आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
२१ ऑगस्ट २०२३ सकाळी ११.०० वाजता
****
केंद्र सरकारने कांदा निर्यातीच्या शुल्कात ४० टक्के वाढ केल्याच्या
निर्णयाविरोधात नाशिक मधल्या बाजार समित्यांमध्ये आज लाक्षणिक बंद पुकारण्यात आला आहे.
तर नाशिक जिल्हा कांदा उत्पादक संघटनेच्या बैठकीत आज कांदा लिलाव बंद ठेवण्याचा निर्णय
घेण्यात आला आहे. नाशिकसह राज्यातल्या कांद्याचे कंटेनर हे निर्यातीसाठी निघालेले आहेत
त्यांच्याबाबत शुल्काचा काय निर्णय होणार, तसंच शुल्कासंदर्भातल्या अन्य स्पष्टीकरणासाठी हा बंद पाळण्यात येणार असल्याचं
याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
अहमदनगर जिल्ह्यातल्या बाजार समित्या देखील हा बंदला पाठिंबा
देत असल्याचं किसान सभेचे अध्यक्ष डॉ. अजित नवले यांनी सांगितलं आहे.
दरम्यान, कांदा निर्यात शुल्क
वाढवल्यामुळे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सरकारवर टीका केली
आहे. एकीकडे कापसाचं आयात शुल्क कमी करता आणि कांद्याचं निर्यात शुल्क वाढवता, म्हणजे हा देश शेतकर्यांचा आहे की कारखानदारांचा असा प्रश्न
त्यांनी उपस्थित केला.
****
उत्तर प्रदेशातल्या वाराणसी इथं चार दिवस चाललेल्या युथ समिट
20 चा काल समारोप झाला. यावेळी वाय-20 मसुदा एकमतानं स्विकारण्यात आला. या बैठकांमध्ये सहभागी झालेल्या
आंतरराष्ट्रीय प्रतिनिधींनी वाय-20 मसुद्यात पाच महत्वाच्या
संकल्पनांवर विचार विनिमय केला. त्यानंतर या मसुदयावर स्वाक्षऱ्या करुन तो स्विकारल्याचं घोषित करण्यात आलं.
****
पुण्यात काल मेरी माटी मेरा देश उपक्रमाची सांगता पालकमंत्री
चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत झाली. देशाविषयी नागरिकांच्या मनात अभिमानाची भावना
असणं गरजेचं आहे. आपल्या देशाचा वैभवशाली इतिहास आणि संस्कृती लोकांना ज्ञात करुन देणं, हे देशाच्या ऐक्यासाठी अत्यावश्यक असून, त्यासाठीच मेरी माटी मेरा देश उपक्रम राबवण्यात आला, असं ते यावेळी म्हणाले. या उपक्रमाअंतर्गत, पुण्यात ३३ हजार नागरिकांनी पंचप्रण शपथ घेतली, तसंच सुमारे ११ हजार वृक्षांची लागवड करण्यात आली.
****
अकोला तसंच वाशीम जिल्ह्यात काल रिमझिम पाऊस झाला. बुलडाणा जिल्ह्यातल्या
सर्वच तालुक्यांमध्ये संततधार पाऊस झाला.
गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरु असलेल्या
रिमझिम पावसामुळे वैनगंगा नदीच्या जलसाठ्यात मोठी वाढ झाली आहे.
****
No comments:
Post a Comment