Monday, 26 June 2023

Text - आकाशवाणी औरंगाबाद , दिनांक : 26.06.2023 रोजीचे दुपारी 01.00 वाजताचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date : 26 June 2023

Time : 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक : २६ जून २०२ दुपारी १.०० वा.

****

पंढरपूर इथं आषाढी यात्रेचा मुख्य सोहळा, येत्या २९ तारखेला साजरा होणार आहे. या सोहळ्यासाठी लाखो भाविक पंढरपुरमध्ये दाखल होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी, काल पंढरपूर इथं विविध ठिकाणांची पाहणी करुन, यात्रेच्या तयारीचा आढावा घेतला. आषाढी वारीसाठी राज्यभरातून येणार्या भाविकांची, कुठल्याही प्रकारची गैरसोय होणार नाही, यासाठी जिल्हा प्रशासनाला, नियोजनबद्ध आणि शिस्तबद्ध तयारी करण्याच्या सूचना, त्यांनी यावेळी दिल्या. वारकरी भाविकांच्या सोयी सुविधांसाठी निधीची कमतरता भासू देणार नाही, असं आश्वासन, मुख्यमंत्र्यांनी दिलं आहे. त्यांनी काल विठ्ठल - रुक्मिणीचं दर्शन घेऊन, मंदिर समितीमार्फत भाविकांना सुलभ आणि जलद दर्शन व्हावं, यासाठी करण्यात आलेल्या नियोजनाची माहिती घेतली, तसंच वारकऱ्यांशी देखील चर्चा केली.

****

आपल्या कृतीतून सामाजिक समतेचा संदेश देणारे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती, आज सामाजिक न्याय दिन म्हणून साजरी केली जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईतल्या शासकीय निवासस्थानी, शाहू महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केलं.

कोल्हापूर इथं पालकमंत्री दीपक केसरकर, आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी, राजर्षी शाहू महाराजांचं जन्मस्थळ 'लक्ष्मी विलास पॅलेस' इथं, शाहू महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केलं.

सामाजिक न्याय दिनानिमित्त, आज राज्यभरात विविध कार्यक्रमांच आयोजन करण्यात आलं आहे. यवतमाळ इथं यानिमित्त रन फॉर सोशल जस्टिस, ही दौड काढण्यात आली. समाज कल्याणचे सहायक आयुक्त भाऊराव चव्हाण यांनी यावेळी मार्गदर्शन केलं.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातल्या केंद्र सरकारला नऊ वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त, सातारा इथं, राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत, मोदी ॲट नाईन, हा कार्यक्रम घेण्यात आला. साताऱ्यात उभारण्यात येत असलेल्या, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या बांधकामाची, पाटील यांनी पाहणी केली. एकाच परिसरात सर्व सोयी असणारं हे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, राज्यासमोर एक आदर्श उदाहरण ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

****

अंमली पदार्थ विरोधी दिन आज पाळण्यात येत आहे. त्यानिमित्त धुळे इथं पोलिस दलातर्फे सायकल रॅली काढून, जनजागृती करण्यात आली. सर्व पोलिस अधिकारी, खेळाडू आणि शालेय विद्यार्थ्यांनी, या रॅलीत सहभाग घेतला होता. रॅलीचा समारोप झाल्यानंतर उपस्थित सर्वांना, अंमली पदार्थ विरोधी शपथ देण्यात आली. 

****

उस्मानाबाद इथल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या उपकेंद्राचं, विद्यापीठात रूपांतर करण्याची मागणी, सिनेट सदस्य देविदास पाठक यांनी, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे केली आहे. यासंदर्भात विद्यापीठाच्या अधीसभा तसंच व्यवस्थापन परिषदेनं एकमुखाने ठराव करून, हा ठराव शासनाकडे पाठवला आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात उच्च शिक्षणाच्या सोयीसुविधा वाढवण्यासह, जिल्ह्याचा शैक्षणिक निर्देशांक उंचावण्यासाठी, स्वतंत्र विद्यापीठ होणं आवश्यक असल्याचं, यासंदर्भातल्या निवेदनात म्हटलं आहे.

****

रत्नागिरी जिल्ह्यात दापोली-हर्णे मार्गावर आसूद इथं ट्रक आणि रिक्षा यांच्या अपघातात आठ जणांचा मृत्यू झाला. या घटनेबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दु:ख व्यक्त केलं आहे. त्यांनी पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडून या अपघाताची माहिती घेतली असून, मुख्यमंत्री सहायता निधीतून मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. 

****

नाशिक जिल्ह्यात मनमाड इथं पेट्रोल, डिझेल वाहतूकदारांनी आज सकाळपासून संप पुकारल्यानं, उत्तर महाराष्ट्रासह मराठवाड्यात जाणारे इंधनाचे टँकर थांबले आहेत. गेल्या तीन दिवसांपासून इंडियन ऑइल कंपनीच्या व्यवस्थापनाच्या विरोधात, वाहतूकदारांचा संप सुरु होता, तो काल मिटल्यानंतर, आज सकाळपासून तिन्ही ऑइल कंपन्यांच्या विरोधात, वाहतूकदारांनी संप पुकारला आहे. पानेवाडी इथल्या इंधनाच्या डेपोमध्ये, टँकर उभे करण्याची व्यवस्था करण्याच्या मागणीसाठी, हा संप पुकारण्यात येत आहे. सध्या वाहतुकदारांना टँकर बाहेरील परिसरात उभे करावे लागतात, त्यामुळे वाद होतात, आणि टँकर मधून इंधन चोरीला जात असल्याचंही, वाहतूकदारांच्या तक्रारीत म्हटलं आहे.

****

नाशिक जिल्ह्यात अखेर मान्सूनचं आगमन झालं असून, कमी अधिक प्रमाणात पावसाने सर्वच तालुक्यात हजेरी लावली. पेठ आणि त्र्यंबकेश्वर इथं काल सर्वाधिक पाऊस झाला.

औरंगाबाद शहर आणि परिसरात आज सकाळपासून ढगाळ वातावरण असून, काही भागात पावसाच्या हलक्या सरी कोसळत आहेत. काल पैठण तालुक्यात मुसळधार पाऊस झाला.

दरम्यान, येत्या चार पाच दिवसात कोकण किनारपट्टी आणि मध्य महाराष्ट्राच्या घाट परिसरात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे.

****

No comments:

Post a Comment