Tuesday, 1 August 2023

Text - आकाशवाणी औरंगाबाद, दिनांक : 01.08.2023, रोजीचे सकाळी: 11.00, वाजताचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

 आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

०१ ऑगस्ट २०२ सकाळी ११.०० वाजता

****

ठाणे जिल्ह्यात शहापूर जवळील खुटाळी गावाजवळ समृद्धी महामार्गाच्या पुलावर गर्डर टाकण्याचं काम सुरू असताना क्रेन आणि गर्डर कोसळळून झालेल्या दुर्घटनेतल्या मृतांची संख्या १७ झाली आहे. यामध्ये पाच साईट इंजिनियर आणि १२ कामगारांचा समावेश आहे. यात तीन जण जखमी झाले असून, त्यांच्यावर ठाणे इथल्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल दु:ख व्यक्त केलं असून, पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी दोन लाख, तर जखमींना ५० हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील या घटनेबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे. मुख्यमंत्री सहायता निधीतून मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाख रुपये मदत जाहीर केली आहे. या अपघाताची चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी संबंधित अधिकार्यांना दिले आहेत.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुणे दौऱ्यावर असून, काही वेळापूर्वी त्यांचं पुणे विमानतळावर आगमन झालं. राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचं स्वागत केलं. पंतप्रधानांना आज लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार आहे. पुणे मेट्रोच्या पूर्ण झालेल्या दुसऱ्या टप्प्याचं उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे.

****

थोर स्वातंत्र्यसेनानी लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज त्यांना अभिवादन करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट संदेशाच्या माध्यमातून लोकमान्य टिळकांना आदरांजली वाहिली आहे.

समाज सुधारक साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची आज जयंती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केलं.

****

दौंड - निझामाबाद ही रेल्वे येत्या सहा ऑगस्ट पर्यंत मुदखेड - निझामाबाद दरम्यान तर निझामाबाद - पंढरपूर ही गाडी येत्या सात ऑगस्ट पर्यंत निझामाबाद ते मुदखेड दरम्यान अंशतः रद्द करण्यात आली आहे. दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड जनसंपर्क कार्यालयाकडून ही माहिती कळवण्यात आली आहे.

//*************//

No comments:

Post a Comment