▼

Monday, 3 July 2023

TEXT - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 03.07.2023 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजताचे मराठी बातमीपत्र

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 03 July 2023

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ०३ जुलै २०२३ सायंकाळी ६.१०

****

§   महायुतीचं सरकार राज्यात चांगल्या प्रकारे काम करेल-उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून विश्वास व्यक्त.

§   जयंत पाटील आणि जीतेंद्र आव्हाड यांना अपात्र ठरवण्याबाबत अजित पवार यांचं विधानसभाध्यक्षांना पत्र; शरद पवार यांच्याकडून प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांची हकालपट्टी.

§   मुलींना आत्मरक्षणाचे धडे देण्यासाठी राजमाता जिजाऊ स्वसंरक्षण अभियानाचा शुभारंभ.

आणि

§   पंढरपूर इथं गोपाळकाल्याने आषाढी यात्रेची सांगता.

****

महायुतीचं सरकार राज्यात चांगल्या प्रकारे काम करेल, असा विश्वास, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला आहे. ते आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. विरोधात असलेल्या पक्षांपैकी सर्वाधिक सदस्य असलेल्या पक्षाच्या नेत्याला विरोधी पक्षनेतेपदी नियुक्त करण्याचा अधिकार फक्त सदनाच्या अध्यक्षांचा असल्याचं सांगितलं. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हेच असल्याचं अजित पवार यांनी नमूद केलं. बहुसंख्य आमदार आपल्यासोबत असल्याचा अजित पवार यांनी यावेळी पुनरुच्चार केला. जयंत पाटील आणि जीतेंद्र आव्हाड यांना अपात्र ठरवण्यासंदर्भात विधानसभाध्यक्षांकडे पत्र दिल्याचं पवार यांनी सांगितलं.

पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी या पत्रकार परिषदेत, जयंत पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदाच्या जबाबदारीतून मुक्त करत असून, प्रदेशाध्यक्ष पदी सुनील तटकरे यांची नियुक्ती करत असल्याचं जाहीर केलं. अनिल पाटील यांना प्रतोदपदी कायम ठेवत असल्याचंही पटेल यांनी सांगितलं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून काही सदस्यांचं सदस्यत्व रद्द करण्याची मागणी विधानसभा तसंच संसदेकडे केली असल्याचं, जाहीर केलं जात आहे, मात्र असा कोणताही निर्णय पक्षाला घेता येत नसल्याचं, पटेल यांनी स्पष्ट केलं. पक्षांतर्गत वाद नसावेत, अशी आपली भूमिका असून, पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी बहुसंख्य सदस्यांची भावना लक्षात घ्यावी, असं आवाहन पटेल यांनी यावेळी केलं.

तटकरे यांनी यावेळी बोलताना, पक्षाच्या विविध पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर केल्या. रुपाली चाकणकर यांची महिला आघाडी अध्यक्षपदी, युवा अध्यक्षपदी सूरज चव्हाण यांची, तर अमोल मिटकरी यांची पक्ष प्रवक्ते म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

****

पक्षविरोधी कारवाया प्रकरणी प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांची पक्षातून हकालपट्टी केल्याचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी जाहीर केलं आहे. पक्षाच्या कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे यांनी केलेल्या शिफारशीनंतर पवार यांनी हा निर्णय घेत असल्याचं, ट्विट संदेशातून जाहीर केलं.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या नऊ आमदारांविरोधात शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने अपात्रतेची याचिका दाखल केली आहे. यामध्ये छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, धर्मराव बाबा आत्राम, आदिती तटकरे, संजय बनसोडे, अनिल पाटील यांचा समावेश आहे. शरद पवार यांनी आज सातारा जिल्ह्यातील कराड इथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांशी बोलताना ही माहिती दिली. पक्ष फोडणाऱ्यांच्या कारस्थानाला आपलेच काही लोक बळी पडले असल्याची टीका पवार यांनी यावेळी केली.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नऊ मंत्र्यांच्या काल झालेल्या शपथविधी सोहळ्यासाठी उपस्थित राहिल्या बद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तीन सदस्यांना पक्षाच्या प्रदेश सरचिटणीस पदावरून तसंच सदस्यत्वावरून बडतर्फ करण्यात आलं आहे. यात नरेंद्र राणे, शिवाजीराव गर्जे आणि अकोला इथल्या विजय देशमुख यांचा समावेश आहे. यांना पक्षाचे नाव तसंच चिन्ह न वापरण्याचे आदेश पाटील यांनी पत्राद्वारे दिले आहेत.

नऊ आमदार वगळता बाकीच्या आमदारांना पक्षाची दारे खुली असून, काही काळ आम्ही त्यांच्यासाठी थांबू, मात्र एका विशिष्ट कालावधीनंतर आम्हाला त्यांच्यावर कारवाई करावी लागेल अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज मुंबईत पत्रकारांशी बोलताना दिली.

अजित पवार यांच्यासोबत गेलेले आमदार आमच्या संपर्कात असून त्यांना धोक्याने तिथं नेलं असल्याचं आमदारांनी सांगितल्याचं पाटील म्हणाले.

दरम्यान, आम्हाला काँग्रेसशी कोणताही संघर्ष करायचा नाही. विधानसभा अध्यक्षांना नऊ आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात पत्र पाठवले असून विधानसभा अध्यक्ष संख्याबळानुसार निर्णय घेतील, अशी अपेक्षाही पाटील यांनी व्यक्त केली.

येत्या पाच तारखेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुंबई इथं बैठक बोलवली आहे. या बैठकीला सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित राहतील अशी खात्री शरद पवार यांनी व्यक्त केली.

दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही पाच तारखेला वांद्रे इथं आपल्या समर्थकांची बैठक बोलावली आहे.

****

लोकशाहीचा अधिकार जतन करणं गरजेचं असल्याचं, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे. सातारा जिल्ह्यातल्या कराड इथं आज माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या प्रीतीसंगम या समाधीस्थळावर अभिवादन केल्यानंतर ते बोलत होते. जातीय विचारधारांना काही सहकारी बळी पडले, मात्र सामान्य माणूस बळी पडणार नाही, असं ते म्हणाले. राज्‍यातले लोक शांततेच्‍या मार्गाने धक्का देवून पुन्‍हा एकदा महाराष्ट्र सर्वसामान्‍यांसाठी काम करणाऱ्या लोकांच्‍या हातात सत्ता देईल, असा विश्‍‍वास पवार यांनी यावेळी व्यक्त केला.

दरम्यान, सातारा इथं पत्रकारांशी बोलताना, पवार यांनी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडली असं आपण म्हणणार नसल्याचं सांगितलं. माझे सहकारी मला सोडून गेले, असं पवार म्हणाले. अजित पवार म्हणजे पक्ष नव्हे, माझा आशीर्वाद घेऊन निर्णय घेतल्याचे सांगून काहीजण संभ्रम निर्माण करत आहेत असं पवार यांनी यावेळी स्पष्ट केलं.

****

 ‘राजमाता जिजाऊ युवती स्व-संरक्षण प्रशिक्षण कार्यक्रम’ आजपासून राज्यात सुरू करण्यात आला आहे. या कार्यक्रमाचा प्रातिनिधिक स्वरूपात मुंबईत मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगण इथं राज्याचे महिला आणि बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या उपस्थितीत शुभारंभ करण्यात आला. युवतींना कोणत्याही प्रसंगाला सामोरे जाण्याचे, लढण्याचे प्रशिक्षण या उपक्रमातून दिले जाणार असल्याचं, लोढा यांनी सांगितलं. या उपक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय महिला अणि बालविकास मंत्री स्मृती इराणी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तसंच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुभेच्छा दिल्या आहेत

****

पशुसंवर्धन आणि दुग्धविकास विभागामार्फत आज प्रातिनिधिक स्वरुपात पाच फिरते पशुवैद्यकीय पथक कार्यान्वित करण्यात आले. आज विधानभवनाच्या प्रांगणात विधानसभा अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे - पाटील यांच्या हस्ते या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. राज्यात सध्या ऐंशी फिरती पशुवैद्यकीय पथकं कार्यान्वित होत आहेत. केंद्र शासनाच्या पशुस्वास्थ आणि रोग नियंत्रण योजनेनुसार राज्यात ३२९ फिरत्या पशुवैद्यकीय पथकांची निर्मिती करण्यात येणार आहे.

****

श्री क्षेत्र पंढरपूर इथं आज गुरू पोर्णिमेच्या दिवशी गोपाळकाल्याने आषाढी यात्रेची सांगता झाली. ‘गोपाळकाला गोड झाला, गोपाळाने गोड केला’ या जयघोषात गोपाळपूर इथं हा सोहळा पार पडला. गोपाळपूर इथल्या श्रीकृष्ण मंदीरात पूजा झाल्यानंतर मंदिर समितीच्यावतीनं लाह्यांच्या काल्याच्या प्रसादाचं वाटप करण्यात आलं. गोपाळकाला केल्यानंतर मानाच्या पालख्यांसह सर्व संताच्या पालख्यांनी श्री विठ्ठलाचे दर्शन घेऊन परतीचा प्रवास सुरु केला.

****

अक्कलकोट इथं श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानात असंख्य स्वामी भक्तांच्या उपस्थितीत गुरुपौर्णिमा उत्सव मोठ्या भक्तीभावाने साजरा करण्यात आला. पहाटे ५ वाजेपासून मंदिर भाविकांना दर्शनाकरिता खुलं करण्यात आलं. नैवेद्य आरतीनंतर सर्व भक्तांना देवस्थानच्या वतीने प्रसाद वाटप करण्यात आलं, भाविक मोठ्या संख्येनं मंदिरात दर्शनासाठी दाखल झाले आहेत. शिर्डी इथंही साईबाबांच्या दर्शनासाठी देशभरातून भाविकांनी मोठी गर्दी केली आहे.

****

समृद्धी महामार्गावर औरंगाबाद जिल्ह्यात करमाड परिसरातल्या जयपूर शिवारात कारचा अपघात होऊन एकाचा मृत्यू झाला, तर दोन जण जखमी झाले. वाशिम जिल्ह्यातल्या मालेगाव इथले रहिवासी सुशीलकुमार थोरात हे पत्नी आणि मुलासह जालन्याच्या दिशेनं जात असताना कारवरील नियंत्रण सुटल्यानं, ही कार महामार्गाच्या खाली कोसळून अपघात झाला. यात सुशीलकुमार थोरात यांचा जागीच मृत्यू झाला. जखमींवर औरंगाबाद इथल्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

****

औरंगाबाद विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी आज जिल्हाधिकारी अस्तिककुमार पांडेय यांच्याकडे पदभार सोपवत, कार्यालयाचा निरोप घेतला. निवृत्तीला सुमारे दोन वर्षाचा कालावधी शिल्लक असतांना केंद्रेकर यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे.

//***********//

No comments:

Post a Comment