आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
०२ जूलै २०२३
सकाळी ११.०० वाजता
****
मुंबई आणि आसपासच्या
परिसरात कालपासून मुसळधार पाऊस सुरू असून दादर, परळ आणि सायनसह अनेक ठिकाणी सखल भागात
पाणी साचलं आहे. मुंबईच्या पूर्व भागात काल एकोणसत्तर पूर्णांक शहाएंशी मिलीमीटर तर
पश्चिम भागात ७३ पूर्णांक सत्तावन्न मिलीमीटर पावसाची नोंद झाली. दरम्यान मुंबईत येणाऱ्या
तीन ते चार दिवसात मुंबईत मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला
आहे.
****
पुण्यातल्या
बावधन वन परिक्षेत्रात वन विभागाच्या वतीनं बांधण्यात आलेल्या वन्यप्राणी उपचार केंद्राचं
लोकार्पण वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते काल करण्यात आलं. जखमी आणि वेदनेनं
त्रासलेल्या वन्यप्राण्यांच्या उपचारासाठी बावधन वन्यप्राणी उपचार केंद्रामुळे मोठी
सोय झाली आहे, असं वनमंत्री मुनगंटीवार म्हणाले. या उपचार केंद्राच्या पहिल्या टप्प्यात
सुमारे २८ कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे.
****
सातारा जिल्ह्यातल्या
कराड तालुक्यातील उंब्रज पोलिस ठाण्याच्या हद्दीत चार ठिकाणी छापे टाकत सातारा स्थानिक
गुन्हे शाखेनं दूध भेसळ करणाऱ्या नऊ जणांना काल ताब्यात घेतलं. त्यांच्याकडून चार वाहनं
आणि भेसळीसाठी वापरण्यात येणारं रसायन, पावडर, तेल असा पंचवीस लाख रुपयांचा मुद्देमाल
जप्त करण्यात आला.
****
दक्षिण मध्य रेल्वेच्या हैदराबाद आणि सिकंदराबाद विभागात
पायाभूत सुविधांच्या निगराणीचं काम येत्या
नऊ जुलैपर्यंत करण्यात येणार आहे. त्यामुळे काही रेल्वे रद्द तर काही रेल्वे अंशतः
रद्द करण्यात आल्या आहेत. निजामाबाद - नांदेड - निजामाबाद गाडी रद्द तर दौंड - निजामाबाद ही गाडी मुदखेड ते निजामाबाद दरम्यान
तर निजामाबाद - पंढरपूर ही गाडी निजामाबाद ते मुदखेड दरम्यान अंशत: रद्द करण्यात आली आहे.
****
औरंगाबाद इथं सरस्वती भुवन कला आणि वाणिज्य महाविदयालयात आज शिक्षण परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. आगामी काळातील
अपेक्षित शैक्षणिक बदल आणि मराठवाडयातील शिक्षण विकासाचा मागोवा घेण्यासाठी
मराठवाडा मुक्तिसंग्राम अमृत महोत्सव समारोह समितीच्या वतीनं ही शिक्षण परिषद आयोजन करण्यात आली आहे.
//*************//
No comments:
Post a Comment