Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 21 August 2023
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २१ ऑगस्ट
२०२३ सायंकाळी ६.१०
****
· देशाच्या आणि समाजाच्या विकासासाठी महिलांचं सक्षमीकरण आवश्यक - राष्ट्रपतींचं
प्रतिपादन.
· कांदा प्रश्नी केंद्र सरकारशी चर्चा करून राज्य सरकार तोडगा काढणार.
· नागपूर मुंबई समृद्धी महामार्गावर रील्स किंवा छायाचित्र काढण्यास मनाई.
आणि
· आशिया चषक क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय संघ जाहीर.
****
देशाच्या आणि समाजाच्या विकासासाठी महिलांचं
सक्षमीकरण आवश्यक असल्याचं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं आहे. सैनिक
पत्नी कल्याण संघटनेनं घेतलेल्या अस्मिता कार्यक्रमात त्या बोलत होत्या. देशात महिलांची
संख्या ५० टक्के इतकी असून त्या देशाच्या विकासाच्या वाटचालीत महत्त्वाची भूमिका बजावू
शकतात. पुरुषांच्या मदतीविना स्त्रिया स्वतःच्या बळावर झुंजून प्रगती करून दाखवू शकतात, असे
गौरवोद्गारही मुर्मू यांनी यावेळी काढले. प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एका स्त्रीचा
हात असतो, या म्हणीऐवजी आता प्रत्येक यशस्वी पुरुषाला एका स्त्रीची साथ असते अशी म्हण प्रचलित
व्हायला हवी,
असं मत मुर्मू यांनी यावेळी मांडलं. काही जुन्या चालीरीती मोडीत
काढून नव्या संकल्पना स्वीकारणं आवश्यक असल्याचं राष्ट्रपती यावेळी म्हणाल्या. राष्ट्रपतींनी
या प्रसंगी सर्व वीर महिलांविषयी कृतज्ञता व्यक्त केली. या कार्यक्रमादरम्यान गौरवण्यात
आलेल्या वीर महिलांचं आणि त्यांच्या कल्याणासाठी झटणाऱ्या संघटनेचं त्यांनी विशेष कौतुक
केलं.
****
राज्यसभेच्या नऊ नवनिर्वाचित सदस्यांनी आज
सदस्यत्वाची शपथ घेतली. यामध्ये परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्यासह तृणमूल काँग्रेसचे
डेरेक ओ ब्रायन,
सुखेंदू शेखर रॉय आदी मान्यवरांचा समावेश
आहे. राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांनी संसद भवनात या सर्वांना सदस्यत्वाची शपथ दिली.
****
कांदा प्रश्नी केंद्राशी चर्चा करून राज्य
सरकार तोडगा काढणार असल्याची ग्वाही सार्वजनिक बांधकाम उपक्रम मंत्री तथा नाशिकचे पालकमंत्री
दादा भुसे यांनी दिली. ते आज नाशिक इथं बोलत होते. याआधी कांद्याचे दर क्विंटलमागे
३०० ते ४०० पर्यंत खाली आले होते. त्यावेळी राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहिले.आताही
नागरिकांना कांदा मुबलक उपलब्ध होईल आणि शेतकऱ्यांना योग्य दर मिळेल, असा
तोडगा काढला जाईल असं आश्वासन भुसे यांनी यावेळी दिलं.
दरम्यान, कांद्याच्या निर्यात
शुल्कात वाढ केल्याच्या निषेधार्थ गेल्या दोन दिवसांपासून कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी
काही बाजार समित्यांमध्ये लाक्षणिक बंद पुकारला असून, कांदा
लिलाव बंद ठेवण्यात आला आहे.
नाशिक जिल्ह्यात पिंपळगाव बसवंत, विंचूर
यासह काही बाजार समितीमध्ये कांद्याचे किरकोळ लिलाव झाले मात्र बहुतांशी ठिकाणी लिलाव
बंद होते. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली व्यापारी आणि सर्वपक्षीय नेत्यांनी
आज दिंडोरी तालुक्यातल्या वणी इथं रस्ता रोको आंदोलन केलं. येवला इथं येवला कृषी उत्पन्न
बाजार समिती जवळ मनमाड मार्गावर शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केलं तर जिल्ह्यात
ठिकठिकाणी तहसीलदारांना निवेदनं देण्यात येत आली.
चांदवड तालुक्यात माजी आमदार शिरीष कोतवाल
यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदारांनी निर्यात शुल्क कमी करावे यासाठी निवेदन देण्यात
आले तर नाशिक मध्ये स्वराज्य पक्षाचे करण गायकर यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी
गळ्यात कांद्याच्या माळा घालून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं.
अहमदनगर जिल्ह्यातल्या बाजार समित्या देखील
या बंदला पाठिंबा देत असल्याचं किसान सभेचे अध्यक्ष डॉ. अजित नवले यांनी सांगितलं आहे.
****
****
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे ‘एकनिष्ठतेची
मोहीम'
राबवण्यात येत आहे. या एकनिष्ठतेच्या मोहिमेत सहभागी होण्यासाठी
सदस्याला 70
30 12 00 12 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन वैयक्तिक माहिती नोंदवायची आहे.
यानंतर सदस्याची नोंद होऊन अधिकृत डिजीटल कार्ड जारी होईल. ही एकनिष्ठतेची मोहीम गाव
पातळीपासून ते राज्य पातळीपर्यंत राबवण्यात येत आहे.
****
चांद्रयान-३ मोहीमेतील लॅण्डर मॉड्यूल चंद्रावर
उतरवण्यासाठी सुरक्षित स्थान शोधण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. लॅन्डरवर कार्यरत
असणाऱ्या कॅमेऱ्याच्या साहाय्यानं चंद्राच्या पृष्ठभागाची काही छायाचित्र घेण्यात आली
आहेत. हा कॅमेरा अहमदाबादच्या अंतराळ उपयोजिता केंद्रानं तयार केला आहे. या कॅमेऱ्यानं
टिपलेली चंद्राच्या पृष्ठभागाची ही छायाचित्रे इस्रोनं आज प्रसारित केली. हे मॉड्यूल
चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर बुधवारी संध्याकाळी सहा वाजून चार मिनिटांनी उतरवण्यात
येणार आहे.
****
मुंबईत १६ व्या आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र
आणि खगोलभौतिकी ऑलिंपियाड २०२३ मध्ये ४ सुवर्ण आणि १ रौप्य पदक मिळवून दुसरं स्थान
पटकावलेल्या विद्यार्थ्यांचा होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्रात आज गौरव करण्यात आला.
सुवर्ण पदक पटकावणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये नागपूरच्या आकर्ष राज सहाय या विद्यार्थ्याचा
समावेश आहे.
****
केंद्र सरकारच्या आवास, पाणीपुरवठा, शिक्षण, शहरी
विकास अंतर्गत सर्व पायाभूत सुविधा योजनांचा लाभ सर्वसामान्य नागरिकांना मिळावा यासाठी
सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावं आणि दिशा समितीकडे अहवाल सादर करावा, असे
निर्देश केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री तथा जिल्हा विकास समन्वय आणि सनियंत्रण समितीचे
अध्यक्ष रावसाहेव दानवे यांनी दिले आहेत. औरंगाबाद इथं झालेल्या दिशा समितीच्या बैठकीत
ते आज बोलत होते. गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, अल्पसंख्याक मंत्री अब्दुल सत्तार, विधान
परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, खासदार इम्तियाज जलील यावेळी
उपस्थित होते. जलजीवन मिशन योजनेअंतर्गत ग्रामीण भागामध्ये सर्वांना ‘हर
घर नल से जल',
तसंच पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत सर्वसामान्यांना परवडेल अशा
घराची निर्मिती या योजनांचा गती देण्याबाबत बैठकीत चर्चा झाली.
****
नागपूर मुंबई समृद्धी महामार्गावर रील्स
किंवा छायाचित्र काढण्यास मनाई करण्यात आली असून या आदेशाचे पालन न करणाऱ्यांना ५००
रुपये दंड आणि एक महिन्याच्या तुरुंगवासाची शिक्षा होणार आहे. वाहतूक विभागाकडून याबाबतचे
आदेश जारी करण्यात आले आहेत. औरंगाबादनजीक दौलताबादजवळील महामार्गाच्या पुलावर हुल्लडबाज
तरुण रील्स काढत असल्याचे आढळून आल्याच्या पार्श्वभूमीवर वाहतुक पोलिसांनी हा आदेश
जारी केला आहे. या महामार्गावर गेल्या डिसेंबर पासून आतापर्यंत सुमारे ४०० पेक्षा अधिक
अपघातांची नोंद झाली आहे.
****
आगामी आशिया चषक स्पर्धेसाठी भारतीय क्रिकेट
संघ आज जाहीर करण्यात आला. कर्णधार रोहित शर्मा आणि उपकर्णधार हार्दिक पंड्या यांच्यासह
या संघात विराट कोहली,
शुभमन गिल, श्रेयस अय्यर, के
एल राहुल, सूर्यकुमार यादव,
तिलक वर्मा, ईशान किशन, रवींद्र
जडेजा, शार्दुल ठाकूर,
अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत
बुमराह, मोहम्मद शमी,
मोहम्मद सिराज, प्रसन्न कृष्णा, आणि
संजू सॅमसन यांचा समावेश आहे.
****
****
नागपंचमीचे औचित्य साधून आज अंधश्रध्दा निर्मुलन
समितीच्या वतीने धुळे जिल्ह्यातील निमगुळ गावात सापांविषयी लोकांच्या मनातील अंधश्रध्दा
दूर करीत शेतकऱ्यांसाठी जागृती मोहिम राबवण्यात आली. साप हा शेतकऱ्यांचा मित्र असून
कृषीप्रधान देशासाठी वरदान आहे, सापांच्या विविध जातींपैकी ९५ टक्के साप
हे बिनविषारी असून फक्त पाच टक्के साप विषारी असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
****
No comments:
Post a Comment