Wednesday, 2 August 2023

Text - आकाशवाणी औरंगाबाद, दिनांक : 02.08.2023, रोजीचे सकाळी : 07.10, वाजताचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 02 August 2023

Time 7.10 AM to 7.25 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०२ ऑगस्ट २०२३ सकाळी ७.१० मि.

****

·      ४१ वा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुण्यात समारंभपूर्वक प्रदान

·      स्वातंत्र्यसेनानी लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त तसंच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांना सर्वत्र अभिवादन

·      विधान सभेच्या विरोधी पक्षनेतेपदासाठी काँग्रेसकडून माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांची शिफारस

·      विरोधी पक्षांनी दाखल केलेल्या अविश्वास प्रस्तावावर येत्या आठ तारखेपासून संसदेत चर्चा सुरू होणार

·      अमृत भारत स्थानक योजनेअंतर्गत उस्मानाबाद, लातूरसह सोलापूर विभागातल्या १५ रेल्वेस्थानकांचा विकास

आणि

·      वेस्ट इंडिज विरुद्धची एकदिवसीय क्रिकेट मालिका भारतानं दोन - एकनं जिंकली

****

४१ वा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुण्यात समारंभपूर्वक प्रदान करण्यात आला. पुणेरी पगडी, लोकमान्य टिळक वापरत होते तसं उपरणं, मानपत्र, स्मृतिचिन्ह आणि एक लाख रुपये असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. पुण्यात एस पी महाविद्यालयात हा कार्यक्रम झाला. यावेळी बोलताना पंतप्रधानांनी, आपण लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार देशवासियांना समर्पित करत असल्याचं, आणि पुरस्काराची रक्कम नमामि गंगा परियोजनेसाठी देत असल्याचं जाहीर केलं. लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी तसंच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांनी त्यांच्या कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख करत, त्यांना अभिवादन केलं. थेट लोकमान्यांशी निगडित स्थानी, त्यांच्याशी निगडित संस्थेचा पुरस्कार मिळणं, हे आपलं भाग्य असल्याची भावना पंतप्रधानांनी व्यक्त केली. ते म्हणाले...

‘‘मला पुण्याच्या या पावन भूमीवर येण्याची संधी मिळाली, हे माझे भाग्य आहे. ये पुण्यभूमी छत्रपती शिवाजी महाराज की धरती है. ये चापेकर बंधुओं की पवित्र धरती है. इस धरती से ज्योतिबा फुले, सावित्री बाई फुले की प्रेरणाएं और आदर्श जुडे हैं. साथियो आज पुणे में आप सब के बीच मुझे जो सम्मान मिला है. ये मेरे जीवन का एक अविस्मरणीय अनुभव है. जो जगह, जो संस्था सीधे तिलकजी से जुडी रही हो, उसके द्वारा लोकमान्य तिलक नेशनल अवार्ड मिलना, मेरे लिए सौभाग्य की बात है.’’

या समारंभाला राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरु दीपक टिळक, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

या पुरस्कारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची निवड केल्याबद्दल मुख्यमंत्री शिंदे यांनी टिळक स्मारक मंदिर ट्रस्टचे आभार मानले. लोकमान्य टिळकांप्रमाणेच, पंतप्रधानांनी गेल्या नऊ वर्षात केलेल्या कामांना देखील लोकमान्यता मिळाल्याचं त्यांनी नमूद केलं. शरद पवार यांनी यावेळी केलेल्या भाषणात, स्वातंत्र्य प्राप्तीसाठी लोकमान्य टिळकांनी केलेल्या कार्याचा गौरव केला.

तत्पूर्वी पंतप्रधानांनी काल सकाळी पुण्यात दाखल झाल्यावर, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची पूजा करून दर्शन घेतलं. पुण्यातल्या विविध विकासकामांचं लोकार्पण तसंच काही नवीन विकासकामांचं भूमिपूजनही त्यांच्या हस्ते झालं. यामध्ये पुणे मेट्रोच्या पूर्ण झालेल्या दुसऱ्या टप्प्याचं लोकार्पण, आणि पुणे महानगर पालिका, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका, यांनी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत बांधलेल्या दहा हजाराहून जास्त घरांचं हस्तांतरण, कचऱ्यातून ऊर्जा या प्रकल्पाचं उद्घाटन, या विकासकामांचा समावेश आहे. या वेळी लाभार्थ्यांना पंतप्रधानांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरुपात घरांची किल्ली सोपवण्यात आली.

****

थोर स्वातंत्र्यसेनानी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त तसंच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त काल त्यांना सर्वत्र अभिवादन करण्यात आलं.

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विधानभवनात लोकमान्यांच्या अर्धाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन आदरांजली वाहिली. कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा आणि मुंबई भाजप अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनीही मुंबईत गिरगाव चौपाटी इथं लोकमान्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं.

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे तिनाव्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, पुणे शहरातल्या सारसबाग इथल्या त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी मंत्रालयात अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं.

औरंगाबाद इथं अण्णाभाऊ साठे तसंच लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यासाठी विविध पक्षसंघटना तसंच नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

****

औरंगाबाद इथल्या, एकशे तीन वर्षांची परंपरा लाभलेल्या बलवंत वाचनालयात लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती आणि वाचनालयाचा एकशे तीनवा वर्धापनदिन यानिमित्त विशेष कार्यक्रम घेण्यात आला. वाचनालयातल्या अमूल्य ग्रंथसंपदेचा वाचकांनी लाभ घ्यावा, असं आवाहन या कार्यक्रमाचे आणि बलवंत वाचनालयाचे अध्यक्ष विपीनकुमार बाकलीवाल यांनी केलं.

****

काँग्रेस पक्षानं, विधान सभेच्या विरोधी पक्षनेतेपदासाठी माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांची शिफारस केली आहे. अजित पवार गट सरकारमध्ये गेल्यानंतर विरोधी पक्षनेते पद संख्याबळानुसार काँग्रेसकडे गेलं. त्यानुसार या पदासाठी काँग्रेस पक्षानं काल वडेट्टीवार यांच्या नावाची घोषणा केली. या आधी २०१९ मध्ये वडेट्टीवार यांच्याकडे विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी होती.

****

नागपूर - मुंबई समृद्धी महामार्गावर सोमवारी मध्यरात्री ठाणे जिल्ह्यात झालेल्या अपघातातल्या मृतांची संख्या २० झाली आहे. तर तीन जण जखमी आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल संध्याकाळी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. भविष्यात अशा प्रकारच्या घटना होऊ नयेत, याची काळजी घेण्याबाबत सूचना देण्यात आल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. पुलावर गर्डर टाकण्याच्या वेळी क्रेन कोसळून हा अपघात झाला. अपघातातल्या मृतांच्या कुटूंबाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्येकी दोन लाख रुपये तर राज्य सरकारने प्रत्येकी पाच लाख रुपये मदत जाहीर केली आहे. जखमींना पंतप्रधानांनी प्रत्येकी ५० हजार रुपये मदत जाहीर केली असून, मुख्यमंत्र्यांनी जखमींवर शासकीय खर्चाने उपचार करण्याची सूचना केली आहे.

****

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाद्वारे गेल्या तेरा महिन्यांत बारा हजारपेक्षा जास्त रुग्णांना ९८ कोटी ९८ लाखांची मदत वितरीत करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत गरजू रुग्णांना गंभीर आणि महागड्या शस्त्रक्रियांसाठी थेट अर्थसहाय्य मिळत असल्यानं आणि संबंधित रुग्णांचे प्राण वाचत असल्यानं जास्तीत गरजू रुग्णांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असं आवाहन मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाच्या वतीनं करण्यात आलं आहे.

****

विरोधी पक्षांनी केंद्र सरकारविरुद्ध दाखल केलेल्या अविश्वास प्रस्तावावर येत्या आठ तारखेपासून संसदेत चर्चा सुरू होणार असून, पंतप्रधान या प्रस्तावावर येत्या दहा तारखेला उत्तर देण्याची शक्यता आहे. बिजू जनता दलानं या अविश्वास प्रस्तावाला विरोध करण्याचा निर्णय घेतला आहे.

दरम्यान, मणिपूर हिंसेच्या मुद्द्यावरून संसदेच्या दोन्ही सदनांचं कामकाज कालही प्रभावित झालं. या गदारोळातच लोकसभेत राष्ट्रीय राजधानी क्षेत्र दिल्ली सुधारणा विधेयक २०२३ मांडण्यात आलं. या विधेयकामुळे दिल्ली सरकारच्या कामकाजासंबंधी कायदे करण्याचा अधिकार केंद्र सरकारला मिळणार आहे. या संदर्भातला अध्यादेश सरकारनं या आधीच आणला आहे. या विधेयकाला काँग्रेससह इतर विरोधी पक्षांनी विरोध केला, तर, बिजू जनता दलानं या विधेयकाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. बिजू जनता दलाच्या या निर्णयामुळे राज्यसभेत हे विधेयक पारित होण्यासाठी केंद्र सरकारला मदत होणार आहे.

दरम्यान, राज्यसभेनं काल दुपारच्या सत्रात बहु राज्य सहकारी संस्था सुधारणा विधेयक २०२३ पारित केलं. तर लोकसभेनं अनुसूचित जाती आदेश घटना दुरुस्ती विधेयक मंजूर केलं.

****

कृषी पायाभूत सुविधा निधीअंतर्गत महाराष्ट्राला सुमारे साडे आठ हजार कोटी रुपये निधी देण्यात आला आहे. केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी काल लोकसभेत ही माहिती दिली. या अतंर्गत प्राथमिक प्रक्रिया केंद्र, गोदामं, शीतगृह तसंच शीत वाहतुक यंत्रणा, वर्गीकरण केंद्र, आदी पायाभूत सुविधांसाठी कर्ज दिलं जातं.

दरम्यान, पंतप्रधान कृषी सिंचन योजनेअंतर्गत महाराष्ट्रासाठी दोन हजार २६५ कोटी रुपयांचा, तर २०२२-२३ या वर्षात पर ड्रॉप मोअर क्रॉप या योजनेअंतर्गत ३३४ कोटी रुपये निधी जारी करण्यात आल्याचं तोमर यांनी सांगितलं.

****

राज्यात काल महसूल दिन साजरा करण्यात आला. मुंबईत राज्यस्तरीय महसूल दिन आणि महसूल सप्ताहाचा शुभारंभ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाला. यावेळी त्यांनी सर्व विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांशी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधला. महसूल सप्ताह महसूल विभागापुरता मर्यादित न ठेवता, सर्व विभागांना सहभागी करुन यशस्वी करावा आणि सप्ताहाच्या निमित्तानं सर्वसामान्य नागरिकांची कामं गतीने पूर्ण करावीत, असं आवाहन पवार यांनी यावेळी केलं.

महसूल विभाग अधिक लोकाभिमुख करण्याचा उद्देशानं महसूल सप्ताह साजरा करण्यात येत असल्याचं, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी यावेळी सांगितलं.

नांदेड इथं यानिमित्त झालेल्या कार्यक्रमात उत्कृष्ट कार्याबद्दल महसूल विभागातल्या कर्मचाऱ्यांना पुरस्कार देण्यात आले, तसंच सहा अनुकंपाधारकांना, प्रातिनिधिक स्वरूपात नियुक्ती आदेश देण्यात आले. जिल्हा प्रशासनाच्या लोकाभिमुख सेवेचा मुख्य चेहरा म्हणून महसूल प्रशासनाकडेच पाहिलं जातं, असं प्रतिपादन नांदेडचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी यावेळी केलं.

लातूर इथं महसूल विभागानं जिल्ह्यातल्या सगळ्या आजी आणि माजी सैनिक, हुतात्मा सैनिकांच्या वीरपत्नी, वीरमाता, वीरपिता आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी, ‘सैनिक हो तुमच्यासाठी’, या उपक्रमाचं आयोजन केलं आहे. येत्या पाच तारखेला सकाळी अकरा वाजता तहसील कार्यालयांमध्ये हा कार्यक्रम होणार आहे.

****

केंद्र सरकारच्या अमृत भारत स्थानक योजनेअंतर्गत उस्मानाबाद आणि लातूरसह सोलापूर विभागातल्या एकूण १५ रेल्वेस्थानकांचा विकास करण्यात येणार आहे. येत्या सहा तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून या विकासकामांचं उद्घाटन होणार आहे. उस्मानाबाद रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासाठी २१ कोटी रुपयांचा निधी मिळाला असल्याची माहिती आमदार राणा जगजीतसिंह पाटील यांनी दिली. दरम्यान ही स्थानकं कशा पद्धतीनं विकसित करावीत याबाबत रेल्वे विभागानं नागरिकांकडून सूचना मागवल्या आहेत. नागरिकांनी आपल्या सूचना उद्या तीन तारखेपर्यंत drm office2011@gmail.com या जी मेल आयडी वर पाठवाव्यात असं आवाहन रेल्वे विभागानं केलं आहे.

****

वेस्ट इंडिज विरुद्धची एकदिवसीय क्रिकेट मालिका भारतानं दोन - एकनं जिंकली आहे. या मालिकेतल्या काल त्रिनिदाद इथं झालेल्या शेवटच्या सामन्यात भारतानं वेस्ट इंडिजवर २०० धावांनी विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करत भारतीय संघानं दिलेल्या ३५२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजचा संघ ३६व्या षटकात सर्वबाद झाला. शार्दूल ठाकुरनं चार, मुकेश कुमारनं तीन, कुलदीप यादवनं दोन, तर जयदेव उनाडकटनं एक गडी बाद केला. दोन्ही संघादरम्यान उद्यापासून पाच टी -ट्वेंटी सामन्यांची मालिका खेळली जाणार आहे.  

****

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या सांगतेनिमित्त देशभरात अमृत कलश यात्रा काढण्यात येणार आहे. ही यात्रा देशाच्या कानाकोपऱ्यातून सात हजार पाचशे कलशांमध्ये माती तसंच विविध रोपं घेऊन दिल्लीत पोहोचेल. राष्ट्रीय युद्ध स्मारकाजवळ कलशातली माती आणि झाडांचा उपयोग करत, ‘अमृत वाटिका निर्माण करण्यात येईल. या उपक्रमासाठी लातूर जिल्हा परिषदेनं एक मोबाईल ॲप तयार केलं असून, जास्तीत जास्त नागरिकांनी या ॲपचा वापर करावा, असं आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर यांनी केलं आहे.

****

नांदेड जिल्ह्यात मुखेड तालुक्यातल्या सकनूर इथं दोन युवकांचा वीजेच्या धक्कयामुळे मृत्यू झाला, तर दोन जण गंभीर जखमी झाले. काल रात्रीच्या सुमारास हे चार मित्र सकनूर इथल्या पाझर तलावावर खेकडे पकडायला जात असताना तळ्यालगतच्या शेतपिकांचं रक्षण करण्यासाठी असलेल्या तारेच्या कुंपणातल्या वीज प्रवाहामुळे त्यांना वीजेचा धक्का लागून ही दुर्घटना घडली. संभाजी नागरवाड आणि शिवाजी सुरुमवाड अशी मृतांची नावं आहेत.

****

भाजप युवा मोर्चाचे हिंगोली जिल्हाध्यक्ष पप्पू चव्हाण यांच्यावर काल दोन हल्लेखोरांनी गोळीबार केला. हिंगोली जिल्हा परिषदेच्या आवारात काल दुपारी ही घटना घडली. चव्हाण यांच्या पाठीत एक गोळी लागल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं. त्यांना नांदेडच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

****

बीड जिल्ह्यातल्या परळी वैजनाथ इथं आज संत रोहिदास चर्मोद्योग आणि चर्मकार विकास महामंडळातर्फे मार्गदर्शन महामेळावा आयोजित करण्यात आला आहे. चर्मकार समाजासाठी राबवल्या जाणाऱ्या विविध योजनांची माहिती देण्यासाठी या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं असून, बीड जिल्ह्यातल्या चर्मकार युवक युवतींनी या मेळाव्याचा लाभ घ्यावा, असं आवाहन या मंडळाच्या जिल्हा व्यवस्थापक संगिता पराते यांनी केलं आहे.

****

राष्ट्रीय समाज पक्ष महाराष्ट्रात लोकसभेच्या सर्वच्या सर्व ४८ जागा लढवणार आहे. पक्षाचे अध्यक्ष आमदार महादेव जानकर यांनी काल सिंधुदूर्ग जिल्ह्यात कुडाळ इथं ही माहिती दिली.

****

No comments:

Post a Comment