Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 22 July 2023
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २२ जुलै २०२३
सायंकाळी ६.१०
****
· तरुण प्रतिभावंतांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी, सरकार
कटिबद्ध-७० हजार तरुणांना नियुक्तीपत्र प्रदान कार्यक्रमात पंतप्रधानांचं प्रतिपादन.
· राज्याच्या अनेक भागात आजही जोरदार पावसामुळे अनेक जिल्ह्यात पूरस्थिती; शासकीय
यंत्रणेकडून बचावकार्य सुरू.
· हिंगोली जिल्ह्यातही अनेक गावांचा संपर्क तुटला.
आणि
· कोरिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय पुरुष जोडी अंतिम फेरीत दाखल.
****
देशातल्या तरुण प्रतिभांना जास्तीत जास्त
रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी, सरकार कटिबद्ध असल्याचं, पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. सरकारी विभाग आणि संस्थांमध्ये नव्यानं नियुक्त सत्तर
हजारहून जास्त उमेदवारांना,
आज पंतप्रधानांच्या हस्ते, दूरदृश्यप्रणालीच्या
माध्यमातून,
नियुक्तीपत्रांचं वाटप करण्यात आलं, त्यावेळी
ते बोलत होते. देश विकासाच्या मार्गावर असताना, सरकारी कर्मचारी म्हणून काम
करण्याची संधी मिळणं,
हा युवकांसाठी मोठा सन्मान असल्याचं, ते
म्हणाले.
दरम्यान, शासकीय नोकरी मिळण्याची
प्रक्रिया अत्यंत पारदर्शक आणि सुलभ झाल्याचं रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी
म्हटलं आहे. औरंगाबाद इथं नवनियुक्त उमेदवारांना नियुक्तीपत्रं प्रदान कार्यक्रमात
दानवे बोलत होते. नोकरीच्या माध्यमातून देशसेवा करण्याची संधी युवकांना मिळाली आहे, देशाला
विविध क्षेत्रात पुढे घेवून जाण्यासाठी या युवकांचं योगदान महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचं
दानवे यांनी नमूद केलं.
****
माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद आज सकाळी
औरंगाबाद इथं दोन दिवसांच्या दौऱ्यावर दाखल झाले आहेत. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा
विद्यापीठाच्या प्रवेशद्वार उद्घाटन आणि पद्म पुरस्कार प्राप्त मान्यवरांचा सन्मान
कोविंद यांच्या हस्ते आज होत आहे. पद्मभूषण डॉ.अशोक कुकडे आणि पद्मश्री डॉ.यु.म.पठाण, डॉ.प्रभाकर
मांडे, दादासाहेब इदाते,
रमेश पतंगे, गिरीश प्रभुणे, शब्बीर
सय्यद, ना.धो.महानोर,
कृषीतज्ज्ञ श्रीरंग देऊबा लाड यांचा गौरव यावेळी करण्यात येणार
आहे. दिवंगत पद्मश्री फातेमा झकेरिया आणि पद्मश्री डॉ.गंगाधर पानतावणे यांचा मरणोत्तर
गौरव करण्यात येणार असून,
हा सन्मान त्यांचे कुटूंबीय स्वीकारणार आहेत. विद्यापीठाच्या
नाट्यगृहात हा सन्मान सोहळा होत आहे.
****
राज्याच्या अनेक भागात आजही जोरदार पाऊस
झाल्याने पूरस्थिती निर्माण झाली आहे. विदर्भात यवतमाळ, बुलडाणा, वाशिमसह
अनेक जिल्ह्यात या पावसामुळे हजारो नागरिक प्रभावित झाले आहेत.
यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यात आनंदनगर
तांडा इथं पुराच्या वेढ्यात अडकलेल्या ४५ जणांना बाहेर काढण्यासाठी भारतीय वायूदलाचे
दोन हेलिकॉप्टर आणि यांत्रिक नावेची मदत घेतली जात आहे. जिल्हाधिकारी अमोल येडगे हे
बचाव कार्यावर लक्ष ठेऊन आहेत. जिल्ह्यात २३१ मिलीमीटर पावसाची नोंद झाल्याचं त्यांनी
सांगितलं. दरम्यान,
धनोडा, खडका आणि पेढी गावात अडकलेल्या ४० ग्रामस्थांना
आपत्ती प्रतिसाद दलाने सुखरूप बाहेर काढलं असून आर्णी तालुक्यातल्या कवठा बाजार इथं
पुरात अडकलेल्या दोघांनाही सुखरूप बाहेर काढण्यात आलं आहे.
जिल्ह्यात सर्वच ठिकाणी पूरस्थिती निर्माण
झाली असून अनेक मार्ग बंद पडले आहेत. वाघाडी नदीला आलेल्या पुरामुळे वाघाडी गावाला
पुराचा वेढा बसला असून गावातील अनेक घरांत पुराचं पाणी शिरलं आहे. बाभुळगाव तालुक्यातील
कोटंबा जवळचा पुल पाण्यात वाहून गेल्याने काही गावांचा संपर्क तुटला आहे.
****
बुलडाणा जिल्ह्यात आज दिवसभर पावसाची संतधार
सुरूच असल्याने जिल्ह्यातील संग्रामपूर आणि जळगाव-जामोद तालुक्यात मोठं नुकसान झालं
आहे. जळगाव-जामोद तालुक्यातील चावरा एलोरा, मानेगाव, वडशिंगी
आदींसह अनेक गावांमध्ये पुराचे पाणी शिरलं आहे तर संग्रामपूर तालुक्यात आलेवाडी, इटखेड, भोंन, वसाली
या सह अनेक गावात पावसाचे पाणी शिरल्याने काही गावांचा संपर्क तुटला आहे. जिल्हा यंत्रणे
कडून नागरिकांना पुराच्या बाहेर काढण्यासाठी आपत्ती दलाच्या पथकासह यशस्वी प्रयत्न
सुरू आहेत
****
वाशीम जिल्ह्यात काल रात्रीपासून सुरू असलेल्या
पावसाने आज सकाळपासून चांगलाच जोर धरला आहे. जिल्ह्यात सहा हजार हेक्टर पेक्षा अधिक
क्षेत्रावरील पिके धोक्यात आली असून जनजीवन विस्कळीत झालं आहे. हवामान खात्याने जिल्ह्यात
ऑरेंज अलर्ट घोषित केल्यामुळे मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त होत असून पुढील काही दिवस
पावसाचा जोर राहणार असल्याने प्रशासनाकडून काळजी घेण्याचे आवाहन नागरिकांना केले जात
आहे.
कारंजा तालुक्यासह जिल्ह्यातील बहुतांश भागात
आज २२ जुलै रोजी अतिवृष्टी झाल्याची माहिती आहे. नद्या, नाल्याना
पूर आले असून,
नद्यातील पाण्याचा प्रवाह शेतात घुसल्यामुळे शेकडो हेक्टरवरील
पिके खरडून गेली तर अनेकांच्या शेतात पाणी साचले आहे.
****
हिंगोली जिल्ह्यात मागच्या दोन दिवसांपासून
होत असलेल्या पावसामुळे नदी, नाले दुथडी भरून वाहत आहेत. आज सेनगाव तालुक्यात
गोरेगाव - कडोळी आणि कळमनुरी तालुक्यातल्या आखाडा बाळापूर- पिपंरी मार्गावरच्या गावांचा
पुरामुळे संपर्क तुटला. हिंगोली शहराजवळील कयाधू नदीचं पात्रही दुथडी भरून वाहत आहे, तर
औंढा नागनाथ तालुक्यात असोला शिवारात एक बंधारा वाहून गेला असून, हिंगोली
तालुक्यातल्या साटंबा शिवारात शेततळं फुटल्याने शेतीचं नुकसान झालं. वसमत तालुक्यातील
आसना नदीचे पाणी शेतात शिरल्याने नुकसान झाल्याचं आमच्या वार्ताहारानं कळवलं आहे.
****
नाशिक जिल्ह्यात अद्याप अपेक्षीत पाऊस झालेला
नाही, मात्र,
इगतपुरी, त्र्यंबक, पेठ, सुरगाणा
या तालुक्यात झालेल्या चांगल्या पावसामुळे तसच इगतपुरी तालुक्यात दारणा धरण क्षेत्रात
मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरु असल्याने, हे धरण ७५ पूर्णांक ८१ टक्के
इतकं भरलं आहे. दरम्यान,
आज सकाळपासून या धरणातून अकराशे दश लक्ष घन फुट प्रतिसेकंद इतक्या
वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. नाशिक जिल्ह्यातल्या २४ धरणांमधे सध्या
४३ पुर्णांक ४७ टक्के इतका साठा आहे.
****
आजादी का अमृत महोत्सव या उपक्रमाच्या समारोप
कार्यक्रमासंदर्भात केंद्रिय सांस्कृतिक कार्य मंत्रालयाच्या वतीने आज पूर्व तयारी
विषयी आढावा बैठक घेण्यात आली. केंद्रिय कॅबिनेट सचिव राजीव गौबा यांच्या अध्यक्षतेखाली
दूरदृश्य प्रणालीव्दारे झालेल्या या बैठकीत राज्याचे मुख्य सचिव मनोज सौनिक यांच्यासह
सर्व विभागाचे प्रधान सचिव या बैठकीला उपस्थित होते. आजादी का अमृतमहोत्सव या उपक्रमाचा
समारोप “मेरी माटी मेरा देश”,
मिट्टी को नमन, वीरों का वंदन, ही
संकल्पना घेऊन संपूर्ण देशभर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येणार आहे. मार्च २०२१
पासून सूरु झालेला या उपक्रमाचा ऑगस्ट २०२३ अखेर समारोप होणार आहे.
****
कोरिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय
जोडी सात्विक साईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी पुरुष दुहेरीच्या अंतिम फेरीत
प्रवेश केला आहे. चिराग आणि सात्विक जोडीनं आज झालेल्या उपान्त्य फेरीच्या लढतीत चीनी
जोडी वेई केंग लियांग आणि चांग वांग यांचा २१-१५ २४-२२ असा पराभव केला. उद्या पुरुष
दुहेरीच्या अंतिम सामन्यात भारतीय जोडीची लढत इंडोनेशियायी जोडीशी होणार आहे.
****
मणिपूर इथं होत असलेल्या महिला हिंसाचारांच्या
घटनेच्या निषेधार्थ औरंगाबाद शहर जिल्हा महिला काँग्रेस समिती आणि क्रांती युवा दल
यांनी औरंगाबाद शहरातल्या क्रांती चौक इथं आज निदर्शने केली. ही घटना संपूर्ण देशासाठी
लाजिरवाणी बाब आहे,
असं शहर जिल्हा अध्यक्ष दिपाली मिसाळ यांनी म्हटलं आहे. यावेळी
बहुसंख्य महिला आणि युवती या निदर्शन आंदोलनात सहभागी झाल्या होत्या.
****
हिंगोली जिल्ह्यातल्या वसमत इथल्या पूर्णा
सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी जयप्रकाश दांडेगावकर तर उपाध्यक्षपदी सुनील कदम
यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. आज झालेल्या या निवडणुकीत दांडेगावकर यांच्या
शेतकरी विकास पॅनलने २१ पैकी २१ जागा जिंकल्या आहेत. दांडेगावकर यांची ६ व्यांदा अध्यक्षपदी
निवड झाली आहे.
****
औरंगाबाद जिल्ह्यात मतदार यादी अद्ययावतीकरणासाठी
सुरू असलेला विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवून
राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी निवडणूक यंत्रणेला सहकार्य करावं, असं
आवाहन, जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी केलं आहे.
या कार्यक्रमाच्या अनुषंगानं काल राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक जिल्हाधिकारी
कार्यालयात झाली,
त्यावेळी ते बोलत होते.
****
No comments:
Post a Comment