Wednesday, 2 August 2023

TEXT - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 02.08.2023 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजताचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 02 August 2023

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ०२ ऑगस्ट २०२३ सायंकाळी ६.१०

****

·      औरंगजेबाचे गौरवगान करुन दोन समुदायात तेढ निर्माण करण्याच्या प्रकरणाबद्दल सखोल चौकशी करणार - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती.

·      जनतेच्या प्रश्नांवर उपाययोजना करण्यात राज्य शासन अपयशी – विधानपरिषदेतले विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांची टीका.

·      मणिपूरमधली परिस्थिती सुरळीत करण्यासाठी राष्ट्रपतींनी हस्तक्षेप करण्याची विरोधी पक्षांची मागणी.

आणि

·      औरंगाबाद शहर पाणीपुरवठा योजनेचं काम गतीनं करण्याची विभागीय आयुक्त मधुकरराजे आर्दड यांची सूचना.

****

औरंगजेबाचे गौरवगान करून दोन समुदायामध्ये तेढ निर्माण करण्याच्या प्रकाराबद्दल सखोल चौकशी करण्यात येईल, तसंच गरज पडल्यास विशेष चौकशी समिती स्थापन केली जाईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली. नितेश राणे यांनी याबाबत मागणी केली होती. प्रकाश आंबेडकर यांच्या औरगजेबाच्या कबरीवर जाण्याला आपला विरोध नसून जाती धर्मात तेढ निर्माण करणं हा गुन्हा आहे असं अबू आझमी यांनी विचारलेल्या एका प्रश्नावर बोलताना फडणवीस म्हणाले.

****

 

राज्यातल्या जनतेच्या प्रश्नांवर उपाययोजन करण्यात राज्य शासन अपयशी ठरत असल्याची टीका विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली आहे. या मुद्यावर विरोधी पक्षांतर्फे सभागृहाबाहेर अभियान राबवणार असल्याचं त्यांनी आज पत्रकारांशी बोलताना सांगितलं.

****

काँग्रेस पक्षाच्या बाळासाहेब थोरात यांनी विधानसभेत मांडलेला संभाजी भिडे यांच्या वक्तव्यावरील स्थगन प्रस्ताव अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी अमान्य केला. भिडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांच्या आवाजाचा नमुना घेतला जात आहे. त्यानंतर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात दिली. कोणालाही राष्ट्रपुरुषांबद्दल आक्षेपार्ह बोलता येणार नाही. त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल देखील आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्या शिदोरी या मासिकावर गुन्हा दाखल करण्यात येईल असं फडणवीस यांनी सांगितलं. काँग्रेस पक्षाच्या यशोमती ठाकूर आणि पृथ्वीराज चव्हाण यांना पूर्ण संरक्षण दिलं जाईल आणि धमकी देणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल असंही ते याबाबत उत्तर देताना म्हणाले.

****

पालघर जिल्ह्यातील बुलेट ट्रेन आणि बडोदा एक्स्प्रेस महामार्ग यासाठी जमीन अधिग्रहण करण्यामध्ये झालेला गैरव्यवहार आणि त्यासंबंधी तक्रारी यांच्या चौकशीसाठी विशेष चौकशी समिती स्थापन करण्याची घोषणा महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात दिली. मनिषा चौधरी यांनी हा प्रश्न उपस्थित केला होता. ही चौकशी करताना संबधित आमदारांनाही बोलावलं जाईल, हा चौकशी अहवाल महिनाभरात घेऊन पुढील कारवाई केली जाईल, असंही ते म्हणाले.

****

मनोरा आमदार निवासाच्या इमारतींचं भूमिपूजन उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते होणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज सभागृहात ही माहिती दिली. यात चाळीस मजले आणि अठ्ठावीस मजले असलेल्या दोन इमारती बांधल्या जातील. प्रत्येकी एक हजार फुटांचं घर आमदारांना उपलब्ध करून दिलं जाईल, असं त्यांनी सांगितलं.

****

समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघातांबाबत स्थगन प्रस्ताव विरोधी पक्ष सदस्यांनी दिला होता. या महामार्गावर अनेक अपघात होत आहेत, काल झालेला अपघात गंभीर आहे. हा रस्ता तातडीनं बंद करून त्यावर तज्ज्ञाची समिती स्थापन करून उपाययोजना कराव्यात अशी मागणी विरोधी पक्षाच्या सदस्यांनी केली होती. अध्यक्षांनी त्याला अनुमती नाकारली.

****

मणिपूरमधली परिस्थिती सुरळीत करण्यासाठी राष्ट्रपतींनी हस्तक्षेप करावा, अशी मागणी विरोधी पक्षांनी केली आहे. इंडिया आघाडीच्या शिष्टमंडळानं आज राष्ट्रपती

द्रौपदी मुर्मू यांची भेट घेऊन मणीपूरमधल्या स्थितीबाबत त्यांना माहिती दिली. त्यानंतर काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांनी बातमीदारांशी बोलताना ही माहिती दिली. इंडिया आघाडीच्या शिष्टमंडळानं २९ आणि ३० जुलैला मणीपूरचा दौरा केला. त्यावेळी जे पाहिलं, ते राष्ट्रपतींसमोर मांडलं, असं ते म्हणाले. मणिपूरप्रश्नी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत निवेदन करावं, या मागणीबाबतही या शिष्टमंडळानं राष्ट्रपतींकडे निवेदन दिलं आहे. त्यावर योग्य कार्यवाही करण्याचं आश्वासन राष्ट्रपतींनी दिलं, असं खरगे यांनी सांगितलं.

****

मणिपूर हिंसाचाराच्या मुद्यावरुन झालेल्या गोंधळामुळं आजही लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करावं लागलं. पंतप्रधानांनी निवेदन द्यावं अशी मागणी करत द्रमुक, तृणमूल, संयुक्त जनता दल या पक्षांच्या खासदारांनी हौद्यात उतरुन घोषणा दिल्या. या गोंधळातच प्रश्नोत्तरांचा तास सुरु करण्याचे प्रयत्न पीठासीन अधिकाऱ्यांनी केले पण गदारोळ सुरुच राहिल्यानं सभागृहाचं कामकाज आधी दुपारी दोन वाजेपर्यंत आणि नंतर दिवसभरासाठी स्थगित करण्यात आलं. राज्यसभेत अध्यक्ष जगदीप धनखड यांनी विरोधकांना मणिपूर हिंसाचारावर स्थगन प्रस्ताव मांडायला परवानगी नाकारली. सदनात निवेदन करणं हा पंतप्रधानांचा विशेषाधिकार असल्यामुळे त्यांना सदनात येण्याचे आदेश अध्यक्ष देऊ शकत नाहीत असं त्यांनी स्पष्ट केलं.

****

 

महिलांच्या नेतृत्वाखालील विकासाचा दृष्टकोन हा महिला सक्षमीकरणाचा सर्वात प्रभावी मार्ग असल्याचं पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं आहे. ते गांधीनगर इथं महिला सक्षमीकरणाच्या जी-२० मंत्रीस्तरीय बैठकीच्या उद्घाटन सत्राच्या वेळी बोलत होते. महिलांच्या विकासात येणारे अडथळे दूर करण्याचं आवाहनही त्यांनी यावेळी केलं. पंतप्रधान मोदी यांनी सर्व क्षेत्रात महिलांच्या समान संधीच्या आवश्यकतेवर भर दिला. सहकार क्षेत्रात विशेषत: दुग्धव्यावसायातल्या महिलांच्या योगदानाचं पंतप्रधान मोदी यांनी यावेळी स्मरण करुन बचत गटाच्या माध्यमातून महिलांचं एकत्रीकरण हे परिवर्तनाचं एक शक्तीशाली माध्यम असल्याचं त्यांनी सांगितलं.

****

भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या आकडेवारीनुसार गेल्या पाच वर्षात राज्यातील दूध उत्पादनात तीन हजार दोनशे दोन हजार टन इतकी वाढ झाली आहे. २०२१-२२ यावर्षी राज्यात चौदा हजार तीनशे हजार टन इतके दूध उत्पादन झाले आहे. दरम्यान, दुध उत्पादनात वाढ होण्यासाठी देशातल्या सर्व जिल्ह्यात राष्ट्रीय गोकुळ अभियान राबवण्यात येत आहे. यासाठी राज्यांना सोळा गोकुळ आणि दोन राष्ट्रीय कामधेनू प्रजनन केंद्रांच्या स्थापनेसाठी निधी जारी करण्यात आला असल्याचं कृषी विभागातर्फे सांगण्यात आलं आहे.

****

उपराष्ट्रपती जगदीप धनखड परवा- शुक्रवारी नागपूरमध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या शतक महोत्सवी समारंभात सहभागी होतील. तसंच, रेशीमबागेतल्या कविवर्य सुरेश भट सांस्कृतिक केंद्रालाही ते भेट देणार आहेत. त्यानंतर, उपराष्ट्रपती राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमीत, ‘प्राणिती ह्या भारतीय महसूल सेवा विभागाच्या प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांसाठीच्या कार्यक्रमाचं उद्घाटन करतील.

****

मुंबईतल्या टाटा मेमोरियल सेंटरतर्फे सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सहकार्यानं सुरू करण्यात आलेला सर्वांसाठी परवडणाऱ्या दरात कर्करोग उपचार केंद्रहा प्रकल्प राज्यात सर्व जिल्ह्यांमध्ये सुरू करण्यात येणार आहे. या संबंधी अधिकृत घोषणा या केंद्राचे संचालक डॉ. राजेंद्र बडवे यांनी नुकत्याच झालेल्या कार्यशाळेत केली. हा प्रकल्प जून २०१६ मध्ये सहा जिल्ह्यांमध्ये प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यात आला होता.

****

ख्यातनाम कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांच्या अकस्मात मृत्यूबद्दल हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्यांचा अकस्मात मृत्यू वेदनादायी आहे. त्यांच्या जाण्यानं एक व्यापक कलादृष्टी असलेला संवेदनशील प्रतिभावंत आपण गमावला आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मराठी सर्जनशीलतेची छाप उमटवणाऱ्याचं असं जाणं अपेक्षित नव्हतं, असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. चित्रपट आणि कला क्षेत्रात अतिशय बहुमूल्य योगदान त्यांनी दिलं आणि त्यासाठी अनेक पुरस्कारांनी त्यांचा गौरव झाला, असं नमूद करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. नितीन देसाई यांच्या आत्महत्येची बातमी ऐकून धक्का बसला, असं नमूद करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

****

औरंगाबाद विभागीय आयुक्त मधुकरराजे आर्दड यांनी आज शहर पाणीपुरवठा योजनेची पाहणी केली. त्यांनी यावेळी जायकवाडी धरणातल्या उद्भव विहीरीच्या सुरू असलेल्या कामाला भेट देऊन पाणीपुरवठा योजनेचा आढावा घेतला. शहर पाणीपुरवठा योजनेचं काम गतीनं करतांना कोणत्याही अडचणी येणार नाहीत याची दक्षता घेण्यासोबतच दर्जेदार आणि गतीनं काम करा, असे निर्देश त्यांनी यंत्रणेला दिले. याबाबत आपण सातत्यानं आढावा घेऊन वेळोवळी पाहणी करणार असल्याचंही विभागीय आयुक्त आर्दड म्हणाले.

****

नांदेड जिल्ह्यातल्या सांडपाणी आणि घनकचरा व्यवस्थापनाचं उदिष्‍ट असलेल्या तीनशे अठ्ठावीस गावांमधली अपूर्ण कामं २४ ऑगस्ट पर्यंत पूर्ण करावी असे निर्देश जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि प्रशासक मीनल करनवाल यांनी दिले आहेत.

****

No comments:

Post a Comment