‘युवा’ आणि ‘बाल’ पुरस्कार
जाहीर;विशाखा विश्वनाथ, एकनाथ आव्हाड आणि सुधा मूर्ती यांचा समावेश
·
कामगार कायदा उल्लंघन
प्रकरणी औरंगाबाद महानगरपालिका तसंच छावणी परिषदेला मुंबई उच्च न्यायालयाची नोटीस
·
मराठवाड्यात काल वेगवेगळ्या
अपघातांमध्ये सात जणांचा मृत्यू
·
औंढा नागनाथ इथं नागरिकांसाठी
व्यसनमुक्ती जनजागृती उपक्रम
आणि
·
पावसाच्या ओढीमुळे राज्यातील
जलसाठ्यात झपाट्याने घट;साठ जलाशयं कोरडी
सविस्तर बातम्या
केंद्र आणि राज्य शासनाच्या आरोग्य विषयक योजनांची समन्वयातून
अंमलबजावणी करावी, अशी सूचना केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी दिली आहे.
काल मुंबईत आयुष्यमान भारत योजनेविषयी आढावा बैठक घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते.
या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित
होते. केंद्राची आयुष्यमान भारत योजना, आणि राज्य शासनाची महात्मा जोतीराव फुले जनआरोग्य
योजना, नागरिकांचा आरोग्यावरील खर्च उचलतात. राज्यातल्या नागरिकांना या योजनांचा जास्तीत
जास्त लाभ द्यावा, असं ते यावेळी म्हणाले. केंद्र आणि राज्याची योजना समन्वयानं राबवल्यास
केंद्र शासनाचा ६० टक्के निधी मिळतो, त्यामुळे राज्याची बचत होते, असं ते यावेळी म्हणाले.
केंद्र शासनाची आयुष्मान भारत योजना तसंच राज्य शासनाची
महात्मा जोतिबा फुले आरोग्य योजना, यांचा एकत्रित लाभ देणारी १२ कोटी कार्ड, राज्यात
वितरित केली जाणार असल्याची माहिती, मांडवीय यांनी दिली. राज्यात सध्या ६०० जनऔषधी
केंद्र असून, त्यात आणखी भर घालणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
आर्थिकदृष्ट्या निर्धन, दुर्बल घटकातल्या रुग्णांना आरोग्य
सेवा पुरवण्यासाठी धर्मादाय रूग्णालय योजनेची आदर्श कार्यप्रणाली जाहीर करण्यात आली
आहे. रुग्णाने तहसीलदाराकडून प्राप्त केलेला उत्पन्नाचा दाखला सादर केल्यानंतर धर्मादाय
रुग्णालयांना रुग्णांच्या वैयक्तीक आर्थिक परिस्थितीची कोणत्याही प्रकारे चौकशी करता
येणार नाही, याबाबतच्या सूचना आदर्श कार्यप्रणालीमध्ये नमुद आहेत. राज्यात ४६७ धर्मादाय
रुग्णालयांमधल्या प्रत्येकी १० टक्के खाटा निर्धन तसंच दुर्बल घटकातील रुग्णांसाठी
राखीव ठेवण्यात आल्या आहेत. प्रत्येक रुग्णालयाच्या ठिकाणी आरोग्य सेवकाची नेमणूक करण्यात
येत आहे. रुग्णसेवेबाबत पडताळणी करण्याकरता तपासणी समिती तयार करण्यात आली आहे.
****
राष्ट्रवाद, सुशासन आणि गरीब कल्याण हे भाजपचे तीन महत्त्वपूर्ण
स्तंभ असल्याचं प्रतिपादन, केंद्रीय मंत्री नीतीन गडकरी यांनी केलं आहे. पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्र सरकारला नऊ वर्ष पूर्ण झाल्यानिमित्तानं ते
काल मुंबईत एका जाहीर कार्यक्रमात बोलत होते. पुढच्या पाच वर्षांत वाहन निर्मिती उद्योग
१५ लाख कोटी रुपयांवर नेण्याचं उद्दीष्ट असून, या क्षेत्रात भारत जगभरात पहिल्या क्रमांकावर
पोहोचेल, असा विश्वास गडकरी यांनी व्यक्त केला.
****
राज्याची आर्थिक परिस्थिती सक्षम असून, नवीनीकरण - रिन्यूएबल
उर्जा क्षेत्रात उद्योग वाढीसाठी लागणारं सर्व सहकार्य करण्यात येईल, असं आश्वासन उपमुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे. काल मुंबईत रिन्यू पॉवर लिमिटेड आणि उद्योग विभाग
यांच्यात सामंजस्य करार झाला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी उद्योगमंत्री उदय सामंत,
उद्योग विभागाचे मुख्य सचिव डॉ. हर्षदीप कांबळे आणि रिन्यू पॉवर कंपनीचे अधिकारी उपस्थित
होते. हा प्रकल्प सुमारे ५०० एकर जागेवर स्थापित होत असून, या प्रकल्पात २० हजार कोटी
रुपयांची गुंतवणूक होणार आहे.
****
भारतीय जनता पक्षाविरोधात लढण्यासाठी सर्व पक्षांना एकत्र
यावं लागेल, असं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी म्हटलं
आहे. ते काल पाटण्यात विरोधी पक्षांच्या बैठकीनंतर संयुक्त पत्रकार परिषदेत बोलत होते.
काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेस नेते राहुल गांधी, संयुक्त जनता दलाचे
नेते बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार, राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालुप्रसाद यादव,
तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष तथा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, जम्मू
काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती, माजी मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, महाराष्ट्राचे
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे महासचिव डी राजा यांच्यासह
विविध पंधरा पक्षांचे नेते यावेळी उपस्थित होते. उद्धव ठाकरे यांनी यावेळी बोलताना,
तानाशाहीच्या विरोधात आपण एकजुटीने लढा देऊ, विरोधकांच्या एकजुटीची ही चांगली सुरुवात
झाल्याचं मत व्यक्त केलं.
****
केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी काल गडचिरोली
इथल्या गोंडवाना विद्यापीठाला भेट देऊन, विद्यापीठाचे अधिकारी आणि स्वयंसेवी संस्थांच्या
प्रतिनिधींशी चर्चा केली. ‘मिशन लाईफ’ ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या
नेतृत्वात भारतानं सुरु केलेली जागतिक लोकचळवळ असून, ती पर्यावरणाचं रक्षण आणि जतन
करण्याला प्रोत्साहन देते. या चळवळीत नागरिकांनी सहभागी व्हावं, असं आवाहन यादव यांनी
यावेळी केलं.
****
महाराष्ट्र लोकसेवा हक्क कायदा हा जनतेच्या हक्कांना जपणारा
कायदा असून, या माध्यमातून प्रशासनानं जनतेला पारदर्शकपणे आणि विहित कालावधीत सेवा
द्याव्यात, अशा सूचना, राज्यसेवा हक्क आयोगाच्या आयुक्त चित्रा कुलकर्णी यांनी दिल्या
आहेत. त्या काल अहमदनगर जिल्ह्यात अकोले इथं आढावा बैठकीत बोलत होत्या. सेवा देण्यास
विनाकारण विलंब झाला तर संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्याची कायद्यात तरतूद असून,
अशी वेळ कुठल्याही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी येऊ देऊ नये, असं त्या म्हणाल्या.
****
भारतीय रिजर्व्ह बँकेनं नियमभंग प्रकरणी बँक ऑफ महाराष्ट्रला
एक कोटी ४५ लाख रुपये दंड ठोठावला आहे. एका संस्थेला कर्जवाटप तसंच एटीएमशी संबंधित
नियमांचं पालन न केल्यामुळे हा दंड लावण्यात आला आहे. ॲक्सिस बँकेलाही क्रेडीट कार्ड
संबंधी नियमभंग केल्याबद्दल रिजर्व्ह बँकेने तीस लाख रुपये दंड ठोठावला आहे.
****
साहित्य अकादमीच्या ‘युवा’ आणि ‘बाल’ पुरस्कारांची घोषणा काल करण्यात आली. मराठी भाषेत विशाखा
विश्वनाथ या युवा साहित्यिकेच्या ‘स्वत:ला स्वत:विरुद्ध उभं करताना’ या कविता संग्रहास ‘युवा’ साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे. तर बालसाहित्यकार
एकनाथ आव्हाड यांच्या ‘छंद देई आनंद’ या कविता संग्रहास ‘बाल’ साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे. मानचिन्ह आणि ५० हजार रुपये असं या
पुरस्कारांचं स्वरुप आहे. प्रसिद्ध लेखिका सुधा मूर्ती यांना दादा दादी की कहानियोंका
थैला या कथा संग्रहासाठी बाल साहित्य पुरस्कार जाहीर झाला आहे.
****
कामगार कायद्यांचं उल्लंघन करणाऱ्या औरंगाबाद महानगरपालिका,
छावणी परिषद आणि जिल्ह्यातल्या इतर आस्थापनांना मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद
खंडपीठानं नोटीस पाठवली आहे. कामगार कायद्यांचं उल्लंघन करणं, किमान वेतन न देणं, ई.एस.आय.सी
आणि भविष्य निर्वाह निधी बुडवून कंत्राटी कामगारावर अन्याय करणारे कंत्राटदार, महानगरपालिका,
छावणी परिषद, घाटी रुग्णालय, विद्यापीठ आणि जिल्ह्यातल्या इतर शासकीय कार्यालयांना
ही नोटीस बजावण्यात आली आहे. औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी यासंदर्भात एक
जनहित याचिका उच्च न्यायालयात दाखल केली आहे, त्याअंतर्गत ही नोटीस पाठवण्यात आली आहे.
****
मराठवाड्यात काल वेगवेगळ्या अपघातांमध्ये सात जणांचा मृत्यू
झाला.
हिंगोली जिल्ह्यात वारंगा फाटा इथं वारंगा ते हदगाव रोडवर
काल दुपारी मालवाहू ट्रक आणि प्रवासी वाहतूक करणाऱ्या ऑटोच्या धडकेत दोन प्रवासी जागीच
ठार झाले. याप्रकरणी आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बीड शहराजवळ पेडगाव घोसापुरी इथं काल दुभाजकाला धडकून झालेल्या
अन्य एका अपघातात तीन तरुणांचा मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला. कार मधले चौघे
नेवासा इथून बीड कडे जात असताना काल सकाळी हा अपघात झाला.
जालना जिल्ह्यात मंठा तळणी मार्गावर अज्ञात वाहनाने धडक
दिल्यानंतर कारला लागलेल्या आगीत महिलेचा होरपळून मृत्यू झाला. सविता सोळंके असं या
महिलेचं नाव असून, त्या पतीसोबत शेगावहून परतत असताना हा अपघात झाला.
****
छापील वीजबिलाऐवजी केवळ ई-मेल आणि एसएमएस वर बिल घेणाऱ्या
वीजग्राहकाला महावितरण वर्षाला १२० रुपये सवलत देणार आहे. यानुसार औरंगाबाद परिमंडलातल्या
पर्यावरणस्नेही १८ हजार ४८२ ग्राहकांची, २२ लाख १७ हजार ८४० रुपयांची वार्षिक बचत होत
आहे. या योजनेनुसार वीजग्राहकांनी छापील वीजबिलाऐवजी फक्त 'ई-मेल' आणि 'एसएमएस'चा पर्याय
निवडल्यास, प्रतिबिलात १० रुपये सवलत देण्यात येत आहे. वीजग्राहकांनी या योजनेत सहभागी
व्हावं आणि पर्यावरण रक्षणात योगदान द्यावं, असं आवाहन मुख्य अभियंता डॉ.मुरहरी केळे
यांनी केलं आहे.
****
हिंगोली जिल्ह्यात औंढा नागनाथ इथं एसटी बस स्थानकात काल
प्रवासी आणि नागरिकांसाठी व्यसनमुक्ती जनजागृती उपक्रम राबवण्यात आला. यावेळी प्रवाशांना
व्यसनमुक्तीची शपथ देण्यात आली. सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाचा जिल्हा परिषद
समाज कल्याण विभाग, आणि राज्याच्या नशाबंदी मंडळाच्या संयुक्त विद्यमानं नशा मुक्त
भारत पंधरवडा राबवण्यात येत आहे. त्या अंतर्गत काल प्रवासी नागरिकांना व्यसनमुक्तीचा
संकल्प देण्यात आला.
****
राज्यात नैऋत्य मोसमी वारे दाखल होण्यास विलंब होत असून,
पावसानं प्रचंड ओढ दिली आहे. त्यामुळे राज्यातल्या धरणांतला पाणीसाठा झपाट्यानं घटला
असून, सुमारे ६० जलाशयांनी पूर्णपणे तळ गाठला आहे. उर्वरित धरणांमधल्या पाण्याची स्थितीही
चिंताजनक आहे. राज्यात दोन हजार ९८९ मोठे, तर दोन हजार ५९० मध्यम प्रकल्प आहेत. यंदा
बिपरजॉय चक्रीवादळ, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे पट्टे वेळेवर तयार न होणं, समुद्रात
वादळासारखी स्थिती अशा विविध कारणांमुळे मोसमी पाऊस पोहोचण्यास विलंब झाला आहे.
दरम्यान, सिंधुदूर्ग जिल्ह्यात काल मोसमी पावसानं हजेरी
लावली. कोल्हापूर जिल्ह्यातही पाऊस झाल्याचं वृत्त आहे.
****
नाशिक इथल्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या
वाणिज्य आणि व्यवस्थापन विद्याशाखेअंतर्गत एम.बी.ए. शिक्षणक्रमाला, ऑल इंडिया कौन्सील
फॉर टेक्निकल एज्युकेशन - ए आय सी टी ई ची मान्यता मिळाली आहे. याबाबतची घोषणा विद्यापीठाचे
कुलगुरू संजीव सोनवणे यांनी केली. ही मान्यता पुढील पाच वर्षांसाठी असून, दरवर्षी दहा
हजार विद्यार्थ्यांना मुक्त विद्यापीठाच्या एमबीएला प्रवेश घेता येणार आहे.
****
नांदेड इथं उद्या “शासन आपल्या दारी” या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली
अबचलनगर मैदानावर होणाऱ्या या कार्यक्रमात, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लाभ वाटप होणार आहे. शासनाच्या सर्व योजनांची माहिती
एकाच छताखाली मिळावी या उद्देशानं हा भव्य उपक्रम साकारण्यात आला आहे.
****
समाजकल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांच्या हस्ते काल
बीड इथं समान संधी केंद्राचं उद्घाटन करण्यात आलं. या केंद्राच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या
शिष्यवृत्ती, स्वाधार योजना, इतर शासकीय योजना, करिअर मार्गदर्शन तसंच रोजगाराच्या
संधी महाविद्यालयाच्या स्तरावरच उपलब्ध व्हाव्यात, त्यातून विद्यार्थी आत्मविश्वासाने
परीक्षेला सामोरे जाण्यास सिद्ध होतील, असा विश्वास नारनवरे यांनी व्यक्त केला. दहावी
तसंच बारावी परीक्षेतल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा विभागाच्या वतीने प्रशस्तीपत्र आणि
सन्मानचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
****
औरंगाबाद महानगरपालिका हद्दितल्या शाळा डिजीटल करण्यासाठी
ग्राउंडअप एज्युकेशन टेक्नॉलॉजी या कंपनीबरोबर करार करण्यात आला आहे. महापालिका आयुक्त
जी. श्रीकांत यांच्या अध्यक्षतेखाली या उपक्रमाद्वारे महानगरपालिका शाळांमध्ये शिकणाऱ्या
सर्व १८ हजार ४४८ विद्यार्थ्यांची उपस्थिती सुधारण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे.
शिक्षकांना केवळ मोबाइलच्या एका क्लिक वर विद्यार्थी उपस्थिती नोंदवता येईल तसंच शिक्षकांचा
अध्यापनेतर लेखी कामांमध्ये जाणाऱ्या ९० टक्के वेळेची बचत होणार आहे.
****
संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं काल सोलापूर
जिल्ह्यात धर्मपुरी इथं आगमन झालं. यावेळी पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी पालखीचं स्वागत करून
माऊलीच्या पादुकांचं दर्शन घेतलं. पालखी स्वागतानंतर प्रशासनातले अधिकारी आणि लोकप्रतिनिधीनी
हरी नामाचा गजर करत पालखी सोहळ्याबरोबर पालखी विसावा ठिकाणापर्यंत चालण्याचा आनंद लुटला.
****
कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या
स्वयंसेवकांनी दरवर्षीप्रमाणे यावर्षीही आषाढी वारीदरम्यान आपली सेवा प्रदान केली.
१८ ते २२ जून या कालावधीत लोणंद ते फलटण या मार्गावर यशस्वीरित्या ही सेवा राबवण्यात
आली. स्वच्छ वारी, निर्मल वारी, स्वस्थ वारी, हरित वारी आणि यंदा विशेष म्हणजे प्लास्टीकमुक्त
वारी अशी विविध अभियानं आणि उपक्रम यावेळी राबवण्यात आले.
****
No comments:
Post a Comment