▼

Friday, 21 July 2023

Text - आकाशवाणी औरंगाबाद, दिनांक : 21.07.2023, रोजीचे दुपारी: 01.00, वाजताचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date : 21 July 2023

Time : 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक : २१ जूलै २०२३ दुपारी १.०० वा.

****

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या आज दुसऱ्या दिवशीही, मणिपूर घटनेसंदर्भात विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे कामकाजात व्यत्यय आला.

लोकसभेत कामकाज सुरु होताच काँग्रेस, द्रविड मुनेत्र कळघम, संयुक्त जनता दलासह इतर विरोधी पक्ष सदस्यांनी हा मुद्दा उपस्थित करत घोषणाबाजी सुरु केली. ही अतिशय गंभीर घटना असून, सरकार चर्चेसाठी तयार असल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितलं. तरीही विरोधकांचा गोंधळ सुरुच राहील्यानं लोकसभेचं कामकाज एका तासासाठी स्थगित झालं होतं.

राज्यसभेतही या मुद्यावरुन विरोधकांनी फलक झळकावत घोषणाबाजी केल्यानं कामकाज दुपारी अडीच वाजेपर्यंत स्थगित झालं.

***

विधानसभेत आज बोगस शाळांच्या मुद्यावर चर्चा झाली. अनेक सदस्यांनी, शाळांचं बनावट नाहरकत प्रमाणपत्र, शाळांचं नुतनीकरण, शिक्षणाधिकारी कार्यालयात असलेला एजंटचा सुळसुळाट, महानगरपालिकेच्या शाळांचा दर्जा, शिक्षक भर्ती, शालेय पोषण आहार, आदी मुद्यांवर प्रश्न उपस्थित केले. शिक्षक भर्ती संदर्भात औरंगाबाद न्यायालयानं बंदी उठवली असून, येत्या महिन्याभरात भर्ती केली जाईल, असं शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितलं. बोगस शाळांची चौकशी करुन निर्णय घेण्यासाठी समिती नेमली असल्याचं ते म्हणाले. जास्तीत जास्त महानगरपालिकेच्या शाळांना परवानगी देण्यात येत आहे. त्याचबरोबर अधिकाधिक बोगस शाळांना नियमित करण्यात येईल, आणि उर्वरित शाळांच्या विद्यार्थ्यांना इतर शाळेत हलवण्यात येईल, असं केसरकर यांनी सांगितलं.

कन्नडचे आमदार उदयसिंग राजपूत यांनी औरंगाबाद इथल्या आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेच्या घोटाळ्यासंदर्भात सभागृहात माहिती दिली. या पतसंस्थेत अनेकांच्या ठेवी अडकल्या असून, शासनाने दखल घेण्याची मागणी त्यांनी केली. 

***

दरम्यान, मणिपूर हिंसाचाराच्या मुद्यावर विरोधकांनी विधानसभेत गदारोळ केला. या मुद्यावर बोलण्याची परवानगी नाकारल्यानं काँग्रेसच्या सदस्यांनी सभात्याग केला. त्यानंतर विधिमंडळ परिसरात वार्ताहरांशी बोलताना, काँग्रेस नेते वर्षा गायकवाड, बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण, प्रणिती शिंदे यांनी मणिपूर घटनेवर केंद्र सरकारचा निषेध केला.

***

विधानपरिषदेत आज नियम २६० अन्वये शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे एकनाथ खडसे यांनी शेतकर्यांच्या आत्महत्येचा मुद्दा उपस्थित केला. शंभर दिवसात जवळपास १७०० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचं त्यांनी निदर्शनास आणून दिलं. यावर उपाययोजना करावी, शेतकऱ्यांना खतावर अनुदान द्यावं, अशी मागणी त्यांनी केली. शेतकऱ्यांच्या आत्महत्येवर सभागृहात एक दिवस चर्चा करण्याची सूचना देखील खडसे यांनी केली. यावर उपसभापती निलम गोर्हे यांनी, पुढच्या आठवड्यात प्रस्ताव देण्यास सांगितलं.

***

नांदेड जिल्ह्यात कालपासून अतिवृष्टी सुरु असून, मुखेड तालुक्यात तारदरवाडी इथला तलाव फुटला आहे. याठिकाणी प्रशासनातर्फे खबरदारी घेण्यात आली असून, आपत्ती निवारणाचं पथक तैनात करण्यात आलं आहे.

दरम्यान, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी आज सकाळी देगलूर, मुखेड तालुक्यात अतिवृष्टी झालेल्या गावांना भेट देऊन पाहणी केली. त्यांनी गावकरी आणि शेतकऱ्यांना धीर देत प्रशासनाकडून सर्व ते सहकार्य मिळण्याचं आश्वासन दिलं.

***

औरंगाबाद विभागात एक जून पासून आतापर्यंत २२९ मिलीमीटर पावसाची नोंद झाली असल्याची माहिती, विभागीय आयुक्त कार्यालयानं दिली आहे. पावसाचं प्रमाण यंदा सरासरीपेक्षा कमी असून, ८८ पूर्णांक आठ टक्केच पाऊस पडला आहे. सर्वाधिक ३२७ मिलीमीटर पाऊस नांदेड जिल्ह्यात, तर सर्वात कमी १६८ मिलीमीटर पाऊस उस्मानाबाद जिल्ह्यात झाला आहे. हिंगोली २७७, लातूर २४१, परभणी २०८, जालना २०४ आणि औरंगाबाद जिल्ह्यात २०२ मिलीमिटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान, मराठवाड्यातल्या मोठ्या अकरा प्रकल्पांमध्ये सद्यस्थितीत ३५ पूर्णांक २७ शतांश टक्के पाणी साठा शिल्लक असल्याची माहिती, गोदावरी मराठवाडा पाटबंधारे महामंडळानं दिली आहे.

***

अकोला जिल्ह्यात झालेल्या दमदार पावसामुळे काटेपूर्णा सिंचन प्रकल्पाच्या जलसाठ्यात बारा टक्क्याने वाढ झाली आहे. जिल्ह्यातल्या इतरही प्रकल्पाच्या पाणी पातळीत काही प्रमाणात वाढ झाली आहे.

***

कोरिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष दुहेरीत भारताच्या सात्विक साईराज रँकी रेड्डी  आणि चिराग शेट्टी यांच्या जोडीनं उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे.

 

//*************//

 

No comments:

Post a Comment