Wednesday, 2 August 2023

Text - आकाशवाणी औरंगाबाद, दिनांक : 02.08.2023, रोजीचे सकाळी: 11.00, वाजताचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

 आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

०२ ऑगस्ट २०२ सकाळी ११.०० वाजता

****

राज्यघटनेतील कलम ३७० रद्द करण्याला आव्हान देणाऱ्या अनेक याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात आजपासून सुनावणी सुरू होणार आहे. सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील पाच न्यायाधीशांचं खंडपीठ या याचिकांवर दररोज सुनावणी करणार आहे.

****

वित्तमंत्री निर्मला सीतारामन च्या अध्यक्षतेखाली आज वस्तू आणि सेवा कर-जीएसटी परिषदेची बैठक होणार आहे. यात ऑनलाईन गेमिंग आणि घोड्यांच्या शर्यती, कॅसिनो वर २८ टक्के कर लावण्यासाठीच्या पद्धतीना अंतिम रुप देण्यात येण्याची शक्यता आहे.

****

गेल्या वर्षापेक्षा या वर्षी १६ टक्क्यांनी अधिक प्राप्तीकर विवरणपत्र दाखल झाली आहेत. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळातर्फे देण्यात आलेल्या माहितीनुसार यंदा ३१ जुलै पर्यंत असलेल्या मुदतीमध्ये सहा कोटी ७७ लाखांहून अधिक प्राप्तीकर विवरणपत्र दाखल झाली आहेत. 

****

नामवंत कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी आत्महत्या केली आहे. त्यांनी कर्जतमधील आपल्या एन. डी. स्टुडीओमध्ये आत्महत्या केल्याचं काही वेळापुर्वी स्पष्ट झालं.

****

येत्या २४ तासात कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या घाटमाध्यांवर, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडक़डाटासह मुसळधार पाऊस, पडेल असा अंदाज  हवामान विभागानं व्यक्त केला आहे.

****

महाराष्ट्र राज्य खादी आणि ग्रामोद्योग मंडळामार्फत मध केंद्र योजना संपूर्ण राज्यात लागू करण्यात आली असून योजनेच्या लाभांसाठी व्यक्ती आणि संस्थांनी अर्ज करावेत असं आवाहन मंडळानं केलं आहे. या योजनेत मध उद्योगाचं मोफत प्रशिक्षण, साहित्य स्वरुपात ५० टक्के अनुदान मिळणार असून ५० टक्के स्वगुंतवणूक करणं आवश्यक आहे.

****

नंदूरबार जिल्ह्यात पावसाची टक्केवारी कमी असून टंचाईची परिस्थिती निर्माण झाल्यास पेयजलास सर्वेाच्च प्राधान्य देण्यात यावं तसंच टंचाईवर मात करण्यासाठी प्रत्येक यंत्रणेनं सुक्ष्म नियोजन करावं, अशा सूचना पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी आज दिल्या आहेत. त्यांच्या उपस्थितीमध्ये नंदुरबार इथं टंचाई आढावा बैठक झाली, त्यावेळी गावित बोलत होते.

 

//*************//

No comments:

Post a Comment