▼

Saturday, 22 July 2023

Text - आकाशवाणी औरंगाबाद , दिनांक : 22.07.2023 रोजीचे दुपारी 01.00 वाजताचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date : 22 July 2023

Time : 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक : २२ जूलै २०२३ दुपारी १.०० वा.

****

देशातल्या तरुण प्रतिभांना जास्तीत जास्त रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी, सरकार कटिबद्ध असल्याचं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. सरकारी विभाग आणि संस्थांमध्ये नव्यानं नियुक्त सत्तर हजारहून जास्त उमेदवारांना, आज पंतप्रधानांच्या हस्ते, दूरदृश्यप्रणालीच्या माध्यमातून, नियुक्तीपत्रांचं वाटप करण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते. देश विकासाच्या मार्गावर असताना, सरकारी कर्मचारी म्हणून काम करण्याची संधी मिळणं, हा युवकांसाठी मोठा सन्मान असल्याचं, ते म्हणाले. आज भारत अशा देशांपैकी एक आहे, जिथे बँकिंग क्षेत्र सर्वात मजबूत मानलं जातं, सरकारने २०१४ पासून, सरकारी बँकांचं व्यवस्थापन मजबूत केल्याचं, पंतप्रधान यावेळी म्हणाले.

देशात ४४ ठिकाणी रोजगार मेळावे घेण्यात आले.

औरंगाबाद इथं बीड वळण रस्त्यावर आय सी ए आय भवन या ठिकाणी, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते, नवनियुक्त उमेदवारांना नियुक्तीपत्रं प्रदान करण्यात आली. पुण्यात केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार, तर नागपूरमध्ये केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी, यांनी नवनियुक्त उमेदवारांना नियुक्तीपत्रं वाटप केली.

शासनामध्ये शासकीय अधिकाऱ्यांचे चुकीचे निर्णय लोकांना त्रास देतात, त्यामुळे वित्तीय परीक्षणासोबतच कामगिरीचं परीक्षण सुद्धा होणं आवश्यक असल्याचं, गडकरी यावेळी म्हणाले. पारदर्शकता, संवेदनशीलता, भ्रष्टाचार मुक्त प्रशासन, वेळ मर्यादित निर्णय प्रक्रिया, या गोष्टी युवकांनी आपल्या शासकीय सेवेमध्ये लक्षात ठेवाव्यात असं आवाहन त्यांनी केलं.

****

माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद औरंगाबादच्या दौर्यावर असून, त्यांचं सकाळी विमानतळावर आगमन झालं. विभागीय आयुक्त मधुकरराजे आर्दड आणि जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी त्यांचं स्वागत केलं. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या प्रवेशद्वाराचं उद्घाटन, आणि पद्म पुरस्कार प्राप्त मान्यवरांचा सन्मान, कोविंद यांच्या हस्ते होणार आहे. कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांच्या अध्यक्षतेखाली, विद्यापीठाच्या नाट्यगृहात आज सायंकाळी पाच वाजता, हा सोहळा होणार आहे.

****

औरंगाबाद जिल्ह्यात मतदार यादी अद्ययावतीकरणासाठी सुरू असलेला विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवून राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी निवडणूक यंत्रणेला सहकार्य करावं, असं आवाहन, जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी केलं आहे. या कार्यक्रमाच्या अनुषंगानं काल राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात झाली, त्यावेळी ते बोलत होते.

****

राज्यात अनेक ठिकाणी आजही पावसाचा जोर कायम आहे.

हवामान विभागानं रायगड जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट दिला असल्यानं, जिल्ह्यातल्या शाळा, महाविद्यालयांना आजही सुटी जाहीर करण्यात आली आहे. जिल्ह्यातल्या सर्वच नद्या दुथडी भरुन वाहत आहेत.

दरम्यान, जिल्ह्यातल्या इर्शाळवाडी इथं आज आणखी दोन मृतदेह सापडल्याचं वृत्त आहे. आता या घटनेतल्या मृतांची संख्या २४ झाली आहे.

 

बुलडाणा जिल्ह्यात काल रात्रीपासून पडणाऱ्या संततधार पावसामुळे नदी, ओढे यांना पूर आला आहे. संग्रामपूर तालुक्यातल्या आलेवाडी, बावनबीर या गावांचा पुराचं पाणी शिरल्यानं संपर्क तुटला आहे.

 

गोंदिया जिल्ह्यात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे पुजारीटोला धरणाच्या पाणीपातळीत वाढ होत असून, धरणाचे १३ दरवाजे आज उघडण्यात आले. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.

 

अमरावती जिल्ह्यातल्या अप्पर वर्धा धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू असल्यानं धरणात पाण्याची आवक वाढली आहे. त्यामुळे धरणाचे ११ दरवाजे आज उघडण्यात आले असून, एक हजार ३३५ घनमीटर प्रतिसेकंद वेगानं पाणी नदीपात्रात सोडलं जात आहे.

 

कोल्हापूर जिल्ह्यातही रात्रीपासून जोरदार पाऊस सुरू आहे. पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत झपाट्यानं वाढ होत आहे. राजाराम बंधाऱ्याची पाणीपातळी ३६ फूट इतकी नोंदली गेली असून, जिल्ह्यातले ७१ बंधारे पाण्याखाली गेले आहेत.

****

येत्या दोन दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि गुजरातमधे मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. जम्मू-कश्मीर, लडाख, गिलगीट, बाल्टीस्थान, मुज्जफराबाद, पंजाब, आणि उत्तर हरियाणामध्ये उद्या जोरदार पावसाची शक्यता आहे. हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पूर्व राजस्थान, केरळ, कर्नाटक, आंध्रप्रदेश किनारपट्टी, आणि तेलंगणामधे येत्या चार दिवसात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

****

कोरिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष दुहेरीत आज भारताच्या सात्विक साईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांच्या जोडीचा उपान्त्य फेरीतला सामना चीनच्या वी के लिआंग आणि चँग वँग या जोडीशी होणार आहे.

****

No comments:

Post a Comment