▼

Monday, 3 July 2023

Text - आकाशवाणी औरंगाबाद, दिनांक : 03.07.2023, रोजीचे दुपारी: 01.00, वाजताचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date : 03 July 2023

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक : ०३ जूलै २०२३ दुपारी १.०० वा.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. पुढच्या वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाचं धोरण ठरवण्यासाठी गेल्या बुधवारी पक्षाचे वरीष्ठ नेते पंतप्रधानांना भेटले होते, त्यानंतर ही बैठक बोलावण्यात आली आहे.

***

भारताच्या जी - 20 अध्यक्षपदाअंतर्गत स्टार्ट अप - 20 समुहाची दोन दिवसीय शिखर परिषद आज हरियाणातल्या गुरुग्राम इथं सुरु झाली. या परिषदेत समुहाच्या अंतिम धोरणाचं अधिकृत प्रकाशन होणार आहे. भारताच्या जी - 20 अध्यक्षपदाच्या कार्यकाळात जागतिक स्टार्ट अप परिसंस्थेच्या भविष्याला आकार देण्याच्या उद्देशानं हा समूह काम करत आहे.

***

राज्यात जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असून, लोकशाहीचा अधिकार जतन करणं गरजेचं असल्याचं, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे. सातारा जिल्ह्यातल्या कराड इथं आज माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या प्रीतीसंगम या समाधीस्थळावर अभिवादन केल्यानंतर ते बोलत होते. जातीय विचारधारांना काही सहकारी बळी पडले, मात्र सामान्य माणूस बळी पडणार नाही, असं ते म्हणाले. राज्‍यातले लोक शांततेच्‍या मार्गाने धक्का देवून पुन्‍हा एकदा महाराष्ट्र सर्वसामान्‍यांसाठी काम करणाऱ्या लोकांच्‍या हातात सत्ता देईल, असा विश्‍‍वास पवार यांनी यावेळी व्यक्त केला.

 यावेळी काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण, खासदार श्रीनिवास पाटील, माजी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. सातारा, सांगली, कोल्हापूर इथल्या हजारो समर्थकांनी याठिकाणी गर्दी केली होती.

***

सोलापूर इथं आज राजमाता जिजाऊ स्वसंरक्षण अभियानाचा शुभारंभ महिला आणि बालकल्याण मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते झाला. सध्या राज्यात आणि देशात मुलींवरती हल्ले होण्याचं प्रमाण वाढलं असून, मुलींना स्वसंरक्षणाची गरज निर्माण झाली आहे. याचा विचार करुन राज्यातल्या साडेतीन लाख आणि देशातल्या ३५ लाख युवतींना महिला आणि बालकल्याण विभागाच्या वतीने स्वसंरक्षणाचे धडे देण्यात येणार असल्याची माहिती लोढा यांनी यावेळी दिली. यामध्ये प्रत्येक तालुक्यात दरवर्षी किमान एक हजार मुलींना हे प्रशिक्षण देण्याचं उद्दीष्ट ठेवण्यात आलं आहे.

***

श्री अमरनाथ यात्रा सध्या सुरळीतपणे सुरू असून देशाच्या विविध भागातून हजारो यात्रेकरू दररोज काश्मीर खोऱ्यात पोहोचत आहेत. यात्रा आणि भाविकांच्या सुविधेसाठी सर्वत्र चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. काल संध्याकाळपर्यंत १८ हजार भाविकांनी अमरनाथ शिवलिंगाचं दर्शन घेतलं.

***

राज्यातल्या सहकारी गृहनिर्माण संस्थांचा कारभार अधिक पारदर्शकपणे चालावा, यासाठीच्या मुलभूत नियमावलीचा मसुदा राज्य शासनाकडून या महिन्यात प्रकाशित केला जाण्याची शक्यता आहे. सहकारी गृहनिर्माण संस्थांसाठी राज्यात सुधारीत कायदा मार्च २०१९ मध्ये लागू करण्यात आला. मात्र नव्या कायद्यातील मुलभूत सुधारीत नियमावली अजुनही प्रसिद्ध झाली नाही. त्याचा फटका राज्यातल्या लाखो गृहनिर्माण संस्थांना बसत आहे.

***

समृद्धी महामार्गावर औरंगाबाद जिल्ह्यात करमाड परिसरातल्या जयपूर शिवारात कारचा अपघात होऊन एकाचा मृत्यू झाला, तर दोन जण जखमी झाले. वाशिम जिल्ह्यातल्या मालेगाव इथले रहिवासी सुशीलकुमार थोरात हे पत्नी आणि मुलासह जालन्याच्या दिशेनं जात असताना आज सकाळी कारवरील नियंत्रण सुटल्यानं, महामार्गाच्या खाली ३० फुट खोल ही कार पडून अपघात झाला. यात सुशीलकुमार थोरात यांचा जागीच मृत्यू झाला. जखमींवर औरंगाबाद इथल्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

***

यावर्षीच्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारोत्तोलन विभागात ऑलिम्पिक रौप्य पदक विजेती मीराबाई चानू आणि राष्ट्रकूल पदक विजेता अजिंता शौली या दोघांची संघात निवड करण्यात आली आहे. चीनमध्ये २३ सप्टेंबर ते आठ ऑक्टोबर या कालावधीत ही स्पर्धा होणार आहे.

***

सॅफ फुटबॉल स्पर्धेचा अंतिम सामना उद्या भारत आणि कुवेत यांच्यात होणार आहे. बंगळुरु इथल्या के. श्री. कान्तीराव मैदानावर संध्याकाळी साडे सात वाजता हा सामना होईल. सुनील छेत्री याच्या नेतृत्वाखाली लढणाऱ्या भारतीय संघान काल उपांत्य फेरीत लेबनॉनचा चार - दोन असा पराभव करत अंतिम फेरी गाठली.

***

येत्या दोन दिवसात कोकणात बहुतांश ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. तसंच मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातही तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.


//************//

 

No comments:

Post a Comment