Sunday, 23 July 2023

आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक : २३ जूलै २०२३ सकाळी ७.१० मि.

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date : 23 July 2023

Time : 7.10 AM to 7.25 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक : २३ जूलै  २०२ सकाळी ७.१० मि.

****

·     ाज्याच्या अनेक जिल्ह्यात जोरदार पावसामुळे पूरस्थिती;हिंगोली तसंच नांदेड जिल्ह्यात अनेक गावांना पुराचा वेढा

·      इर्शाळवाडी दरड दुर्घटनेत मृतांची संख्या २७

·     तरुण प्रतिभावंतांना रोजगाराच्या संधी देण्यासाठी, सरकार कटिबद्ध-७० हजार तरुणांना नियुक्तीपत्र वितरण कार्यक्रमात पंतप्रधानांचं प्रतिपादन

·      सामाजिक सलोखा आणि सहिष्णुता अबाधित राखण्यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठानं मार्गदर्शक काम करावं-माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचं आवाहन

·      रेल्वे प्रवाशांना दर्जेदार जेवण पुरवण्यासाठी इकॉनॉमी मीलही संकल्पना कार्यान्वीत

आणि

·      कोरिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष दुहेरीत भारतीय जोडी अंतिम फेरीत दाखल

****

ाज्याच्या अनेक भागात कालही जोरदार पाऊस झाल्याने पूरस्थिती निर्माण झाली. विदर्भात यवतमाळ, बुलडाणा, वाशिमसह मराठवाड्यात हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यात या पावसामुळे हजारो नागरिक प्रभावित झाले.

यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यात आनंदनगर तांडा इथं पुराच्या वेढ्यात अडकलेल्या नागरिकांना जणांना बाहेर काढण्यासाठी भारतीय वायूदलाचे दोन हेलिकॉप्टर आणि यांत्रिक नावेची मदत घेण्यात आली. जिल्ह्यात २३१ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. दरम्यान, धनोडा, खडका आणि पेढी गावात अडकलेल्या ४० ग्रामस्थांना आपत्ती प्रतिसाद दलाने सुखरूप बाहेर काढलं असून आर्णी तालुक्यातल्या कवठा बाजार इथं पुरात अडकलेल्या दोघांनाही सुखरूप बाहेर काढण्यात आलं आहे. जिल्ह्यात आतापर्यंत दोघांचा पावसाशी संबंधित घटनांत मृत्यू झाल्याचं वृत्त आहे.

जिल्ह्यात सर्वच ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली असून अनेक मार्ग बंद पडले आहेत. वाघाडी नदीला आलेल्या पुरामुळे वाघाडी गावाला पुराचा वेढा बसला असून गावातील अनेक घरांत पुराचं पाणी शिरलं आहे. बाभुळगाव तालुक्यातील कोटंबा जवळचा पुल पाण्यात वाहून गेल्याने काही गावांचा संपर्क तुटला आहे.

****

अमरावती जिल्ह्यात काल एक महिला आणि २ युवक पुराच्या पाण्यात वाहून गेले. जिल्ह्यातल्या १५ हजार ६०० हेक्टरवरील पिकांचं अतिवृष्टीमुळे नुकसान झालं आहे. अकोला जिल्ह्यातही संततधार सुरु असून काल पाथर्डी तालुक्यात एक युवक वाहून गेला.

****

बुलडाणा जिल्ह्यात काल दिवसभर पावसाची संतधार सुरूच असल्याने जिल्ह्यातील संग्रामपूर आणि जळगाव-जामोद तालुक्यात मोठं नुकसान झालं आहे. जळगाव-जामोद तालुक्यातील अनेक गावांमध्ये पुराच पाणी शिरलं आहे तर संग्रामपूर तालुक्या काही गावांचा संपर्क तुटला आहे. जिल्हा यंत्रणे कडून नागरिकांना पुराच्या बाहेर काढण्यासाठी आपत्ती दलाच्या पथकासह यशस्वी प्रयत्न सुरू आहेत

****

वाशीम जिल्ह्यात सहा हजार हेक्टर पेक्षा अधिक क्षेत्रावरील पिकं धोक्यात आली असून जनजीवन विस्कळीत झालं आहे. कारंजा तालुक्यासह जिल्ह्यातील बहुतांश भागात काल अतिवृष्टी झाल्याची माहिती आहे. नद्या, नाल्याना पूर आले असून, नद्यातील पाण्याचा प्रवाह शेतात घुसल्यामुळे शेकडो हेक्टरवरील पिकं खरडून गेली तर अनेकांच्या शेतात पाणी साचलं आहे. कारंजा तालुक्यात अडाण धरणाचे पाच दरवाजे उघडण्यात आले असून पाण्याचा विसर्ग केला जात आहे.

****

हिंगोली जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे नदी, नाले दुथडी भरून वाहत आहेत. सेनगाव तालुक्यात गोरेगाव - कडोळी आणि कळमनुरी तालुक्यातल्या आखाडा बाळापूर- पिंपरी मार्गावरच्या गावांचा पुरामुळे संपर्क तुटला. हिंगोली शहराजवळील कयाधू नदीचं पात्रही दुथडी भरून वाहत आहे, साटंबा शिवारात शेततळं फुटल्याने शेतीचं नुकसान झालं. वसमत तालुक्यातील आसना नदीचं पाणी शेतात शिरल्याने नुकसान झालं असून, औंढा नागनाथ तालुक्यात असोला शिवारात एक बंधारा वाहून गेल्याचं आमच्या वार्ताहारानं कळवलं आहे.

****

नांदेड जिल्ह्याच्या किनवट तालुक्यात सर्व नऊ महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली. या अतिवृष्टीमुळे तालुक्यातल्या एकुण १७६ गावातल्या २१  हजार ४१५ शेतकऱ्यांच्या १३ हजार २४६ हेक्टरवरील शेतीपिकांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. दरम्यान, पिंपरी इथं डोंगराचं माळरान खचून जवळपास ६५ घरांची पडझड झाली आहे. भंडरवाडी इथं १२ घरं आणि इतर गावातील २५ अशा ९० घरांची पडझड झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. अतिवृष्टीमुळे पैनगंगा नदीची पाणी पातळी वाढल्यामुळे सहस्त्रकुंड धबधबा ओसंडून वाहत आहे. किनवट तालुक्यातल्या काही गावांचा संपर्क तुटला आहे.

माहूर तालुक्यातही मोठा पाऊस झाला असून, पैनगंग नदीला पूर आला आहे. या पुरात अडकलेल्या तिघांची राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या तुकडीनं सुटका केली.

****

 

रायगड जिल्ह्यातल्या खालापूर तालुक्यात इर्शाळवाडी दरड दुर्घटनेत ढिगाऱ्याखाली आणखीन पाच मृतदेह सापडले आहेत. अद्याप ७८ जण ढिगाऱ्याखाली असण्याची शक्यता असून, शोधकार्य सुरु आहे. या दुर्घटनेतल्या मृतांची संख्या २७ झाली आहे.

****

देशातल्या तरुण प्रतिभावंतांना जास्तीत जास्त रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी, सरकार कटिबद्ध असल्याचं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. सरकारी विभाग आणि संस्थांमध्ये नव्यानं नियुक्त सत्तर हजारहून जास्त उमेदवारांना, काल पंतप्रधानांच्या हस्ते, दूरदृश्यप्रणालीच्या माध्यमातून, नियुक्तीपत्रांचं वाटप करण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते.

औरंगाबाद इथं बीड वळण रस्त्यावर आयसीएआय भवनात नवनियुक्त उमेदवारांना रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याहस्ते नियुक्तीपत्रं प्रदान करण्यात आले. शासकीय नोकरी मिळण्याची प्रक्रिया अत्यंत पारदर्शक आणि सुलभ झाल्याचं दानवे यांनी म्हटलं आहे. नोकरीच्या माध्यमातून देशसेवा करण्याची संधी युवकांना मिळाली आहे, देशाला विविध क्षेत्रात पुढे घेवून जाण्यासाठी या युवकांचं योगदान महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचं दानवे यांनी नमूद केलं. या मेळाव्यात नियुक्तीपत्रं मिळालेल्या उमेदवारांनी आपल्या भावना या शब्दांत व्यक्त केल्या...

‘‘मला  माननीय  पंतप्रधान साहेबाचे  मोलाचे  शब्द  ऐकायला  मिळाले मला  जॉइनिंग  लेटर माझा स्टेट बँक ऑफ इंडिया ला याचा प्रोफेशनली ऑफिसर सिलेक्शन झालेला आहे मला  खूप  छान  वाटले आणि  मी गव्हर्नमेंट  ऑफ  इंडियाचा  खूप  खूप  धन्यवाद  करतो मोदी  सरांनी  रोजगार  मेळावेचा ज्या  रोपरेषा  हे  सर्व केलेला  होते ते  बघून  मला  खूप  आनंद  झाला आणि  माझा  एस  बी  आय कडून सिलेक्शन झालेला आहे मी  पण  एक शेतकरी  कुटुंबातली  आहे तर  सरकारी  नौकरी भेटली मला  फार  आनंद  होत  आहे आणि  मी  मोदी सरांचा खूप  खूप  धन्यवाद  करते.’’

 

केंद्रीय दूरसंचार राज्यमंत्री देवूसिंह चौहान यांनीही काल मुंबईत नियुक्तीपत्र वितरित केली. सरकारी क्षेत्रात १० लाख रोजगार निर्माण करण्याची सरकारची उद्दिष्टपूर्ती लवकरच होईल असं त्यांनी सांगितलं. 

पुण्यात यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी इथं रोजगार मेळाव्यात केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ.भारती पवार यांच्या हस्ते नियुक्तीपत्रं वितरित करण्यात आली. त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं.

****

आजादी का अमृत महोत्सव या उपक्रमाच्या समारोप कार्यक्रमासंदर्भात केंद्रीय सांस्कृतिक कार्य मंत्रालयाच्या वतीनं काल पूर्व तयारी विषयी आढावा बैठक घेण्यात आली. केंद्रिय कॅबिनेट सचिव राजीव गौबा यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्य प्रणालीव्दारे झालेल्या या बैठकीत राज्याचे मुख्य सचिव मनोज सौनिक यांच्यासह सर्व विभागंचे प्रधान सचिव उपस्थित होते. आजादी का अमृतमहोत्सव या उपक्रमाचा समारोप मेरी माटी मेरा देश”, मिट्टी को नमन, वीरों का वंदन, ही संकल्पना घेऊन संपूर्ण देशभर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येणार आहे. मार्च २०२१ पासून सूरु झालेला या उपक्रमाचा पुढच्या महिनाअखेरीस समारोप होणार आहे.

****

मराठवाडा ही सामाजिक क्रांतिकारी परिवर्तनाची भूमी आहे. याच भूमितील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठानं शिक्षणाबरोबरच सामाजिक सलोखा आणि सहिष्णुता अबाधित राखण्यासाठी मार्गदर्शक काम करावं, असं आवाहन माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केलं आहे. काल औरंगाबाद इथं डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात पद्म पुरस्कार प्राप्त मान्यवरांचा कोविंद यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा उद्देश हा राष्ट्र विकसित करणं हा असल्याचं कोविंद यांनी सांगितलं. कोविंद यांच्या हस्ते सन्मान झालेल्या मान्यवरांमध्ये दादा इदाते, डॉ.प्रभाकर मांडे, गिरीश प्रभुणे, सय्यद शब्बीर, कृषीतज्ज्ञ श्रीरंग देऊबा लाड यांचा समावेश आहे. वंचित, कष्टकरी, शेतकरी आदी समाज घटकांचा नियमित लाभलेला सहवास हाच आमच्या जगण्याचा श्वास आहे, अशी भावना पद्म पुरस्कारांर्थीनी या सत्कारानंतर व्यक्त केली.

दरम्यान, विद्यापीठाच्या नूतनीकृत प्रवेशद्वाराचं काल कोविंद यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं. कुलगुरु डॉ.प्रमोद येवले, प्रकुलगुरु डॉ. श्याम शिरसाठ यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. कोविंद यांनी या परिसराची पाहणी करून विद्यापीठ प्रवेशद्वाराचा इतिहासही कुलगुरु येवले यांच्याकडून जाणून घेतला.

****

रेल्वे प्रवाशांना दर्जेदार आणि परवडणाऱ्या दरात जेवण पुरवण्यासाठी भारतीय रेल्वेने इकॉनॉमी मीलही संकल्पना कार्यान्वीत केली आहे. २० रुपये प्रतिपाकीट दराने हे जेवण पुरवलं जाणार आहे. औरंगाबादसह हैदराबाद, विजयवाडा, गुंटकल आणि रेणीगुंटा रेल्वेस्थानकावर हे जेवण पुरवण्यास सुरवात झाली आहे. याच कक्षात कॉम्बो प्रकारातही जेवण उपलब्ध असून, त्याचा दर पन्नास रुपये प्रतिपाकीट असा आहे.

****

कोरिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय जोडी सात्विक साईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी पुरुष दुहेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. चिराग आणि सात्विक जोडीनं काल झालेल्या उपान्त्य फेरीच्या लढतीत चीनी जोडी वेई केंग लियांग आणि चांग वांग यांचा २१-१५ २४-२२ असा पराभव केला. पुरुष दुहेरीच्या आज होणाऱ्या अंतिम सामन्यात भारतीय जोडीची लढत इंडोनेशियायी जोडीशी होणार आहे.

****

भारत आणि बांगलादेश महिला संघातली एकदिवसीय क्रिकेट सामन्यांची मालिका एक एक अशी बरोबरीत सुटली आहे. बांगलादेशात मीरपूर इथं काल झालेला तिसरा सामना अनिर्णित राहिला. तीन सामन्यांच्या या मालिकेत पहिला सामना बांगलादेशनं तर दुसरा सामना भारतानं जिंकला होता.

****

भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यात सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात काल तिसऱ्या दिवशी वेस्ट इंडीजच्या पाच बाद २२९ धावा झाल्या. सामन्यात भारत सध्या २०९ धावांनी आघाडीवर आहे.

****

अहमदनगर जिल्ह्यात अवैधरित्या दारुगोळा आणि स्फोटक पदार्थ बाळगल्या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. खारे कर्जुने इथं स्थानिक गुन्हे शाखा आणि सैन्य गुप्तवार्ता विभागाने काल संयुक्त कारवाई करत मोठ्या प्रमाणात दारुगोळा आणि इतर स्फोटकं हस्तगत केली.

****

ऑनलाईन गेमिंगच्या माध्यमातून फसवणूक करणाऱ्या गोंदिया इथल्या आरोपीच्या घरातून पोलिसांनी सुमारे अठरा कोटी रुपये रोकड तसंच पंधरा किलो सोनं आणि २०० किलो चांदी जप्त केली आहे. अनंत जैन असं या आरोपीचं नाव असून, त्याने नागपुरात एका उद्योजकाच्या मुलाची ऑनलाईन गेमिंगच्या माध्यमातून ५८ कोटी ४२ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. फसवणूक झालेल्या इसमाने आत्महत्येचा प्रयत्न केल्यानंतर ही बाब समोर आली.

****

मणिपूर इथं महिला हिंसाचारांच्या घटनेच्या निषेधार्थ औरंगाबाद शहर जिल्हा महिला काँग्रेस समिती आणि क्रांती युवा दल यांनी औरंगाबाद शहरातल्या क्रांती चौक इथं काल निदर्शनं केली. ही घटना संपूर्ण देशासाठी लाजिरवाणी बाब आहे, असं काँग्रेसच्या शहर जिल्हा अध्यक्ष दिपाली मिसाळ यांनी म्हटलं आहे.  बहुसंख्य महिला आणि युवती या निदर्शन आंदोलनात सहभागी झाल्या होत्या.

****

हिंगोली जिल्ह्यातल्या वसमत इथल्या पूर्णा सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी जयप्रकाश दांडेगावकर तर उपाध्यक्षपदी सुनील कदम यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. काल झालेल्या या निवडणुकीत दांडेगावकर यांच्या शेतकरी विकास पॅनलने २१ पैकी २१ जागा जिंकल्या आहेत. दांडेगावकर यांची सहाव्यांदा अध्यक्षपदी निवड झाली आहे.

****

केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजना लाभार्थ्यांच्या घरापर्यंत पोहचवणार असल्याची ग्वाही आमदार अभिमन्यू पवार यांनी दिली आहे. लातूर  जिल्ह्यातल्या औसा इथं काल केंद्र शासनाच्या मल्टिमीडिया चित्रप्रदर्शनाचं आणि शासन आपल्या दारी- लाभार्थी घरोघरी ' योजनेच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. एकेकाळी जागतिक अर्थव्यवस्थांमध्ये १० वा क्रमांक असणारा भारत आज अर्थव्यवस्थेमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे, असं पवार यांनी सांगितलं.

****

परभणी जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाकरता सर्वांनी प्रयत्न करण्याचं आवाहन नवनियुक्त जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी केलं आहे. गावडे यांनी काल आंचल गोयल यांच्याकडून जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारला, त्यानंतर ते बोलत होते. यावेळी सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांच्या वतीनं गोयल यांचा सत्कार तर गावडे यांचं स्वागत करण्यात आलं.

****

जालना जिल्ह्यात काल जोरदार पाऊस झाला. जिल्ह्यात आठवडाभरापासून कमी-अधिक प्रमाणात सुरू असलेल्या रिमझिम पावसामुळे खरीप हंगामातील मशागतीच्या कामांवर परिणाम झाला आहे. जिल्ह्यात आजपर्यंत ९१ टक्के क्षेत्रावरील पेरण्या पूर्ण झाल्या असून आजपर्यंत २१३ मिलीमीटर इतका पाऊस झाला आहे. पावसाचं हे प्रमाण वार्षिक सरासरीच्या केवळ ३५ टक्के इतकं आहे.

****

नाशिक जिल्ह्यात दारणा धरण क्षेत्रात मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरु असल्याने, हे धरण ७५ पूर्णांक ८१ टक्के इतकं भरलं आहे.

****

No comments:

Post a Comment