Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 20 August 2023
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २० ऑगस्ट
२०२३ सायंकाळी ६.१०
****
· भारताचं चांद्रयान चंद्राच्या दक्षिण ध्रुवापासून अवघ्या १३४ किलोमीटर अंतरावर, बुधवारी
सायंकाळी चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणार.
· राज्याच्या पहिल्या महाराष्ट्र उद्योग पुरस्कारांचं मुंबईत वितरण, अदर
पुनावाला यांना उद्योगमित्र पुरस्कार प्रदान.
· दहीहंडीतील गोविंदा पथकांना राज्य सरकारकडून मिळणार विमा संरक्षण, दहा
लाखापर्यंत मिळणार आर्थिक मदत.
· गंगापूर इथं होणाऱ्या ४३ व्या मराठवाडा साहित्य संमेलन अध्यक्षपदी डॉ. जगदीश कदम
यांची एकमताने निवड,
लेखिका साहित्य संमेलन जानेवारीमध्ये हिंगोलीत होणार.
आणि
· आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र आणि खगोलभौतिकी ऑलिंपियाड स्पर्धेत भारताला दुसरा क्रमांक, चार
सुवर्ण आणि एक रौप्य पदक पटकावलं.
****
भारताच्या चंद्रमोहिमेतील चांद्रयान - तीनच्या
अंतराळ यानाचा भाग अर्थात लँडर चंद्राच्या पृष्ठभागावर उतरवण्यासाठी भारतीय अंतराळ
संशोधन संस्था-इस्त्रोनं ते आवश्यक असणाऱ्या कक्षेत पोहचवलं आहे. यासंदर्भातली दुसरी
प्रक्रिया आज पहाटे यशस्वीरित्या पार पडली. इस्त्रोतर्फे जारी करण्यात आलेल्या माहितीनुसार, चंद्रयान-तीन
येत्या बुधवारी २३ ऑगस्टला संध्याकाळी सहा वाजून चार मिनिटांनी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर
उतरणार आहे. ही ऐतिहासिक घटना इस्त्रोचं संकेतस्थळ आणि यु-ट्युब चॅनल तसंच फेसबुकवरील
पेज यासह दूरदर्शनच्या राष्ट्रीय वाहिनीवरून थेट प्रसारीत करण्यात येणार आहे.
आता हे यान आणि चंद्र यांच्यातील सरासरी
कमाल अंतर १३४ किलोमीटर इतकं असल्याचं इस्त्रोच्या माहितीत सांगण्यात आलं आहे. यान
सुस्थितीत असल्याचं इस्रोतर्फे सांगण्यात आलं असून यान जेव्हा
दक्षिण ध्रुवाजवळ चंद्रावर उतरेल तेव्हा ही कामगिरी करणारा भारत हा पहिला देश ठरणार
आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवापर्यंत अद्याप कोणत्याही देशाला यशस्वीपणे पोहोचता आलेलं
नाही. दरम्यान,
रशियाचं लुना - २५ हे यान दक्षिण ध्रुवाजवळ उतरताना अपघातग्रस्त
झालं. त्यामुळे रशियाची ही मोहीम अपयशी ठरली आहे.
****
राज्याच्या पहिल्या महाराष्ट्र उद्योग पुरस्कारांचं
आज मुंबईत झालेल्या सोहळ्यात राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते वितरण
झालं.
सिरम इन्स्टिट्यूटचे अदर पुनावाला यांना
उद्योगमित्र पुरस्कार,
किर्लोस्कर समूहाच्या गौरी किर्लोस्कर यांना उद्योगिनी पुरस्कार
आणि विलास शिंदे यांना उत्कृष्ट मराठी उद्योजक पुरस्कार प्रदान करण्यात आला. रोख रक्कम, सन्मानचिन्ह
आणि मानपत्र असं या पुरस्कारांचं स्वरुप आहे.
या पुरस्काराअंतर्गतचा राज्याचा पहिला उद्योग
रत्न पुरस्कार काल ज्येष्ठ उद्योजक रतन टाटा यांना त्यांच्या निवासस्थानी मुख्यमंत्री
आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रदान केला गेला होता. त्यानंतर टाटा ट्रस्टचे अध्यक्ष
चंद्रशेखरन यांना पुरस्काराचं सन्मानचिन्ह आज प्रदान केलं गेलं.
महाराष्ट्र भूषण पुरस्काराच्या धर्तीवर राज्य
शासनानं यंदाच्या वर्षापासून या पुरस्काराला सुरुवात केली आहे.
****
लडाखमध्ये काल संध्याकाळी भारतीय सैन्य दलाचा
एक ट्रक खोल दरीत कोसळून झालेल्या अपघातात नऊ सैनिक हुतात्मा झाले तर एक सैनिक गंभीर
जखमी झाला. अपघाताबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड
आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. दरम्यान, या
अपघातात शहीद झालेल्या जवानांमध्ये सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्याच्या राजाळे इथल्या
वैभव संपतराव भोईटे यांचा समावेश आहे.
****
वर्ष २०२४ साठी दिल्या जाणाऱ्या बाल शक्ती
पुरस्कार आणि बाल कल्याण या पुरस्कारांसाठी केंद्र शासनातर्फे अर्ज मागवण्यात येत आहेत.
www.awards.gov.in
या संकेतस्थळामार्फत ऑनलाईन पद्धतीनं या ३१ ऑगस्ट पर्यंत हे
अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत.
वय वर्ष पाचपेक्षा अधिक ते १८ वर्षापर्यंतच्या
ज्या मुलांनी शिक्षण,
कला,
सांस्कृतिक कार्य, खेळ नावीण्यपूर्ण शोध, सामाजिक
कार्य आणि शौर्य अशा क्षेत्रात विशेष उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे त्यांना बाल शक्ती
पुरस्कार दिला जातो. तर,
मुलांच्या विकास, संरक्षण आणि कल्याण या क्षेत्रात
कोणत्याही प्रकारचे वेतन अथवा मानधन न घेता मानसेवी उदात्त भावनेतून किमान सात वर्ष
काम करणाऱ्या व्यक्तिस तसंच बाल कल्याण क्षेत्रात किमान दहा वर्षे सातत्यपूर्ण उत्कृष्ट
अपवादात्मक कार्य करणाऱ्या आणि पूर्णतः निधीवर अवलंबून नसणाऱ्या संस्थेला बाल कल्याण
पुरस्कार प्रदान करण्यात येतो.
****
दहीहंडीसह प्रो-गोविंदा लीग मानवी मनोरे
रचण्याच्या स्पर्धेत सहभाग घेणाऱ्या अर्थात गोविंदा आणि गोपिकांना विमा संरक्षण देण्याची
मागणी मान्य झाली असून तसा शासननिर्णय क्रीडा विभागातर्फे जारी करण्यात आला आहे. हा
साहस प्रकार असल्यानं तो सादर करताना अनेकदा गोविंदांना अपघात होतात, रुग्णालयात
दाखल करून वैद्यकीय उपचारांची गरज पडते. प्रसंगी गोविंदांचा मृत्यूही ओढवतो. अशा परिस्थितीत
गोविंदांना विमा संरक्षण देण्याची मागणी अनेक वर्षांपासून होत होती.
काही दिवसांपूर्वी मुंबई, ठाण्यातील
गोविंदा पथकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन गोविंदा पथकांना विमा संरक्षण
देण्याची मागणी केली होती. त्याद्वारे क्रीडामंत्री संजय बनसोडे यांनी हा शासन निर्णय
पारित केला आहे. या विमा योजनेंतर्गत दहा लाख रुपयांपर्यंत मदतीची तरतुद करण्यात आली
आहे.
****
गंगापूर इथं येत्या दोन ते चार डिसेंबर दरम्यान
आयोजित ४३ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ कवी, कथा-कादंबरीकार
डॉ. जगदीश कदम यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. मराठवाडा साहित्य परिषदेच्या कार्यकारिणीची
बैठक आज परिषदेचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार
पडली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
मसापच्या अध्यक्षपदी निवड झालेले ज्येष्ठ
साहित्यिक जगदीश कदम यांचे रास आणि गोंडर, झाडमाती, नामदेव
शेतकरी, गाव हाकेच्या अंतरावर हे कवितासंग्रह प्रसिद्ध झाले आहेत. मुडदे, आखर, मुक्क्याला
फुटले पाय हे कदम यांचे कथासंग्रह आहेत. बुडत्याचे पाय खोलात, वडगाव
लाईव्ह ही नाटकं,
कादंबरी तसेच चरित्रग्रंथ, ललितलेख, समिक्षा
ग्रंथ, व्यक्तिचित्रे असं विपूल लेखन कदम यांनी केलं आहे.
दरम्यान, नववं लेखिका साहित्य
संमेलन हिंगोली इथं घेण्याचा निर्णयही आजच्या बैठकीत घेण्यात आला. स्व. वामनराव देशमुख
बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, हिंगोली या संस्थेनं लेखिका संमेलनाचं निमंत्रण
मसापला दिलं होतं. त्यानुसार जानेवारी २०२४ मध्ये हे संमेलन हिंगोलीत घेतलं जाणार आहे.
तर मराठवाडा साहित्य परिषदेच्या वर्धापनदिनाचा कार्यक्रम येत्या ३० सप्टेंबर रोजी देगलूर
इथं घेण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला.
****
जालना इथल्या उर्मी ट्रस्टच्या वतीनं दरवर्षी
देण्यात येणारा कविता गौरव पुरस्कारासाठी यंदा कविवर्य प्राचार्य जयराम खेडेकर यांना जाहीर झाला आहे. तर याच संस्थेतर्फे दरवर्षी दिला जाणारा
जीवनगौरव पुरस्कार यंदा डॉ. दादा गोरे यांना त्यांच्या समग्र वाङ्मयीन कार्यासाठी जाहीर
झाला आहे. उर्मीच्याच वर्ष २०२२ च्या गोदावरी राज्य काव्य पुरस्कारासाठी माजलगावच्या
कवयित्री कविता बोरगावकर यांची, तर वर्ष २०२३ च्या पुरस्कारासाठी
कवयित्री सीमा पाटील,
केजकर यांची निवड करण्यात आली आहे. या संस्थेचा विविध क्षेत्रातील
उल्लेखनीय कार्यासाठीचा वर्ष २०२३ चा जीवनगौरव पुरस्कार आरोग्य क्षेत्रातील सेवेबद्दल
जगन्नाथराव खंडागळे यांना जाहीर झाला आहे. येत्या २८ ऑक्टोबर रोजी जालन्यातील अग्रसेन
भवन इथं हे पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान केले जाणार आहेत.
****
केंद्र शासनाच्या सेवेला नऊ वर्ष पूर्ण झाल्या
निमित्तानं हिंगोली जिल्ह्यात औंढा इथं मल्टीमीडिया चित्र प्रदर्शन भरवण्यात आलं आहे.
भक्त निवास क्रमांक दोनमध्ये भरवलेलं हे प्रदर्शन २२ तारखेपर्यंत चालणार आहे. गेल्या
नऊ वर्षाच्या कालखंडात केंद्र सरकारने केलेल्या विकास कामाची माहिती घेण्यासाठी नागरिकांनी
प्रदर्शनास भेट द्यावी असं आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केलं आहे .
****
आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र आणि खगोलभौतिकी
ऑलिंपियाड स्पर्धेत भारतानं चार सुवर्ण आणि एक रौप्य पदक जिंकून दुसरं स्थान पटकावलं
आहे. पोलंडच्या चोरझॉफ इथं दहा ऑगस्टपासून सुरू असलेल्या या ऑल्म्पिआडचा आज समारोप
झाला. यात महाराष्ट्रातल्या नागपूरच्या आकर्ष राज सहय याच्यासह राजस्थानातील कोटाच्या
राजदीप मिश्रा,
आंध्र प्रदेशातील कुर्नूलच्या कोडूरु तेजेश्वर आणि पश्चिम बंगालमधील
कोलकाताच्या मोहम्मद साहिल अख्तर या चौघांनी सुवर्ण पदक मिळवलं. तसंच कर्नाटकातल्या
बंगरुळूच्या सैनवनीत मुकुंद यानं रौप्य पदक मिळवलं. स्पर्धेत युनायटेड किंगडमनं पाच
सुवर्णपदकं मिळवून आघाडीचं स्थान घेतलं. पन्नास देशांमधून २३६ विद्यार्थ्यांनी यात
सहभाग नोंदवला.
****
येत्या दोन दिवसात कोकणात बहुतांश ठिकाणीतर
मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा
अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी वीजांच्या कडकडाटासह मुसळधार
पावसाचा इशाराही हवामान विभागानं दिला आहे.अकोला जिल्ह्यात आज सकाळपासूनच रिमझिम पाऊस
पडत आहे.वाशीममध्येही रिमझिम पाऊस सुरु आहे. बुलढाणा जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये
पावसाची संततधार सुरू आहे.
गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यात गेल्या दोन
दिवसांपासून सुरु असलेल्या रिमझिम पावसामुळे वैनगंगा नदीच्या जलसाठ्यात मोठी वाढ झाली
आहे. मध्य प्रदेशातल्या संजय सरोवर धरणाचे पाच दरवाजे उघडण्यात आल्यानंसुद्धा वैनगंगा
नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली. त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून खबरदारी म्हणून गोसीखुर्द
धरणाचे ३३ दरवाजे अर्ध्या मिटरनं उघडण्यात आले आहेत.
****
No comments:
Post a Comment