▼

Saturday, 22 July 2023

Text - आकाशवाणी औरंगाबाद, दिनांक : 22.07.2023 रोजीचे सकाळी 07.10 वाजताचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date : 22 July 2023

Time : 7.10 AM to 7.25 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक : २२ जूलै  २०२३ सकाळी ७.१० मि.

****

ठळक बातम्या

·      पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत आज सत्तर हजारावर उमेदवारांना रोजगार मेळाव्यात नियुक्तीपत्रांचं वितरण

·      मणीपूर हिंसाचार मुद्यावरून संसदेचं कामकाज दुसऱ्या दिवशीही ठप्प;राज्य विधानसभेतून काँग्रेस सदस्यांचा सभात्याग 

·      दरड प्रवण भागातल्या नागरिकांचं सुरक्षितस्थळी कायमस्वरुपी पुनर्वसन करण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय 

·      महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात श्री सदस्यांच्या मृत्यूला सरकार जबाबदार-विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा आरोप

·      माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद आजपासून औरंगाबाद दौऱ्यावर 

·      राज्यात प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या;जालना, लातूर आणि परभणीला नवे जिल्हाधिकारी

·      औरंगाबाद विभागात एक जून पासून आतापर्यंत सरासरी २२९ मिली मीटर पावसाची नोंद

आणि

·      कोरिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय जोडी उपान्त्य फेरीत दाखल

सविस्तर बातम्या

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रोजगार मेळाव्यात, सरकारी विभाग आणि संस्थांमध्ये नव्यानं नियुक्त सत्तर हजारहून जास्त उमेदवारांना, दूरदृश्यप्रणालीच्या माध्यमातून, नियुक्तीपत्रं वाटणार आहेत. देशभरात चव्वेचाळीस ठिकाणी हे मेळावे होणार आहेत.

औरंगाबाद इथं बीड वळण रस्त्यावर आय सी ए आय भवन या ठिकाणी हा मेळावा होणार असून, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते नवनियुक्त उमेदवारांना नियुक्तीपत्रं देण्यात येणार आहेत. आयकर आयुक्त किरण देशपांडे यांनी ही माहिती दिली. रोजगार मेळावा हा रोजगार निर्मितीला सर्वोच्च प्राधान्य देण्याच्या वचनबद्धतेच्या पूर्ततेच्या दिशेनं एक पाऊल असून, हा मेळावा पुढील रोजगार निर्मितीमध्ये उत्प्रेरक म्हणून काम करेल, आणि तरुणांना त्यांच्या सक्षमीकरणासाठी आणि राष्ट्रीय विकासात सहभागासाठी अर्थपूर्ण संधी प्रदान करेल, अशी अपेक्षा असल्याचं, या बाबतच्या प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहे.

****

मणिपूर हिंसा प्रकरणावरून संसदेच्या दोन्ही सदनांचं कामकाज कालही बाधित झालं. सुरवातीला लोकसभेचं कामकाज बारा वाजेपर्यंत तर राज्यसभेचं काम दुपारी अडीच वाजेपर्यंत तहकूब करावं लागलं. बारा वाजता लोकसभेचं काम सुरू झाल्यावर, काँग्रेस, द्रमुक, संयुक्त जनता दल, शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि अन्य काही पक्षांचे सदस्य घोषणाबाजी करत सदनाच्या मधोमध पोचले. मणिपूर हिंसा प्रकरणी पंतप्रधानांनी स्पष्टीकरण द्यावं, अशी मागणी हे सदस्य करत होते. सरकार या मुद्द्यावर चर्चेला तयार असूनही विरोधी पक्ष सदनात यावर चर्चा होऊ देत नसल्याचा आरोप, संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी केला. लोकसभा अध्यक्षांनी वारंवार विनंती करूनही गोंधळ सुरूच राहिल्यानं त्यांना लोकसभेचं काम दिवसभरासाठी स्थगित करावं लागलं.

राज्यसभेचं कामकाज दुपारी अडीच वाजता सुरू झाल्यानंतरही विरोधकांच्या घोषणाबाजीमुळे लगेचच दिवसभरासाठी स्थगित करण्यात आलं. आता संसदेच्या दोन्ही सदनांचं कामकाज सोमवारी सकाळी अकरा वाजता सुरू होईल.

****


दरम्यान, राज्य विधानसभेत मणिपूर हिंसाचाराच्या मुद्यावर बोलण्याची परवानगी नाकारल्यानं काँग्रेसच्या सदस्यांनी सभात्याग केला. त्यानंतर विधिमंडळ परिसरात वार्ताहरांशी बोलताना, काँग्रेस नेते वर्षा गायकवाड, बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण, प्रणिती शिंदे यांनी केंद्र सरकारचा निषेध केला.

****

राज्यातल्या दरड प्रवण भागातल्या नागरिकांचं सुरक्षितस्थळी स्थलांतर करून त्यांचं कायमस्वरुपी पुनर्वसन करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल विधानसभेत आपल्या निवेदनातून ही माहिती दिली. रायगड जिल्ह्यातल्या इर्शाळवाडी दुर्घटनेबाबत काल मंत्रिमडळाच्या बैठकीत चर्चा झाली, ज्या ठिकाणी धोका आहे अशा दरड प्रवण क्षेत्रातल्या नागरिकांना तातडीनं सुरक्षित ठिकाणी हलवण्याचे निर्देश, या बैठकीत देण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.

या दुर्घटनेत २२ जणांचा मृत्यू झाला, मदतकार्यात पाऊस, चिखल आणि धुक्याचा मोठा अडथळा होता, मात्र तरीही एकशे नव्व्याण्णव लोकांना वाचवण्यात यश आल्याची माहिती, मुख्यमंत्र्यांनी दिली. मदत कार्यादरम्यान अग्निशमन दलाच्या एका जवानाचं निधन झाल्याबद्दल दु:ख व्यक्त करत, शासन त्यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी असल्याचं त्यांनी सांगितलं. या संकटाच्या वेळी सत्तापक्ष आणि विरोधी पक्षांनी मतभेद विसरून एकत्र प्रयत्न केले, याबाबत मुख्यमंत्र्यांनी समाधान व्यक्त केलं. दरम्यान, विकासाच्या नादात निसर्गाशी छेडछाड करण्याच्या प्रवृत्तीला आळा घालायला हवा, असं मत काँग्रेस नेते नाना पटोले यांनी यासंदर्भात विधानसभेत बोलताना व्यक्त केलं.

****

महाराष्ट्र भूषण पुरस्कार कार्यक्रमादरम्यान झालेली घटना ही दुर्देवी असून, या घटनेच्या संदर्भातली वस्तुस्थिती तपासण्याकरता स्थापन केलेल्या समितीला एक महिन्याची मुदतवाढ दिली आहे, अशी माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी काल विधान परिषदेत दिली. सदस्य भाई जगताप यांनी यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता.

दरम्यान, या सोहळ्यात झालेल्या दुर्घटनेला सांस्कृतिक विभागाइतकंच गृह खातंही जबाबदार असून, या घटनेतल्या श्री सदस्यांच्या मृत्यूला सरकार जबाबदार असल्याचा गंभीर आरोप, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे. ते काल विधान परिषदेत बोलत होते. या संदर्भात गठीत समितीचा अहवाल प्रकाशित झाल्यानंतर गृहमंत्र्यांनी उत्तर देणं अपेक्षित होतं, असंही दानवे यांनी म्हटलं आहे. सरकारने रुग्णवाहिका, तसंच वैद्यकीय पथकांचं कार्यक्रमस्थळी नियोजन केलं होतं, तर घटनेवेळी या यंत्रणा कुठे होत्या असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

****

राज्यात अनधिकृतपणे सुरू असलेल्या सहाशे एकसष्ट खाजगी शाळांवर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू असून, या शाळांमधल्या विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ दिलं जाणार नाही, असं शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी काल विधानसभेत सांगितलं. यासंदर्भात हरिभाऊ बागडे, आशिष शेलार, अतुल भातखळकर यांच्यासह अन्य सदस्यांनी प्रश्न केला होता.

****

कन्नडचे आमदार उदयसिंग राजपूत यांनी औरंगाबाद इथल्या आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेच्या घोटाळ्यासंदर्भात सभागृहात माहिती दिली. या पतसंस्थेत अनेकांच्या ठेवी अडकल्या असून, शासनाने दखल घेण्याची मागणी त्यांनी केली.  

****

सामान्य भविष्य निर्वाह निधीचा तपशील आता ऑनलाईन पाहता येणार आहे. भविष्य निर्वाह निधीचं २०२२-२३ चं वार्षिक लेखा विवरण सेवार्थ डॉट महाकोष डॉट जीओव्ही डॉट इन या संकेतस्थळावर कर्मचाऱ्यांसाठी उपलब्ध करुन देण्यात आलं असून, त्याची प्रत्यक्ष प्रत देणं थांबवल्याची माहिती महालेखाकार कार्यालयानं दिली आहे.

****

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या, मोदी आडनाव मानहानी प्रकरणी गुजरात उच्च न्यायालयानं सुनावलेल्या शिक्षेला स्थगिती द्यावी, अशी मागणी करणाऱ्या याचिकेवर काल सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. न्यायालयानं यासंदर्भात तक्रारदार पूर्णेश मोदी, गुजरात सरकार आणि इतर प्रतिवादींना नोटीस बजावली असून, याप्रकरणी पुढची सुनावणी येत्या चार ऑगस्टला होणार आहे.

****


माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद आजपासून औरंगाबाद इथं दोन दिवसांच्या दौऱ्यावर येत आहेत. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या प्रवेशद्वार उद्घाटन आणि पद्म पुरस्कार प्राप्त मान्यवरांचा सन्मान कोविंद यांच्या हस्ते होणार आहे. पद्मभूषण डॉ.अशोक कुकडे आणि पद्मश्री डॉ.यु.म.पठाण, डॉ.प्रभाकर मांडे, दादासाहेब इदाते, रमेश पतंगे, गिरीश प्रमुणे, शब्बीर सय्यद, ना.धो.महानोर, कृषीतज्ज्ञ श्रीरंग देऊबा लाड यांचा गौरव यावेळी करण्यात येणार आहे. तसंच दिवंगत पद्मश्री फातेमा झकेरिया आणि पद्मश्री डॉ.गंगाधर पानतावणे यांचा मरणोत्तर गौरव करण्यात येणार असून, हा सन्मान त्यांचे कुटूंबीय स्वीकारणार आहेत. कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांच्या अध्यक्षतेखाली विद्यापीठाच्या नाटयगृहात आज सायंकाळी पाच वाजता हा सोहळा होणार आहे. दरम्यान, डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्राच्या इमारतीच्या उद्घाटनाचा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला असल्याची माहिती कुलसचिव डॉ. भगवान साखळे यांनी दिली आहे.

****

राज्यातल्या अनेक प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. यामध्ये जालन्याचे जिल्हाधिकारी विजय राठोड यांची, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे सह मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून, लातूरचे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी पी यांची, नागपूर स्मार्ट सिटीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी बदली झाली आहे. परभणीच्या जिल्हाधिकारी आंचल गोयल यांची, नागपूर महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त पदी, तर नंदूरबार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आर के गावडे यांची, परभणीच्या जिल्हाधिकारी पदी बदली झाली आहे.

नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांची लातूर जिल्हाधिकारीपदी, यवतमाळ जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ श्रीकृष्णनाथ पांचाळ यांची जालना जिल्हाधिकारी पदी, लातूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिवन गोयल यांची धुळे जिल्हाधिकारी पदावर बदली झाली आहे. नंदूरबारच्या सहायक जिल्हाधिकारी मीलन करणवाल यांची नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी, तर गोंदियाचे सहायक जिल्हाधिकारी अनमोल सागर यांची, लातूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी, बदली करण्यात आली आहे.

****

औरंगाबाद विभागात एक जून पासून आतापर्यंत २२९ मिलीमीटर पावसाची नोंद झाली असल्याची माहिती विभागीय आयुक्त कार्यालयानं दिली आहे. पावसाचं प्रमाण यंदा सरासरीपेक्षा कमी असून ८८ पूर्णांक आठ टक्केच पाऊस पडला आहे. यामध्ये उस्मानाबाद जिल्ह्यात सर्वाधिक कमी १६८ मिलीमीटर पाऊस झाला आहे. तर नांदेड जिल्ह्यात सर्वाधिक ३२७ मिलीमीटर पाऊस झाला आहे. हिंगोली जिल्ह्यात २७७, लातूर २४१, परभणी २०८, जालना २०४ आणि औरंगाबाद जिल्ह्यात २०२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.

दरम्यान, मराठवाड्यातील मोठ्या अकरा प्रकल्पांमध्ये सद्सस्थितीत ३५ पूर्णांक २७ शतांश टक्के पाणी साठा शिल्लक असल्याची माहिती जलसंपदा विभागाच्या गोदावरी मराठवाडा पाटबंधारे महामंडळानं दिली आहे.

****

नांदेड जिल्ह्यातल्या मुखेड मधील तारदरवाडी इथला तलाव अतिवृष्टीमुळे काल फुटला. याठिकाणी प्रशासनातर्फे खबरदारी घेण्यात आली असून आपत्ती निवारण दल तैनात करण्यात आलं आहे.

दरम्यान, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी काल देगलूर, मुखेड तालुक्यात अतिवृष्टी झालेल्या गावांना भेट देऊन पाहणी केली. जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी गावकरी आणि शेतकऱ्यांना धीर देत प्रशासन नागरिकांच्या सोबत असल्याचं सांगितलं.

****

नाशिक जिल्ह्यात इगतपुरी तालुक्यातल्या कावनई किल्ल्याचा काही भाग काल दुपारी कोसळल्यानं परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. या भागात असलेल्या दोन घरांतल्या नागरिकांना अन्यत्र हलवण्यात आलं असून, सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

****

भारत आणि वेस्ट इंडिज दरम्यान त्रिनिदाद इथं सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या कालच्या दुसऱ्या दिवस अखेर वेस्ट इंडिजच्या पहिल्या डावात एक बाद ८६ धावा झाल्या. तत्पूर्वी भारताचा पहिला डाव ४३८ धावांवर संपुष्टात आला. विराट कोहलीनं १२१, रोहीत शर्मानं ८०, रविंद्र जडेजानं ६१, तर रविचंद्रन अश्विननं ५६ धावा केल्या. भारत सध्या ३५२ धावांनी आघाडीवर आहे. 

****

कोरिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या सात्विक साईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांच्या जोडीनं उपान्त्य फेरीत प्रवेश केला आहे. काल झालेल्या सामन्यात या जोडीने जपानी जोडीचा २१ - १४, २१ - १७ असा पराभव केला.

****

औरंगाबाद महानगरपालिकेच्या हद्दीतल्या धर्मादाय आयुक्तांची परवानगी घेतलेल्या शैक्षणिक संस्थाना लागू करण्यात आलेल्या करातून सूट देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय महानगरपालिकेचे प्रशासक जी. श्रीकांत यांनी घेतला आहे. काल झालेल्या शैक्षणिक संस्थाचालकांच्या उपस्थितीत हा निर्णय जाहीर करण्यात आला. महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाच्या शिष्टमंडळानं यासंदर्भात श्रीकांत यांना यासंदर्भात मागणी केली होती.

****

उस्मानाबाद जिल्ह्यात 'अन्नपूर्णा स्वस्थ बालक माता पाककृती अभियान राबवण्यात येत आहे. जिल्ह्यातल्या कुपोषित बालकांना सामान्य श्रेणीत आणण्यासाठी सुयोग्य आहाराबद्दल जनजागृती व्हावी, या दृष्टीनं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं आठवड्याभरासाठी पाककृती निश्चित करून, त्या पाककृतींचं प्रशिक्षण मातांना आणि अंगणवाडी सेविकांना देणं, तसंच हे पदार्थ आहारात समाविष्ट करण्याचं महत्त्व त्यांना समजावून देणं, असं या अभियानाचं स्वरूप आहे.

****

जैन साधू आचार्य कामकुमारनंदी महाराज यांचं अपहरण करून हत्या केल्याच्या निषेधार्थ, हिंगोली इथं जैन समाजाच्या वतीनं, काल जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. अशा घटना यापुढे घडू नयेत, यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशा मागणीचं निवेदन यावेळी जिल्हा प्रशासनाला तसंच जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपती आणि पंतप्रधानांनाही पाठवण्यात आलं.

****

वन्य प्राण्यांच्या उपद्रवानं पिकांची नासाडी होत असून, या प्राण्यांचा बंदोबस्त करावा, या आणि इतर मागण्यांसाठी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं हिंगोली इथल्या विभागीय वन अधिकारी कार्यालयावर, काल शेती बचाओ एल्गार मोर्चा काढण्यात आला.

****

सुरत - चेन्नई ग्रीनफिल्ड महामार्गाकरता उस्मानाबाद जिल्ह्यातल्या परंडा आणि तुळजापूर तालुक्यातल्या एकूण बत्तीस गावात भूसंपादनाची प्रक्रिया सुरू असून, दोन्ही तालुक्यांचा संयुक्त मोजणी अहवाल तहसील कार्यालय, तलाठी कार्यालय आणि ग्रामपंचायत कार्यालयात दर्शनी भागात लावण्यात आला आहे. यासंबंधी काही आक्षेप असल्यास संबंधित भूधारकांनी येत्या अठ्ठावीस तारखेपर्यंत लेखी आक्षेप अर्ज करण्यास सांगण्यात आलं आहे.

****

यंदाच्या खरीप हंगामासाठी एक रुपयात पीक विमा भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. बीड जिल्ह्यातल्या जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी ही प्रक्रिया पूर्ण करावी, असं आवाहन बीड जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी केलं आहे. शेवटच्या दिवशी होणारी गर्दी किंवा संभाव्य तांत्रिक अडचण टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी वेळेआधी ही प्रक्रिया पूर्ण करावी, असं त्यांनी म्हटलं आहे.

****

लातूर जिल्ह्यातल्या सूक्ष्म आणि लघु उद्योग घटकांसाठीच्या उत्कृष्ट उद्योजकता पुरस्काराकरता अर्ज करण्याचं आवाहन जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापकांनी केलं आहे. येत्या एकतीस तारखेपर्यंत यासाठी अर्ज करता येणार आहेत. २०२०, २१ आणि २२ या तीन वर्षांच्या पुरस्कारांसाठी हे अर्ज करता येणार आहेत.

****

लहान मुलांच्या लसीकरणासाठी शासनानं सुरू केलेल्या यू विन, या ॲपचा उस्मानाबाद जिल्ह्यातल्या पालकांनी लाभ घ्यावा, असं आवाहन, जिल्हा प्रजनन आणि बाल आरोग्य अधिकारी डॉ. कुलदीप मिटकरी यांनी केलं आहे.

****

No comments:

Post a Comment