▼

Monday, 3 July 2023

Text - आकाशवाणी औरंगाबाद, दिनांक : 03.07.2023, रोजीचे सकाळी: 11.00, वाजताचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

 

आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

०३ जूलै २०२३ सकाळी ११.०० वाजता

****

व्यास पौर्णिमा अर्थात गुरु पौर्णिमा आज साजरी होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट संदेशाच्या माध्यमातून देशवासियांना गुरु पौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या आहेत. गुरु पौर्णिमेनिमित्त शिर्डीच्या श्री साईबाबा मंदिरात भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. याठिकाणी होणाऱ्या गुरु पौर्णिमेच्या उत्सवाच्या मुख्य दिवशी आज अखंड पारायण समाप्तीनंतर श्रींची प्रतिमा, पोथी आणि विणेची मिरवणूक काढण्यात आली. प्रशासकीय अधिकाऱ्यांसह भाविक याठिकाणी उपस्थित होते.

***

मंत्रिपदाची शपथ घेतलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नऊ आमदारांविरुद्ध सदस्यत्व रद्द करण्याची मागणी करणारी याचिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं विधानसभा अध्यक्षांकडे दाखल केली आहे. या सदस्यांनी पक्षाचे अध्यक्ष आणि प्रदेशाध्यक्षांना कोणतीही कल्पना न देता, पक्ष धोरणाच्या हिताच्या विरोधात कारवाया करत, मंत्रिपदाची शपथ घेतली, त्यांची ही कृती बेकायदेशीर असल्याची तक्रार पक्षानं शिस्तभंग समितीकडे केली होती, त्यानंतर या समितीनं नऊ सदस्यांचं सदस्यत्व रद्द करण्याची याचिका ई मेल द्वारे विधानसभा अध्यक्षांकडे दाखल केली आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसनं मुख्य प्रतोद म्हणून जितेंद्र आव्हाड यांची नियुक्ती केली असून, विधानसभेत विरोधी पक्षनेतेपदासाठी देखील त्यांची शिफारस केली आहे.

***

समान नागरी कायदा संहितेविषयी चर्चा करण्यासाठी संसदेच्या कार्मिक तसंच विधी आणि न्याय विषयक स्थायी समितीची बैठक आज होणार आहे. कायद्याविषयी विविध घटकांची मतं ही समिती समजून जाणून घेणार आहे.

***

भारतीय नौदलाच्या कोची इथल्या वॉटर सर्वायवल ट्रेनिंग फॅसिलिटी मध्ये मिशन गगनयानच्या पहिल्या टप्प्यातल्या पहिल्या तुकडीचं प्रशिक्षण पूर्ण झालं आहे. या तुकडीत भारतीय नौदलातले पाणबुडे आणि आणि सागरी कमांडोंचा समावेश आहे.

***

नैॠत्य मोसमी पावसानं संपूर्ण देश व्यापला असल्याचं हवामान विभागाने काल जाहीर केलं. दरवर्षी सर्वसाधारणपणे आठ जुलै च्या दरम्यान मान्सूननं संपूर्ण देश व्यापला जातो, यंदा मात्र या तारखेच्या पाच सहा दिवस आधीच मान्सून देशात सर्वदूर सक्रीय झाला आहे.

 

//*************//

 

No comments:

Post a Comment